उमय्या खिलाफत : (६६१–७५०). इस्लाम धर्मातील एक प्रसिद्ध खिलाफत. अब्द-शम्स ह्या मक्केतील कुरैश जमातीमधील उमय्या ह्या व्यक्तीवरून तिला हे नाव प्राप्त झाले. ह्या वंशाच्या खिलाफतीस अरबी राज्य असेही म्हणतात. मुहंमद पैगंबराच्या वेळी हे व्यापारी कुटुंब म्हणून प्रसिद्धीस आले. ह्या कुटुंबातील सुफ्यान हा मुहंमदाविरुद्ध असणाऱ्या लोकांचा प्रथम पुढारी होता पण पुढे त्याने इस्लाम धर्म स्वीकारला. मुहंमद आणि त्यानंतरच्या खलीफांनी ह्या घराण्यातील लोकांचा प्रशासकीय कामाकरिता उपयोग करून घेतला. मुआविया हा ह्या वंशातील पहिला खलीफा. त्याने मुहंमद पैगंबराचा जावई अली ह्याच्या खुनानंतर खलीफा पदावर आलेल्या हुसैन ह्या मुलास सक्तीने खलीफापदाचा त्याग करावयास लावून आपणाकडे खलीफापद घेतले. तत्पूर्वी तो सिरियाचा राज्यपाल होता आणि त्याने आपली सत्ता ईजिप्तपर्यंत वाढविली होती.

उमय्या खिलाफतीत एकूण चौदा खलिफा झाले : (१) मुआविया (६६१–६८०) (२) यझिद (६८०–६८३) (३) दुसरा मुआविया (६८३) (४) पहिलामेरवान (६८३–६८५) (५) अब्दुल मलिक (६८५–७०५) (६) पहिला वालिद (७०५–७१५) (७) सुलैमान (७१५– ७१७) (८) दुसरा उमर (७१७–७२०) (९) दुसरा यझिद (७२०–७२४) (१०) हिशम (७२४–७४३) (११) दुसरा वालिद (७४३) (१२) तिसरा यझिद (७४३–७४४) (१३) इब्राहिम (७४४) आणि (१४) दुसरा मेरवान (७४४–७५०).

मुआविया खलीफापदावर येताच त्याने आपला प्रतिपक्षी झियाद ह्यास बसर्‍याचा प्रांताधिकारी म्हणून नेमले व तो आपल्यामागून खलीफा होणार, असे जाहीर केले. मुआविया कर्तबगार राज्यकर्ता होता. त्याने सर्वत्र शांतता निर्माण केली आणि राजधानी दमास्कस ह्या ठिकाणी हलविली. त्याच्या अमदानीत इस्लामचा विशेषतः उत्तरेकडे खूप विस्तार झाला. पूर्वेकडे त्याने सिंधू नदीपर्यंत व ईशान्येस अमुदर्याच्या पलीकडे बूखारा शहरापर्यंत इस्लामी धर्माचा प्रसार केला होता. मुआविया ६८० मध्ये मरण पावला. मरण्यापूर्वी त्याने आपला मुलगा यझिद ह्यास खलीफा करण्याचे ठरविले कारण झियाद हा ६७८ मध्ये मरण पावला.

याझिद खलीफा झाल्यावर त्याचा हक्क हुसैन व अब्दुल्ला ह्या त्याच्या विरोधकांनी मान्य केला नाही. कूफाच्या नागरिकांनी हुसैनला खलीफा होण्याविषयी आग्रह धरला. तथापि यझिदच्या सैन्याने हे कूफाचे बंड मोडून काढले आणि हुसैनच्या शोधार्थ त्याचे सैन्य धाडण्यात आले. हुसैनने माघार घेतली, तरीसुद्धा मुहंमदाचा हा नातू अनुयायांसह मारला गेला. ह्यानंतर मक्का व मदीना या शहरांनी यझिदविरुद्ध बंड केले. त्याच्या सैन्याने मदीना जिंकून घेतले व मक्केकडे मोर्चा वळविला. दरम्यान यझिद मरण पावला व त्याचा २१ वर्षांचा मुलगा दुसरा मुआविया गादीवर आला. पण हा स्वतः शिया पंथी होता आणि त्याने खलीफापदाची निवडणूक व्हावी, असा आग्रह धरल्यामुळे त्याचा अवघ्या ४५ दिवसांत खून झाला.

दुसरा मुआविया गेल्यानंतर त्याच घराण्यातील मदीनेच्या मेरवान ह्या वयस्क गृहस्थाने खलीफापदाचे अधिकारग्रहण केले. त्याने सिरिया, ईजिप्त इ. प्रदेशांवर आपली सत्ता प्रस्थापित केली कारण हे प्रदेश स्थानिक राज्यपालांनी ह्या सुमारास गिळंकृत केले होते. शिवाय उमय्याच्या शत्रूंत बंडाळी माजली. त्याचा फायदा मेरवान घेत असता त्याच्या बायकोने त्यास मारले. कारण ही प्रथम यझिदची पत्नी होती, नंतर तिने मेरवानबरोबर विवाह केला होता. तिला आपला पहिला मुलगा खलीद हा खलीफा व्हावा असे वाटत होते परंतु मेरवानने अब्दुल मलिक ह्या आपल्या मुलास खलीफा करण्यासाठी खटपट सुरू केली. अर्थात मेरवानचा खून होऊनही अब्दुल मलिकने अनेक लढाया करून खलीफापद मिळविले. त्याच्या ताब्यात सर्व अरबस्तान आला होता. ग्रीकांनी बर्बर लोकांशी संगनमत करून अब्दुल मलिकच्या सैन्यास मागे रेटले पण त्याचा मुलगा मूसा याने व सेनापतीने हाही पराभव धुवून काढला, कार्थेज जिंकले आणि सिसिली व सार्डिनिया ह्यांवर स्वारी केली. मूसाने इस्लामची दीक्षाही देण्यास सुरुवात केली. अब्दुल मलिक ७०५ मध्ये मरण पावला व त्यानंतर त्याचा मुलगा वालिद खलीफापदावर आला. ह्याची राजवट अत्यंत भरभराटीची गेली आणि स्पेनमध्ये इस्लामचा प्रवेश झाला. त्याच्यानंतर आलेल्या सुलैमान, दुसरा उमर, दुसरा यझिद, हिशम वगैरे खलीफांनी इस्लाम धर्माचा प्रसार व प्रचार करून आपली अधिसत्ता आफ्रिकेच्या उत्तर व मध्य प्रदेशांवर तसेच आशिया मायनरवर दृढ केली. पण ७२५ मध्ये टूर्स येथे अरबांचा पराभव झाला आणि उमय्या खिलाफतीस अपकर्षाचा काळ आला. ७५० मध्ये मेरवानला मारून अबुल अब्बासने खलीफापद मिळविले व अब्बासी खिलाफतीची स्थापना झाली.

अबुल अब्बासने उमय्या घराण्यातील व्यक्तींची कत्तल केली. त्यांतून निसटून उमय्या घराण्यातील एक इसम स्पेनमध्ये गेला. अब्दुर रहमान हे नाव धारण करून त्याने कॉर्दोव्हाचा अमीर असे ७५६ मध्ये जाहीर केले. दहाव्या शतकात ह्या वंशातील तिसर्‍या अब्दुर रहमानने ह्या अमीरपदाचे खलीफापदात रूपांतर केले. ते खलीफापद पुढे १०३१ पर्यंत स्पेनमध्ये चालू होते. ह्या घराण्यातील हाकीम, अब्दुर रहमान, हिशम, मुंधिर वगैरे व्यक्तींनी वरील काळात खलीफापद उपभोगले.

उमय्यांच्या अमदानीत दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या : (१) इस्लाम धर्मामध्ये शिया व सुन्नी असे दोन पंथ निर्माण झाले. उमय्या वंशातील बहुतेक खलीफा सुन्नी पंथाचे होते, फक्त दुसरा मुआविया ह्याने शिया पंथाचा स्वीकार केला होता. ६६१ पर्यंत खलीफापद हे लोकांच्या मताप्रमाणे चालत असे आणि खलीफाची निवड होई. परंतु मुआवियाने ही प्रथा बंद करून ते वंशपरंपरागत केले व ७५० पर्यंत ते एकाच घराण्यात होते.

ह्याशिवाय उमय्यांच्या वेळी अरबी संस्कृती, कला व विद्या ह्यांचा सर्वत्र प्रसार झाला. राजधानी दमास्कस ह्या मध्यवर्ती ठिकाणी हलविण्यात आली. ह्या राजधानीच्या शहरात अनेक सुंदर इमारती व राजवाडे बांधण्यात आले. तत्कालीन जगतात ते एक सुंदर शहर बनले. उमय्यांनी इस्लाम धर्माचा प्रसार आफ्रिका खंडात, तसेच आशिया मायनरपर्यंत केला. अरबस्तान बाहेरील अनेक जातिजमातींचा इस्लाम मध्ये समावेश झाला. त्यांचे राज्य खूप फोफावले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या काळी भारतामध्ये सिंधू नदीपर्यंत इस्लाम धर्माचे लोण पोहोचले. इस्लामी साम्राज्यांपैकी एक बलशाली साम्राज्य म्हणून उमय्यांचा उल्लेख इतिहासात होतो.

पहा : खिलाफत.

संदर्भ : 1. Rauf, M. A. A Brief History of Islam, Oxford, 1964.

           2. Spuler, Bertold Trans. Bagley, F. R. C. The Muslim World, Part I, Leiden, 1960.

ओक, द. ह.