इस्लामी धर्मपंथ : इस्लाममध्ये त्र्याहात्तर पंथ होतील आणि त्यांतील बहात्तर नामशेष होऊन फक्त एकच बाकी उरेल, असे मुहंमद पैगंबरांनी म्हटले होते. त्यामुळे अनेक मुस्लिम लेखकांनी निरनिराळ्या पंथोपपंथाना भिन्न नावे योजून त्यांची संख्या फुगविण्याचा प्रयत्‍न केला. शहरस्तानीने पंथांच्या वर्गीकरणासाठी चार मूलभूत तत्वे सुचविली : (१) ईश्वराचे विशेष, (२) नियती आणि इच्छास्वातंत्र्य, (३) कुराणातील वचने व धोक्याचे इशारे आणि (४) श्रद्धा व चुका, साक्षात्कार, बुद्धिवाद आणि इमामकल्पना. इच्छास्वातंत्र्यवादी कादिरी व नियतीवादी जब्री ईश्वरी विशेषांची नित्यता मानणारे शिफाती आणि नाकारणारे मुताझिली कर्मनिवाडा कियामतीच्या दिवसाअगोदर नाही, असे सांगणारे मूर्जी आणि या जगात कर्माबद्दल शिक्षा होईल, असे म्हणणारे वाइदी खलीफापद लायकी व लोकमान्यतेनुसार असावे, असा आग्रह धरणारे खरिजी आणि ते पद ईश्वरदत्त वंशपरंपरेने मिळते, हा दावा मांडणारे ⇨ शिया अशा विरोधी जोड्या त्याने सांगितल्या आहेत. इस्लाममध्ये धर्म आणि शासन यांचा मिलाफ झाल्यामुळे तात्त्विक आणि सैद्धांतिक मतभेदांबरोबरच राजकीय संघर्षामुळेही पंथोपपंथ निघाले. 

खलीफा उस्मान याच्या मनस्वी राजवटीने संतप्त झालेल्या सैनिकांनी ६५६ मध्ये इस्लाममधील पहिले बंड उभारून उस्मानचा खून केला. त्यांच्या मते खलीफांची लोकमताने निवड झाली पाहिजे आणि खलीफाने दुर्वर्तन केल्यास त्याला काढून टाकले पाहिजे. खलीफांची निवड कुरैश जमातीमधून अगर मुहंमदांच्या वंशजांमधून न होता कडक धर्माचरण करणारा कोणताही मुसलमान, मग तो हबशी का असेना, त्याला लोकांचा पाठिंबा असल्यास खलीफा म्हणून निवडला गेला पाहिजे. प्रथम बाहेर पडले म्हणून या लोकांना खवारिज (खारिजी) किंवा बाहेर पडलेले असे नाव मिळाले. ते वृत्तीने अत्यंत कर्मठ व साधे होते. अन्यायाविरुद्ध त्यांनी सतत लढे दिले. उत्तर आफ्रिकेच्या नव-मुस्लिमांनी स्वत:चे स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी खारिजी पंथाचा पाठपुरावा केला. या पंथाचे लोक अजूनही उत्तर आफ्रिकेत आढळतात. 

खारिजींनी खलीफा अलीचा खून केल्यानंतर उमय्या घराण्याने खिलाफतीवर ताबा मिळविला. अलीच्या पाठिराख्यांनी प्रथम हसनला आणि त्यानंतर हुसेनला खलीफा म्हणून निवडले. खलीफा यझीद याने करबला येथे हुसेनला घात केला. त्यानंतर हुसेनच्या वंशजांना खलीफापद मिळावे म्हणून अनेक लढाया झाल्या. खलीफापद किंवा इमामपद ईश्वरदत्त असून मुहंमदांच्या वंशजांकडेच ते असले पाहिजे, असा शियांचा दावा होता. त्यांच्या मते बाराधा इमाम गुप्त झाला आहे व योग्य वेळ येताच तो पुन्हा प्रकट होऊन खिलाफतीचा ताबा घेईल. बहुतेक शिया पंथीय इमामांचे खूनच झाले. शिया पंथातही इमामपदाच्या हक्कावरून अनेक वाद झाले व प्रत्येकाच्या नावाने वेगवेगळे उपपंथ निघाले. उदा., झईदी, ⇨ इस्माइली, मुस्ताली, निझरी, दाउदी, सुलेमानी इत्यादी.

मुआविया, यझिद आदी उमय्या खलीफांनी अघोर अत्याचार केले होते. त्यांच्याविरुद्ध अनेक बंडेही झाली परंतु ती निर्दयपणे मोडून काढण्यात आली. अत्याचारांची घृणा आल्यामुळे तात्विक वाद निर्माण झाले. मनुष्याच्या हातून जी बरीवाईट कृत्ये होतात ती त्याच्या स्वयंप्रेरणेने होतात, की नियतीमुळेदुष्कृत्यांना या जगातच शासन करावे का अत्याचारांविरुद्ध बंडाचा झेंडा उभारावा, की उभारू नये परमेश्वर अत्याचारी  लोकांना नरकवासाची शिक्षा देईल, की क्षमा करील असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. व्यक्तीला इच्छास्वातंत्र्य आहे असे म्हणणारे कादिरी, इच्छास्वातंत्र्य नाही म्हणणारे जब्री, अत्याचारांना परमेश्वर शिक्षा देईल, की क्षमा करील ते कियामतदिनापर्यंत कोणासही सांगता येणार नाही, असा युक्तिवाद करणारे मूर्जी इ. पंथ तात्त्विक भूमिकेवरून निघाले. उमय्यांनी कादिरी मंडळींना नामशेष करून टाकले. 

मूर्जी विद्वानांनी धर्मशास्त्र आणि इस्लामी कायदेशास्त्र निर्माण केले. प्रत्येक कायदा आणि निर्णय परमेश्वरी मार्गदर्शनाबरहुकूम आहे, असे दाखविण्यासाठी त्यांनी कुराणातील वचने व मुहंमदांच्या आख्यायिका यांच्या आधारावर, तसेच हीच प्रमेये वापरून उपस्थित होणारा प्रत्येक प्रश्न पूर्वी निर्णय झालेल्या प्रश्नासारखा आहे, असे ओढूनताणून सिद्ध करून, त्याप्रमाणे विवेचन करण्याची पद्धती सुरू केली. उदा., कुराणात विवाहबाह्य संबंध सिद्ध करण्यासाठी चार साक्षीदार हवेत असा उल्लेख आहे. त्यावरून प्रत्येक फौजदारी गुन्ह्यात तो गुन्हा प्रत्यक्ष पाहिलेले चार साक्षीदार असलेच पाहिजेत, असा पुराव्याचा कायदा तयार झाला. एका विशिष्ट पद्धतीने कुराणावरील भाष्य तयार करण्यात आले आणि त्यात दिलेला अर्थ व स्पष्टीकरण हेच खरे स्पष्टीकरण आहे, असा आग्रह धरला गेला. त्याविरुद्ध मुताझिला नावाने प्रसिद्ध असलेल्या विद्वानांच्या गटाने प्रत्येक निर्णय सारासारविवेकाने आणि तर्काच्या निकषावर तपासला पाहिजे, असे प्रतिपादन केले. मूर्जी धर्मपंडित आणि स्वतंत्र बुद्धीचे मुताझिला यांचे जवळजवळ प्रत्येक प्रश्नावर वादविवाद झालेपण शेवटी राजसत्तेने मुताझिलांविरुद्ध कौल दिला आणि बाबावाक्यं प्रमाणम् असा दावा मांडणाऱ्या रूढीप्रिय धर्मपंडितांचा विजय झाला. मुताझिलांनी लिहिलेली पुस्तके जाळून टाकण्यात आली आणि नवे धर्मशास्त्र पूर्ण झाल्यावर राजसत्तेने त्याला अधिकृत मान्यता दिली. त्यामुळे बहुसंख्य मुसलमान  सुन्नी पंथाचे झाले. या धर्मशास्त्राचा आधार मुहंमदांच्या परंपरा किंवा सुन्नाह होत्या आणि त्यावरूनच सुन्नी पंथ हे नाव पडले. 

इस्लामचे धर्मशास्त्र आणि कायदाशास्त्र पूर्ण झाले, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी फार थोड्या भागात होत असे. इतरत्र अनेक परंपरागत रूढी, समजुती इ. टिकून राहिल्या. एक समजूत अशी, की जगाचा उद्धार करण्यास कोणीतरी महदी निर्माण होणार आहे आणि तोच खरा इस्लाम धर्म प्रत्यक्ष अंमलात आणील. या समजुतीने निरनिराळ्या कालखंडात अनेक लोकांनी स्वत: महदी असल्याचे जाहीर केले. मध्ययुगीन भारतातसुद्धा रुकन, सय्यद मुहंमद यांसारखे महदी निघाले व त्यांना प्रचंड पाठिंबा मिळाला. सय्यद मुहंमदाचे वारस शेख अब्दुल्ला नियझी आणि शेख अलाई यांनीही महदी पंथ वाढविला आणि महदी धर्मवाङ्‌मय निर्माण केले. अद्यापही काही ठिकाणी या पंथाचा प्रभाव आहे. गेल्या शतकात इराणमध्ये अली मुहंमद आणि त्याचे अनुयायी मिर्झा हुसेन अली यांनी स्वत: महदी असल्याचे जाहीर केले. अली मुहंमदाला फाशीची शिक्षा झाली. मिर्झा साहेबांनी स्थापन केलेल्या ⇨ बहाई पंथाला जगातील सर्व देशांतून पाठिंबा मिळाला. बहाई पंथ उदारमतवादी आहे. मुसलमानांमध्ये आधुनिक समाजव्यवस्था आणि स्त्रीस्वातंत्र्य आणण्यासाठी, बहाई पंथाने बरीच कामगिरी केली आहे. परंतु जागतिक सनातन उलमांनी बहाई पंथ हा इस्लामच्या बाहेरील स्वतंत्र धर्म आहे, असा निर्णय दिला.

भारतातील शेवटचे महदी मिर्झा गुलाम अहमद  पंजाबातील कादियान या गावी राहत असत. तेथे त्यांनी १८८९ साली स्वतः महदी असल्याचे जाहीर केले. महदी कल्पना आणि अवतारकल्पना एकच आहे असे सांगून १९०४ साली त्यांनी आपण स्वत: कृष्णाचा अवतार असल्याचा आपल्याला साक्षात्कार झाला आहे, असे जाहीर केले. सुन्नी धर्मपंडितांनी इस्लामच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या शतकांत धर्म आणि कायदाशास्त्र उभारले ते बरोबर नाही, त्याचे पालन करण्याची आवश्यकता नाही, कुराणातील किंवा हदीसमधील काही भाग रद्द (मन्सूख) झाला आहे हे विधान चुकीचे आहे, मुसलमानांनी आता जिहाद याचा अर्थ आक्रमक धर्मयुद्ध न करता फक्त संरक्षण असाच करावा इ. विचार या नव्या महदींनी व्यक्त केले. त्यांनाही असंख्य अनुयायी मिळाले आणि ⇨ अहमदिया पंथाचा किंवा कादियानी पंथाचा प्रसार अनेक देशांत झाला. फाळणीनंतर कादियानचे मुख्य पीठ पाकिस्तानमध्ये हलविण्यात आले आहे. अहमदियांमध्येही आता दोनतीन उपपंथ निघाले आहेत. 


प्रस्थापित धर्म आणि कायदाशास्त्राचे शब्दश: पालन करणारे आणि अनुकरण करणारे मुकल्लिद तेच खरे मुसलमान,या कल्पनेविरुद्ध सनातनी पंडितांनीही आवाज उठविला. या बंडखोरीचे नेतृत्व चौदाव्या शतकात इब्‍न तैमीयहने केले. त्याच्या मते धर्मशास्त्रातील अनेक निर्णय कुराण आणि सुन्ना यांना धरून नव्हते. ⇨ सूफी पंथाला अधिकृत इस्लाममध्ये स्थान देण्याच्या अल्-गझालीपासून चालत आलेल्या रूढीलाही त्याने सक्त विरोध केला. सूफी तत्त्वज्ञानामुळेच इस्लाम अशुद्ध व दुर्बळ झाला आहे, असा त्याने दावा केला आणि मुहंमद पैगंबरांच्या वेळच्या नियमांचे संशोधन करून पुनरुज्‍जीवन करावे आणि त्यासाठी ⇨ इज्तिहादचा हक्क चालू ठेवावा, असा त्याने आग्रह धरला. त्यावेळी हा विचार यशस्वी होऊ शकला नाही. परंतु अठराव्या शतकात अब्दुल वहाबने अरबस्तानात असेच विचार मांडून अव्वल इस्लामच्या प्रस्थापनेसाठी बंड उभारले. कुराण आणि हदीस यांबाहेरचे विचार – उदा., सूफी तत्त्वज्ञान-उखडून टाकण्याच्या प्रयत्‍नांत त्याला इब्‍न सौदचा पाठिंबा मिळाला. शेवटी तीस वर्षांच्या लढाईनंतर इब्‍न सौदचा मुलगा अब्दुल अझीझ याचा विजय झाला आणि ⇨ वहाबी पंथ  हाच अधिकृत इस्लाम असल्याचे त्याने जाहीर केले. वहाबी पंथाचा थोडाफार परिणाम गेल्या शतकातील मुस्लिम चळवळींवरही झाला. बंगालमधील फरैदिया पंथ आणि सय्यद अहमद बरेलवी (याने १८३१ साली पेशावरला स्वतंत्र खिलाफत स्थापन केली होती) यांच्यावर वहाबी पंथाचा पगडा होता. ईजिप्त आणि पश्चिम आशियातील इख्वान’ तसेच भारत आणि पाकिस्तानातील जमाते इस्लामी या संघटनांचे तत्त्वज्ञान आणि वहाबी पंथाचे तत्त्वज्ञान यांत बरेच साम्य आढळते. 

याउलट जवळजवळ सर्व इस्लामी देशांतून इस्लामच्या आधुनिकीकरणाची चळवळ थोड्याफार प्रमाणात चालू आहे. तुर्कस्तानमध्ये माल पाशाने शरीयत रद्द करून आधुनिक पाश्चिमात्य कायदे लागू केले. इतर देशांतही प्राचीन रूढी आणि कायदे रद्द करून आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्याच्या आधारावर कायदे करावेत अशी चळवळ चालू आहे. 

करंदीकर, म. अ.