अँडॅलुसाइट : खनिज. स्फटिक समचतुर्भुजी गटातले व जवळजवळ चौरस अनुप्रस्थ (आडवा) छेद असणाऱ्या प्रचिनासारखे [→ स्फटिकविज्ञान]. अस्पष्ट स्तंभाकार किंवा कणमय किंवा अरीय (अऱ्यांसारख्या) राशीच्या स्वरूपात आढळते. पाटन : (110) ठळक ते उत्तम [ → पाटन]. भंजन खडबडीत, उपशंखाभ [ → खनिजविज्ञान]. ठिसूळ. कठिनता ७·५. वि.गु. ३·१८. चमक काचेसारखी किंवा निस्तेज. पारदर्शक ते अपारदर्शक, सामान्यत: दुधी काचेप्रमाणे पारभासी. रंग पांढुरका, गुलाबी लाल, लालसर, जांभळा, तपकिरी, पिवळसर हिरवा. कस रंगहीन. काही स्फटिक स्पष्ट द्विरंगी असतात. त्यांच्यातून एका दिशेने प्रकाश येत असताना ते फिकट हिरवे व दुसऱ्या दिशेने येत असताना फिकट लाल दिसतात. रा. सं. Al2SiO5. वितळबिंदू अतिशय उच्च. अम्‍लांनी याचे अपघटन (मूळ रेणूचे तुकडे होऊन लहान रेणू वा अणू बनणे) होत नाही.

स्वच्छ पारदर्शक स्फटिकांचा रत्‍न म्हणून उपयोग होतो. स्पार्क प्लगांसाठी (अंतर्ज्वलन एंजिनात इंधन पेटविण्याकरिता विद्युत् ठिणगी पाडणाऱ्या साधनांसाठी) व इतर कामांसाठी लागणारे उच्चतापसह पोर्सलीन तयार करण्यासाठी अँडॅलुसाइट मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मातीपासून तयार झालेल्या स्लेट, फिलाइट इ. खडकांचे संस्पर्शी (अग्निज खडकांच्या राशीच्या स्पर्शाने) किंवा प्रादेशिक (उच्च तापमान व दाब यांच्यामुळे) रूपांतरण झाल्याने हे खनिज तयार होते. अँडॅलुसाइटाच्या कित्येक स्फटिकांत सूक्ष्म कार्बनमय पदार्थ समाविष्ट झालेले असतात व ते स्फटिकांत अशा नियमित रीतीने रचिले गेलेले असतात की, स्फटिकाचा अनुप्रस्थ छेद पाहिला म्हणजे चौफुलीसारख्या आकृती दिसतात. अशा अँडॅलुसाइटला ‘चिॲस्टोलाइट’ म्हणतात. एकंदरीत अल्प तापमानाच्या व अल्प बाष्पदाबाच्या परिस्थितीत कृत्रिम अँडॅलुसाइट तयार करण्यात आलेले आहे. नाव स्पेनमधील ‘अँडॅलूशा’ नावाच्या प्रांतावरून पडले आहे.

ठाकूर, अ. ना.