कासोदा : (रानकासविंदा, रानटाकळा, कासिवदा हिं. कासोंदा गु. कासुंदरी क. दोड्डा तगसे सं. अरिमर्दा, कासारी, कासमर्दा इं. नीग्रो कॉफी, स्टिंकिंग वीड लॅ. कॅसिया ऑक्सिडें‌टॅलिस कुललेग्युमिनोजी, सीसॅल्पिनिऑइडी). हे वर्षायू क्षुप (एक वर्ष जगणारे झुडूप) भारतात आणि उष्णकटिबंधात सर्वत्र आढळते. सामान्य शारीरिक लक्षणे त्याच वंशातील तरवड, बाहवा, टाकळा यांच्याप्रमाणे व त्यांच्या कुलात [→ लेग्युमिनोजी] वर्णिल्याप्रमाणे. खोड ०⋅६—१⋅५ मी. उंच फांद्या जांभळट व त्यावर खोलगट रेषा सोपपर्ण (उपपर्णयुक्त) पाने १५—२० सेंमी. लांब, संयुक्त व पिसासारखी दले ३—५ जोड्या फुले लहान व पिवळी त्यातील पाच पाकळ्यांवर नारिंगी रेषा असून ती पानांच्या बगलेत व फांद्यांच्या टोकास, परिमंजऱ्यासारख्या फुलोऱ्यावर जानेवारी–मार्चमध्ये येतात. केसरदलांपैकी तीन वंध्य, तीन लांब व चार आखूड असतात [→ फूल]. शिंबा (शेंग) चपटी, १०—१२ x ८ सेंमी. व गाठाळ बिया १५—३०, हिरवट, कठीण, गुळगुळीत व परस्परांपासून पडद्यांनी अलग झालेल्या असतात. सर्व भाग मूत्रल (लघवी साफ करणारे), रेचक, पौष्टिक व ज्वरनाशक. पानांचा व बियांचा उपयोग पाळीच्या तापावर व त्वचारोगांवर करतात. पाने चुरगळल्यावर घाण वास येतो त्यावरून इंग्रजी नाव पडले, तसेच भाजलेल्या बियांची पूड कॉफीऐवजी वापरतात म्हणून नीग्रो कॉफी म्हणतात. कोकणात मुलांच्या आकडीवर बियांचा उपयोग करतात. दुष्काळात पाने भा‌जीकरिता वापरतात.

पहा : टाकळा तरवड बाहवा.

परांडेकर, शं. आ.