उरूब’ पी. सी. कुट्टिकृष्णन् : (८ जून १९१५–   ). एक मलयाळम् कथाकार व कांदबरीकार. ‘उरूब’ हेत्यांचे टोपण नाव. जन्म केरळमधील पोन्नानी येथे. ‘आकाशवाणी’त नोकरी तसेच ‘साहित्य अकादेमी’चे सदस्य. त्यांचे एकूण एकवीस ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

नीरचालुकळ (१९४३), कथिरकट्ट (१९४६), तुरत्रिट्टजालकम् (१९४९), कुंबेटुकुन्ना मन्‍नू (१९५१), नवोन्मेषम्, निलावेलिच्‍चम् वगैरे त्यांचे विशेष प्रसिद्ध कथासंग्रह होत. त्यांच्या कथा विनोदपूर्ण असून जीवनातील विविध अनुभवांवर आधारलेल्या आहेत. उमाचु (१९५४), सुंदरिकळम् सुंदरन्‌मरम् (१९५८) ह्या त्यांच्या विशेष प्रसिद्ध कादंबऱ्या होत. यांपैकी दुसऱ्या कादंबरीला ‘साहित्य अकादेमी’चे पारितोषिक मिळालेले असून तीत केरळमधील मुसलमानांचे जीवन रेखाटलेले आहे. त्यांच्या कादंबऱ्यांत जीवनाच्या बहुविध अंगांचे सूक्ष्म व सखोल दर्शन घडते. खुसखुशीत शैलीमुळे त्यांच्या कादंबऱ्या अत्यंत लोकप्रिय झालेल्या आहेत.

नायर, एस्. के. (इं.) कापडी, सुलभा (म.)