खडक : पृथ्वीचे कवच जवळजवळ पूर्णपणे घन पदार्थांचे बनलले आहे. कवचाच्या घन घटकास खडक असे म्हणतात. पृथ्वीचे कवच निरनिराळ्या प्रकारच्या खडकांचे बनलेले आहे. सामान्यत: बहुतेक सर्व खडक कठीण, घट्ट व एकसंध म्हणजे संसक्त असतात. परंतु खडक या शब्दाची भूवैज्ञानिक व्याख्या व्यवहारातल्या नेहमीच्या समजुतीपेक्षा अधिक व्यापक आहे. माती, वाळू, गोटे यांच्यासारखे सुटे पदार्थही भूवैज्ञानिक दृष्टीने खडकच आहेत. खडकांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते सामान्यत: काही विशिष्ट रासायनिक संघटन व त्यानुसार प्राप्त झालेला आकार असलेल्या खनिजांचे असतात. बहुतेक खडक दोन अथवा अधिक खनिजांचे बनलेले असतात. केवळ काही थोडे खडकच जवळजवळ पूर्णपणे एकाच खनिजाचे बनलेले असतात उदा., ⇨ क्वॉर्टझाइट,संगमरवर. खनिजांचे बनलेले नसूनदेखील खडक असणारे काही थोडे अपवाद आहेत उदा., ज्वालाकाच (ऑब्सिडियन) ही खनिज नसलेली ज्वालामुखी काच असून ती खडक आहे. दगडी कोळसा कार्बनी पदार्थांचा बनलेला असतो व तो पण खडकच आहे. ठिसूळ, सुटी ज्वालामुखी राख देखील खडकाचाच प्रकार आहे. खडक निरनिराळ्या क्रियांनी तयार होतात. (१) शिलारसाचे घनीभवन होऊन तयार झालेले ⇨ अग्निज खडक (उदा., बेसाल्ट), (२) गाळाचे निक्षेपण होऊन (साचून) तयार झालेले ⇨गाळाचे खडक (उदा., वालुकाश्म) व (३) कुठल्याही प्रकारच्या आधीच्या खडकांचे रूपांतरण होऊन तयार झालेले ⇨ रूपांतरित खडक (उदा., संगमरवर) हे खडकांचे तीन प्रमुख प्रकार आहेत.

आगस्ते, र. पां.