उपदंश: ट्रिपोनेमा पॅलिडम  या रंगविहीन मळसूत्राकार जंतूच्या संसर्गामुळे होणाऱ्या सार्वदेहिक रोगालाउपदंश, गरमी, अथवा फिरंग रोग असे म्हणतात. या रोगाचा संसर्ग मुख्यत्वे संभोगाद्वारे होतो. हा रोग पाश्चात्य देशांतून भारतात आला. पोर्तुगीज लोकांना पूर्वी फिरंगी असे म्हणत असल्यामुळे या रोगास फिरंग रोग हे नाव पडले.

इतिहास : कोलंबसाबरोबरच्या खलाशांद्वारे हा रोग अमेरिका खंडातून यूरोपमध्ये आला असे म्हणतात. कित्येकांच्या मते वेस्ट इंडीज बेटातून हा रोग यूरोपमध्ये आला. सन १४९५ मध्ये इटलीतील नेपल्स या शहरी हा रोग साथीच्या स्वरूपात दिसला. १९०३ मध्ये मेशनिकॉफ यांनी चिंपँझी जातीच्या माकडांना संसर्ग करून हा रोग माकडांत होऊ शकतो असे दाखविले. १९०५ मध्ये शॉडिन आणि होफमान यांनी ट्रिपोनेमा पॅलिडम हा जंतू या रोगाचे मूळ कारण असलयाचे प्रथम शोधून काढले. १९०६ मध्ये वासरमान यांनी या रोगाच्या निदानास मदत होईल अशी रक्‍तपरीक्षा शोधून काढली. १९१० मध्ये अर्लिक यांनी ६०६ वेळा प्रयोग करून या रोगावरील ‘साल्व्हरसान’ हे आर्सेनिकयुक्त औषध शोधून काढले. हा शोध म्हणजे ⇨ रासायनिक चिकित्सेचा जन्म मानला जातो. पेनिसिलीन व इतर प्रतिजैव औषधे [→ प्रतिजैव पदार्थ] शोधून काढण्यात आल्यापासून हा रोग पूर्णपणे साध्य झालेला आहे.

जॉन हंटर या शास्त्रज्ञांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस या रोगाचे जंतू स्वत:च्या शरीरात टोचून घेऊन पुढे तीन वर्षेपर्यंत त्यांना होत गेलेली सर्व लक्षणे विस्ताराने वर्णिली आहेत. वैद्यकशास्त्रात असा धाडसी प्रयोग करून शास्त्रज्ञाने स्वतःचे मरण जवळ ओढवून घेतल्याचे हे संस्मरणीय उदाहरण आहे.

उपदंश जंतू: या रोगाचा जंतू ट्रिपोनेमा पॅलिडम  हा सारख्या अंतरावर ८ ते १५ वेटोळी असलेला आणि सु. ५ ते २० मायक्रॉन (१०-६ मीटर) लांब असतो. या जंतूचे नेहमी वापरात असलेल्या रंजकद्रव्यांनी रंगवून सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले, तरी तो दिसू शकत नाही परंतु कृष्णक्षेत्रदीप्ति-परीक्षेने (सूक्ष्मदर्शकातील दृष्टीक्षेत्राच्या मध्यभागी अंधार करून फक्त बाजूने प्रकाश पाडून करावयाच्या परीक्षेने) तो दिसू शकतो. जंतुनाशके, साबण, उष्णता आणि निर्जलीकरण यांमुळे हा जंतू त्वरीत नष्ट होतो. शरीराबाहेर कृत्रिम माध्यमावर या जंतूचे प्रजनन अजून शक्य झालेले नाही. शीतपेटीत ठेवलेल्या रक्तात तो फार तर २-३ दिवसच जगू शकतो.

संभोगाखेरीज इतर कारणांनी या जंतूंचा संसर्ग होणे शक्य असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र संभोगामुळेच मुख्यतः या रोगाचा प्रसार होतो. त्वचा आणि श्लेष्मकला (आतड्यासारख्या अंतर्गत इंद्रियाच्या आतील भागावरील बुळबुळीत अस्तर) अभेद्य आहे तोपर्यंत हा जंतू शरीरात प्रवेश करू शकत नाही, परंतु अतिसूक्ष्म अशा ओरखड्यातून प्रवेश करून तो लसीका मार्गाने [स्वच्छ, पिवळसर व रक्तातील पांढऱ्या पेशींनीयुक्त असलेला द्रव वाहून नेणाऱ्या मार्गाने, → लसीका तंत्र] सर्व शरीरभर पसरू शकतो.

अवस्था: वेळीच योग्य उपचार न झाल्यास या रोगाच्या एकीमागून एक अशा पुढील तीन अवस्था दिसतात :

(१) प्रथमावस्था: ओरखड्यातून जंतुप्रवेश झाल्यानंतर सु. तीन ते सहा आठवड्यांच्या परिपाक कालानंतर, जेथे जंतुप्रवेश झाला त्या जागी प्राथमिक क्षत अथवा व्रण (जखम) उत्पन्न होतो. शिश्नत्वचेवर अथवा योनिमुखापाशी प्रथम लाल फोड येतो. तो गव्हाच्या आकाराचा आणि टणक असून लौकरच त्याच्या पृष्ठभागावर व्रण तयार होतो. या व्रणाच्या तळाशी आणि कडांवर शुभ्र-तंतू-ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या पेशींचा – येथे शुभ्र तंतुमय पेशींचा समूह) उत्पन्न होत असल्यामुळे हा व्रण हाताला कठीण लागतो म्हणून त्याला कठीण रतिव्रण असे नाव पडले आहे. हा व्रण वेदनारहित असून त्याचा पृष्ठभाग कणात्मक (रवाळ) आणि लाल रंगाचा दिसतो. व्रणाच्या जवळच्या लसीकाग्रंथी मोठ्या होतात पण दुखत नाहीत अथवा त्यांमध्ये पू होऊन विद्रधी (पूयुक्त फोड) होत नाही. हा व्रण काही काळाने आपोआप बरा होत असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याचा संभव असतो.

(२) द्वितीयावस्था: प्राथमिक व्रणोत्पत्तीनंतर सु. चार ते सहा आठवड्यांनी त्वचेवर पीटिका (लाल फोड) उत्पन्न होतात. या पीटिका प्रथम छाती व पोट यांवर दिसतात व पुढे सर्वांगावर पसरतात. या पीटिका प्रथम लाल रंगाच्या असून त्यांच्या भोवती सूज नसते. तोंडात, घशात आणि जननेंद्रियावरही अशा पीटिका उठतात. या पीटिकांमधील लसीकेत सर्पिल जंतू सापडतात.

डोकेदुखी, अस्वस्थपणा आणि संधिशोथ (सांध्याची दाहयुक्त सूज) ही लक्षणेही या अवस्थेत दिसतात. विशेषतः हाडांमध्ये रात्रीच्या वेळी वेदना होतात. सर्व शरीरातील लसीकाग्रंथी मोठ्या झालेल्या असतात. विशेषतः मानेच्या पश्च त्रिकोणात आणि कोपराच्या वरच्या बाजूची लसीकाग्रंथी हाताला लागू लागते. नेत्रपटलशोथ (डोळ्यातील थरांची दाहयुक्त सूज), परिमस्तिष्कशोथही (मेंदू भोवतीच्या आवरणाची दाहयुक्त सूजही) होऊ शकतो.

(३) तृतीयावस्था: ही अवस्था सुरुवातीपासून सु. दहा ते वीस वर्षांनंतर दिसते. सर्व शरीरातील सूक्ष्म रोहिण्यांच्या अंतःस्तराला शोथ आल्यामुळे या अवस्थेतील लक्षणे सार्वदेहिक असतात. शरीरात कोठेही चिकट व घट्ट अशी अर्बुदे (पेशींच्या अतिरिक्त वाढीमुळे निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेस निरुपयोगी असणाऱ्या गाठी) उत्पन्न होतात त्यांना रत्यर्बुदे असे म्हणतात. त्वचा, श्लेष्मकला, अस्थी वगैरे ठिकाणी अशी अर्बुदे होतात. सांध्यामध्ये द्रव साठून थोड्याच दिवसांत सर्व सांधा विरघळून गेल्यासारखा होतो. स्वरयंत्र (आवाज उत्पन्न करणाऱ्या दोन तंतूंचे बनलेले घशातील इंद्रिय) आणि पचन तंत्रातील (पचन संस्थेतील) इंद्रियांतील अशीच अर्बुदे उत्पन्न होतात. परिमस्तिष्क व मस्तिष्कातील (मेंदूतील) विविध केंद्रांमध्ये विकृती झाल्यामुळे झटके, पक्षाघात वगैरे लक्षणेही दिसतात. मेरुरज्‍जूच्या (पाठीच्या कण्याच्या पोकळीतून गेलेल्या दोरीसारख्या मज्‍जारज्‍जूच्या) एखाद्या खंडकात शोथ झाल्यामुळे कमरेपासून खालच्या भागात पक्षाघात होतो व मलमूत्रोत्सर्गावरील नियंत्रण नाहीसे होते.

या अवस्थेच्या शेवटी केंद्रीय तंत्रिका तंत्रात (केंद्रीय मज्‍जासंस्थेत) विकृती होऊन मस्तिष्कातील कोशिकांचा नाश झाल्यामुळे रोग्याच्या व्यक्तिमत्त्वात बदल दिसू लागतो. निद्रानाश, स्मृतिभ्रंश, चिडखोरपणा आणि विपरीत वागणूक दिसू लागते तसेच मनोविकृती, वैचारिक गोंधळ वगैरे मानसिक विकार अथवा बढाईखोरपणा, बडबड वगैरे लक्षणेही दिसतात. या प्रकाराला मनोविकृत सर्वांगवध (मनाच्या विकृतींबरोबरच सर्वांगावरून वारे जाणे) असे नाव आहे.


मेरुरज्‍जूत येणाऱ्या अभिवाही तंत्रिकांच्या पश्चमूलांत (खाली येणाऱ्या मज्‍जातंतूच्या मागील भागांत) विकृती झाल्यामुळे संवेदनाविकृती (स्पर्श, वेदना वगैरेंबद्दलचा विकार) होतो. हातापायास मुंग्या येणे, बधिरपणा, कंडराप्रतिक्षेपांचा (एक स्‍नायू दुसऱ्या स्‍नायूला किंवा हाडाला ज्या तंतुमय ऊतकाद्वारे जोडलेला असतो त्याच्या अनैच्छिक क्रियेचा) नाश, विपरीत संवेदना, गतिदोष वगैरे लक्षणेही दिसू लागतात. या प्रकाराला पश्चमूलक्षय असे म्हणतात.

वर वर्णन केलेल्या दोन्ही प्रकारांत डोळ्यांवर प्रकाशझोत टाकला असता बाहुली आकुंचित होत नाही परंतु तीच बाहुली जवळचे पाहण्याचा प्रयत्‍न केल्यास आकुंचित होते. या लक्षणाचे निदानात फार महत्त्व आहे. त्याला आरगाईल-रॉबर्ट्सन-बाहुलीअसे म्हणतात.

निदान: पहिल्या व दुसऱ्या अवस्थेत कृष्णक्षेत्रदीप्ति-परिक्षेने रोगजंतू दिसू शकतात त्याची निदानास चांगली मदत होते. उपदंशाची विविध अवस्थांतील लक्षणे इतकी विविध आहेत की, या रोगाच्या निदानासंबंधी पुष्कळ वेळा संभ्रम पडतो. पहिल्या अवस्थेच्या १०–१२ दिवसांपासून सर्व अवस्थांमध्ये रक्त, मस्तिष्कद्रव्य वगैरे द्रवांची विशिष्ट पद्धतीने परीक्षा केल्यास निदान सुलभ होते. अशा अनेक पद्धती प्रचारात आहेत. वासरमान व कान या शास्त्रज्ञांच्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या रक्तपरीक्षा फार उपयुक्त आहेत. अलीकडे आणखीही कित्येक परीक्षा पद्धती वापरात आलेल्या आहेत. त्यांपैकी व्ही. डी. आर. एल. (व्हेनेरिअल डिसिझेस रिसर्च लॅबोरेटरी) पद्धत विशेष विश्वसनीय असून, उपदंश-जंतूपासून बनविलेल्या प्रतिजनांचा [शरीरात प्रताकरक्षम प्रतिपिंडे निर्माण करणाऱ्या पदार्थांचा, प्रतिजन] उपयोग करून इतरही अनेक परीक्षा पद्धती वापरण्यात येत आहेत [→ विकृतिविज्ञान, उपरुग्ण].

जन्मजात उपदंश: मातेपासून मुलाला या रोगाचा संसर्ग झाला तर गर्भ चांगला पोसला जात नाही. गर्भपात होण्याचाही संभव असतो. मूल कमी दिवसांचे म्हणजे ७-८ महिन्यांचेच जन्माला आले, तर त्याचे कातडे सुरकुतलेले व त्वचेवर स्फोटके (फोड) दिसतात. अर्भकावस्थेत नाक आणि कान या ठिकाणी विकृती, ओठांच्या कोपऱ्यात व्रण, यकृत व प्लीहावृद्धी ही लक्षणे दिसतात. सहा ते बारा महिन्यांच्या मुलात नेत्रशोथ, डोक्याच्या अस्थींचा शोथ आणि दोन वर्षे वयाच्या मुलात संधिशोथ, नाकाचे हाड बसकट होणे, द्रवमस्तिष्क (मेंदूभोवती द्रव साठणे) वगैरे लक्षणे दिसतात. त्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलांचे कायम दात टोकाला निमुळते व खाच असलेले असे दिसतात.

प्रतिबंध: उपदंशाचा प्रतिबंध करण्याचे प्रमुख साधन म्हणजे सर्वसाधारण लोकांना या रोगाच्या गंभीर परिणामाची जाणीव करून देणे हे होय. गरीब, अशिक्षित लोकांमध्ये या रोगाच्या गांभीर्याची जाणीव नसते तसेच हा एक गुप्त रोग मानला जात असल्यामुळे त्याविरुद्ध वेळीच चिकित्सा काढून घेतली जात नाही. अथवा पुरेशी चिकित्सा होण्याच्या आतच ती बंद करण्यात येते. रक्ताच्या तपासणीमध्ये रोगाचा पूर्ण नायनाट झालेला दिसल्याशिवाय चिकित्सा थांबविणे फार धोक्याचे असते. तरुणांना लैंगिक शिक्षणाबरोबरच या रोगाची माहिती देणे फार महत्त्वाचे आहे.

संशयित व्यक्तीशी संभोग न करणे हा प्रतिबंधाचा उत्तम मार्ग. संभोगाच्या वेळी रबराची पिशवी वापरली असता रोगप्रतिबंध होऊ शकतो. संशयित संभोगानंतर २-३ तासांत जननेंद्रिये पाणी व साबण यांनी स्वच्छ धुवून लगेच तेथे पारदाचे मलम चोळल्यावरही प्रतिबंध होऊ शकतो. सैनिक संघटनांमध्ये अशी सोय मुद्दाम करण्यात येते. संसर्गाचा संशय आल्यास पेनिसिलीन हे औषध टोचून घेतल्यासही प्रतिबंध होऊ शकतो.

वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची वारंवार तपासणी करण्याचा प्रघात अनेक देशांत सुरू करण्यात आल्यापासून रोगप्रसाराला आळा घालण्याच्या दृष्टीने असा तपासणीचा फार उपयोग आहे.

चिकित्सा: पूर्वी आर्सेनिक, पारद आणि पोटॅशियम आयोडाइड ही औषधे वापरीत. आर्सेनिकापासून बनविलेल्या साल्व्हरसानाचा उल्लेख वर आलाच आहे.

पेनिसिलीन व तत्सदृश इतर प्रतिजैव औषधे अत्यंत गुणकारी ठरली असून त्यांचा वेळीच उपयोग केला असता उपदंश लवकर बरा होतो. मात्र रक्तपरीक्षेने रोग पूर्णपणे बरा झाल्याची खात्री होईपर्यंत चिकित्सा चालू ठेवावी लागते. लक्षणे नाहीशी झाल्याबरोबर चिकित्सा थांबविली तर काही काळाने रोगलक्षणे पुन्हा दिसू लागतात म्हणून रक्तपरीक्षा पूर्णपणे समाधानकारक होईपर्यंत चिकित्सा चालू ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे. सर्व चिकित्सा थांबविल्यानंतरही पाच वर्षेपर्यंत वारंवार रक्तपरीक्षा करावी लागते व त्यानंतरच रोग पूर्णपणे नाहीसा झाल्याची खात्री देता येते.

पहा : गुप्त रोग.

अभ्यंकर, श. ज.

आयुर्वेदीय चिकित्सा: हा रोग झालेल्या स्त्रियांशी संयोग केल्याने किंवा ह्या रोगाने पीडित व्यक्तीशी संपर्क आल्याने हा रोग होतो. हा तीन प्रकारचा असतो. बाह्य, आभ्यंतर व दोन्ही मिळून. (१) बाह्य : भाजल्याप्रमाणे लिंगमण्यावर फोड येणे, फोडात वेदना थोड्या आसतात. तो फुटला म्हणजे व्रण होतो. या अवस्थेत चिकित्सा केली म्हणजे तो साध्य होतो. (२) आभ्यंतर : आमवातासारखी पीडा व सूज असते. हा कष्टसाध्य आहे. (३) बाह्याभ्यंतर : संधीच्या ठिकाणी हाडांचा शोथ, हाडे वाकडी होणे, नाक सडणे व गळणे इ. लक्षणे होतात. हा असाध्य आहे.

उपचार: व्रणावर त्रिफलामधी किंवा कज्जली तुपामधून लावावी. रसकापुराच्या पाण्याने तो व्रण धुवावा. पोटात व्याधिहरण १ गुंज, दोन वेळा तुपात. आभ्यंतरावर महायोगराज गुग्गुळ, त्रिफला गुग्गुळ वा कांचनार गुग्गुळ मध तुपाबरोबर द्यावा. बाह्याभ्यंतरावर अष्टमूर्तिरसायन वा षट्गुणगंधकजारितमल्लसिंदूर १/२ प्रमाणात तूप-मधाबरोबर द्यावा. या रोगातील दोषदूध्यांना अनुसरूनही चिकित्सा करावी.

जोशी, वेणीमाधवशास्त्री