उद्याने व उपवने : विस्तृत क्षेत्रात हिरवळ, फुलझाडे, वृक्ष, वेली, विविध आकारांचे दगड, कमानी, तोरणे व कारंजी, पूल, जलाशय इत्यादींच्या साहाय्याने संयोजित केलेल्या मांडणीस उद्यान म्हणतात. उपवनाची कल्पना नैसर्गिक भूभागाच्या सौंदर्याने व सुखदतेने उदयास आली. नैसर्गिक शोभास्थळातील मूळची साधनसामग्री जतन करून व त्यात योग्य ते फेरफार करून थोड्याशा नियमबद्धतेने मांडणी केली असता उपवने तयार होतात. मोकळ्या व निसर्गरम्य जागा दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे काही प्रेक्षणीय अशा मोठ्या वनांची राखीव राष्ट्रीय उपवने तयार करण्यात आलेली आहेत. उद्याने व उपवने मुख्यतः श्रमपरिहार, मनोरंजन, क्रीडाविहार, निसर्गास्वाद आणि सौंदर्यनिर्मिती यांसाठी मुद्दाम तयार करण्यात येतात. तसेच वनस्पतींच्या शास्त्रीय अभ्यासासाठीही व फळे, फुले आणि भाजी यांच्या उत्पादनासाठीही उद्याने तयार करण्यात येतात. आधुनिक शहररचनेतील उद्याने ही शहराची फुप्फुसे आहेत असा विचार जे. एल्. सर्ट यांनी मांडलेला आहे.
उद्याननिर्मिती ही एक कलाही आहे व शास्त्रही आहे. उद्यानविज्ञान (हॉर्टीकल्चर), स्थलशिल्प (लँडस्केप आर्किटेक्चर) व उद्यान वास्तुकला (लँडस्केप गार्डनिंग) ह्या उद्याननिर्मितीशी संबंधित अशा शाखा आहेत. त्यांपैकी उद्यानविज्ञान हा कृषिविज्ञानाचाच एक भाग असून त्याचा वनस्पतिविज्ञानाशी निकटचा संबंध आहे. स्थलशिल्प ही विसाव्या शतकातच उदयास आलेली शाखा होय. निसर्गतःच मनोरम असलेल्या भूभागाचे आकर्षक संयोजन करून त्याला आकर्षक वास्तुरूप देण्याचा प्रयत्न स्थलशिल्पशास्त्र करते. उद्यान वास्तुकलेत एखाद्या उद्यानातील वृक्षवेली, जलाशय आदींची शिल्पसदृश रचना करण्याचा प्रयत्न असतो, परंतु त्यातही आकर्षक वास्तुयोजन हेच उद्दिष्ट असते. इतर शास्त्रांप्रमाणेच उद्याननिर्मितीच्या शास्त्राची वाढ मानवाच्या बदलत्या दृष्टिकोनांवर अवलंबून असल्यामुळे अलीकडच्या काळात उपयुक्ततेनुसार उद्यानाच्या मूळ कल्पनेत बरेच फेरबदल झालेले आहेत. एकोणिसाव्या शतकापर्यंत प्रचलित असलेली निसर्गोद्यानाची कल्पना विसाव्या शतकात स्थलशिल्पाच्या व्यापक कल्पनेत परिणत झाली व त्यामुळे उद्याने व उपवने यांचा आता वास्तुशास्त्रीय दृष्टीने विचार होऊ लागला आहे.
प्रकार : उद्याने व उपवने यांचे साधारणपणे पुढील आठ प्रकार करता येतील : (१) घरगुती, (२) फलोत्पादक, (३) शाकोत्पादक (भाजी पिकविणारा), (४) पुष्पोत्पादक, (५) आलंकारिक, (६) विहार व क्रीडा, (७) शास्त्रीय आणि (८) प्राणिसंग्रहोद्याने. यांपैकी काही उद्यानांतील उत्पादनांच्या विक्रीपासून उद्यानाच्या देखभालीसाठी आर्थिक मदतही होते.
(१) घरगुती (परसबाग) : भाजीपाला, फळझाडे व शोभिवंत फुलझाडे यांची घराभोवतालच्या जागेत फार पूर्वीपासून मांडणी करण्यात येत आहे. घरातील भाजीपाल्याची गरज भागविणे हा या उद्यानाचा प्रमुख उद्देश असून शोभा देणे हा दुय्यम उपयोग असतो. मुळे, गाजरे, टोमॅटो, कोथिंबीर इत्यादींचे वाफे तसेच शक्य तेथे द्राक्षे, तोंडली, काकडी, भोपळे इत्यादींच्या वेलांचे मांडव यांची योजना करण्यात येते.
(२) फलोत्पादक : जमिनीच्या मगदुराप्रमाणे, हवामानाच्या परिस्थितीप्रमाणे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या फळझाडांची उद्यानांत लागवड करतात. उष्ण कटिबंधात केळी, अननस, आंबे उपोष्ण कटिबंधात खजूर, मोसंबी, संत्रे इत्यादी उष्ण समशीतोष्ण कटिबंधात अलुबुखार, अंजीर, द्राक्षे आणि थंड समशीतोष्ण कटिबंधात सफरचंद, नासपती यांसारखी फळझाडे लावतात. साधारणतः द्राक्षे, संत्री, मोसंबी, केळी, सफरचंद, चिकू वगैरे फळे महत्त्वाची समजतात. फलोत्पादनात हवामान, जमीन, लागवड, उत्पादन विक्रीची सोय वगैरे बाबी महत्त्वाच्या आहेत [→ फळबाग].
(३) शाकोत्पादक : भाजीपाला पिकविण्याचे पुढील प्रकार प्रचारात असलेले आढळतात : (अ) व्यापारी तत्त्वावर उत्पादन. अनुकूल हवामान व सुपीक जमीन असलेल्या उद्यानांत योग्य भाजीपाला मोठ्या क्षेत्रात लावून जलदगती वाहनांनी नजीकच्या शहरांत किंवा दूरवर विक्रीसाठी पाठवितात. (आ) आसपासच्या शहरात भाजीपाल्याला नेहमी मागणी असल्यामुळे जास्त किंमत मिळते म्हणून त्या त्या पिकाच्या नेहमीच्या हंगामाच्या थोडे आधी वा मागाहून गैरहंगामी लागवड करतात. (इ) लहान प्रमाणावर, वैयक्तिक गरज भागविण्यासाठी आणि स्थानिक लोकांना विकण्याकरिता भाजीपाल्याची पैदास करतात. सर्वसाधारणपणे कोबी, फुलावर, नवलकोल, भोपळा, टोमॅटो, काकडी, वांगी इ. भाजीपाल्यांची लागवड करण्यात येते [→ भाजीपाला].
(४) पुष्पोत्पादक : फार पूर्वीपासून लोकांना फुलांची आवड असल्यामुळे फुलांना नेहमीच मागणी असते आणि त्यामुळे पुष्पोत्पादनाचा धंदा आजही महत्त्वाचा समजला जातो. सौंदर्यवर्धन, अत्तरे, सजावट, विविध धार्मिक कार्ये इत्यादींसाठी फुलांचा उपयोग होतो. फुलांसाठी जगभर दरसाल कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. एकट्या मुंबई शहरात वर्षाकाठी सु. तीन कोटी रुपये किंमतीच्या फुलांची उलाढाल होते. अमेरिकेत १९६० साली सत्तर कोटी डॉलर किंमतीची फुले विकली गेली. भारतातून गुलाबाची फुले निर्यात केली जातात.
फुलांच्या पैदाशीसाठी अनुकूल हवामान, सकस व चांगल्या निचऱ्याची जमीन, योग्य मशागत, पाण्याची सोय, रोगराईवर उपाययोजना इत्यादींचा सखोल विचार करावा लागतो. फुलझाडे हंगामी, वर्षायू (एक वर्ष जगणारी) व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) अशी तीन प्रकारची असतात. उदा., ॲस्टर हंगामी, डेलिया वर्षायू आणि गुलाब, मोगरा बहुवर्षायू आहेत. फुले साधी, आकर्षक रंगांची, सुवासिक वा गंधरहित असतात. भारतासारख्या देशात फुलझाडे सर्वसाधारणपणे उघड्या शेतजमिनीत लावतात. थंड प्रदेशांत विशिष्ट हंगामात ती काचगृहातून लावतात. हल्लीच्या सुधारलेल्या लागवडीच्या पद्धतीप्रमाणे योग्य ती मशागत करून खते व पाणी देऊन, छाटणी करून, रोगनाशके व कीटकनाशके वापरून फुलांचे उत्पादन २० ते २५ टक्क्यांनी वाढवता येते.
अनेक देशांतून राष्ट्रीय व स्थानिक पुष्पोत्पादनाच्या पुष्कळ संस्था आहेत. त्यात अमेरिकन पुष्पविक्रेत्या व सजावट करणाऱ्या उद्यानविद्या संस्थेचे स्थान प्रमुख आहे. याशिवाय गुलाब, डेलिया, कार्नेशन यांसारख्या विशिष्ट फुलांबाबतच्या संस्थाही अमेरिकेत आहेत. भारतातही गुलाब संस्था आहेत. अमेरिकेतील काही व्यापारी संस्थांकडे तारेने मागणी केल्यास त्या देशातील कोणत्याही शहरात त्या संस्था ताबडतोब फुलांचा पुरवठा करतात.
(५) आलंकारिक : समारंभ, धार्मिक कार्ये यांच्या निमित्ताने वास्तूच्या आतबाहेर निसर्गसदृश्य वनश्रीची शोभा निर्माण करण्यात येते. यासाठी निरनिराळी झाडे लावलेल्या कुंड्यांचा वापर करण्यात येतो. हल्ली घराच्या गच्चीवरही बागा तयार करण्यात येतात. पुरेशा जागेच्या अभावी किंवा प्रतिकूल हवामानामुळे जपान, चीन वगैरे देशांत दगड, गोटे, वाळू, काटक्या तसेच खुज्या वृक्षादिकांचा वापर करून आलंकारिक उद्याने तयार करतात.
(६) विहार व क्रीडा : नगरे व शहरे यांच्यापासून फार दूर नसलेल्या विस्तीर्ण क्षेत्रातील नैसर्गिक साधने जतन करून सार्वजनिक उपवने तयार करण्यात येतात. त्यांना क्रीडावनेही म्हणतात. यांची मांडणी नद्या, तलाव, डोंगर किंवा सौंदर्यपूर्ण दऱ्या तसेच जुने वाडे किंवा वास्तु-अवशेष यांच्याभोवती करण्यात येते. यात दोन्ही बाजूला उंच कडे असलेले मार्ग, गुहा, पाण्याचे धबधबे, गरम पाण्याचे झरे, डोंगरी सुळके, जुनी प्रंचड झाडे, भिन्न वनस्पतिसमूह, विविध प्रकारचे पशुपक्षी, नदी नाले आणि लहान मोठे तलाव वगैरेंसारखे मन प्रसन्न करणारे प्रकार शक्यतेनुसार राखलेले असतात. विहारासाठी बांधलेल्या उद्यानात सहली, पोहणे, नौकाविहार, निसर्गशोभा अवलोकन इत्यादींसाठी खास सोयी असतात. सांघिक खेळ, मनोरंजन इत्यादींसाठी अलग जागा योजण्यात येतात. छत्र्या, चबुतरे, बाके, उतरंडी, पायऱ्या, झोपाळे, प्राणिसंग्रहालय, छोटी आगगाडी यांची लहान थोरांसाठी योजना केलेली असते. सहलीसाठी येणाऱ्या नागरिकांना विसाव्यासाठी घरे, तंबू वा झोपड्यांची सोय केलेली असते. नैसर्गिक परिसरात सामावून जाईल असे उपहारगृहही असते. महाराष्ट्रात मुंबईनजिक बोरीवली भागात व चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा येथे अशी क्रीडावने आहेत. पाश्चात्त्य देशांत व्हिएन्नामधील बेल्व्हडीर, इंग्लंडमधील ब्लेनिम, स्वीडनमधील ट्रॉटिंगशोम व रशियातील पीटरहॉफ ही क्रीडावने सुप्रसिद्ध आहेत. अशा क्रीडावनांत लोकांना कमीत कमी खर्चात आणि वेळात जाता यावे म्हणून सार्वजनिक भाडोत्री वाहनांची (बस, आणि आगगाडी वगैरे) सोय करण्यात येते. कोणत्या ठिकाणी काय पहाण्यासारखे आहे, कोठल्या ठिकाणापासून नैसर्गिक देखावा उत्कृष्ट दिसेल, वनातील प्रेक्षणीय स्थळे, पशुपक्षी यांची माहिती देणारी पत्रके, नकाशे व फलक यांची योजना केलेली असते. त्यामुळे मनोरंजनाबरोबरच ज्ञान मिळण्याचे उद्दिष्टही साध्य होते. क्रीडावनात येणाऱ्यांना गोफणी, तिरकमठे, हवाई बंदूका इ. आयुधे बरोबर नेण्याची त्याचप्रमाणे तेथील पशुपक्षी भितील असे कोणतेही कृत्य करण्याची बंदी असते. क्रीडास्थानात सुधारणा म्हणून फक्त मुलांसाठी कॅलिफोर्नियात डिझनीलँडसारखे करमणूकीचे स्थान निर्माण केले गेले आहे. तेथील बाल-करमणूक- केंद्रात विविध प्रकारचे खेळ, परीकथांतील दृश्ये, रेड इंडियन लोकांच्या वसाहतीची दृश्ये इ. अनेक मनोरंजक प्रकार आहेत [→ डिझनीलँड].
सामान्य जनतेचे मनोरंजन, शहरांची शोभा, मोकळी जागा व चांगली हवा या दृष्टीने उद्यानांचे शहरातील स्थान महत्त्वाचे आहे व यासाठी शहरातील लोकसंख्येवर त्यांचे प्रमाण ठरविण्यात आले आहे. अलास्कातील किटिमॅट, स्वीडनमधील वालिंग्बी, ब्राझीलमधील ब्राझील्या आणि भारतातील चंदीगड येथे अशी मानके निश्चित करण्यात आली आहेत. आपल्या घरापासून क्रीडावनात जाण्याला पंधरा मिनिटांपेक्षा कमी वेळ लागावा असे ठरवून क्रीडावनासाठी १·३० ते २·४५ हेक्टर क्षेत्राची शिफारस करण्यात आलेली आहे. विश्रांतीसाठी, पादचाऱ्यांसाठी, शहराच्या मध्यभागी, खास बाजाराजवळ, सहकारी घरबांधणीजवळ असे शहरातील उद्यानांचे आयोजन असते. दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या नैसर्गिक मोकळ्या जागांमुळे राष्ट्रीय उपवनांचे महत्त्व वाढले आहे. वन्य पशू व नैसर्गिक वृक्षसंपत्ती वाढविण्यासाठी त्यांना योग्य ते संरक्षण मिळावे या हेतूने राखीव उपवने निर्माण केली जात आहेत [→ वन्य जीवांचे आश्रयस्थान].
(७) शास्त्रीय : वनस्पतींचे शास्त्रीयरीत्या संवर्धन करणे, विविध प्रकारच्या वनस्पतींचा संग्रह करणे, वनस्पतींसंबंधी संशोधन चालू ठेवणे इ. उद्देशांनी शास्त्रीय उद्याने तयार करण्यात येतात [→ शास्त्रीय उद्याने].
(८) प्राणिसंग्रहोद्याने : आपल्या देशाच्या निरनिराळ्या भागांत तसेच निरनिराळ्या परदेशांत आढळणाऱ्या महत्त्वाच्या प्राण्यांचा संग्रह करून जिवंत प्राण्यांच्या निरीक्षणाने प्राणिशास्त्राच्या अभ्यासाला चालना देणे हा प्राणिसंग्रहोद्यानांचा हेतू आहे. भारतात मुंबई, कलकत्ता व म्हैसूर येथे अशी उद्याने आहेत [→ प्राणिसंग्रहोद्याने].
चौधरी, रा. मो.
इतिहास : उद्यानांची मूळ स्वरूपातील कल्पना खाजगी मालकीच्या नैसर्गिक भूप्रदेशावरून आली असावी. मानवाच्या सौंदर्याभिरुचीमुळे व सौंदर्यानिर्मितीच्या प्रवृत्तीमुळे शेतीवर जो दृश्य परिणाम झाला, त्यातूनच उद्यानाची कल्पना उदयास आली. प्रारंभी इजिप्त आणि मेसोपोटेमिया येथे उद्यानांची निर्मिती करण्यात आली. भारतात ऋग्वेदकाळात उद्यानांचा उल्लेख आढळतो. मोहें-जो-दडो व हडप्पा येथे तलावांच्या कडेने उद्याने होती. ‘उद्यानं ते पुरुष नावयानम्’ असा उद्यानकाबद्दल अथर्ववेदात उल्लेख आढळतो. इंद्राचे नंदनवन, कुबेराचे चैत्ररथ उद्यान, कैकेयीचे उपवन, मोठमोठ्या सम्राटांची विशाल आणि समृद्ध उपवने यांचा उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतो. या उद्यानांचा सहलीसाठी आणि मृगयेसाठी उपयोग केला जात असे. ही उद्याने पूर्वी राजे लोक खास आपल्याकरिता राखून ठेवीत तथापि प्रजाजनांना त्यांत काही हद्दीपर्यंत सहल करण्याची मोकळीक असे. उद्यानपालकांचाही वर्ग इ. स. ८०० च्या सुमारास होता, असे दिसते. उद्यानक्रीडेस त्या काळी महत्त्व असून अनेक समारंभ व महत्त्वाच्या गाठीभेटी यांसाठी उद्याने वापरण्यात येत. ईजिप्तमधील उद्यानांचे खाजगी व सार्वजनिक असे प्रकार होते. फुलझाडे, रमणीय कुंज, झाडांच्या रांगा, चबुतरे, छत्र्या, पाण्याचे पाट इत्यादींचा शोभेसाठी वापर केला जाई. अंजीर, शिंदी, खजूर, ॲकेशिया (बाभळीच्या वंशातील झाडे) वगैरे प्रकारची झाडे लावण्यात येत.
बॅबिलोनियन लोकांनी उद्यानाच्या मांडणीसाठी वास्तुशिल्पाचा वापर केला. तेथील अनेक कमानींवर आधारलेल्या उतरत्या, छपरी किंवा अधांतरी बागा प्रसिद्ध आहेत. निनेव्ह येथील राजवाड्यातील अपोत्थित शिल्पात राजा असुरबनिपाल राणीसह वनभोजन करताना दाखविलेला आहे. तत्कालीन उद्यानात शिकारीचीही सोय केलेली असे.
ग्रीक व रोमन उद्याने : ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात इराणी (पर्शियन) संस्कृतीद्वारे उपवनांची कल्पना ग्रीकांनी आत्मसात केली. अलेक्झांडरनंतर शाही उद्यानांचा सर्वत्र प्रसार झाला. त्यांची मांडणी भौमितिक तत्त्वांवर केलेली असे. इ. स. पू. दुसऱ्या शतकात सिसिली व ॲलेक्झांड्रिया येथील उद्यानांत पाषाणशिल्पांचा वापर करण्यात आला. ‘हॉर्टी सिझेरिस्’, ‘हॉर्टी पाँपेअनी’ यांसारखी अनेक मोठी सार्वजनिक उद्याने रोम शहराच्या परिसरात होती. वाटिका, पथ, क्रीडागारे, चबुतरे यांचा उपयोग व उतरत्या जागेवर बांध घालून केलेल्या पायऱ्या ही रोमन उद्यानांची वैशिष्ट्ये होती. छायाप्रकाश, देखावे व दूरची दृश्ये यांचा विचार करून या उद्यानांची योजना केलेली होती. लहान लताकुंज, छोटी देवालये, थडगी, पुतळे, पूल, मनोरे, निर्झर इत्यादींचा नैसर्गिक दृश्यांचा आभास निर्माण करण्यासाठी वापर करण्यात येत असे.
बायझंटिन काळातील अस्थिर परिस्थितीमुळे त्या काळात मोठी उद्याने कमी निर्माण झाली. त्यावेळच्या उद्यानांच्या मांडणीवर ख्रिस्ती धर्माचा पगडा होता, हे ‘फाउंटन्स ऑफ लाइफ’ यासारख्या वास्तूच्या बांधणीवरून दिसून येते.
मध्ययुगीन उद्याने : स्थूलमानाने ११००–१२०० पर्यंतच्या या कालखंडाच्या सुरुवातीला पाश्चात्त्य देशांत चर्चच्या प्रांगणात उद्यानांचा प्रथम वापर झाला. लहान किल्ले व वाड्या यांमध्ये सूर्यकिरणांप्रमाणे पसरत जाणाऱ्या फुलझाडांच्या रांगांची योजना करून उद्याने उभारण्यात आली.
गॉथिककालीन उद्याने : सामान्यतः तेराव्या-चौदाव्या शतकांतील गॉथिक उद्यानांत भौमितिक आकार, पसरत जाणारे फुलांचे ताटवे, हिरवळी, द्राक्षवेलींनी मंडित असे मार्ग व कुटी, गुलाब, जाई यांसारखी फुलझाडे या सर्वांचा वापर करण्यात आला. उद्यानाच्या मध्यभागी मोठी हिरवळ असून त्याच्या आजूबाजूला अनेक रंगीत फुलझाडांचे ताटवे असत. या हिरवळीवर पांढऱ्याशुभ्र संगमरवराचे सुबक कोरलेले कारंजे असे व त्यातून येणारे पाणी बागेच्या सर्व भागांतून खेळविले जाई.
प्रबोधनकालीन व बरोककालीन उद्याने :चौदाव्या शतकापासून सु. सतराव्या- अठराव्या शतकापर्यंतचा हा कालखंड होय. झाडे, झुडपे व लहान वृक्षांची पाने कापून त्यांना विविध आकार द्यावयाची कल्पना या काळात पुढे आली. मध्ययुगात झाडे नैसर्गिक दिसावीत, म्हणून ती छाटली जात. पण प्रबोधनकाळात चौकोनी, गोल, लंबवर्तुळाकार, शंक्वाकृती अशा विविध अनैसर्गिक आकारांत त्यांची छाटणी करण्यात येऊ लागली. त्यामुळे उद्याने व उपवने एखाद्या मोठ्या गालिचासारखी दिसत. झाडे छाटून अवकाशाचा आभास निर्माण करण्यात येई. तस्कनी व मध्य इटली येथे आल्बेर्ती व जॉर्जो यांनी अनेक उद्याने उभारली. मोठे राजवाडे, वाड्या, जहागिऱ्या यांमधून मोठ्या बागा उभारण्याची प्रथा पाडली. त्या काळात अनेक स्थापत्यविशारद स्थलशिल्पी झाले. बूलोन, पाव्हिया, नेपल्स शहरांत आल्बेर्ती व रोझेलिनो सांग्गाल्लो यांनी अनेक उद्याने उभारली. बरोककाळात या उद्यानांचे स्वरूप बरेच बदलण्यात आले. सोळाव्या शतकात बांधलेले टिव्होली येथील ‘व्हिला देस्ते’ उद्याने या पद्धतीचे उत्तम उदाहरण होय. ब्रामांते, रॅफेएल यांनी वास्तुशिल्पाकृती, झाडे इत्यादींचा फार मोठा उपयोग उद्यानांत केला. तत्कालीन उद्यानांमध्ये अनेक टप्प्यांच्या पायऱ्या, स्तंभरचना, कारंजी, पुष्पकुंज, शिल्पे इत्यादींचा वापर सर्रास होत होता तसेच उद्यानांची अक्षीय मांडणी सतराव्या शतकापर्यंत रूढ होती. इंग्लंड, फ्रान्स व ऑस्ट्रिया या देशांत अनेक उद्याने आंद्रे लनोत्र या स्थलशिल्पज्ञाच्या योजनेप्रमाणे करण्यात आली. अठराव्या शतकातील व्हर्साय येथील शाही-उद्यान हे लनोत्रच्या योजनेचे सर्वोत्तम उदाहरण होय. अक्षरेषेच्या दुतर्फा बागेची मांडणी तसेच अक्षरेषेवरच मोठ्या वास्तूची योजना करून परस्परांना शोभा देणारी उद्याने निर्माण करण्यात आली. वास्तूकडून बागेकडे व बागेच्या टोकाकडून वास्तूकडे पाहताना बागेचे अंगोपांग खुलून दिसावे, यासाठी खास प्रयत्न करण्यात आले. बागेत सर्वत्र दृष्टी खेळती रहावी, अशा दृष्टीने दृष्टिपथातील झाडांची विविध दिशांना पसरत जाणारी मांडणी केलेली असे. विविध भौमितिक आकृत्या वापरून ताटव्यांची मांडणी केल्याचे आढळते. उठाव येण्यासाठी हिरवळीचा वापर केलेला दिसतो. लनोत्र याने मोठ्या झाडांचा फार मोठ्या प्रमाणावर वापर करून उद्यानाच्या एकूण मांडणीला अधिक आलंकारिक स्वरूप दिले. पाण्याचा वापर विस्तृत पण उथळ जलाशयात करून आजूबाजूची दृश्ये त्यामध्ये प्रतिबिंबित करून त्यातून एक आगळी शोभा निर्माण करावयाची, ही लनोत्रची खास शैली होती. त्याची ही शैली पुढे यूरोपात सर्वत्र प्रचलित झाली.
एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील उद्याने : सतराव्या-अठराव्या शतकांत ‘नैसर्गिक मांडणी हीच सर्वश्रेष्ठ मांडणी होय’, असा विचार विल्यम केंट (सु. १६८६–१७४८), ‘केपेबिलिटी’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेला लान्सेल्ट ब्राउन (१७१६–१७८३) इ. स्थलशिल्पज्ञांनी मांडून एक नवीन स्थलशिल्पशैली निर्माण केली. त्यातूनच पुढे नैसर्गिक रस्ते, पायवाटा, हिरवळी, झाडे, खडक, मानवनिर्मित निर्झर इत्यादींचा उद्यानांसाठी वापर होऊ लागला. कृत्रिम साधनांचा वापर न करण्यावर एकोणिसाव्या शतकातील स्थलशिल्पज्ञांचा कटाक्ष होता. ही पद्धती कालांतराने जास्त क्लिष्ट होऊ लागली. उद्यानास वैचित्र्यपूर्ण स्वरूप देण्यासाठी कृत्रिम पडकी देवळे किंवा वास्तू यांची योजना करण्यात येत असे. याशिवाय एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या उद्यानांवर पौर्वात्य स्थलशिल्पाची छाप पडू लागली. प्रवास, नवीन वसाहती व वाढते साम्राज्य यांमुळे अनेक लोकांचा पौर्वात्य उद्यान-मांडणीशी संबंध आला व विशेषतः निसर्गसदृश अशा जपानी व चिनी मांडणीची आवड या काळात निर्माण झाली. वाळू, दगड, बांबूची बने, नेचे, लहान शिल्पे इत्यादींचा बागबगीचांत उपयोग करण्यात आला. बारमाही पावसाच्या जंगलात आढळणारी वनशोभा काही उद्यानांत व उपवनांत कृत्रिम रीतीने निर्माण करण्यात आली. यासाठी अनेक प्रकारचे वृक्ष, वेली, झुडपे यांची संमिश्र योजना करून देखावे, दूरदृश्ये व वाटिका उभारण्यात आल्या. यासाठी नैसर्गिक भूभागाचा पूर्णपणे अभ्यास व विचार करण्यात येई व त्याला योग्य अशीच मांडणी करण्यात येई. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शहरांची अनिर्बंध वाढ होऊ लागली व जागेच्या समस्येमुळे शहरातील उद्यानांचे प्रमाण फारच कमी झाले. निसर्ग व मानव यांतील अंतर कमी करण्यासाठी उद्याननगरी, राष्ट्रीय उद्याने व उपवने, राखीव जंगले यांची शहरांभोवती योजना करण्यात आली. अमेरिकेत व इतर पाश्चात्त्य देशांत त्यांची फार झपाट्याने वाढ झाली. चौक, फुलांचे ताटवे, मोठ्या खिडक्या, अंगणातील वा गच्चीवरील बागा, पाण्याची कारंजी यांचा योग्य उपयोग करून वास्तू व निसर्ग यांची एकत्रित सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला व येत आहे.
पौर्वात्य उद्याने : एकांत, मनन व निसर्गावलोकन यांसाठी खास निसर्गसदृश दिसणाऱ्या वाटिका, उद्याने व उपवने निर्माण करणे, हे चिनी स्थलशिल्पज्ञांचे वैशिष्ट्य आहे. डोंगर व पाणी यांच्या योजनेतून निर्माण होणाऱ्या ‘शानसुई’ चित्रशैलीकरिता चिनी चित्रकार प्रसिद्ध आहेत. या शैलीचा चिनी उद्यानरचनेवर परिणाम झालेला दिसून येतो. लहानलहान विविध दृश्ये डोळ्यासमोर उलगडत जावी, या हेतूने उद्यानांची मांडणी केली जाई व यासाठी उद्यानांतील पाऊलवाटांच्या बाजूला त्या प्रकारच्या देखाव्यांची मांडणी केली जाई.
चिनी स्थलशिल्पकलेवर ताओच्या विचारांचा मोठा पगडा आहे. या विचारांप्रमाणे डोंगर, पर्वत हे पृथ्वीचे मणके वा सांगाडा असून पाणी हे तिचे जीवन आहे. यास्तव चिनी स्थलशिल्पात नैसर्गिक वा कृत्रिम दगडांचा, ते पर्वत आहेत असे कल्पून, फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तळ्याच्या मध्यभागी असलेली बेटे, त्यांवर जाण्यासाठी लाकडी बांधणीचे पूल तसेच बांबू, पाइन इ. वृक्षांचा सांकेतिक वापर हे शैलीमुळेच प्रचलित झाले. मंडपाचा वापर, अष्टकोनी वा वर्तुळाकृती दरवाजे, जमिनीच्या ढाळाप्रमाणे बदलणाऱ्या भिंती ही सर्व या शैलीची वैशिष्ट्ये इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून प्रचलित होती. नैसर्गिक दृश्यांचे चित्रण करण्याची पद्धती सुंग कालखंडात (सु. ९६०–१२८०) पूर्णत्वास पोहोचली. तेव्हापासून आजपर्यंत तिचा चिनी स्थलशिल्पावर कमीअधिक प्रमाणात पगडा कायम आहे.
जपानी स्थलशिल्पाच्या कल्पना निसर्गाशी अधिक प्रमाणात तादात्म्य पावलेल्या आढळतात. निसर्गात दिसणाऱ्या अनेक दृश्यांपैकी, ज्या दृश्यांमुळे प्रेक्षकाला आनंद होईल, अशाच दृश्यांना उद्यानांत समावेश केला जातो व याकरिता नैसर्गिक रीतीने झिजलेले दगड, लाकडाचे ओंडके, धातूची भांडी, शिल्पाकृती यांचा वापर करण्यात येतो. अनेक वृक्ष व वेली यांचा विविध ऋतूंचे आगमन दर्शविण्यासाठी वापर केला जाई. उद्यानाभोवती भिंत बांधण्याची जपानमध्ये प्रथा होती. डोंगरउतारावरील व सपाटीवरील असे बागांचे दोन प्रकार करण्यात येत. लहान किंवा अल्पाकृती झाडांचा (बोन्साई) वापर करून निर्माण केलेल्या अल्पाकृती बागा हे जपानचे खास वैशिष्ट्य आहे. या बागांची मांडणी मोठ्या लाकडी थाळ्यांमध्ये वाळू, भुसा, माती वगैरे वापरून केली जाते. क्योटो येथील काटसुरी राजवाड्याची उद्यानरचना ही जपानी शैलीचे उत्तम प्रतीक आहे.
इ. स. पू. पाचव्या शतकात इराणी साम्राज्य तत्कालीन साम्राज्यांत फार मोठे होते. तेथील राजकीय सुस्थिरतेमुळे उद्याननिर्मितीसारख्या कला वाढीस लागल्या होत्या. भौमितिक व समप्रमाण मांडणी हे इराणी उद्यानांचे वैशिष्ट्य आहे. अनेक पाट, बंधारे, वाहते पाणी, ओळीने लावलेली सुरूसारखी प्रमाणबद्ध झाडे, रंगीत लाद्या यांचा इराणी उद्यानांत वापर होत असे. गुलाबाच्या ताटव्यांचा भौमितिक आकृतीच्या उद्यानात वापर केल्यामुळे त्यास एखाद्या गालिचाचे स्वरूप प्राप्त होई. या मांडणीचा परिणाम नंतरच्या मोगल व अरबी तसेच पश्चिमेकडे स्पेन व मोरोक्को येथील उद्याननिर्मितीवर झाला. अल् हम्ब्रा येथील उद्यानांच्या मांडणीवर ख्रिस्ती व इस्लामी संस्कृतींचा पगडा दिसतो. पाण्याची कारंजी, धबधबे, भौमितिक शिल्पाकृती, कमानी, स्तंभावली, अनेक दालनांचे चौक इत्यादींनी या उद्यानांस शोभा आणली जाई. सोळाव्या शतकात ग्रानाडा येथे मूरिश स्थलशिल्पज्ञांनी अनेक संमिश्र पद्धतीच्या उद्यानयोजना केल्या. सेव्हिल येथील अल् काझर हे उद्यान अरबी व ख्रिस्ती स्थलशिल्पशैलींच्या संयोजनाचे उत्तम उदाहरण आहे.
भारतीय उद्यानांची परंपरा इ. स. पू. २००० पर्यंत पोहोचते. या उद्यानांची मांडणी तळी किंवा मोठे चौक यांच्याभोवती असे. संस्कृत साहित्यात पुष्पवाटिका, उद्यान इ. प्रकारचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात. या उद्यानांत अनेक प्रकारची फळझाडे, फुलझाडे, वेली, लहान चबुतरे, लतामंडप, झोपाळे, धारागृहे यांची योजना असे. सार्वजनिक उद्यानांची कल्पना नसली, तरी ऋषींच्या आश्रमाभोवती वन्य पशूंपासून वा राक्षसांपासून संरक्षित अशी वने व उपवने अस्तित्वात होती. किंबहुना आश्रमांची योजना अशा उपवनांतच असे. अनुकूल हवामानामुळे वृक्ष, वेली व फुलझाडे यांची उपवनांत गर्दी असे. हरिण, मोर यांसारखे प्राणी उपवनांत फिरत असत व तशी वर्णनेही जुन्या ग्रंथांतून आढळतात. उद्यानांची मांडणी समप्रमाण नसली, तरी मांडणीबाबत काही योजना झालेल्या असाव्यात.
अकराव्या शतकापासून तुर्की व नंतर मोगली व इराणी उद्यानरचनांची छाप भारतीय उद्यानांवर पडली. सार्वजनिक व खाजगी उद्याने या काळानंतर अस्तित्वात आली. मोगलांच्या काळात सतराव्या शतकापर्यंत काश्मीरात तसेच आग्रा, दिल्ली इ. ठिकाणी इराणी शैलीची अनेक उद्याने बांधण्यात आली. काश्मीरमधील शालिमार बाग व निशात बाग या त्यांपैकी प्रसिद्ध बागा आहेत. पीर पिंजर खिंडीजवळ जहांगीराने मोठी बाग बांधली. बागेच्या सभोवताली दालने व स्तंभावल्या होत्या आणि आत विहार करण्यासाठी वाटा व फुलांचे ताटवे यांची योजना होती. दाल सरोवराजवळ शालिमार बागेची रचना करण्यात आली. मुख्य सरोवराशी एका नाल्याने तिचा संबंध जोडलेला आहे. उद्यानाची मांडणी तीन टप्प्यांवर असलेल्या पाच मोठ्या पायऱ्यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यावर दिवाण-इ-आमसारखी सार्वजनिक सभेची वास्तू, दुसऱ्या टप्प्यावर खास समारंभासाठी दिवाण-इ-खाससारखी वास्तू व तिसरा टप्पा अंतःपुरासाठी राखून ठेवलेला होता. बागेच्या मध्यभागी मोठा पाट असून त्याचे पाणी कारंजी, तळी व धबधबे यांद्वारे सर्वत्र खेळविले आहे. एका बाजूला दाल सरोवर तर दुसऱ्या बाजूला पर्वतराजी असल्यामुळे या उद्यानाला अवर्णनीय सृष्टिशोभा प्राप्त झाली आहे. आग्रा येथील ताजमहालाच्या परिसरातील बगीचा शहाजहानच्या मृत्यूनंतर सर्वांना खुला करण्यात आला. याव्यतिरिक्त अजमेर येथील अनासागर तलावाजवळील दौलतबाग, पुष्कर सरोवराजवळील बाग व अलाहाबाद येथील खुश्रू बाग यांची मांडणी प्रेक्षणीय आहे. राजपूत राजे व सरदार यांनी मध्ययुगात व नंतरच्या काळात बिकानेर, जोधपूर, जैसलमीर, उदयपूर, अंबर व जयपूर येथे अनेक उद्याने बांधली. तळी, बारादरी, नाले व पाट आणि भौमितिक मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
पेशवे व इतर मराठे सरदार यांनी उभारलेल्या उद्यानांच्या मांडणीवर मोगल शैलीचा प्रभाव दिसून येतो. पुण्यातील सारस बागेची मांडणी प्रमाणबद्ध नसून नैसर्गिक वनराजीवरच तीत जास्त जोर दिला असावा. म्हैसूरमधील वृंदावन उद्यान व केरळ-कर्नाटक सीमेवरील पेरियार तलावाजवळील उद्यान ही अलीकडील प्रसिद्ध उद्याने होत. बोरीवली येथे राष्ट्रीय उद्यान व इतर हवेच्या ठिकाणी सरकारतर्फे उद्याने बांधण्यात येत आहेत. त्यांची मांडणी संमिश्र स्वरूपाची असून पाश्चात्य स्थलशिल्पशैलीची त्यांवर दाट छाप दिसून येते.
स्थलशिल्पशास्त्र : स्थलसिल्पसाधनेत वापरावयाच्या वस्तूंच्या प्रथम विचार करावा लागतो. स्थलशिल्पांसाठी झाडे, वेली, प्राणी, दगड, शिल्पे इ. साहित्य लागते.
झाडे व वेली : स्थलशिल्पज्ञाला वनस्पतींची पूर्ण माहिती असावी लागते. झाडे, वेली व झुडपे यांचे रंग, आकार, वाढीला लागणारा काळ, जमीन व हवामानाची गरज, त्यांना येणारी फुले व फळे, पानांची मांडणी व फूट, सदाहरित की गळणारी पाने इ. सर्व दृष्टींनी वनस्पतींचा विचार करावा लागतो. वनस्पतींच्या योग्य निवडीचा उद्यानाच्या मांडणीवर व त्याच्या काळानुरूप बदलणाऱ्या दृश्यावर फार मोठा परिणाम होतो. वनस्पतींचा उपयोग संरक्षण, पडदा, सावली, पोत, रंगसंगती, उठाव देणे इत्यादींसाठी होऊ शकतो. देशपरत्वे झाडांच्या वाढीवर कोणते परिणाम होतात याचाही स्थलशिल्पज्ञाला विचार करावा लागतो. हरितगृहे व झाडांची माहिती देणारी पुस्तके यांच्याद्वारे स्थल शिल्पज्ञास तयार माहिती व साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.
पाणी : वनस्पतींच्या वाढीसाठी पाणी आवश्यक असतेच पण त्याचबरोबर उद्यानाला शोभा आणण्यासाठी पाण्याचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. तलाव, सरोवरे यांसारखे मोठे जलाशय उद्यानाला उठाव देतात तर कारंजी, पाट, लहान धबधबे यांनी उद्यानाला ठिकठिकाणी शोभा आणता येते. अवकाशाचे स्वरूप, योजनेची सुसंबद्धता, थंडावा व मांडणीचे एकसूत्रीकरण यांसाठी पाण्याचा विविध प्रकारे वापर करण्यात येतो. पंपाच्या साहाय्याने त्याच पाण्याचा पुनःपुन्हा वापर करता येतो व पाणी विस्तृत क्षेत्रात खेळविता येते. पाण्याच्या साहाय्याने चमत्कृतिजन्य आभासही निर्माण करता येतात. शिंपले व खवले असलेले ढाळ, खडकाळ पात्र यांचा वापर केल्यास पाण्याचा ध्वनी निर्माण होऊन उद्यानास जिवंतपणा आणता येतो.
शिल्पे व दगडी वास्तू : मानवाचे निसर्गावरील प्रभुत्व किंवा मानवाच्या अस्तित्वाचे व कार्याचे दृश्य प्रतीक म्हणून उद्यानात उत्तम शिल्पे वापरली जातात. उद्यानातील ठळक स्थानी तसेच एखाद्या दृश्याच्या शेवटी, हिरवळीवर, तळ्यात इ. अनेक जागी शिल्पांचा वापर केला जातो. उद्यानात दगडांचा किंवा वास्तूंचा वापर दृश्यांना उठाव देण्यासाठी करतात. पुतळ्यांची मांडणी व त्यामागील कल्पना यांमध्ये सुसंगती येण्यासाठी स्थलशिल्पज्ञ व शिल्पकार यांचे सहकार्य आवश्यक आहे.
भिंती, ढाळ, टप्पे व पायऱ्या : पाश्चिमात्य उद्यानांच्या रचनेत भिंतींना फार महत्त्व आहे. खाजगी उद्यानांभोवती ज्याप्रमाणे भिंती बांधल्या जातात, त्याचप्रमाणे वास्तूची निसर्गाशी वा उद्यानाशी पुरेशी सांगड घालण्यासाठी दगडी अथवा विटांच्या भिंती उद्यानरचनेत वापरल्या जातात. इटलीमधील उद्यानांत भिंती, टप्पे व पायऱ्या वापरून अवकाशाची व विलोभनीय दृश्यांची निर्मिती केली जाते. टप्प्यांचा वापर केल्यामुळे खोऱ्यात किंवा डोंगराच्या उतारावर असलेल्या उद्यानाला जास्त शोभा येते. पायऱ्यांची किंवा टप्प्यांच्या भिंतींची बांधणी दगड, विटा वा ओंडके यांची करतात. बांधकामाच्या सांध्यांमधे फुलझाडे, वेली अथवा हिरवळ योजून बागेची शोभा वाढविता येते. पायऱ्यांची मांडणी मोठ्या, कमी उंचीच्या व दृष्टीला आकर्षक अशा जागी करण्यात येते. पायऱ्यांच्या वापरामुळे लहान उद्यानात मोठ्या अवकाशाचा आभास निर्माण करता येतो.
मांडणीची तत्त्वे : वास्तुशिल्पाप्रमाणेच स्थलशिल्पशास्त्राची काही ठळक तत्त्वे उद्याननिर्मितीसाठी वापरण्यात येतात. उद्यानाच्या वा उपवनाच्या वापराप्रमाणे त्याची निर्मिती कशी करावी, यासंबंधीचे विचार यामध्ये आढळतात. वास्तुशिल्पातील बाह्य अवकाशपरिणाम आंतर अवकाशाच्या परिणामाशी निगडित करावा लागतो व त्यासाठी स्थलशिल्पज्ञास वास्तुशिल्पज्ञाची मदत घ्यावी लागते. वास्तुशिल्पज्ञाचे कार्य वास्तूच्या निर्मितीनंतर पूर्ण होते पण स्थलशिल्पज्ञाला उद्यानाकडे सतत लक्ष पुरवावे लागते. उद्यानाची किंवा स्थल शिल्पाची मांडणी सदैव आकर्षक राहण्यासाठी सतत मेहनत व खर्च आवश्यक असतो व त्यामुळे मांडणी करताना याचाही विचार स्थलशिल्पज्ञाने करणे आवश्यक असते. हवामान, पाण्याची उपलब्धता, जमिनीची ठेवण इ. गोष्टींचा विचार करून मगच उद्यानाची प्रमुख रूपरेषा ठरविली जाते.
योजनेची एकसूत्रता : मांडणी करताना उद्यानाची जागा जरी मोठी असली, तरी एकूण मांडणीत सूत्रबद्धता असणे आवश्यक आहे. बागेतील अनेक दृश्यांचा किंवा मांडणीचा एकमेकांशी संबंध जोडण्यासाठी पाणी, हिरवळ, बांध, कुंपणे, पाऊलवाटा अशा अनेक क्लृप्त्यांचा वापर केला जातो. मोगल उद्यानांत पाण्याचा, प्रबोधनकालीन यूरोपातील उद्यानांत कातरलेल्या झुडपांचा, आधुनिक उद्यानांत भिंतींचा उपयोग अशाच प्रकारे केलेला आहे.
उद्यानाच्या मांडणीत काही विशिष्ट प्रकार प्रचारात आहेत. एका प्रकारची उद्याने आतून, तर दुसऱ्या प्रकारची उद्याने बाहेरून बघण्यासाठी योजली जातात. प्रत्येक उद्यानात एकांत, वनक्रीडा व मनन यांसाठी काही खास जागा योजण्यात येतात. मांडणीच्या दृष्टीने सलग हळुवारपणे बदलत जाणाऱ्या पातळ्या व फिरते आकार वापरून काही आधुनिक उद्यानांची योजना आखतात तर अष्टकोनी, चौकोनी अशा आकारांचा वापर उद्यानास भौमितिक सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी केला जातो.
प्रमाण : उद्यान प्रमाणबद्ध दिसण्यासाठी त्याच्या अनेक अंगांचे एकमेकांशी योग्य प्रमाण असणे जसे आवश्यक असते, तसे संपूर्ण उद्यान हे सभोवतालच्या सृष्टीशी किंवा वास्तूशी प्रमाणशीर असणे आवश्यक असते. खाजगी उद्यानांचे प्रमाण व्यक्तीशी, मोठ्या शहरातील उद्यानांचे प्रमाण सभोवतालच्या वास्तूंशी व जनसमुदायाशी, उपवनांचे व राष्ट्रीय उद्यानांचे प्रमाण त्यांच्या आसपासच्या पर्वत, तळी किंवा इतर नैसर्गिक गोष्टींशी असणे आवश्यक असते. मोठे राजरस्ते किंवा उपवनातील रस्ते यांवरून वाहने फार वेगाने जात असल्यामुळे झाडांची मांडणी लांब अंतरावर असलेल्या मोठ्या वृक्षसमुदायाची असावी. वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या फार जवळ झाडे असल्यास धोका निर्माण होऊन झाडांची शोभा अनुभवण्यासही अवधी मिळत नाही. भराभर बदलणाऱ्या जवळच्या दृश्यांपेक्षा लांबवरचे वृक्षसमुच्चय जास्त आल्हाददायक ठरतात. उजेडाचे व सावल्यांचे पट्टे, उघडा व बंदिस्त असा दृष्टिकोन, दृष्टीच्या बदलणाऱ्या पातळ्या यांमुळे येणारे दृश्यांतील नावीन्य सतत कायम ठेवण्याच्या दृष्टीने कृत्रिम रीत्या वृक्षरचना करण्यात येते.
काळ : उद्यानरचनेत काळाचा विचार करणे आवश्यक आहे. कारण सर्वस्वी वृक्ष व वेलींवर अवलंबून असलेली मांडणी कालांतराने बिघडण्याची शक्यता असते. फरशी, शिल्पे, बांधकाम, जमिनीचे आकार व दूरचे सृष्टिसौंदर्य या सर्वांच्या मिलाफातून निर्माण झालेली मांडणी जास्त काळ प्रमाणबद्ध राहू शकते.
उजेड व सावल्या : घनदाट झाडांची योजना करून गूढ वातावरण, तर हिरवळीचा वापर करून हलके आल्हाददायक वातावरण उद्यानात निर्माण करता येते. यासाठी रचनेत प्रकाश व सावल्या यांची सांगड घालावी लागते. कापलेली झुडपे, फुलांचे ताटवे व कातरलेल्या आकाराच्या पानांची झाडे यांची योजना करून उजेड व सावल्यांचा खेळ साध्य करता येतो.
पोत: इराणी व मोगल उद्यानांत पोताचा वापर प्रकर्षाने केलेला आढळतो. अनेक तऱ्हेच्या फरशा, कोरीवकाम केलेले चबुतरे, बारादऱ्या इ. वापरून उद्यानांची रचना केलेली असल्यामुळे अनेक पोत दृष्टीसमोर येतात. वाळू, दगड, बांबू, सागवान यांचे नैसर्गिक पोत जपानी स्थलशिल्पज्ञ फार कौशल्याने वापरतात. जपानी उद्यानाचे रसग्रहण करताना उद्यानाचे पोत व त्याच्या साहाय्याने निर्माण केलेले आभास, विरोधाभास व अवकाश हे महत्त्वाचे ठरतात. झाडांच्या किंवा हिरवळीच्या प्रकारानुरूप नैसर्गिक पोत बदलतो. मोठ्या उपवनांचे नियोजन यांवर अवलंबून असते.
रंग व छटा : उद्यानात अनेक रंगांची झाडे व फुले असल्यामुळे अनेक रंगसंगती व रंगयोजना करणे शक्य होते. गालिचासारखे अनेक भडक रंग प्रबोधनकालीन उद्यानांत वापरले जात. इटलीत गडद हिरव्या रंगाच्या सुरूच्या वृक्षांसमोर पांढरी संगमरवरी शिल्पे योजततर मोगल उद्यानात फुलांच्या ताटव्यांचे रंग वापरीत असत. आधुनिक उद्यानांत एकमेकांत मिसळत जाणारे किंवा विरोधी रंग वापरून शोभा आणली जाते किंवा निळसर वा करड्या रंगाची झुडपे पार्श्वभूमीसारखी योजली जातात.
वृक्षांचा आडोसा : अनेक वृक्ष ओळीने व दोन-तीन रांगांत लावले, तर सोसाट्याचा वारा, दूषित हवा, धूर इत्यादींपासून संरक्षण प्राप्त होते. अनेक स्थलशिल्पज्ञ व नगररचनाकार अशा नैसर्गिक संरक्षणाचा उपयोग करतात. मोकळ्या जागी किंवा समुद्रकिनाऱ्याजवळ उद्यानाची मांडणी केलेली असल्यास अशा संरक्षक रांगांची आवश्यकता भासते. अशा वृक्षांच्या पट्ट्यांची कार्यक्षमता झाडांच्या उंचीवर अवलंबून असल्यामुळे निरनिराळ्या उंचीची झाडे राखतात.
उद्यानांचा वापर : उद्याने किंवा उपवने यांच्या वापराप्रमाणे त्यांच्या मांडणीत फरक पडतो. खास शोभेची किंवा अवलोकनाची उद्याने आणि खेळ व क्रीडांसाठी वापरावयाची उद्याने असे दोन विभाग पडतात. झाडांचे प्रकार, जमिनीची मांडणी, फरशा व पाण्याचा वापर या सर्वांत उद्यानाच्या उपयोगानुरूप बदल करावे लागतात. क्रीडा-उद्यानांत मोठ्या हिरवळी लवकरच खराब होतात अशा जागी वाळू, नदीतील गोटे किंवा फरशा यांची योजना उपयुक्त ठरते. शाळा, कारखाने यांच्याजवळील उद्यानात खेळण्याची व्यवस्था असावी व झाडे एका कडेला किंवा सीमेवरच लावावी. वस्तीच्या जवळील उद्यानांत लहानथोरांची विहारव्यवस्था करून मांडणीत लहान बागेसारखी आखणी करून विभाग पाडले, तर ते जास्त शोभिवंत दिसतात. उद्यानात विविध प्रकारचे साहित्य व वास्तू योजण्यात येतात व त्यांत उद्यानांच्या प्रकारांनुसार फरक करण्यात येतो. (चित्रपत्रे ६५, ६६).
कान्हेरे, गो. कृ.
संदर्भ : 1. Baily, L. H. Standard Cyclopaedia of Horticulture, New York, 1960.
2. Gothein, M. M.; Trans. Archer-Hind, A History of Garden Art, 2 Vols., 1928.
3. Walls, I. G. Creating Your Garden, London, 1967.
4. Whitehead, G. E. Garden Designs and Construction, London, 1966.
5. Whitehead, S. B. A Modern Guide to Good Gardening, London, 1967.