इस्लाम धर्म : इस्लाम धर्मसंस्थापक मुहंमदांचा कालखंड इ. स. ५७१ ते ६३२ हा होता. सबंध अरबस्तानचे धार्मिक तीर्थक्षेत्र आणि सर्वांत मोठे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या मक्का शहरात ते जन्मले. त्यांच्या जन्मापूर्वी शेकडो वर्षे अरबस्तानावर रोमन आणि इराणी साम्राज्याची अधिसत्ता होती. परंतु ही दोन्ही साम्राज्ये खिळखिळी झाली होती. मक्का, यसरिब (मदीना), ताइफ यांसारख्या शहरांना स्वायत्तता होती. इतरत्र ठिकठिकाणी ज्यू, ख्रिश्चन जमातींच्या वसाहती आणि भटकणाऱ्या अरब टोळ्यांचे तांडे पसरलेले होते. मक्केची यात्रा हा त्या काळीही अरब जीवनातील एक महत्वाचा भाग होता. प्रत्येक अरब टोळीच्या कुलदेवता असत आणि या कुलदेवतांच्या मूर्ती, मक्केच्या भव्य काबा मंदिरात ठेवलेल्या असत. वर्षातून एकदा मक्केची यात्रा करून आपल्या कुलदैवताची पूजा करण्याचा टोळीवाल्यांमध्ये प्रघात होता. काबा मंदिरात येशू आणि मेरी यांची भव्य चित्रेही होती. सर्व अरबांचे यात्रास्थान असल्यामुळे काबा मंदिराचे उत्पन्नही मोठे होते. मक्का शहरावर कुरैश जमातीचे वर्चस्व होते. कुरैशांच्या निरनिराळ्या घराण्यांकडे मक्का शहराची आणि देवालयाची व्यवस्था ठेवण्याच्या कामगिऱ्या होत्या. कुरैश लोक व्यापारातही खूप पैसा कमावीत. कुरैशांच्या बानी हशिम या घराण्यात ⇨ मुहंमद पैगंबरांचा जन्म झाला. विसाव्या वर्षांपासून तेथील एक श्रीमंत विधवा खदीजा हिच्या मोठ्या व्यापाराचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहण्यास सुरुवात केली. त्या निमित्ताने उंटांच्या काफिल्यांबरोबर त्यांनी सबंध देश पालथा घातला होता. पुढे त्यांनी खदीजाशीच विवाह केला.

त्या काळातही अरबी भाषा बरीच प्रगत होती. अनेक सुंदर कवने, लोकगीते आणि पोवाडे लोकांच्या जिभेवर असत. इतर मागासलेल्या समाजांत जशा अनेक खुळ्या समजुती आणि रीतिरिवाज असत, तसेच वेगवेगळ्या अरब जमातींत आणि टोळीवाल्यांमध्येही ते प्रचलित होते. अरबी भाषा आणि मक्केचे तीर्थस्थान हेच त्यांना एकत्र जोडणारे दुवे होते. प्रत्येक टोळीतील लोक एकमेकांविषयी बंधुभावाने वागून टोळीची एकजूट अभेद्य राखीत. टोळीप्रमुखं सर्वांत वयोवृद्ध आणि शहाणा असा निवडला जात असे. त्याच्या आज्ञा सर्वजण मानीत. परंतु इतर टोळीवाल्यांशी मात्र त्यांचे जवळजवळ हाडवैरच असे आणि त्यामुळे टोळीवाल्यांच्या आपापसात सदोदित लढाया चालत. ठिकठिकाणी वसाहती करून राहिलेल्या ज्यू आणि ख्रिश्चन जमाती मात्र यापासून दूर राहत. व्यापाराच्या निमित्ताने तिन्ही शहरांत ज्यू आणि ख्रिश्चन कुटुंबेही राहत असत. 

व्यापारामुळे आणि देवस्थानाच्या उत्पन्नामुळे मक्केची भरभराट झाली होती. परंतु पैसा कमावण्यासाठी श्रीमंत लोक फसवाफसवीही करीत असत. देवस्थानसुद्धा यापासून मुक्त नव्हते. सावकारी पाशांनी काही श्रीमंतांनी गरीब जमातींना जखडून टाकले होते. हे लोक देवाचे नव्हे, तर पैशाचे पुजारी आहेत अशी त्यांना कुप्रसिद्धीही मिळाली होती. त्यामुळे अनेक़जण अबरस्तानमध्येच वाढलेल्या हनीफ पंथाकडे आकर्षित होत. हनीफ पंथाच्या लोकांची एकेश्वरवादावर गाढ श्रद्धा होती. मूर्तिपूजा आणि इतर धार्मिक सणांऐवजी टेकडीवर जाऊन एकांतात अमूर्त परमेश्वराचे ध्यान करण्याचा रिवाज हनीफ पंथीयांत होता. ईश्वर एकमेवाद्वितीय आहे हे हनीफांचे तत्त्व असल्यामुळे ज्यू धर्मीयांना ते जवळचे मानीत. मुहंमद व्यापाराच्या निमित्ताने सर्वत्र फिरत असल्यामुळे, अरबस्तानातील वेगवेगळ्या जमातींच्या श्रद्धा आणि रीतिरिवाज त्यांना माहीत असल्यास आश्चर्य नाही. मुहमंद स्वत: हनीफ पंथाकडे आकर्षित झाले होते. 

वयाच्या चाळीसाव्या वर्षी नेहमीप्रमाणे मक्केजवळील हिरा टेकडीवर ध्यान करीत असता मुहंमदांना गेब्रिएल या देवदूताचे दर्शन झाले. ज्यू आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांचे लोक गेब्रिएलला मानीत असत. गेब्रिएलकरवी मुहंमदांना ईश्वरी संदेश वाचण्याची आज्ञा झाली. तेव्हापासून पुढील बावीस वर्षे अधूनमधून त्यांच्या मुखातून उत्स्फूर्त अशी वाणी बाहेर पडत असे. त्याचा संग्रह कुराण (कुर्आन) म्हणून प्रसिद्ध आहे. कुराण  याचा अर्थच ‘मोठ्याने वाचन’ असा आहे. धार्मिक कारकीर्दीतील पहिली अकरा-बारा वर्षे कुराण पठन आणि उपदेश करण्यात घालविल्यानंतर मुहंमदांना मक्का सोडून मदीनेस जावे लागले. तेथे लोकांनी त्यांच्या हातात राजसत्ता सोपविली. पुढील दहा वर्षांत त्यांनी सर्व अरबस्तान एकछत्री अंमलाखाली आणला. अरबस्तान शंभर टक्के मुसलमान देश झाला. 

आजचे इस्लामी जग : उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील मोरोक्कोपासून पूर्वेकडे पाकिस्तानपर्यंत जवळजवळ सर्व राष्ट्रे इस्लामी राष्ट्रे आहेत. यांशिवाय तुर्कस्तान,मलेशिया आणि इंडोनेशिया हेही इस्लामी देश आहेत. बांगला देश, पाकिस्तान तसेच इंडोनेशियात इस्लाम धर्मीय बहुसंख्येने आहेत. रशिया, चीन आणि भारत येथेही मुसलमान वस्ती बरीच आहे. पूर्व यूरोपातील इतर देश आणि उत्तर व दक्षिण अमेरिकेतही मुसलमान आढळतात. जगातील एकूण मुस्लिम लोकसंख्या ५५ कोटीच्या वर भरेल (१९६१). भारतातील मुस्लिम लोकसंख्या ६,१४,१७,९३४ असून महाराष्ट्रातील ४२,३३,०२३ (१९७१) आहे.

श्रद्धेय तत्त्वे आणि महत्त्वाच्या संकल्पना : ‘इस्लाम या शब्दाचा अर्थ परमेश्वरावर नितांत श्रद्धा, त्याच्या इच्छांचे व आज्ञांचे पालन, ईश्वराला संपूर्ण शरणागती हा होय. परंतु प्रत्येक आस्तिक व्यक्ती मुसलमान असू शकत नाही. ईश्वरासंबंधीची आणि त्याच्या मार्गदर्शनासंबंधीची इस्लामची विशिष्ट कल्पना मान्य असणारेच मुसलमान होऊ शकतात. 

विश्वामध्ये फक्त एकच ईश्वर आहे. सारे विश्वच त्याने निर्माण केले आहे. ईश्वराने विश्वनिर्मितीच्या वेळी देवदूत आणि जिन (भूत, पिशाच) निर्माण केले. त्यानंतर मानव आणि इतर प्राणिमात्र. प्राणिमात्रांत लिंगभेद असतो. देवदूतांमध्ये लिंगभेद नाही. जिन या दोहोंमधलेच असतात. मानवाची निर्मिती करण्याअगोदर ईश्वराला देवदूतांपेक्षाही एक श्रेष्ठ कृती तयार करण्याची इच्छा झाली. त्या इच्छेचा परिणाम म्हणूनच आदिमानव आदम आणि ईव्ह यांना त्याने निर्माण केले. त्यानंतर परमेश्वराने सर्व देवदूतांना आदमला अभिवादन करण्याची आज्ञा केली. ही आज्ञा सर्वांनी पाळली इब्‍लिस किंवा सैतान या देवदूताचाच फक्त एक अपवाद निघाला. त्याने असूयेमुळे अभिवादन करण्याचे नाकारले. त्यामुळे रागावून परमेश्वराने आदमबरोबर सैतानालाही पृथ्वीवर पाठविले. आदम आणि त्याच्या वंशजांना ज्ञान देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी एका संरक्षित पट्टिकेवर कुराण  निर्मिले होते. ईश्वराने आदमला कुराण  सांगितले व त्याप्रमाणे वागण्याची आज्ञा केली तसेच सैतान ईश्वरी संदेशापासून त्याला च्युत करण्याचा प्रयत्‍न करील, तरी सावध रहा, असेही सांगितले. कुराण  ही परमेश्वराची मानवजातीवर कृपाच आहे. 


सैतानाच्या प्रभावामुळे किंवा दुरभिमानामुळे मानव ईश्वरी मार्गदर्शनापासून अधूनमधून च्युत होतो. काही वेळा ईश्वरी संदेशाचा विसर पडून किंवा ईश्वरी संदेशात इतर संदेश मिसळून त्याला विकृत केले जाते. मोठ्या प्रमाणावर ईश्वरी आज्ञांचे उल्लंघन होते, तेव्हा परमेश्वर अधूनमधून पृथ्वीवरच मानवांना कडक शिक्षा करतो. ठिकठिकाणी जीर्ण-भग्न अवशेष सापडतात ते या शिक्षेची साक्ष देतात. तथापि ईश्वर मुख्यत: क्षमाशील आणि कृपावंत असल्यामुळे त्याने आदमच्या पहिल्या चुकीला जशी क्षमा केली आणि त्याच्यावर पुन्हा अनुग्रह केला, त्याचप्रमाणे वेळोवेळी ठिकठिकाणी त्याने आपले पैगंबर किंवा प्रेषितही धाडले. हे पैगंबर मानवच होते. देवदूत किंवा जिन नव्हते. या पैगंबरांकरवी ईश्वराने पुन्हापुन्हा लोकांना कुराणाच्या मार्गदर्शनाचा लाभ दिला. प्रत्येक पैगंबराने कुराणाच्या मूळ स्वर्गीय मार्गदर्शनाप्रमाणे स्वत:ची वागणूक ठेवली आणि लोकांना उपदेश केला. प्रत्येक पैगंबराने आपल्या बांधवांना सांगितले, की परमेश्वर एकच आहे. त्याला कोणी भागीदार अथवा प्रतिस्पर्धी आहे, ही कल्पनाच परमेश्वर सहन करू शकत नाही. परमेश्वराने मानवाला निर्माण केले आहे आणि त्याच्यावर मार्गदर्शनाची कृपाही केली आहे. जर कोणी ईश्वरी मार्गदर्शनाप्रमाणे आचरण केले नाही, तर परमेश्वरी कोपामुळे त्याला अपार नरकयातना भोगाव्या लागतील. पैशाच्या लोभाने व इतर प्रलोभनांमुळे लोक सैतानाच्या आहारी जातात आणि त्यांना परमेश्वराचा व ईश्वरी संदेशाचा विसर पडतो. परंतु प्रत्येकाने कियामतीच्या दिवसाची आठवण ठेवली पाहिजे. त्या दिवशी सर्व मृतात्मे जागृत होतील. देवदूतांच्या मेळाव्यात सिंहासनावर बसलेल्या परमेश्वरासमोर देवदूत आपल्या वह्या उघडून प्रत्येकाच्या सत्कृत्यांचा आणि दुष्कृत्यांचा पाढा वाचतील आणि तराजूच्या पारड्यात दोहोंचे वजन केले जाईल. सत्कृत्यांचे पारडे जड झाले, तर प्रत्येक जीवात्म्याला स्वर्गात प्रवेश मिळेल. उलट ईश्वराला विसरणाऱ्याना, ईश्वर अनेक आहेत असे मानणाऱ्यांना, मूर्तिपूजकांना आणि ज्यांची दुष्कृत्ये अधिक आहेत, पण परमेश्वराने ज्यांना क्षमा केली नाही त्यांना तर कायम नरकयातना भोगाव्या लागतील. हा ईश्वरी संदेश आदम, अब्राहम, नूह, इसाक, मोझेझ, झकारिया, युसुफ, येशू यांसारख्या हजारो पैगंबरांनी आपल्या बांधवांना दिला. शेवटी परमेश्वराने मुहंमदांना प्रेषित म्हणून अरबस्तानात धाडले आणि स्वर्गीय कुराण  त्यांच्या मुखातून अरबी भाषेत वदविले. इतर प्रेषितांप्रमाणे मुहंमदांनीही आदमपासून चालत आलेला खरा धर्म मानवांना शिकविला आणि ईश्वरी संदेशाप्रमाणे कसे वागावे, याचा आदर्श आपल्या स्वत:च्या आचरणाने लोकांसमोर ठेवला.

मुहंमद हे परमेश्वराचे अखेरचे प्रेषित होते. त्यांच्यानंतर दुसरा कोणी प्रेषित येणार नाही आणि पुन्हा तोच संदेश सांगणार नाही. मुहंमदांमार्फत आलेला ईश्वरी संदेश अधिकृतपणे लिहून ठेवलेला आहे. त्यात गेल्या तेराशे वर्षांत कानामात्रेचाही फरक झालेला नाही. तसेच त्यांच्या अधिकृत आठवणी, आख्यायिकाही अधिकृतपणे तयार केल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांची शिकवण, उक्ती आणि कृती आजही स्पष्टपणे लोकांना उपलब्ध आहेत. यापूर्वीच्या प्रेषितांचे संदेश अपुरे आणि त्यांत भेसळ झाल्यामुळे अनधिकृत स्वरूपात उपलब्ध आहेत, ते रद्द समजले पाहिजेत. त्यामुळे ज्यूंचा ईश्वरी धर्मग्रंथ तौरात  (जुना करार) किंवा ख्रिश्चनांचेगॉस्पेल  रद्दबातल झाले आहे. 

परमेश्वर सगुण आहे. परमेश्वराचे गुण दर्शविणारी नव्याण्णव विशेषणे कुराणात दिली आहेत. उदा., विश्वनिर्माता (खालिक), अनादी आणि अनंत (समद), कृपाळू (रहीम), पालनकर्ता (हाफिझ), क्षमाशील (गफूर), सर्वशक्तिमान (अझीझ), रक्षणकर्ता (मुहायमिन), श्रेष्ठतम (वली), मार्गदर्शक (हादी), कियामतदिनीचा न्यायाधीश (हाकिम), विश्वाचा मालक (मालिक), इत्यादी. हा परमेश्वर एकमेवाद्वितीय आहे. अल्लाशिवाय दुसरा ईश्वर नाही आणि मुहंमद त्याचा पैगंबर आहे. (लाइलह इल्ल ल्लह मुहमंद-उर्-रसूल ल्लह), हे इस्लामचे ब्रीदवाक्य (कलमा) आहे. चारचौघांसमक्ष या ब्रीदवाक्याचा मोठ्याने उच्चार करणाराच मुसलमान होऊ शकतो. कारण कलमा म्हटल्याने तो आपली ईश्वरावरील श्रद्धा जाहीर करतो, ईश्वराला कोणी भागीदार किंवा प्रतिस्पर्धी नाही हे मान्य करतो, मुहंमद ईश्वराचे प्रेषित आहेत हे कबूल करून मुहंमदांमार्फत आलेल्या ईश्वरी मार्गदर्शनाचे पालन करण्याचा निर्धार करतो. 

विशुद्ध एकेश्वरवाद हा इस्लामचा पाया आहे. अद्वैत तत्वज्ञान, मूर्तिपूजा आणि अवतारकल्पना इस्लामला मान्य नाहीत. येशू परमेश्वराचा पुत्र नसून मानवी प्रेषित होता, असा कुराणाचा दावा आहे. प्रत्येक व्यक्ती एकदाच जन्म घेते आणि अखेरच्या  न्यायदिनी पुन्हा सजीव होऊन स्वर्गात किंवा नरकात जाते. या एका जन्मातील सत्कृत्ये आणि दुष्कृत्ये तिचे कियामतीच्या दिवशीचे भवितव्य ठरवितात. त्यामुळे पुनर्जन्माची कल्पना इस्लाम मानीत नाही. ख्रिस्ती धर्मातील मूळ पापाची कल्पनाही इस्लामशी विसंगत आहे. कारण कोणीही व्यक्ती दुसऱ्याच्या पापात किंवा पुण्यात सहभागी होऊ शकत नाही. जो तो स्वत:ला जबाबदार आहे. 

ईश्वर क्षमाशील असला, तरी दंडाधिकारीही आहे. वेळीच पश्चात्ताप झाला, तर तो क्षमा करीलही. परंतु प्रत्येक व्यक्तीने ईश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याची क्षमा आणि कृपा याचिली पाहिजे. ईश्वरावर प्रेम करा, ही ख्रिश्चन शिकवणूक याहून अगदी वेगळी आहे हे उघडच आहे. देवाची भीती बाळगून त्याच्या आज्ञेप्रमाणे आणि मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करणे, म्हणजेच नैतिक जीवन जगणे, असे इस्लाम धर्म सांगतो. कुराणात काय करावे आणि काय करू नये ते सांगितले आहे याचे अधिक तपशीलवार विवेचन मुहंमदांच्या परंपरा, उक्ती आणि कृती वर्णन करणाऱ्या हदीसमध्ये (इस्लामी स्मृतिग्रंथ) दिले आहे. त्यानुसार वर्तन करणे म्हणजेच धर्माचरण किंवा नैतिक जीवन.

परमेश्वराला संपूर्ण शरणागती हा इस्लामचा अर्थ असला, तरी हा धर्म निवृत्तिवादी नसून प्रवृत्तिवादी आहे. त्यात संन्यासाला किंवा ब्रह्मचर्याला स्थान नाहीसंसाराला आहे. स्त्रीपुरुषसंबंध, कुटुंबसंस्था, स्थावर-जंगम मिळकतीची वाटणी, स्त्रीचे आणि पुरुषाचे वैयक्तिक हक्क, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कर्तव्य इ. जीवनाच्या विविध अंगोपांगांसंबंधी इस्लामने एक विशिष्ट शिस्त घालून दिली आहे. वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक नीतिकर्तव्यांच्या बाबतीत ईश्वरी किंवा धार्मिक मार्गदर्शन असल्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या इस्लामने एका विशिष्ट शिस्तीने एकत्र गुंफल्या आहेत. 

कुराण : हे गद्यकाव्य ६,२२६ आयतांचे (श्लोकांचे) असून ते ११४ सूरांमध्ये (अध्यायांत) संपादित केलेले आहे. सर्वांत मोठा सूरा २३६ आयतांचा असून दोन छोटे सूरा ३–३ आयतांचे आहेत. कुराणाची उत्पत्ती मुहंमदांना अधूनमधून मिळणाऱ्या स्फूर्तीने बावीस वर्षे चालू होती. वेळोवेळी ह्या आयता मुखोद्‌गत केल्या जात आणि पानांवर किंवा चामड्यांवर लिहिल्या जात. मुहंमदांच्या मृत्यूनंतर सु. वीस वर्षांनी त्यांचा जावई खलीफा उस्मान याच्या मार्गदर्शनाखाली कुराणाचे संपादन झाले. आता माहीत नसलेल्या कोणत्यातरी कारणासाठी, संपादकाने स्थलकालाचा क्रम ठेवला नाही. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या आणि अगदी शेवटी उत्स्फूर्त झालेल्या आयताही एका सूरामध्ये सापडतात. सूरांची मांडणी करतानासुद्धा अगदी शेवटचे आणि मोठे सूरा प्रथम आणि सुरुवातीच्या आयता असलेले सूरा मध्येच किंवा शेवटी आले आहेत. पहिल्या संपादनानंतर सु. शंभर वर्षांनी कोणता सूरा मक्केतील (मुहंमदांच्या धार्मिक कारकीर्दीतील पहिला कालखंड) आणि कोणता मदीनेतील ते प्रारंभी नमूद करण्याची पद्धती सुरू झाली. 


मक्केतील सूरांचा एकंदर सूर आर्जवीपणाचा, इस्लामचे तत्त्वज्ञान पटवून देण्याचा आहे. त्यांत परमेश्वराचे वर्णन, अंतिम न्यायदिनाची माहिती, स्वर्गसुखाचे आणि नरकयातनांचे वर्णन, विश्वनिर्मिती तसेच सैतानाची आणि आदमची कथा, ज्यू आणि ख्रिश्चन धर्मांतील पुराणकथांचे एकेश्वरवाद आणि मूर्तिपूजेचा धिक्कार या तत्त्वांनुसार केलेले विवरण, तत्कालीन वाईट चालींचा धिक्कार, मुहंमदांना लोकांनी विचारलेल्या शंका आणि त्यांची उत्तरे, मुहंमदांना मक्केच्या लोकांचा विरोध इ. हकीकत दिली आहे. मक्केहून मुहंमद यस्त्रिब शहरात गेले. तेथील स्थानिक शासन त्यांच्या हवाली करण्यात आले. पैगंबरांचे गाव म्हणून यसरिबला मदीना हे नाव पडले. मदीनेतील आयतांतून अधिकार आणि आत्मविश्वास पदोपदी प्रकट होतो. या आयतांतून मुहंमदांच्या राज्यातील ज्यू, ख्रिश्चन आदी विविध जमातींचे शासनाशी संबंध, ज्यू आणि ख्रिश्चनांना मुहंमद हे ईश्वराचे प्रेषित आहेत हे मान्य करण्याचे आवाहन, नवीन राज्यांतील मुलकी आणि फौजदारी कायदे, नवी रीतिरिवाज, मक्केच्या मूर्तिपूजकांशी झालेल्या लढाया, या लढायांत सामील  होण्याचे आणि लढाईसाठी देणग्या देण्याचे आवाहन, अनुयायांनी लढाईच्या वेळी पाळण्याची शिस्त, कचखाऊ अनुयायांचा धिक्कार, ज्यू आणि ख्रिश्चनांची अरबस्तानातून हकालपट्टी, मक्केवरील अंतिम विजय आणि काबावर मिळविलेला ताबा, तेथील मूर्तींचे भंजन इ. विषय हाताळलेले आहेत. 

कुराणाची भाषा अत्यंत प्रभावी आहे. मुहंमदांनी तारुण्याची वीस वर्षे मोठ्या व्यापारधंद्यात घालविली होती यावरून त्यांना लिहिता वाचता येत असावे असे वाटते. परंतु ते अशिक्षित होते असा जवळ जवळ सर्व मुस्लिम धर्मवेत्त्यांचा दावा आहे. किंबहुना एका अशिक्षित माणसाच्या तोंडून कुराणासारखा भव्य, प्रतिभासंपन्न आणि सामर्थ्यशाली ग्रंथ बाहेर पडावा, हेच ईश्वरी कृपेचे आणि चमत्काराचे उदाहरण आहे, असे भाविक लोक मानतात. किंबहुना प्रत्येक आयत म्हणजे एक चमत्कार आहे म्हणून कुराणाच्या आयतास अरबीत चमत्काराचा निदर्शक अशा अर्थाचा आयत हाच शब्द वापरतात. नवव्या सूराखेरीज प्रत्येक सूराची सुरुवात कृपाळू आणि दयावंत परमेश्वराच्या नावाने या अर्थाच्या शब्दांनी होते. एकदोन सूरा सोडले तर बाकीचे सर्व सूरा मुहंमदांना किंवा लोकांना उद्देशून परमेश्वर, भाषण करीत असल्यासारखे आहेत. कुराणात परमेश्वर स्वत:चा उल्लेख आम्ही असा करतो काही वेळा मी हा शब्दही वापरलेला आहे. ईश्वराच्या वाणीचे भाषांतर करणे चूक आहे या कारणासाठी कित्येक शतके कुराणाचे भाषांतर करण्यास प्रतिबंध होता [→ कुराण].

धर्मशास्त्र आणि कायदा : मदीनेच्या १० वर्षांच्या अमदानीत मुहंमद राजकीय सत्ताधीश झाले. शासक या नात्याने त्यांनी अनेक कायदे केले व त्यांची अंमलबजावणीही केली. धर्मसंस्थापकाने केलेल्या निवाड्यांमुळे प्रत्येक शासकीय निवाड्याला धार्मिक निवाड्याचे महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार किंवा खलीफा हेसुद्धा एकाच वेळी धर्मप्रमुख आणि शासनप्रमुख म्हणून काम पाहत. साहजिकच शासकीय कार्यप्रणाली आणि शासकीय निवाड्यांना धर्मशास्त्रात महत्त्वाचे स्थान मिळाले. इस्लामच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे हे सर्व निर्णय परमेश्वरी आज्ञा आणि मार्गदर्शन यांनुसार होते. मदीनेचे राज्य शहरापुरते मर्यादित होते तोवर जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नावर मुहंमदांना आपला स्वत:चा निर्णय देता येत असे. परंतु राज्याचा विस्तार झाल्यानंतर काजींच्या नेमणुका होऊ लागल्या. शासनकर्त्यांप्रमाणे काजीही स्थानिक धर्मप्रमुख झाले व दैनंदिन कज्‍जांत न्यायनिवाडा करू लागले. परंतु हे काम कुराणाच्या मार्गदर्शनाबरहुकूम करणे जवळपास अशक्य होते. कारण कुराणात सर्वसाधारण मार्गदर्शन होते. प्रत्येक नव्या प्रश्नाचा निवाडा देण्यासाठी दुसऱ्या परंतु तितक्याच महत्त्वाच्या मार्गदर्शनाची जरूरी होती. यामुळेच मुहंमदांनी वेळोवेळी ज्या गोष्टी केल्या, जे निवाडे दिले, जी मते व्यक्त केली त्यांच्या आधारे निवाडे देण्याची पद्धती सुरू झाली. 

इस्लामी धर्मशास्त्राची सुरुवात कुराणाचे विश्लेषण तसेच मुहंमदांच्या आठवणी आणि आख्यायिका यांचा संग्रह करण्याच्या कार्यापासून होते. परंतु जसजसा काळ उलटत गेला, तसतसे आठवणी आणि आख्यायिकांचे पेवच फुटल्यासारखे झाले. त्यामुळे प्रत्येक आठवणीसाठी योग्य पुरावा आहे की नाही, याची छाननी सुरू झाली. शेवटी मुहंमदांच्या मृत्यूनंतर सु. २५० वर्षांनी त्यांच्या आठवणींचे संग्रह सहा वेगवेगळ्या सुन्नी पंडितांनी तयार केले. या प्रत्येक संग्रहाला अधिकृत संग्रह म्हणून मान्यताही मिळाली. हे संग्रह (हदीस) धर्मशास्त्र आणि कायदा या दोहोंसही फार मोलाचे ठरले. शिया व इतर पंथांच्या वेगवेगळ्या हदीस असतात. 

श्रेष्ठ कायदेपंडितांनी विशिष्ट प्रश्नांमध्ये निवाडा देण्याच्या बाबतीत स्थानिक काजींना मार्गदर्शन केले. त्यांच्यात कोणत्याही मुद्यावर एकमत झाले (इज्मा) तर त्या निवाड्याला आधारभूत मानण्यात येई. परंतु हे कायदेपंडित एकत्र बसून निर्णय घेत नसत. कोणतरी श्रेष्ठ व्यक्ती आपला निर्णय देत असे. त्यानंतर इतर कायदेपंडितांनीही तशाच प्रकारचा निवाडा देण्यास सुरुवात केली, की या निवाड्याला अधिकृत स्वरूप येऊ लागे. 

कुराण, हदीस आणि श्रेष्ठ कायदातज्ञ यांच्या एकवाक्यता, या तीन कसोट्यांवर बऱ्याच प्रश्नांबाबत निर्णय घेता येत असे. तरीसुद्धा काही प्रश्न गुंतागुंतीचे असल्यामुळे निर्णय देण्यास अडचण येऊ लागली. तेव्हा काही पंडितांनी सारासारविवेकाने स्वत:च योग्य तो निर्णय घेण्यास सुरुवात झाली. कारण या प्रश्नांबाबत कुराण, ⇨ हदीस आणि इज्मा (पंडितांचे मतैक्य) यांपासून काही मार्गदर्शन मिळत नसे. परंतु या स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या प्रश्नावर (इज्तिहाद) खूप वादळ माजले. त्यातून शाफी या पंडिताने असा मार्ग काढला, की पूर्वीच्या सर्वमान्य निर्णय घेण्यात आलेल्या प्रश्नाशी गुंतागुंतीच्या किंवा नवीनच उद्‌भवलेल्या प्रश्नाचे काही बाबींतत जरी साम्य आढळले, तरी या समानतेच्या आधारावर (किया) साधकबाधकतेचा विचार करून निर्णय घ्यावेत. याशिवाय अरबस्तानच्या बाहेर ठिकठिकाणी पूर्वीपासून चालत आलेल्या चालीरीतींना धरून निर्णय घेण्याच्या बाबतीतही मुस्लिम पंडितांत बरीच एकवाक्यता झाली आणि इस्लामी कायदा किंवा शरीयत उन्नत झाला.

अशा रीतीने कुराण, हदीस, इज्मा, किया आणि स्थानिक रीतिरिवाज यांच्या आधाराने अगणित प्रश्नांवर अकमत झाल्यावर, ‘हिदायत’ नावाचे धर्मशास्त्राचे आणि कायद्यासंबंधीचे ग्रंथ निर्माण झाले. विलक्षण बुद्धिमान आणि मान्यवर पंडितांचे काहीजण अनुयायी झाले. हे पंडित म्हणजे अबू हनीफा, मलिक इब्‍न अनास, मुहंमद शाफी, इब्‍न हनबाल इत्यादी. त्यांच्या चार वेगळ्या शाखा सुरू झाल्या (हनफी, मालिकी, शाफी आणि हनबाली). हनफी शाखेचे अनुयायी तुर्कस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या देशांत आहेत. मालिकी शाखा अरबस्तानचा काही भाग आणि उत्तर आफ्रिकी देशांत आहे. दक्षिण अरबस्तान, पूर्व आफ्रिका, भारताचा पश्चिम किनारा, मलेशिया आणि इंडोनेशिया भागांतील मुसलमान शाफी शाखेचे आहेत. हनबाली शाखेचे अनुयायी फारच थोडे आहेत. ते प्रामुख्याने मध्य अरबस्तानात आढळतात. 

जवळजवळ ७५ टक्के मुसलमान सुन्नी पंथाचे आहेत. वर सांगितलेल्या चार शाखा या सुन्नी मुसलमानांच्या शाखा आहेत. यांशिवाय शिया आणि इतर उपपंथांच्या धर्मशास्त्राच्या आणि कायदेशास्त्राच्या स्वतंत्र शाखा आहेत. 


मध्ययुगीन मुस्लिम समाजाच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील जवळजवळ प्रत्येक प्रश्नावर हिदायत ग्रंथांमधून अधिकृत निर्णय दिलेले सापडतात. यावरून हे ग्रंथ किती मोठे आणि किती काळजीपूर्वक तयार केले आहेत याची कल्पना येईल. परंतु आधुनिक युगातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांतीमुळे या ग्रंथांतील ईश्वरी मार्गदर्शन मानवजीविताच्या अंतापर्यंत स्थलकालांमुळेही न बदलणारे आहे, असा आग्रह धरणाऱ्या सनातनी मुसलमानांना एक मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि आता बदललेल्या परिस्थितीशी कितपत मिळतेजुळते घ्यावे हा त्यांच्यापुढे मोठाच प्रश्न आहे. 

अध्यात्म : ईश्वराला संपूर्ण शरणागती हा धर्माचा पाया असल्यामुळे, जरी अधिकृत धर्मनेत्यांनी दैनंदिन ऐहिक जीवनाचे ईश्वरप्रणीत नियम सांगितले आणि हे नियम पाळल्याने कियामतीच्या दिवशी स्वर्गसुखाचे वाटेकरी होण्याची आशा निर्माण केली, तरी अनेक विचारवंतांना विरक्तीची ओढ असे. धर्म आणि राजकारण यांची अभेद्य सांगड घातल्यामुळे राजकीय सत्ताधाऱ्यानी काहीही केले, तरी त्यांना त्यासाठी धर्माचा काही ना काही तरी अधिकार सांगता येई. खलीफा अलीच्या खुनानंतर उमय्या घराण्यातील खलीफांनी अनन्वित अत्याचार केले. त्यामुळे अनेक विचारवंतांना चीड आली. त्यांनी धर्मग्रंथांचा दाखला देऊन सांगितले, की या अत्याचारांमुळे परमेश्वर त्यांना कियामतदिनी नरकवासाची सजा देईल. उलट सत्ताधाऱ्यांच्या पुरस्कर्त्यांनी दावा केला, की ज्या काही गोष्टी घडल्या त्या परमेश्वरी इच्छेमुळे. मानवाला आपल्या कोणत्याही कर्माबाबत स्वातंत्र्य नाही. त्याच्या हातून जे घडते, ते ईश्वरेच्छेचाच परिणाम आहे. उलट पहिल्या विचारवंतांनी दावा केला, की परमेश्वराने मानवाला विवेक स्वातंत्र्य दिले आहे. आणी सारासारविवेक न करता मन मानेल तसे अत्याचार करण्याने ईश्वरी कोपच होईल. या विचारवंतांना जब्री हे नाव पडले आणि सत्तेच्या पाठीराख्यांना मूर्जी ’ हे नाव प्राप्त झाले. उमय्या खलीफांच्या कारकीर्दीत जब्रींचा खूप छळ झाला. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हे जाणून अनेकांनी विरक्ती आणि अध्यात्माचा आश्रय घेतला. प्रत्येक राजवटीत सत्ताधाऱ्यांच्या जुलुमाला कंटाळून अनेक मंडळी विरक्तिमार्गाकडे वळली.

मुहंमद स्वत: हिरा पर्वतावर ध्यान करीत असत. ही हनीफ परंपरा पुढेही सतत चालू राहिली. विरक्त झालेले लोक फाटकीतुटकी लोकरी वस्त्रे घालून ध्यान आणि ईश्वरचिंतन करीत बसत. या वस्त्रांना अरबी भाषेत सूफ असे म्हणतात. सूफ घालणारे ते सूफी. विरक्ती आणि अध्यात्म यांचा ध्यास घेतलेल्यांची एक सूफी परंपराच निर्माण झाली. या मंडळींनी काजीच्या नोकऱ्या नाकारल्या. त्यांना हिदायतीप्रणीत शिस्तबद्ध जीवन जगण्यात रस वाटत नसे. ते सर्व प्रकारच्या अधिकारपदांपासून दूर राहण्याचा प्रयत्‍न करीत. कठोर, पवित्र आणि शुद्ध व साधे जीवन जगण्यास पाठिंबा देणारी पैगंबरांची अनेक वचने त्यांना मिळाली. सूफी मंडळींनी कुराणाची स्वतंत्र भाष्ये तयार केली आणि हदीस परंपराही. कुराणातील परमेश्वराच्या ९१ नामांचे नामस्मरण (जिक्र) करताकरता अनेकांना परमानंदाचा साक्षात्कार झाला. इस्लाममधील पहिली सूफी परंपरा आत्मानंद प्राप्त झालेल्यांची होती. बाह्य संसारात सर्वत्र दु:ख आणि अन्याय अनुभवणाऱ्या सूफींना आत्मानंदामुळे शांती लाभली. या अनुभवाची पुढील पायरी म्हणजे साक्षात्काराचे विविध अनुभव. नवव्या शतकात बयाझिद बिस्तामी या संताने या अनुभवांचे वर्णन लिहून ठेवले. 

बयाझिद बिस्तामीचे अनुयायी बगदादमध्ये आणि इराणमध्ये होते. बगदादला मुस्लिम धर्मगुरूंचे (उलमा किंवा उलेमा) प्राबल्य असल्यामुळे सूफी संत शक्य तो आपल्या पंथाबाबत गुप्तता राखीत असत. कारण त्यांना शरीयतचे पालन हे जीवनाचे मुख्य ध्येय वाटत नसे. उलट शरीयतच्या काटेकोर पालनासाठी राजसत्ता आणि उलमा डोळ्यात तेल घालून दक्षता बाळगीत. परंतु पुढेपुढे सूफी संतांना आपल्या अनुभवांतून अद्वैताचा साक्षात्कार होऊ लागला. इराणी अनुयायांपैकी मन्सुर अल्-हल्लाजने तर अद्वैताचा अनुभव सांगताना ‘मीच परमेश्वर आहे, परमेश्वरात आणि माझ्यात फार अंतर उरले नाही ’ असे जाहीर केले. या ‘गुन्ह्यासाठी’ मन्सुरला फाशीची शिक्षा झाली. बगदादच्या अनुयायांनी यापासून बोध घेतला. अल्-जुनैदने सूफी तत्वज्ञान आणि इस्लाम यांत फरक नाही, हे दाखविण्याचा प्रयत्‍न केला. ईश्वराला शरण जाताना सूफी संत आपले मीपण विसरून जातो (फना), त्यावेळी परमेश्वर आणि नामस्मरण करणारा संत यांत फक्त एकच पडदा (बला) शिल्लक राहतो. अशा रीतीने शरीयतच्या बाबतीत बेफिकीर व अद्वैत (वहदत-उल्-वुजूद) सिद्धांतावर विश्वास असणारे आणि शरीयतचे उल्लंघन न करता द्वैत आणि अद्वैत यांच्या मधला मार्ग स्वीकारणारे, असे दोन ढोबळ सूफी पंथ उदयास आले. सूफीमधील उपपंथ वेगवेगळ्या संतांच्या अनुयायांनी स्वतंत्रपणे चालविले. 

सूफी संतांना सामान्य मुसलमान जनतेत अफाट लोकप्रियता मिळाली. संतांच्या समाध्या (दर्गे) ही तीर्थक्षेत्रे बनत चालली. त्याच सुमारास हळूहळू खलीफांची सत्ता खिळखिळी झाली आणि खलीफा नाममात्रच धर्मगुरू आणि शासक म्हणून उरले. खरी राजसत्ता छोट्या मोठ्या सुलतानांकडे गेली. सूफी संप्रदायावर विश्वास असलेला विद्वान धर्माधिकारी ⇨ अल्गझाली मंत्री झाल्यावर त्याच्या सल्ल्यानुसार मुस्लिम धर्मप्रमुखांनी सूफी संप्रदाय आणि शरीयतवर भर देणारे उलमा यांची सांगड घातली. ही गोष्ट तुर्की सुलतानांच्या कारकीर्दीत होऊ शकली, याचे कारण सूफी संतांनी तुर्कस्तानामध्ये असंख्य अनुयायी इस्लामला मिळवून दिले होते. सूफी संतांमुळे इस्लाम धर्म स्वीकारलेल्या सेनाधिकाऱ्यांकडे सत्ता आल्यानंतर, अल्-गझालीचा सल्ला मानणे अधिक सोपे झाले आणि सूफी तत्त्वज्ञान, त्यातील अद्वैताचा किंवा वहदत-उल्-वुजूदचा भाग वगळून, इस्लामचे एक अंगभूत तत्वज्ञान ठरले. सूफी संप्रदायांना राजाश्रय मिळाला. भारतात बाराव्या आणि तेराव्या शतकांत जे इस्लामी साम्राज्य स्थापन झाले, त्या साम्राज्यात सूफी संतांचा फार मोठा प्रभाव होता. हे सूफी संत शरीयतमध्येही निपुण असते [→ सूफी पंथ].

आचारविचार आणि व्यावहारिक सामाजिक नियम : प्रत्येक मुसलमानाने धार्मिक जीवन व्यतीत केले  पाहिजे, अशी इस्लामची अपेक्षा असते. आवश्यक धार्मिक आचरणात पुढील बाबींचा समावेश होतो : (१) कलमा अल्लाहो अकबर (परमेश्वर श्रेष्ठतर आहे) आणि वर सांगितल्याप्रमाणे लाइलह इल्ल ल्लह मुहंमद-उर्-रसूल ल्लह ब्रीदवाक्याचा जाहीर उच्चार (२) ६ ते ८ वर्षांपर्यंतच्या मुलांची सुंता. (३) पाच वेळा प्रार्थना (सलात किंवा नमाज). (४) दर शुक्रवारी मशिदीतील सार्वजनिक प्रार्थनेच्या वेळी उपस्थिती. या सामूहिक प्रार्थनेला उपस्थित राहण्याचा स्त्रियांना हक्क नाही. (५) रमझान या चांद्रमासात कुराण  प्रकट झाले, त्यानिमित्त दर वर्षी रमझान महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्जली उपवास (रोझे). (६) रमझानच्या शेवटी प्राप्तीच्या अडीच टक्के इतका दानधर्म. (७) आयुष्यातून एकदा तरी मक्केची यात्रा. मुसलमानांच्या सर्व प्रार्थना मक्केकडे तोंड करून केल्या जातात. 

परवानगीशिवाय कोणाच्याही घरात प्रवेश न करणे स्त्रियांनी गोषात (पडदानशीन) राहणे कोणतीही गोष्ट करावयाची असे ठरविताना इन्शा अल्ला’ म्हणजे अल्लाची मर्जी असेल तर असे शब्द उच्चारणे मोठ्याने किंवा कठोर भाषेत न बोलणे वृथाभिमान न बाळगणे धनसंचय न करता दानधर्म करीत राहणे व्यापारात खोटी वजने-मापे न वापरणे दुसऱ्याने आपली चीजवस्तू सुरक्षित ठेवण्यास दिली असता, नंतर ती जशीच्या तशी परत करणे व्याज घेऊन सावकारी न करणे कर्ज घेतल्यास वेळेवर परत करणे ज्याला कर्ज दिले त्याची हलाखीची परिस्थिती असल्यास परतफेडीस मुदतवाढ देणे मद्य, अफू, डुकराचे मांस व जुगार यांपासून दूर राहणे फक्त अल्लाच्या नावे कापलेल्या जनावराचे मांस सेवन करणे जोपर्यंत पित्याने इस्लामचा त्याग केला नसेल तोपर्यंत पित्याच्या आज्ञेत राहणे मानवी चित्रे आणि पुतळे तयार न करणे इ. आचारविषयक नियम इस्लामने विहित मानले आहेत.


इस्लामी नागरी कायदा अजून अनेक देशांत अस्तित्वात आहे. आधुनिक युगातील मानवी हक्क आणि स्त्रीपुरुषसमानता या तत्त्वांनुसार कायद्यात सुधारणा करण्याचे प्रयत्‍न तुर्कस्तान आणि काही पश्चिम आशियाई देशांतून चालू शतकाच्या आरंभापासून सुरू आहेत. सौदी अरेबिया आणि भारत हेच त्याला अपवादभूत देश आहेत. स्त्रियांनी गोषा वापरावा आणि डोक्यापासून पायापर्यंत शरीर झाकून घ्यावे, असे धर्मशास्त्रात विहित नाही. तथापि गोषापद्धती भारत, पाकिस्तान आदी भागांत शतकानुशतके अस्तित्वात आहे. गेल्या तीस–चाळीस वर्षांत गोषापद्धती कमी होत चालली आहे. इस्लामी नागरी कायद्यामुळे मुस्लिम स्त्रिया समान हक्कांपासून वंचित झाल्या आहेत. बालविवाहाविरुद्धचा सारडा कायदा मुसलमानांना लागू नसल्यामुळे, अजूनही कोठेकोठे त्यांच्यात बालविवाह होतात. बहुपत्‍निकत्वाची चाल अद्यापि अस्तित्वात आहे. बहुसंख्य मुस्लिम राष्ट्रांतून बालविवाह आणि बहुपत्‍निकत्वाची पद्धती नाहीशी करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या गेल्या आहेत. परंतु स्त्रियांच्या दृष्टीने सर्वांत अन्यायमूलक पद्धती म्हणजे, इस्लामी धर्मशास्त्रात विहित असलेला पुरुषांचा एकतर्फी घटस्फोटाचा (तलाक) हक्क. त्यामुळे नवरे मन मानेल तेव्हा तलाक, तलाक, तलाक असे म्हणून बायकांना घटस्फोट देतात. घटस्फोटित स्त्रियांना विवाहाच्या वेळी मेहेर म्हणून निश्चित केलेल्या रकमेखेरीज काहीही मिळू शकत नाही. श्रीमंत कुटुंबांत मेहेरची रक्कम बरी असते परंतु गरीब मुसलमान कुटुंबातील स्त्रियांना उदरनिर्वाहासाठी काहीच मिळू शकत नाही. पस्तीस वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रियांवर घटस्फोटाचा प्रसंग आला, तर त्यांची स्थिती अत्यंत शोचनीय होते. पश्चिम आशियाई देशांतून एकतर्फी घटस्फोट देण्याच्या नवर्‍यांच्या हक्कावर अलीकडे बऱ्याच मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

परमेश्वराचे मार्गदर्शन स्थलकालभेदातीत आहे. जगाच्या अंतापर्यंत ते लागू होणारे आहे. इस्लामचे रीतिरिवाज आणि कायदे परिपूर्ण आहेत त्यांत काडीमात्रसुद्धा फरक करण्याची आवश्यकता नाही, या सनातन इस्लामच्या आग्रहामुळे मुसलमानांसमोर फार मोठ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. इस्लामी धर्मशास्त्राची उभारणी मन्सूखवर म्हणजे नंतरच्या मार्गदर्शनाने अगोदरचे मार्गदर्शन रद्द होते, या तत्वावर झाली होती. कुराणातील मक्केच्या आयतांतून धार्मिक बाबतींत उदार स्वरूपाची मते सांगितली आहेत. उलट मदीनेच्या शेवटच्या आयतांतून मक्केच्या मूर्तिपूजकांविरुद्ध, ज्यूंविरुद्ध व ख्रिश्चनांविरुद्ध कठोर टीका आहे आणि धर्मयुद्ध करून सारी मानवजात इस्लामच्या झेंड्याखाली आणली पाहिजे, असा आदेश आहे. काअल् उम्म या ग्रंथाच्या चौथ्या भागात शाफी या प्राचीन धर्मपंडिताने अगोदरचे औदार्ययुक्त मार्गदर्शन रद्द झाले आहे, असे प्रतिपादिले. या मताला इतर पंडितांचीही पुष्टी मिळाली. त्यामुळे सर्व जगावर इस्लामी राज्य स्थापण्यासाठी जिहाद केला पाहिजे, या मताला धार्मिक मान्यता मिळाली. मजीद कादरी या अर्वाचीन पंडिताने शरीयतप्रणीत शांतता आणि युद्धासंबंधीचे कायदे, अशा अर्थाचे शीर्षक असलेल्या आपल्या ग्रंथातही इस्लामी शरीयतची अशी आज्ञा आहे, की सर्व जग इस्लामी स्वामित्वाखाली आणले पाहिजे असे ठासून सांगितले. आधुनिक युगात निरनिराळी स्वतंत्र राष्ट्रे आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांची प्रभुसत्ता आहे. मुसलमान आणि बिगरमुसलमान यांना दररोज जगात अनेक व्यवहारांत सहकार्य करणे भाग पडले आहे. शरीयतमध्ये मुसलमानांनी आपापसांत कसे वागावे आणि इतरांशी कसे संबंध ठेवावेत यांबाबत भिन्न आदेश आहेत. सर्व मानवांची समानता, स्त्रीपुरुष समानता, राष्ट्रीय स्वातंत्र्य, धर्मातीत शासन इ. तत्त्वांचा आजच्या युगात फार मोठा प्रभाव आहे आणि हा प्रभाव वाढतच जाईल हे स्पष्ट झाले आहे. अशा वेळी मनावर बिंबलेल्या परंपरागत कल्पना आणि आधुनिक युगातील वस्तुस्थिती यांतील तफावत दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. अर्थांतच ही कोंडी फोडण्यासाठी पाश्चिमात्य शिक्षण घेतलेले विचारवंत प्रयत्‍नांची पराकाष्ठा करीत आहेत. निरनिराळ्या इस्लामी देशांत मंजूर झालेले प्रागतिक कायदे या विचारवंतांच्या यशाचेच द्योतक आहेत. 

इस्लामी धर्मशास्त्राची छाननी पुन्हा सुरू झाली आहे आणि इस्लाम स्थापनेपासूनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकांत निर्माण झालेल्या प्रश्नांचा आणि त्यावेळी उपस्थित केलेल्या मुद्यांचा पुन्हा अभ्यास चालू आहे. मन्सूख-तत्त्वाचे प्रत्यक्ष व्यवहारात उच्चाटन होत आहे. इस्लामच्या तिसऱ्या शतकात मुताझिला या नावाने प्रसिद्ध असलेल्या तत्त्ववेत्त्यांनी मन्सूख-तत्त्वाला विरोध केला होता आणि प्रागतिक व उदार मते मांडली होती. त्यावेळी त्यांची सपशेल हार झाली परंतु आज हजार वर्षानंतर त्यांचेच विचार प्रभावी ठरू पाहत आहेत.

पंथोपपंथ : मुहंमदांचा ज्येष्ठ जावई खलीफा उस्मान याच्या कारकीर्दीत राजकीय कारणांसाठी पहिला इस्लामी धर्मपंथ उदयास आला. उस्मानच्या कारकीर्दीत त्याच्या अनेक सगेसोयऱ्यांना मोठ्या जागा दिल्या गेल्या होत्या. ईजिप्तचा राज्यपाल अमर इब्‍न अल्-आस याला पदच्युत करून त्याच्या जागी उस्मानच्या बांधवाला नेमल्यामुळे बंडाळी झाली. बंडखोरांनी शेवटी खलीफाचा वध केला. त्याच्यानंतरचा खलीफा अली याने उस्मानच्या नातेवाईकांना काढून टाकण्यास सुरुवात केली परंतु त्यांनी बंड केल्यामुळे हा प्रश्न लवादाकडे सोपविण्याचे मान्य केले. त्यामुळे उस्मानविरुद्ध बंड केलेल्यांनी स्वतंत्र पंथ स्थापन केला. हे खारिजपंथीय लोक अत्यंत कर्मठ होते आणि खलीफाची निवडणूक सर्व मुसलमानांचे मत घेऊन केली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. अलीच्या खुनानंतर अलीविरुद्ध बंड केलेल्या मुआवियाने स्वत:स खलीफा म्हणून जाहीर केले. मुहंमदांच्याच वंशजांकडे खिलाफत राहिली पाहिजे, हसन आणि हुसेन हे अलीचे पुत्र मुहंमदांचे नातू होते, त्यांना खलीफा नेमावे म्हणून मुआवियाविरुद्ध बंडे झाली. या बंडातून ⇨ शिया पंथ उदयास आला. पुढे त्यांच्या वंशजांमधील भाऊबंदकीने, शियांमध्येही अनेक उपपंथ निघाले. अशा रीतीने राजकीय कारणांसाठी बाहेर पडलेल्यांनी आपल्या स्वत:च्या वेगवेगळ्या धार्मिक तत्त्वज्ञानाची उभारणी केली. पुढे इस्लामी साम्राज्याचा अफाट विस्तार झाल्यावर, उत्तर आफ्रिकेच्या जनतेने इस्लाम धर्म स्वीकारलापरंतु आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी खारिजींच्या तत्त्वज्ञानास पाठिंबा दिला. इस्लामी साम्राज्याच्या स्थापनेपासूनच अरब आणि इराणी यांच्यात तीव्र स्पर्धा सुरू झाली. इराणी जनता जरी मुसलमान झाली होती, तरी अरबांबरोबरच्या संघर्षात तिने शिया पंथाला उचलून धरले.


अरबस्तानात खिलाफतीच्या संघर्षात शियांचा आणि खारिजींचा पराभव झाला आणि उमय्या घराण्याकडे खिलाफत आली. उमय्या खलीफांनी अत्यंत कठोरपणाने राज्यकारभार चालविला होता. त्यामुळे उमय्या अत्याचारांविरुद्ध पापभीरू विचारवंतांनी कादिरी पंथ स्थापन केला. उमय्यांच्या पापांचा समाचार परमेश्वर कियामतदिनी अवश्य घेईल, असे मत त्यांनी मांडले. उलट उमय्यांच्या पाठीराख्यांनी मानवाचे प्रत्येक कृत्य ईश्वरी इच्छेने होते, त्यामुळे परमेश्वर उमय्यांना शिक्षा करणार नाही, असे उत्तर दिले. या वादातून मानवाला स्वतंत्र बुद्धी असते, की त्याची सर्व कृत्ये परमेश्वरी इच्छेने होतात, हा तात्त्विक मतभेद निर्माण झाला. उमय्यांच्या पाठीराख्यांना मूर्जी हे नाव मिळाले. कादिरी पंथाचे लोक मानवाला आचारस्वातंत्र्य आहे, असे मानीत आणि उमय्यांच्या अत्याचारांचा निषेध करीत. शेवटी राजसत्तेच्या विजयाबरोबर मूर्जी तत्त्वाचाही वरचष्मा झाला. कादिरी पंथाच्या विचारवंत अनुयायांनी पुढे ⇨ मुताझिला पंथ स्थापन केला. त्यांच्या मते मानवाला सारासारविवेकशक्ती नसती, तर परमेश्वराने कुराणात दुष्कृत्यांसाठी शिक्षा सांगितलीच नसती. मूर्जी पंडित खलीफांच्या सर्वंकष सत्तेचे समर्थन करणाऱ्या मुहंमदांच्या तथाकथित वचनांचा आधार घेत. ही वचने बनावट आहेत, कारण ती तर्काला पटण्यासारखी नाहीत, असे प्रत्युत्तर मुताझिलांनी दिले. मानवी जीवनात परमेश्वरी मार्गदर्शनाइतकेच तर्क आणि सारासारविवेक यांना महत्त्व आहे. या मताच्या समर्थनार्थ त्यांनी कुराण आणि मुहंमदांची वचने यांचा पुरावा दिला. परंतु हे दोन्ही प्रकारचे पुरावे त्यानंतरच्या आयतांनी आणि उक्तींनी रद्द किंवा मन्सूख झाले, असे मूर्जींनी तर्कट लढविले. तेव्हा मुताझिलांनीमन्सूख कल्पनाच चुकीची आहे, कुराण  परमेश्वराचे संपूर्ण मार्गदर्शन आहे, त्यातल्या कांही आज्ञा आणि मार्गदर्शन आता रद्द झाले, असे सांगण्याचा अधिकार कोणत्याही मानवाला असू शकणार नाही, असा बिनतोड जबाब दिला. परंतु सत्तेपुढे त्यांचे काही चालले नाही.

इस्लाममधील बहुतेक सर्व पंथोपपंथ राजकीय संघर्षातून निर्माण झाले. धर्म आणि शासन यांचा संपूर्ण मिलाफ झाल्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धी धार्मिक प्रतिस्पर्धीही झाले आणि प्रत्येकाने आपापले वेगवेगळे धर्मशास्त्र निर्माण केले [ इस्लामी धर्मपंथ].

इस्लामी संघटना : मुहंमद स्वत: धर्मसंस्थापक, धर्मप्रमुख, शासक आणि सरसेनापतीही होते. त्यांच्यानंतरच्या खलीफांनी वेगळे सरसेनापती नेमले. साम्राज्य उभे राहिल्यावर गव्हर्नर किंवा राज्यपाल नेमण्यास सुरुवात झाली. त्यांच्या वेळोवेळी बदल्याही होत. साम्राज्यात ठिकठिकाणी सेनादल ठेवले जाई. गव्हर्नर खलीफांप्रमाणे स्थानिक धर्मप्रमुखही असत. त्यांच्या मदतीला ठिकठिकाणी कुर्रा किंवा कुराणपाठक नेमले जात. ते कुराण  म्हणून दाखवीत आणि धर्माची माहिती देत. गव्हर्नर शुक्रवारच्या प्रार्थनेचे नेते असत तसेच नागरी, मुलकी आणि फौजदारी या तिन्ही क्षेत्रांतील न्यायदानाचे काम करीत. पुढे त्यांची जागा ⇨ काजींनी घेतली. धर्मशास्त्राप्रमाणे न्यायदान करणे आणि स्थानिक राज्यकारभार चालविणे ही त्यांची कामे असत. काजींना मार्गदर्शन करण्यासाठी विद्वान धर्मपंडितांची मुफ्ती म्हणून नेमणूक करण्याची पद्धती सुरू झाल्यावर निरनिराळ्या प्रश्नांवर हे ]मुफ्ती काजींना आपली मते सांगत. ही मते किंवा फतवे समजावून घेऊन त्याप्रमाणे काजी न्यायदान करीत. या सर्व फतव्यांचे संकलन करूनच हिदायत तयार करता आले. 

इस्लामच्या दुसऱ्या शतकात प्रथम खलीफांनी वजीर किंवा मुख्य प्रधान नेमण्यास सुरुवात केली. त्यांच्या जोडीला साहिब अल्-बारीद हे वित्तमंत्री, पोस्टमास्टर जनरल आणि प्रमुख काजी म्हणून कामकाज पाहू लागले. अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी साहिब अल्-शुर्ताह हे नवीन मंत्री नेमले गेले. इस्लामच्या  तिसऱ्या शतकापासून ‘मुहतसिब’ नेमण्यास सुरुवात झाली. इस्लामचे धार्मिक आणि सामाजिक आचरण प्रत्येकजण कसोशीने करीत आहे की नाही, ते पाहण्याची जबाबदारी मुहतसिबांवर सोपविण्यात आली. खलीफांची सत्ता कमकुवत झाल्यानंतर ठिकठिकाणचे स्थानिक लष्करी अधिकारी सुलतानपद धारण करून स्वतंत्र राज्यकारभार करू लागले. त्यांनी धार्मिक बाबतीत सल्ला देण्यासाठी शेख-उल्- इस्लाम यांची नेमणूक करण्याचा प्रघात सुरू केला. ठिकठिकाणच्या काजींच्या नेमणुका करण्याचे काम शेख-उल्-इस्लाम यांच्यावर सोपविण्यात आले. सुलतानांच्या कारकीर्दीत खलीफांचे राज्यपाल नाहीसे झाले. सुलतानांनी राज्यपालांच्या जागी इक्तेदार नेमण्यास सुरुवात केली. हे इक्तेदार जमीनमहसूल गोळा करीत आणि सैन्यभरतीही करीत असत. सुलतान स्वत:सरसेनापतीही असत. जरूर पडल्यास इक्तेदारांच्या फौजा मदतीला बोलावून घेत. या सर्व पदांसाठी व त्या त्या खात्याच्या कनिष्ठ स्थानिक पदांसाठी नेमणुका होत व त्यांचे पगार सरकारी खजिन्यातून दिले जात. 

ठिकठिकाणी श्रीमंत लोकांनी स्थापन केलेल्या विश्वस्त निधींचा कारभार पाहण्यासाठी वक्फ मंडळे नेमली जात. त्यांचा प्रमुख मुतवल्ली असे. मशिदी, हमामबारे, सराया यांसाठी समित्या नेमल्या जात. दर्ग्याची व्यवस्था मूळ संतांचे वंशज (पीर) किंवा मुजावर पाहत. अद्यापही स्थानिक समित्या, मशिदी, दर्गे, हमामखाने आणि वक्फ यांची व्यवस्था हीच मंडळी पाहतात. 

भारतात काजींची नेमणूक सरकारमार्फत होते. मशिदींची व्यवस्था प्रत्येक मशिदीची समिती पाहते. खाजगी संस्था मशिदीत किंवा इतरत्र धार्मिक शाळा (मदरसा) चालवितात. त्यांत शिक्षण घेतलेल्यांची नेमणूक काजी म्हणून केली जाते. निरनिराळ्या पंथांचे आणि शाखांचे वेगवेगळे काजी असतात. 

इस्लामी संस्कृती : कर्मठ सनातनी इस्लामला चित्रकला, गाणे बजावणे इ. गोष्टी वर्ज्य आहेत. सूफी संतांच्या मठांतून धार्मिकगीते गाण्याससुद्धा उलमांचा विरोध असे. सूफी पंथाला मान्यता मिळाल्यानंतर गायनकला विकसित झाली. प्रत्येक मशिदीला जोडून पाठशाळा किंवा मदरसा असण्याचा प्रघात अकराव्या शतकापासून पडला. त्यांत मुख्यत: धार्मिक शिक्षण दिले जाते. पण या सर्व परंपरा १००० ते ११०० नंतरच्या. त्याअगोदर अरबी मुसलमान विचारवंतांनी आणि विद्वानांनी इस्लामी संस्कृती उभारण्याचे भगीरथ प्रयत्‍न केले होते. सनातन इस्लामच्या उदयानंतर हे सर्व प्रयत्‍न बंद पडले. 

यूरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचा पगडा बसल्यावर प्राचीन– विशेषत: रोमन आणि ग्रीक– संस्कृतींची पाळेमुळे नष्ट करण्यास आरंभ झाला. ख्रिस्तापूर्वीचे ज्ञान ते खरे ज्ञान नव्हेच, या आवेशाने ग्रीक विद्वानांची हकालपट्टी करण्यात आली. आपले ग्रंथ घेऊन सहाव्या आणि सातव्या शतकांत हे विद्वान यूरोप सोडून इराक, इराण या देशांत स्थायिक झाले. आठव्या शतकात अरब विद्वांनानी तत्त्वज्ञान, शास्त्र आणि कला इ. विषयांवरील ग्रीक ग्रंथांचा अभ्यास सुरू केला. या ख्रिस्तपूर्व विद्वत्तेची त्यांच्यावर एवढी छाप पडली, की त्यांनी या सर्व ग्रंथांची अरबी भाषांतरे करण्याचा सपाटा सुरू केला. संस्कृत भाषेतील अनेक ग्रंथांची भाषांतरेही  अरबीत झाली. नवव्या  शतकापासून या ज्ञानाची जोपासना करून त्यात भर घालण्यापर्यंत अरबी विद्वानांनी प्रगती केली. आज ॲरिस्टॉटल, प्लेटो इ. तत्त्ववेत्त्यांची मूळ पुस्तके अस्तित्वात नाहीत तथापि अरबी भाषांतरांवरूनच अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत यूरोपियनांनी या आपल्या अमोल ठेव्याचे पुनरुज्‍जीवन केले. गणित, बीजगणित, भौतिकी, रसायनशास्त्र, इतिहास, भूगोल आणि खगोलशास्त्र यांत अरबी विद्वानांनी मौलिक भर घातली. ॲरिस्टॉटल आणि प्लेटो यांच्या तत्त्वज्ञानावरील भाष्ये अरबीत तयार झाली. ग्रीक वैद्यकाचा आणि अरबी वैद्यकाचा मिलाफ होऊन नवे यूनानी वैद्यक तयार झाले. युद्धशास्त्रात प्रगती झाली आणि नवी शस्त्रे तयार करण्यात आली. 


या नवीन ज्ञानाचा फायदा इस्लामी साम्राज्यास झाला. त्या वेळच्या जगात अरबी संस्कृती वैभवाच्या शिखरावर पोहोचली होती. यामुळेच इतर देशांतील मुसलमानांना, विशेषत: तुर्कांना, इस्लामधर्म स्वीकारल्यानंतर ही संस्कृती आत्मसात करता आली. पुढे तुर्कांनी इस्लामी साम्राज्यावर ताबा मिळविला. त्यानंतर ३०० ते ४०० वर्षेपर्यंत इस्लामी राज्यांना, संबंध यूरोपीय देश एकजुटीने विरुद्ध उभे राहिले असूनसुद्धा, विजय मिळविले. मुस्लिम राज्यांना या लढायांत आपल्या श्रेष्ठ ज्ञानामुळे, नव्या युद्धतंत्राच्यायोगे आणि आधुनिक शस्त्रांमुळे इतर सर्वांशी दोन हात करून विजय मिळविण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत यूरोपीय संस्कृती इतर संस्कृतींच्या जेवढी पुढे होती, तेवढीच इस्लामी संस्कृती अकराव्या ते पंधराव्या शतकांमध्ये इतर संस्कृतींच्या पुढे होती. यूरोपात सहाव्या शतकात जे घडले, तेच इस्लाममध्ये दहाव्या आणि अकराव्या शतकांत घडले. त्यामुळे इस्लामी संस्कृतीची पुढील प्रगती रोखली गेली. तथापि जे ज्ञान आणि तंत्र आत्मसात केले गेले ते विसरणे शक्यच नव्हते. 

इस्लामच्या प्रसाराची कारणे : मुहंमदांनी अरबस्तानचे एक नवे राष्ट्र निर्माण केले. एक धर्म, एक भाषा आणि केंद्रीय राज्यकारभार यांनी एकसंध झालेले हे जगातील पहिलेच राष्ट्र होते. सर्व जग इस्लाममय करण्याच्या तीव्र आकांक्षेने नवोदित अरब राष्ट्राने एकामागून एक देश जिंकले. मुहंमदांच्या मृत्यूनंतर १०० वर्षांच्या आतच स्पेनपासून अफगाणिस्तानपर्यंतचा मुलूख काही अपवाद वगळता इस्लामी साम्राज्याखाली आला. यूरोपमध्ये सनातन ख्रिस्तवादाच्या प्रभावाने नवीन ज्ञान संपादन करणे तर दूरच राहो पण आपल्याजवळ असलेल्या अमोल ठेव्याचे जतन करण्याचेही भान त्यांना उरले नव्हते. रोमन आणि पर्शियन साम्राज्ये मोडकळीस आल्यानंतर इस्लामचा उदय झाला आणि वायुवेगाने साम्राज्यवाढ करणे अरबी खलीफांना आणि त्यांच्या सैन्याला शक्य झाले. त्यानंतरच्या काळात शिका, अधिक शिका जमले तर चीनपासूनही शिका, अशा अर्थाच्या मुहंमदांच्या उक्तीला प्रत्यक्षात मूर्त स्वरूप देऊन ज्ञानपिपासू अरबांनी एक उच्चतर संस्कृती उभारली. इतर सर्व देश त्यांच्यापुढे निष्प्रभ ठरले.

बाराव्या शतकाच्या अखेरीस इस्लामची घोडदौड दुसऱ्यांदा भारतावर चालून आली. त्या आधी आठव्या शतकात सिंध, पश्चिम पंजाब आणि अफगाणिस्तान अरबांनी जिंकलेले होतेच. पृथ्वीराज चौहानाच्या काळात भारतात छोटी छोटी अगणित राज्ये होती. एकदा पृथ्वीराजावर विजय मिळविल्यानंतर छोटी छोटी निर्बल राज्ये पादाक्रांत करण्यास त्यांना मुळीसुद्धा अवधी लागला नाही. तुर्की सुलतानां अगोदरच चिस्तीसारख्या सूफी संतांनी ठिकठिकाणी ठाण मांडले होते. साम्राज्य निर्माण झाल्यावर या सूफी संतांनी  देशभर आपले जाळे पसरविले आणि स्थानिक जनतेच्या मनावर आपला पगडा बसविला. युद्धात पराभव झालेल्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून आपले जीव वाचविले. पण सूफी संतांच्या प्रभावाने त्याहीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात स्वखुषीने धर्मांतर झाले. 

संदर्भ:1. Arberry, A. J. Sufism : An Account of the Mystics of Islam, London, 1950.

     2. Coulson, N. J. A History of Islamic Law, Edinburgh, 1964.

     3. Daniel, N. A. Islam, Europe and Empire, Edinburgh, 1966.

     4. Gibb, H. A. R. Modern Trends in Islam, Chicago, 1947.

     5. Gibb, H. A. R.Mohammedanism, New York, 1961.

     6. Hurgronje, S. C. Mohammedanism, New York, 1916.

     7. Levy, Reuben, The Social Structure of Islam, Cambridge, 1957.

     8. Schacht, Joseph, An Introduction to Islamic Law, Oxford, 1964.

     9. Smith, W. C. Islam in Modern History, Princeton, 1957.

   10. Watt, W. Montgomery, Islam and the Integration of Society, London, 1961.  

करंदीकर, म. अ.