गोविंदप्रभु : (११८७ ? – १२८७). महानुभाव पंथाचे संस्थापक ⇨चक्रधर  ह्यांचे गुरू. अमरावती जिल्ह्यातील ऋद्धिपुराजवळील (सध्याचे रिधपूर) काटसूर ह्या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याचे नाव अनंतनायक मातेचे नेमाइसा. ते लहान असतानाच त्यांचे आईवडील निवर्तले त्यामुळे त्यांच्या मावशीने त्यांना ऋद्धिपुरास नेले. तेथे बोपो उपाध्ये ह्यांच्याकडे त्यांनी वेदाध्ययन केले. गोविंदप्रभूंचे मूळ नाव ‘गुंडो’ असे होते. सिद्ध पुरुष म्हणून लौकिक झाल्यानंतर ‘गुंडम स्वामी’, ‘श्री गुंडम राऊळ’ ह्या नावांनी त्यांना संबोधिले जाऊ लागले. ⇨म्हाइंभटाच्या ऋद्धिपुर चरित्रात (१२८८, श्री गोविंदप्रभु चरित्र  हे ह्या ग्रंथाला डॉ. वि. भि. कोलते यांनी दिलेले नाव) गोविंदप्रभूंचा ध्यास घेतलेल्या साधेच्या तोंडी आलेल्या ‘गोविंदु वो । गोविंदु वो । ’ (१७५) किंवा ‘गोविंदु आइ : गोविंदु बाइ : गोविंदु माझी बाळ वेसी :’ (१७९) ह्यांसारख्या उद्‍गारांवरून त्यांना त्यांच्या हयातीतच ‘गोविंद’ हे नाव मिळाल्याचे दिसते. ‘श्री प्रभु’ आणि ‘चिद्‍घन’ ही त्यांची आणखी काही नावे.

गोविंदप्रभुंनी काही ग्रंथरचना केल्याचा पुरावा नाही. त्यांच्या जीवनाची माहीती आपणास म्हाइंभटाच्या ऋद्धिपुर  चरित्रातूनच मुख्यतः मिळते. तथापि गोविंदप्रभूंचे हे चरित्र त्यांचे विभूतिमत्त्व गृहीत धरून सश्रद्धपणे लिहिलेले असल्यामुळे त्यांच्या संबंधीच्या आख्यायिका आणि त्यांनी केलेले चमत्कार ह्यांवरच तेथे भर आहे. महत्त्वाचे ऐतिहासिक तपशील त्याच्यातून फारसे उपलब्ध होत नाहीत मात्र गोविंदप्रभूंच्या व्यक्तिमत्त्वाची काहीशी कल्पना आपणास त्यावरून येऊ शकते. त्यांचा वेष, वर्तन, खाणेपिणे विक्षिप्त असे. ‘आवो मेली जाय’ हा विशिष्ट वाक्यप्रयोग ते नेहमी वापरीत. आनंद झाला म्हणजे ‘ऐया माझा आता होए म्हणे’ असा उद्‍गार ते काढीत. परंतु बाह्यात्कारी विचित्र वाटणाऱ्या ह्या सत्पुरुषाने सर्वांभूती समानदृष्टी ठेवण्याचा आदर्श स्वतःच्या वर्तनाने घालून दिला होता. ‘राऊळ मातांगा माहारांचा घरोघरी वीचरताती : आणि तसेचि दीक्षितां ब्राह्मणांच्या घरी वीचरताती’, असा त्यांचा लौकीक होता. नुसता विहार नव्हे, तर त्यांच्या घरी ते जेवीतही. या दृष्टीने वर्णाश्रम धर्माची चौकट मोडून मानवतेच्या दृष्टिकोणातून समतेचा आदर्श घालून देणारे ते आद्य सुधारक ठरतात. अनाथ आणि असहाय स्त्रियांना त्यांचा फार मोठा आधार वाटे. चक्रधरांप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर संचार केला नाही. अमरावती जिल्ह्यापुरतेच त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित राहिले.

महानुभाव पंथाने मानलेल्या पंचकृष्णांत गोविंदप्रभूंचा समावेश होतो. ‘हा इस्वर अवतारु होये’ अशी महानुभावांची त्यांच्याबद्दलची श्रद्धा आहे.

संदर्भ : कोलते, वि. भि. म्हाइंभट संकलित श्री गोविंदप्रभु चरित्र, मलकापूर, १९४४.

कुलकर्णी, अ. र.