ईसॉ, कॅथरिन : (३ एप्रिल १८९८–  ). अमेरिकन स्त्री वनस्पतिशास्त्रज्ञ. विषाणू [→ व्हायरस] व त्यांचा वनस्पतींवर होणारा परिणाम यांसंबंधी विशेष महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म रशियात इकॅतरीनोस्लाव्ह (हल्लीचे नेप्रोपट्रोफस्क) येथे झाला. कॉलेजमध्ये एक वर्ष शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आईवडिलांसह जर्मनीस १९१९ मध्ये प्रयाण केले व तेथे पुढील शिक्षण (१९१९ –१९२२) घेतले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेऊन वनस्पतिविज्ञानातील पीएच्. डी. पदवी १९३१ मध्ये संपादन केली आणि तेथेच १९६३ पर्यंत अध्यापन कार्य केले. त्यानंतर त्यांची सांता बार्बारा येथे बदली झाली व १९६५ मध्ये सेवानिवृत्तीनंतर गुणश्री (एमरिटस) प्राध्यापक म्हणून त्या काम करू लागल्या. १९५७ मध्ये त्यांना नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यत्वाचा बहुमान मिळाला. त्यांनी लिहिलेल्या वनस्पतींच्या शरीररचनाविषयक ग्रंथाचा (प्‍लँट ॲनॅटमी  १९५३, १९६५) उपयोग बहुतेक विद्यापीठांत केला जातो. शिवाय त्यांनी ॲनॅटमी ऑफ सीडप्‍लँट्स, प्‍लँट्स, व्हारयसेस अँड इन्सेक्ट्स, व्हॅस्क्युलर डिफरन्शिएशन इन प्‍लँट्स  इ. ग्रंथ लिहिले आहेत. विषाणूंचा वनस्पतींवर होणारा परिणाम हा त्यांचा विशेष संशोधनाचा विषय असून शारीर (वनस्पतींच्या शरीररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र) व कोशिकाविज्ञान  (पेशींची संरचना, कार्य इत्यादींसंबंधी अभ्यास करणारी  जीवविज्ञानाची शाखा) यांच्या संदर्भात त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला. परिकाष्ठ [वनस्पतीत मुख्यत्वे अन्न पदार्थांची ने-आण करणारा पेशीसमूह, → परिकाष्ठ] व त्यावर परिणाम घडविणारे विषाणू यांतील संबंध त्यांनी विशद केले.

परांडेकर, शं. आ.