एडेलमान, जेरल्ड मॉरिस : (१ जुलै १९२९ – ). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. १९७२ चे वैद्यक व शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक एडेलमान यांना आर्. आर्. पोर्टर या ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञांसमवेत विभागून मिळाले.

त्यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. पेन्सिल्व्हानिया विद्यापीठाची वैद्यकीय पदवी त्यांनी १९५४ मध्ये मिळविली. रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेमधून १९६० मध्ये ते पीएच.डी. झाले. १९५४-५५ या काळात त्यांनी मॅसॅच्युसेट्स रुग्णालयात नोकरी केली. १९५७ पासून ते रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये काम करू लागले व तेथेच १९६०–६३ दरम्यान दुय्यम प्राध्यापक होते. १९६६ मध्ये ते जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले. पेन्सिल्व्हानिया विद्यापीठाचा ‘स्पेन्सर मॉरिस’ पुरस्कार व अमेरिकन केमिकल सोसायटीचा ‘इली लीली’ पुरस्कार हे बहुमान त्यांना मिळाले आहेत.

गॅमा-ग्‍लोब्युलीन या रक्तरसातील (रक्त गोठताना त्यातील वेगळ्या होणाऱ्या निवळ द्रवातील) प्रतिपिंडांची (जंतू, त्यांची विषे व इतर विशिष्ट पदार्थ यांना विरोध करणाऱ्या रक्तात तयार होणाऱ्या पदार्थांची) रासायनिक संरचना शोधून काढल्याबद्दल एडेलमान यांना नोबेल पारितोषिक मिळाले. याच विषयावर पोर्टर यांनीही स्वतंत्रपणे संशोधन केलेले आहे. या शोधामुळे शरीराच्या प्रतिरक्षात्मक (रोग प्रतिकार करण्याच्या) कार्याबद्दलच्या संशोधनाचा पाया रचला गेला आहे, असा उल्लेख या दोघा शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक देतांना करण्यात आला आहे.

एडेलमान यांनी प्रथिन-रसायनशास्त्र, अनुस्फुरण वर्णपटिविज्ञान [→ वर्ण पटविज्ञान] व प्रथिनाची प्राथमिक आणि त्रिमितीय संरचना या विषयांवर संशोधन केले आहे.

भालेराव, य. त्र्यं.