उडीद : (हिं. उडद, ठिकिरी; गु. अडेद; क. उडदू; सं. माष, पितृभोजन; इं. ब्‍लॅक ग्रॅम; लॅ. फॅसिओलस मुंगो; कुल-लेग्युमिनोजी; उपकुल-पॅपिलिऑनेटी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी), शिंबावंत (शेंगा येणारी) वेल मूळची उष्णकटिबंधीय आशियातील आहे. तिच्या खोडावर बारीक केस असून तिच्या अनेक फांद्या जमिनीवर पसरतात. पाने संयुक्त, त्रिदली व एकाआड एक; दले रूंद, अंडाकृती, पातळ, टोकदार; उपपर्णे रुंद व काहीशी त्रिकोनी. फुले लहान, पिवळी व पाचसहाच्या झुबक्यांनी येतातफुलांची रचना पतंगरूप [→ अगस्ता; लेग्युमिनोजी]; शेंग (शिंबा) गोलसर व लांब; शेंगेत १०–१५, गर्द करड्या किंवा काळ्या बिया असतात. हिरव्या बियांचा प्रकारही आढळतो.

उडीद : (१) शेंगांसह फांदी, (२) पान, (३) तडकलेली शेंग, (४) फूल, (५) दाणे.

माणसांसाठी तसेच जनावरांसाठीही बिया उत्तम पौष्टिक खाद्य आहे. शिजविलेली डाळ मातेस दुग्धवर्धक असते. तिच्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. उडदाच्या डाळीच्या पिठापासून पापड व वडे बनवितात. महाराष्ट्राच्या खानदेश भागात ज्वारीच्या पिठात उडदाचे पीठ मिसळून त्याच्या भाकरी करून खातात. दक्षिण भारतात तांदूळाच्या पिठात उडदाचे पीठ मिसळून त्याचे इडली व डोसा हे खाद्यपदार्थ बनवितात. पंजाबात तुरीच्या डाळीपेक्षा उडदाची डाळ जास्त प्रमाणात खातात. उडीद उष्ण, वृष्य (कामोत्तेजक) व मूत्रल (लघवी साफ करणारे) असून संधिवात, पक्षाघात व तंत्रिका तंत्राचे (मज्‍जासंस्थेचे) विकार इत्यादींवर काढा पोटात घेण्यास व बाहेरून लावण्यास उपयुक्त. मूळ मादक (अमली) असून दुखणाऱ्या हाडावर गुणकारीआखडलेले गुडघे व खांदे यांवरही उपयुक्त. उडदाचे पीठ निखाऱ्यावर टाकून निघालेला धूर नाका-तोंडाने आत घेतल्यास उचकी थांबते. पिठाचा लेप कपाळावर लावल्यास घोळण्यातून (नाकपुड्यांतील मांसल भागांतून) होणारा रक्तस्राव थांबतो.

सोयाबीन वगळल्यास प्रथिनाचे प्रमाण जास्त असलेले कडधान्य म्हणून उडदाचे महत्त्व विशेष आहे. उडदात फॉस्फोरिक अम्‍लाचेही प्रमाण अधिक आहे.

भारतात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांत उडदाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. ते इराण, मलाया, पूर्व आफ्रिका, ग्रीस इ. प्रदेशांतही पिकविले जाते.

हंगाम : हे मुख्यत: पावसाळी हंगामातील पीक असून त्याची पेरणी जून-जुलै महिन्यांत करतात. थोड्याबहुत प्रमाणात ते रब्बी हंगामातही पेरतात. पीक ८५ ते ९० दिवसांत तयार होते.

जमीन व हवामान: या पिकाला सकस काळी, भारी प्रकारची जमीन लागते. पाणी धरून ठेवणारी मळीची जमीन जास्त मानवते. मध्यम काळ्या पण खोल जमिनीत तसेच काळ्या कपाशीच्या जमिनीतही हे पीक लावतात. ते जसे उष्ण प्रदेशांत तसेच समुद्रसपाटीपासून १,८०० मी. उंचीवरील थंड प्रदेशांतही येऊ शकते. डोंगरी भागांतील आणि दमट हवामानाच्या भागांतील उडीद चांगला शिजतो.

मशागत : जमीन नांगरून दोन तीन कुळवाच्या पाळ्या देऊन मोकळी करून सपाट करतात. तिच्यामध्ये दर हेक्टर क्षेत्राला ५,०००–६,००० किग्रॅ. शेणखत अगर कंपोस्ट खत घालून ३५–५० किग्रॅ. फॉस्फेरिक अम्‍ल आणि २५–५० किग्रॅ. नायट्रोजन मिळेल इतकी रासायनिक खते घालून जमीन तयार करतात. तिच्यामध्ये काकरीत ३०–३६ सेंमी. अंतर ठेवून हेक्टरी १०—१२ किग्रॅ. बी पेरतात. उडदात सुधारलेले वाण आहेत. त्यांचे बी भारतातील बहुतेक प्रांतांतून मिळू शकते. बी पेरल्यानंतर जमीन दाबण्याकरिता फळी फिरवितात. पीक एकटेच स्वतंत्रपणे किंवा कापूस, मका, ज्वारी अगर बाजरीच्या पिकात मिश्रपीक म्हणून घेतात.

काही ठिकाणी पेरल्यानंतर पंधरा दिवसांनी ओळीतील रोपांत २०–२५ सेंमी. अंतर ठेवून रोपांची विरळणी करतात. पेरणीपासून २०–२५ दिवसांनी एक कोळपणी करून खुरपाणी करतात. त्यानंतर पीक झपाट्याने वाढते. म्हणून जरूरीप्रमाणे पुन्हा एकदा कोळपणी आणि खुरपणी करतात.

काढणी : शेंगा पिकून काळ्या दिसू लागल्या म्हणजे एक दोन तोड्यात त्या काढून घेतात. खळ्यावर नेऊन त्या चांगल्या वाळवितात. वाळल्यानंतर काठीने बडवून अगर बैलांच्या पायाखाली तुडवून त्यांची मळणी करतात. नंतर भुसकट उफणून उडीद काढून घेऊन साफ करून पोत्यात भरून साठवून ठेवतात. काही ठिकाणी पीक तयार झाल्यावर शेंगांसह झाडे उपटून घेऊन सात-आठ दिवस ती खळ्यात वाळू देतात आणि नंतर वरीलप्रमाणे त्यांची मळणी करतात.

उत्पन्न : सरासरी प्रति-हेक्टर उत्पन्न ५०० ते ७५० किग्रॅ. दाणे आणि १,५०० ते १,६०० किग्रॅ. भुसकट मिळते. भुसकट जनावरांना चारतात.

रोग : या पिकाला क्वचित भुरी आणि तांबेरा रोगांपासून अपाय होतो म्हणून या रोगांना प्रतिबंध करणाऱ्या वाणांचे बी वापरणे श्रेयस्कर असते.

कीड : माव्यापासून या पिकाला अपाय होतो आणि पोरकिड्यांपासून साठवून ठेवलेल्या दाण्यांना उपद्रव पोहोचतो.

परांडेकर, शं. आ.; आर्गीकर, गो. प्र.