इन्क्‍विझिशन : ख्रिस्ती धर्मातील न्यायमंडळाचे नाव. पोप तिसरा इनोसंट याने १२०८ मध्ये ख्रिस्ती पाखंड्यांविरुद्ध जोराची चळवळ सुरू केली. पाखंडी व्यक्तीने गुन्हा कबूल करून आपली मते बदलली, तर त्याला क्षमा केली जाई. अन्यथा इन्क्‍विझिशन त्याला शिक्षेसाठी मुलकी अधिकाऱ्याच्या स्वाधीन करीत असे. त्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षाही अत्यंत क्रूर स्वरूपाच्या, जिवंत जाळण्याच्याही, असत.

स्पेनमध्ये फर्डिनँड व इझाबेला यांच्या कारकीर्दीत जे इन्क्‍विझिशन स्थापन झाले, ते स्पॅनिश इन्क्‍विझिशन म्हणून ओळखले जाते. पुष्कळ वेळा राजकीय दृष्ट्या अपराधी असलेल्या व्यक्तीचा काटा काढण्यासाठीही सरकार इन्क्‍विझिशनचा वापर करीत असे. शेवटी लोकांच्या वाढत्या विरोधाला यश येऊन १८३४ मध्ये ही न्यायमंडळे कायमची बंद करण्यात आली. गोव्यातही पोर्तुगीजांनी १५६० मध्ये इन्क्‍विझिशनची स्थापना केली आणि त्या आधारे अनेक हिंदूंना कैद, हद्दपारी, फटके इ. स्वरूपाच्या शिक्षा ठोठावल्या. १७७४ मध्ये गोव्यातील इन्क्‍विझिशन बंद झाले.

चर्चचे पावित्र्य कायम रहावे म्हणून एकोणिसाव्या शतकात इन्क्‍विझिशनचेच रूपांतर काँग्रिगेशन ऑफ द होली ऑफिस मध्ये झाले.

आयरन, जे. डब्ल्यू. (इ.) साळवी, प्रमिला (म.)