उरा : (दुदला हिं. खिन्ना, लेंडवा क. कुर्डा, नानका लॅ. सेपियम इन्सायने कुल–यूफोर्बिएसी). हा मध्यम आकाराचा, ६–९ मी., क्वचित १५–१८ मी. उंच, पानझडी वृक्ष कोकणातील व उत्तर कारवारातील समुद्रकाठचा प्रदेश, खडकाळ व जांभ्या दगडाच्या जमिनी, घाटावरची दाट जंगले, पश्चिम द्वीपकल्प, तसेच हिमालयाच्या पायथ्यास बियास नदी ते पूर्वेस आसाम, चित्तगाव, ओरिसा, श्रीलंका इ. ठिकाणी आढळतो. यात विषारी पांढरा चीक भरपूर असून तो कातडीस लागल्यास फोड येतात. फांद्या जाड साल करडी व चमकदार असून कोवळेपणी उभ्या मोठ्या सुरकुत्या व जून झाल्यावर मोठ्या भेगा दिसतात. पाने साधी, गर्द हिरवी, एकाआड एक, लांबट गोल कडा दातेरी व प्रपिंडीय (ग्रंथियुक्त), शिवाय देठावर टोकास दोन प्रपिंड असतात. फांद्यांच्या टोकांस पानांची विशेष गर्दी असते. फुलात नर व मादी हा भेद असून ती बिनदेठाची, लहान व शेंड्यावरच्या स्वतंत्र कणिशात डिंसेबर-फेब्रुवारीमध्ये येतात. थंडीत पाने झडतात तेव्हाच फुलोरे येतात. फळे (बोंडे) गोलसर असून त्यांत २-३ कप्पे असतात. [→ यूफोर्बिएसी].
लाकूड पांढरे किंवा किंचित करडे व मऊ असून पादत्राणांचे तळ व ढोलकी यांसाठी वापरतात.
पहा : वनस्पती, विषारी शिशम, विलायती.
पटवर्धन, शां. द.