इतिहाससाधने : कोणत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी होते. इतिहासकाळाचे प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन असे तीन विभाग मानून त्यांत समाविष्ट होणाऱ्या साधनांचा विचार करता येतो. साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो. याशिवाय इतिहाससाधनांच्या भाषेवरून उदा., मराठी, फार्सी, डच, इंग्रजी इ. किंवा लेखनासाठी वापरण्यात आलेली माध्यमे उदा., सोने, तांबे, रुपे, कातडे, लाकूड, कागद, भूर्जपत्र, दगड, माती इत्यादींवरूनही इतिहास साधनांचे वर्गीकरण करता येते. समकालीन, उत्तरकालीन तसेच सार्वकालीन व विशिष्टकालीन असेही वर्गीकरण करता येते.

प्रत्येक देशाला आपल्या इतिहासलेखनासाठी इतिहास साधनांचा उपयोग होतो. भारताबाहेर पश्चिमेच्या बाजूस विशेषतः इराणचा पश्चिम भाग, इराक, तुर्कस्तानचा पूर्व भाग, सध्याचा इझ्राएल, क्रीट व सायप्रस बेटे, ईजिप्त आणि अटलांटिक महासागराच्या पलीकडील मेक्सिको वगैरे प्रदेशांत अनेक संस्कृती उदयास आल्या. त्यांसंबंधींच्या अलिखित साधनांत पिरॅमिड, स्फिंक्स, अवाढव्य पुतळे, मंदिरे इत्यादींचा समावेश होतो. या संस्कृती नष्ट होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. या बहुतेक संस्कृतींचे अवशेष जमिनीत गाडले गेल्याने अनेक वर्षे या संस्कृती अज्ञात राहिल्या. पंधराव्या शतकापासून म्हणजे यूरोपीय प्रबोधनकाळापासून या संस्कृतींच्या भूमिगत व भूमिवरील अवशेषांकडे काही यूरोपीय विद्वानांचे लक्ष वेधले. त्यांनी या सर्व प्रदेशांत संचार व उत्खनन करून शोधलेल्या अवशेषांपैकी एक भाग लिखित साधनांचा आहे. ही लिखित साधने फार प्राचीन असल्यामुळे त्यांची भाषा व लिपी समजणे कठीण होते. सुदैवाने ईजिप्तमध्ये रोझेटा या स्थळी एक त्रैभाषिक शिलालेख सापडला. त्यावर सामान्यतः एकच मजकूर ⇨ हायरोग्लिफिक, डेमॉटिक व ग्रीक अशा तीन लिप्यांत आहे. त्यातील ग्रीक मजकुराचा काळ हायरोग्लिफिक लिपी समजण्यास फार उपयोगी झाला. रोझेटा पाषाणलेखाप्रमाणेच इराणमध्ये बेहिस्तून येथेही एक त्रैभाषिक लेख सापडला. त्यातील एक लिपी प्राचीन फार्सी असल्यामुळे उरलेल्या दोन भाषांचे स्वरूप ज्ञात झाले. या दोन लेखांमुळे ईजिप्त, बॅबिलोनिया, सुमेरिया व ॲसिरिया तसेच हिटाइट व मितानी या संस्कृतींची माहिती देणाऱ्या लिखित साधनांचा उत्तम प्रकारे उलगडा झाला. तथापि क्रीट-सायप्रस व भारतातील सिंध प्रदेशात सापडलेल्या अवशेषांतील प्राचीनतम लेखांचा अद्यापि म्हणावा तितका स्पष्ट उलगडा झालेला नाही. अमेरिकेतील माया, इंका इ. संस्कृतींचीही परिस्थिती काही प्रमाणात अशीच आहे.

या संस्कृतींचे अवशेष व त्यांत सापडलेले लेख यांचा अभ्यास करून त्या संस्कृतींची माहिती देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये चार्ल्स बुली, रोनी, हेटर्सफेल्ड, हेन्री रॉलिन्सन इ. संशोधकांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. भारताच्या पूर्वेकडील ब्रह्मदेश, थायलंड, व्हिएटनाम, लाओस, चीन, कोरिया, जपान इ. देशांतही त्या त्या प्राचीन संस्कतींचे अवशेष सर्वत्र विखुरलेले आहेत. तथापि त्या अवशेषांचे वारसदार आजही त्या त्या देशात रहात असल्यामुळे, त्यांच्या प्राचीन संस्कृतीत सापडलेल्या लिखित साधनांची माहिती होण्यास फारसे प्रयास पडले नाहीत. त्यांतील लेखांचा व लिपींचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये पॉल पेल्यो, ग्रुंडवेल, शावानीज, स्व्हेन, हेडीन, ऑरेल स्टाइन इत्यादींचा उल्लेख अवश्य करावयास हवा. उपर्युक्त सर्व देशांत सापडलेली लिखित साधने विटा, लाकूड, कागद, धातूंचे पत्रे, कातडे इ. माध्यमांची आहेत.

इतिहास काळाचे अभ्यासाच्या दृष्टीने प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन वा आधुनिक असे तीन कालविभाग पडतात. या प्रत्येक कालविभागांतील लेख व ग्रंथ अशी दोन्ही प्रकारची साधने मिळू शकतात. प्राचीन काळासंबंधी साक्षात ऐतिहासिक माहिती देणारे ग्रंथ फार थोडे आहेत. तथापि नाणी व अलिखित साधनांद्वाराही या काळातील माहिती मिळवता येते. मध्ययुगीन इतिहासाबाबत विविध भाषांतील व विविध लिपींतील लेख, नाणी, समकालीन व उत्तरकालीन ग्रंथ यांचा मुख्यतः उपयोग होतो. मध्ययुगीन काळाच्या पूर्वार्धातील फारच थोडी कागदपत्रे उपलब्ध आहेत पण उत्तरार्धासाठी हजारो कागदपत्रे व शेकडो ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अर्वाचीन वा आधुनिक काळासाठी तत्कालीन कागदपत्रे, ग्रंथ व वर्तमानपत्रे यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

जागतिक लिखित साधने : प्राचीन लिखित साधनांमध्ये मुख्यत्वे ⇨कोरीव लेखांचा  समावेश होतो. हे बहुतेक लेख दगडांवर अथवा विटांवर कोरलेले असून हायरोग्‍लिफिक, क्यूनिफॉर्म, ब्राह्मी, खरोष्ठी वगैरे लिप्यांत ते आहेत. काही लेख पपायरसेवर (ईजिप्त) लिहिलेले आहेत. बहुसंख्य लेख मृतांच्या स्मरणार्थ किंवा अर्पणार्थ कोरले गेलेले आढळतात. मात्र काही लेखांमधून विधिसंहिता (हामुराबीची संहिता) किंवा लष्करी दिग्विजयांचे वर्णन (फेअरो राजांचे पराक्रम) ह्याही गोष्टी आढळतात. लिखित साधनांमध्ये विधिसंहिता, प्राचीन काव्ये, राज्यांच्या जंत्री, वीरकथा, दानपत्रे इ. महत्त्वाचे असून इतिहासलेखनास त्यांचा फार उपयोग झाला आहे. मात्र ह्या साधनांचा उपयोग अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. शिवाय कालानुक्रमाची संगती लावणे हे परिश्रमाचे काम आहे. कारण बहुतेक लेखन दंतकथा व पौराणिक कथांनी युक्त असते आणि त्यांवर धर्माचे वर्चस्व आढळते. तथापि तत्कालीन धार्मिक वा सामाजिक अंगांची माहिती त्यांतून मिळते.

विधिसंहितांत हामुराबीच्या संहितेखालोखाल हिब्रूंचे डेकॅलॉग (दहा आज्ञा), रोमनांची बारा परिशिष्टे, केंट व वेसेक्स येथील राजांचे कायदे हेही महत्त्वाचे आहेत. त्या सर्वांमधून प्राचीन कायदेपद्धतीसंबंधी बरीचशी विश्वसनीय माहिती मिळते. प्राचीन काव्यांत गिलगामेश, इलियड, ओडिसी  ही इ. स. पूर्वीची असून बेवूल्फचे डेबोराचे गीत, हेसिअडचे वर्क्‌स अँड डेज आणि ईजिप्शियन स्तोत्रे ही नंतरची आहेत. ह्या काव्यांमधून तत्कालीन समाजस्थितीचे दर्शन घडते. राजांच्या जंत्री, वीरकथा इ. बाबतींत बहुविध साहित्य आतापर्यंत उपलब्ध झाले असून त्यांत जुन्या कराराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इसवीसनाच्या प्रारंभी समाजात पुरोहितवर्ग हाच केवळ शिक्षित असल्याने व धर्माला प्राधान्य असल्यामुळे त्याला समाजात मानसन्मान असे. तत्कालीन समाजाची दिनदर्शिका (कॅलेंडर) ही मोठी गरज असे. त्याशिवाय कोणताही सण साजरा करणे अशक्य होते. साहजिकच ह्या कॅलेंडर कल्पनेमधून सण, उत्सवांबरोबरच इतर घटनांची नोंद ठेवण्यात येऊ लागली. ह्यामधूनच पुढे ⇨ इतिवृत्तांची परंपरा निर्माण झाली.

इतिवृत्तांत अँग्‍लो सॅक्सन क्रॉनिकल हे महत्त्वाचे असून त्यात ॲल्फ्रेड राजाच्या आज्ञेवरून सॅक्सनांचा इतिहास लिहिण्यात आला. ह्या नंतरच्या इतिवृत्तांत सेंट डेनिस (पॅरिस), सेंट ऑल्बन्झ (लंडन), सेंट गॉल (स्वित्झर्लंड) आणि माँटी कासीनो (इटली) ह्या प्रमुख चर्चनी इतिवृत्ते लिहिली. ह्या चर्चमधील पाद्र्यांनी तत्कालीन घडामोडींची माहिती टिपून ठेवून पुढे ती संग्रहित केली. ह्यांतील मॅथ्यू पॅरिसचे क्रॉनिका मेजोरा  हे इंग्रजी इतिहासाचे अत्यंत महत्त्वाचे साधन समजले जाते. राल्फ ऑफ डीस, राल्फ हिजडेन, रॉजर ऑफ वेंडोव्हर, टॉमस वॉल्सिंगअम इत्यादींची इतिवृत्ते त्यामानाने कमी प्रतीची व दुय्यम स्थाने मानण्यात येतात. यूरोपातील प्रत्येक देशाने ही इतिवृत्तपरंपरा पुढे चालविली, त्यामुळे यूरोपच्या मध्ययुगीन इतिहासावर प्रकाश पडतो.

वरील इतिवृत्तांमुळे पुढे प्रसिद्ध चर्चमधील पाद्री आपली आत्मवृत्ते लिहू लागले आणि त्यामागून ख्रिस्ती संतांच्या चरित्रांमधून चरित्र वाङ्‌मय जन्मास आले. मध्ययुगानंतर काही विश्वसनीय चरित्रे बाहेर पडली. ह्यांतील आइनहार्टने लिहिलेले शार्लमेनचे चरित्र, ॲसरकृत ॲल्फ्रेडचे चरित्र, पेम्ब्रुकचे मेम्‌वार्स ऑफ फिलिप द कमिन्स  ही काही उल्लेखनीय आहेत. ह्याशिवाय हिस्टरी ऑफ बोहीमिया  हे ॲनचे पुस्तक किंवा फ्‍लॉरेन्टाइन हिस्टरी हा मॅकिआव्हेलीचा वृत्तांत हेही तेवढेच महत्त्वाचे आहेत.

भारतीय इतिहासाची साधने : प्राचीन कालखंडाच्या इतिहाससाधनांत मुख्यतः पुरातत्त्वीय निरनिराळ्या वस्तूंचा समावेश होतो. उत्खननांमुळे मिळालेली भांडी, शस्त्रे, घरे व त्यांची बांधणी, ग्राम-नगरव्यवस्था, अलंकार इ. तत्कालीन समाजिक, धार्मिक व आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यास उपयुक्त आहेत. प्राचीन कालखंडात तयार झालेले विविध भाषिक ग्रंथ हेही इतिहासाचे महत्त्वाचे साधन आहे. या ग्रंथांचे समकालीन व उत्तरकालीन असे दोन भेद पडत असले, तरी ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने तत्कालीन इतिहासावर प्रकाश टाकतात. राजतरंगिणी, राष्ट्रौढवंशमहाकाव्य, शिवभारत  इ. ग्रंथ प्रत्यक्ष इतिहास सांगतात तर हर्षचरित, विक्रमांकदेवचरित पंपभारत, मणिमेखलै  इ. ग्रंथ रूपक शैलीने इतिहासकथन करतात. काही ग्रंथांच्या आरंभी किंवा अंतर्भागी किंवा अंती इतिहासविषयक माहिती मिळते. उदा., हेमाद्रिलिखित चतुर्वर्गचिंतामणि, जल्हणचा सुक्तिमुक्तावलि  व प्रसिद्ध कानडी कवी पंप याचा विक्रमार्जुनविजय अथवा पंपभारत ह्या ग्रंथांच्या प्रस्तावनांत ऐतिहासिक माहिती आढळते. बसबभूपालने शिवतत्त्वरत्‍नाकरात मधूनमधून ऐतिहासिक माहिती गुंफली आहे तर सोमदेव सुरीने यशस्तिलकचंपूमध्ये ग्रंथाच्या शेवटी काही ऐतिहासिक माहिती दिली आहे. तथापि इतिहासकाळातील प्राचीन विभागाची साक्षात माहिती देणारे ग्रंथ एकंदरीत थोडेच आहेत.

तत्कालीन राजकीय इतिहाससंबंधी माहिती देण्यास हे ग्रंथ अपुरे पडत असले, तरी इतिहासाच्या धार्मिक, सामाजिक, भाषिक ह्या विविध अगांसंबंधी माहिती देण्यास हे ग्रंथ उपयुक्त आहेत. पुराणे, रामायण, महाभारत, ही महाकाव्ये, तत्कालीन सामाजिक आचारविचार, राहणीमान, वस्त्रे, अलंकार इत्यादीसंबंधी माहिती देण्यास उपयुक्त व महत्त्वाची साधने आहेत. भारताच्या पारंपरिक इतिहासकाळातील निरनिराळ्या राजवंशांसंबंधी माहिती देण्यास पुराणे हेच एकमेव व महत्त्वाचे साधन आहे. प्राचीन कालखंडातील निरनिराळ्या साधनग्रंथांचा अभ्यास करून, तत्कालीन लोकजीवनाची माहिती देण्याचे कार्य वासुदेवशरण अग्रवाल, डॉ. मोतीचंद्र, डॉ. हंदीकुई इत्यादींनी आपापल्या पुस्तकांद्वारे केले आहे. ही पुस्तके प्रायः इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये असून मराठी भाषेत अशा प्रकारची पुस्तके त्यामानाने कमी आहेत.

मध्ययुगीन इतिहाससाधने : भारताच्या मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासास फार्सी व मराठी ग्रंथांचा उपयोग होतो. फार्सी ग्रंथांत नामे, तारीख-तवारीखे, मआसिर इत्यादींचा, तर मराठी ग्रंथांत बखरींचा अंतर्भाव होतो. या साधनग्रंथांच्या प्रचंड संख्येमुळे त्यांचा उपयोग करणे आवश्यक ठरते. तथापि ऐतिहासिक दृष्टीने त्यांना विश्वसनीयता कमी आहे. नामे, तवारिखा, मआसिर अगर बखरी या एकेका व्यक्तीने लिहिलेल्या असल्याने, त्या व्यक्तीने ग्रंथलेखनासाठी जमविलेली साधने, त्यांचा ग्रंथलेखनासाठी केलेला उपयोग, साधनांचा उपयोग करताना दाखविलेली सूक्ष्म बुद्धी, सारासारविचार व त्यावरून काढलेली अनुमाने यांवर त्या ग्रंथाची योग्यता अवलंबून असते. नामे, तवारिखा इ. फार्सी ग्रंथ व बखरी ह्यांचे बाह्य स्वरूप एकच असले, तरी त्यांच्या रचनात्मक स्वरूपात पुष्कळच फरक आहे.

नामा म्हणजे लेख, तारीख किंवा तवारिखा म्हणजे कालनिर्देश व मआसिर म्हणजे स्मरण. तथापि ज्या ग्रंथांच्या नावांत हे शब्द आले आहेत, त्या ग्रंथांच्या विषयावरून या शब्दांच्या अभिप्रेत अर्थ इतिहासकथन हा एकच असतो, हे लक्षात येते.नाम्यांमध्ये दोन प्रकार आढळतात. बाबरनामा  किंवा जहांगीरनामा  अशांसारखे ग्रंथ आत्मचरित्रपर असले, तरी त्यांची संख्या फारच थोडी आहे. याउलट अकबरनामा, इक्बालनामा, बादशाहनामा, आलमगीरनामा  अशांसारखे ग्रंथ म्हणजे त्यावेळी तयार केलेले इतिहासग्रंथ होत. ते आत्मचरित्रपर नाहीत. तारीख किंवा तवारिख ह्या सदरात तारीखअली, तारीखबाबुरी, तारीखसिंध, तारीखमुजफ्फरी, झुब्दतत्तवारीख, मुन्तखबुत्तवारीख इ. ग्रंथांचा समावेश होतो, तर मआसिर ह्या सदरात मआसिरुलउमरा, मआसिरआलमगिरी, मआसिरहैदरी  इ. ग्रंथांचा समावेश होतो.

हे ग्रंथ लिहीत असताना ग्रंथकार बादशाह किंवा सुलतान यांचा समकालीन असून त्यांच्या नोकरीत असेल, तर त्या ग्रंथात सत्याचा अंश किती व असत्याचा किती, हे सांगणे अवघड असते. बादशाह किंवा सुलतान यांच्या दरबारी असलेला वाकेनवीस रोज बादशाहाने केलेल्या कृतीची माहिती लिहून, ती बादशाहास दाखवीत असे. बादशाह ती वाचून त्यात स्वतःच्या फुशारकीचा किंवा अपयशाचा जो मजकूर असेल, तो योग्य प्रकारे घालण्याबद्दल किंवा काढून टाकण्याबद्दल वाकेनवीसास सांगे. या पद्धतीने इतिहासग्रंथांच्या रचनेवर परिणाम होऊन सत्य, पण सत्ताधाऱ्यास नको असलेली माहिती काढून टाकलेली व असत्य पण त्यास हवी असलेली माहिती या इतिहासग्रंथांत समाविष्ट केलेली असे. यामुळेच औरंगजेबाच्या आलमगीरनाम्यात दिलेल्या पहिल्या अकरा वर्षाच्या हकिकतीत शिवाजीने शायिस्तेखानावर घातलेला हल्ला व सुरतेची लूट ही दोन महत्त्वाची प्रकरणे आढळत नाहीत.

तारीख व मआसिर हे ग्रंथ तयार करताना ग्रंथकर्त्याने त्याच विषयांवरील काही जुने ग्रंथ क्वचित कागदपत्रे पाहून लेखन केलेले असते. अठराव्या शतकात लिहिलेला मआसिरुलउमरा किंवा खजान-इ-आमिर अशांसारखे ग्रंथ घेतले, तर त्यांत दिलेली माहिती पूर्वसूरींच्या अनेक ग्रंथांतून घेतली असल्याचे आढळून येते. याउलट मुन्तखबुल्‍लुबाब ह्या ग्रंथात खाफीखानाने कित्येक ठिकाणी, स्वतः पाहून वर्णन केलेल्या हकिकतीही आता जवळजवळ संशयास्पद ठरलेल्या आहेत. ग्रंथ लिहिताना वर निर्दिष्ट केलेल्या शाही पद्धतीचे किंवा धार्मिक दडपण वा पक्षपात नसेल, तर त्यात सत्य माहिती अधिक प्रमाणात येण्याचा संभव असे. मराठी बखरींच्या मानाने फार्सी ग्रंथांत आलेली माहिती अधिक तपशीलवार असते.

फार्सी ग्रंथ व मराठी बखरी ह्यांमध्ये मोठा फरक हा, की बखरकर्त्याने आपल्या विषयांसंबंधी आपल्यापूर्वी कोणकोणते ग्रंथ झाले आहेत, हे पाहण्याचा मोठा प्रयत्‍न केलेला दिसत नाही. काही बखरकर्त्यांना त्यावेळी उपलब्ध असलेल्या काही जुन्या बखरी ठाऊक होत्या असे दिसते पण कोणत्याही बखरकाराने आपली बखर लिहिताना कोणत्या जुन्या बखरींचा उपयोग केला, हे कोठेही उचित रीतीने सांगितलेले नाही. काही मराठी बखरींमध्ये इतिहास नसून पौराणिक माहितीच मुख्यतः आहे. उदा., शालिवाहन राजाची बखर, पांडवांची बखर. याउलट काही मराठी बखरी ऐतिहासिक माहितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. उदा., भाऊसाहेबांची बखर, महिकावतीची बखर, सभासद बखर इत्यादी. तत्कालीन सामाजिक परिस्थिती संबंधी माहिती मिळविण्यासाठीही ह्या बखरींचा काही अंशी उपयोग होतो. उदा., पेशव्यांची बखर.

लिखित साधनांपैकी ताम्रशिलाशासनांविषयी प्रथमच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही, की ही शासने इतिहास समजावा म्हणून लिहीलेली नाहीत. काही शासने केवळ प्रशस्तिपर किंवा व्यवस्थापत्रे आहेत. पण अशांची संख्या एकंदरीत फार थोडी आहे. क्वचित धारसारख्या एखाद्या ठिकाणी एक नाटक किंवा व्याकरणविषयक भाग शिलेवर खोदला आहे किंवा ओंकारमांधात्यास अमलेश्वर मंदिरात शिवमहिम्‍न, इ. स्तोत्रेही खोदली आहेत. असे काही अपवाद सोडून दिल्यास बहुतेक ताम्रशिलाशासनेही दानपत्रे आहेत. यांपैकी ताम्रशासने एका व्यक्तीला उद्देशून दिलेली असतात. मग ती व्यक्ती एखादा ब्राह्मण असेल, एखादा महंत असेल, एखादा जैन विद्वान असेल, परंतु सामान्यतः ताम्रशासने ही व्यक्तिसंबद्ध आहेत, तर शिलाशासने प्रायः मंदिर, मठ इ. वास्तुसंबद्ध आहेत. ताम्रशासने किती मोठी असावी याचा नियम नाही. परंतु सामान्यतः एका ताम्रशासनांत ३ पत्रे असतात. २, ४ किंवा ५ पत्र्यांची ताम्रशासने संख्येने कमी आहेत. पत्र्यांची ताम्रशासने त्यांहून कमी आहेत. तथापि सर्वांत मोठे ताम्रशासन हॉलंडमधील लायडन शहरात असून त्याचे एकंदर २१ पत्रे आहेत. पत्रे कितीही असोत, हे सर्व पत्रे एक किंवा दोन कड्यांत ओवून त्यांची दोन टोके एका गट्‌टूत एकत्र सांधलेली असतात आणि त्यांवर कधी कुलाची चिन्हे, तर कधी दान करणाऱ्या राजाचे नाव कोरलेले असते. ताम्रशासनाचा आरंभ स्वस्ति, सिद्धं इ. शब्दांनी करतात. नंतर एखादा मंगलार्थक श्लोक असतो. तदनंतर दान करणारा पुरुष आपल्या कुलाची माहिती देतो. या माहितीत प्रथम कुलनाम कसे तयार झाले, त्याचा अर्थ काय इ. माहिती सांगून नंतर आपल्या कुलातील लोकांची सामान्य लक्षणे सांगतो. पुढे त्यात होऊन गेलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींचे, त्यांच्या कर्तबगारीसह वर्णन करतो. हे वर्णन तो स्वतःपर्यंत आणून भिडवतो. एवढे सांगितल्यावर मग तो पुरुष ज्या वेळी दान करतो, त्या वेळेचा तपशीलवार निर्देश करून पुढे ज्याला दान केले, त्या व्यक्तीची माहिती देतो. नंतर केलेल्या दानाचे तपशीलवार वर्णन देतो. यांत बहुधा एक किंवा अधिक गावे अगर एखाद्या गावातील जमीन अथवा दुकाने, तेलाचे घाणे इत्यादींवरील कर यांचे दान केलेले असते. हे दान नेमके लक्षात यावे, म्हणून दिलेल्या स्थळाच्या चतुःसीमा वर्णन करतो. हे वर्णन संपल्यावर मग दान मोडणारा आणि दानाचे पालन करणारा यांना उद्देशून शापाशीर्वादात्मक श्लोक येतात आणि शेवटी ते दानपत्र राजाज्ञेवरून कोणी दिले, त्याची नोंद केलेली असते. ताम्रपटांमध्ये येणाऱ्या माहितीची मांडणी सामान्यतः वर सांगितल्याप्रमाणे केलेली असते. तथापि ही माहिती प्रत्येक ठिकाणी वर सांगितलेल्या क्रमानेच येते असे नाही. कित्येक ठिकाणी या क्रमात उलटापालट झालेली असते. काही तपशील गाळलेलाही असतो. सामान्यतः ताम्रशासने संस्कृत भाषेत आणि त्याखालोखाल प्रादेशिक भाषांत लिहिलेली आढळतात. क्वचित काही शासने दोन भाषांत लिहून पूर्ण केलेली असतात. ताम्रशासनाच्या भाषा जशा विविध त्याप्रमाणे त्यांची रचना गद्यात असेल, पद्यात असेल किंवा गद्यपद्यात असेल पण बहुतेक शासने गद्यपद्यात्मकच आहेत. क्वचित ताम्रशासनांच्या शेवटी स्वाक्षरी किंवा कुलदेवतेचे नाव असते.

शिलाशासनांचा हेतू सामान्यत : सार्वजनिक स्वरूपाचे दान नोंदण्याचा असतो. म्हणूनच ते ताम्रपटावर न खोदता शिलेवर खोदून ती शिला सर्व लोकांना सहज दिसेल, अशा ठिकाणी ठेवलेली असते. शिलाशासनांत प्रारंभी शिल्पे असतात. या शिल्पांत कधी चंद्रसूर्य व सयोनिलिंगाची पूजा करणारा भक्त, तर कधी नुसते शिवलिंग दूध पिणाऱ्या वासरासह गाय किंवा तलवार वा जंबिया यांसारखे एखादे हत्यार कमीअधिक उठावाने खोदलेले असते. काहींत दान मोडणार्‍यास शिक्षा म्हणून गाढव व स्त्री यांच्या संभोगाचे चित्र आढळते. काही शिलाशासनांतून माएसीगाढोऊ, तयाचे बाइलेवरी गाढोऊ इ. ग्राम्य व अश्लील भाषाप्रयोग आढळतात. शिलाशासन जैन असेल, तर त्यात शिवलिंग येत नाही. त्याऐवजी यक्षयक्षीसह किंवा यक्षयक्षीविरहित एखादा तीर्थंकर, त्याचा भक्त, असा काही तपशील येतो. ताम्रशिलाशासनाशिवाय विशिष्ट स्त्रीपुरुषांच्या मृत्यूसंबंधी माहिती देणाऱ्या स्मृतिशिला हेही एक महत्त्वाचे ऐतिहासिक साधन आहे. त्यास वीर, वीरगळ, गळू-पाळिये असेही म्हणतात. ही स्मृतिशिला एक, तीन किंवा चारही बाजूंनी खोदलेली आढळते. तिच्या प्रत्येक बाजूवर एकावर एक, तीन किंवा चार दालने असतात. अगदी खालच्या दालनात नुसता मृत मनुष्य किंवा मृत मनुष्याच्या देहास चाटणारी गायबैलांसारखी गुरे दाखविलेली असतात. त्यानंतरच्या दुसऱ्या दालनात लढाईचा देखावा असतो. तिसऱ्या दालनात त्या लढाईत मेलेला मनुष्य पालखीत किंवा मेण्यात बसून किंवा दोन स्त्रियांच्या खांद्यावर हात ठेवून कैलासास चालल्याचे दाखविलेले असते. चवथ्या अथवा वरच्या दालनात अप्सरांसह तो शिवलिंगाची पूजा करीत असलेला दाखवितात. बहुतेक स्मृतिशिलांत (वीरगळांत) अगदी खालचे दालन नसते. ज्या प्रकाराने मनुष्याला वीरोचित मरण आलेले असते, तो प्रकार वीरगळांत दाखविलेला असतो. महाराष्ट्रात हजारो वीरगळ आहेत, पण त्यांवर सामान्यतः लेख कोरलेले नाहीतत्यामुळे हे वीरगळ कोणासाठी खोदले, ह्याचा बोध होत नाही. द्राविडी भाषांच्या प्रदेशातील वीरगळांवर बहुतेक ठिकाणी वीरगती पावलेल्या मनुष्याच्या कृतीचे कालनिर्देशासह वर्णन करून त्यापुढे, जितेन लभते लक्ष्मी, मृतेनापि सुरांगना। क्षण विध्वंसिनि काये का चिंता मरणे रणे हा श्लोक कोरलेला असतो. याशिवाय सतींचे दगडही उपलब्ध झाले आहेत. त्यास मास्तिकल्‍लू (कर्नाटक), सतीशिला (महाराष्ट्र) असेही म्हणतात. महाराष्ट्रात सतीशिलांवर लेख नाहीत, पण दक्षिण भारतात त्यांवर लेख आढळतात. समकालीन लिखित साधने फारशी उपलब्ध होत नसल्याने, या शिलाशासनांचा उपयोग करून घेणे भाग पडते. राजस्थान, कर्नाटक इ. ज्या प्रदेशांत ही ताम्रशासने प्रायः लुप्त पावली, तेथे पारंपारिक पद्धतीने खोदलेली शिलाशासने फार मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहेत.

मध्ययुगीन इतिहासकाळास अरबी, फार्सी व उर्दू शिलालेखांचाही साधने म्हणून काहीसा उपयोग होतो. हे शिलालेख मशिदी, दर्गे, वेशी, दरवाजे, कमानी, कबरी, हौद, विहिरी, तळी, घुमट इ. वास्तूंवर कोरलेले आढळतात. अरबी शिलालेख म्हणजे सामान्यतः कुराण, हदीस  इ. ग्रंथांमधील वचने असतात. त्या लेखात संबंधित वास्तू कोणी, केव्हा, कोणाचे राज्य चालू असता बांधली, याची माहिती असते. काही शिलालेख प्रशस्तिपरही आहेत. या लेखांत इतिहासाच्या दृष्टीने उपयुक्त व महत्त्वाची माहिती एकंदरीत कमीच मिळते.

आधुनिक इतिहाससाधने : अर्वाचीन किंवा आधुनिक इतिहास विभागाला साधनीभूत होणार्‍या दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार, बिकानेर येथील राजस्थानचे अभिलेखागार, महाराष्ट्र राज्यातील मुंबई व पुणे येथील अभिलेखागारे, आंध्र व तमिळनाडू ह्या प्रदेशांची अभिलेखागारे महत्त्वाची आहेत. कित्येक ऐतिहासिक घराण्यांत असलेल्या कागदपत्रांची गणना कोटीनेच करावी लागेलपण प्रकाशित कागदपत्रांची संख्या एखाद्या लाखापलीकडे जाईल, असे वाटत नाही. यांपैकी काही फार्सी, मराठी व इंग्रजी भाषांतील साधने प्रकाशित झाली असून, इंग्रजीशिवाय इतर यूरोपीय भाषांतील साधने त्यामानाने कमी आहेत. डच साधने सतराव्या शतकातील इतिहासासाठी जितकी उपयुक्त आहेततितकी अठराव्या शतकातील इतिहासासाठी नाहीत. डाग रजिस्टर या डच भाषेतील साधनांचे बरेच खंड प्रसिद्ध झालेले आहेत. पोर्तुगीज साधने काळाच्या दृष्टीने सर्वांत जुनी आहेत. त्यांचा प्रारंभ सोळाव्या शतकात होतो, सतराव्या व अठराव्या शतकांसही ही साधने उपयुक्त आहेतपण एकोणिसाव्या शतकातील इतिहासास मात्र या साधनांचा फारसा उपयोग होत नाही. बिकर ट्राटाडॉस, विकी, ब्रागॅन्झा, पिसुर्लेकर इत्यादींच्या प्रयत्‍नांमुळे पोर्तुगीज साधनांचे सु. ५० खंड प्रसिद्ध झाले आहेत. सतराव्या व अठराव्या शतकांच्या भारताच्या इतिहासास फ्रेंच साधनांचाही उपयोग होण्यासारखा आहे. तथापि अद्याप त्या भाषेतील साधनांचे विपुल प्रमाणात प्रकाशन झालेले नाही. भारतात इंग्रजी सत्तेची एकसारखी वाढ होत राहिल्यामुळे इंग्रजी साधनांत (तह, पत्रव्यवहार, अहवाल वगैरे) मोठ्या प्रमाणात वाढ झाली व इंग्रजी साधनांचे प्रकाशनही इतर यूरोपीय भाषांतील साधनांपेक्षा जास्त प्रमाणात झालेले आहे. या चारही यूरोपीय भाषांतील साधनांत जशी भारतविषयक माहिती येते, त्याचप्रमाणे भारताच्या पूर्व व आग्‍नेय दिशांकडील देशांविषयीही येते. त्यातल्या त्यात इंग्रजी साधनांत भारताविषयी सर्वाधिक माहिती येते, तर पोर्तुगीज व डच साधनांत भारताइतकीच उपर्युक्त देशांची माहिती येते.

भारतीय भाषांतील व प्रकाशित कागदपत्रांत बारा ते पंधरा या शतकांतील कागद प्रायः नाहीतच, असे म्हटले तरी चालेल. सोळाव्या शतकातील सु. २०० कागद आजवर प्रकाशित झालेले आहेत. त्यामानाने सतराव्या व अठराव्या शतकांतील साधने हजारोंनी प्रकाशित झालेली आहेत. फार्सी पत्रव्यवहारात फर्मान, निशान, हसबुल-हुक्म, हुक्म, परवाना, मिसल, शुक्का, खरीता, तकरीर, महजर, खरीदी खत, खुर्द खत, तमस्सुक इ. कागदपत्रे मोडतात. मराठी पत्रव्यवहारात राजपत्र, आज्ञापत्र, खुर्द खत, मिसल किंवा हुज्‍जत, एका गावच्या रहिवाशांनी किंवा अनेक गावकऱ्यांनी मिळून केलेला महजर, वतनपत्र, निवाडपत्र, ताळेबंद, जमीनझाडा, देहझाडा, कुळकट, करीणा असे निरनिराळ्या प्रकारचे कागदपत्र असतात. या प्रकाशित साधनांत सनदापत्रे व पत्रव्यवहार यांची संख्या मोठी आहे. अशा पत्रांच्या आरंभी पत्रग्राहकाचे नाव किंवा पदव्यासह टोपण नाव किंवा अधिकारदर्शक शब्द असतो. प्रेषक सामान्यतः आपले नाव घालीत नाही. मजकुरात कधी कधी कालनिर्देश सापडतात.तथापि त्यात सामान्यतः वर्षाचा निर्देश नसून, कधी हिंदू मास व तिथी, तर कधी मुसलमानी महिना व तारीख यांचा निर्देश असतो. क्वचित तिथी व तारीख यांच्याबरोबर वाराचा निर्देश केलेला असतो. पत्राचा काळ कधी पत्रारंभी तर कधी पत्रान्ती असतो किंवा कित्येकदा पत्रात कालनिर्देशच नसतो. पत्रव्यवहार तात्पुरता महत्त्वाचा अशी समजूत असल्याने ही उणीव राहिली असावी. सामान्यतः पत्र लिहून झाल्यावर त्याची गुंडाळी करीत. तीवर एका कोऱ्या कागदाचे आवरण घालीत आणि त्यावर एक वेष्टणपट्टी गुंडाळीत. या वेष्टणपट्टीवर ज्याला शिक्का करण्याचा अधिकार असे, तो आपला शिक्का उठवी आणि हक्क नसेल, तर तो केवळ आपले नाव घाली. आवरणावर ग्राहकाचे नावगाव घालून शिवाय पत्र पोहोचल्याची तारीखही ग्राहक टाकी. दुर्दैवाने आजवर सापडलेल्या पत्रांची आवरणे व वेष्टणपट्ट्या सापडत नसल्यामुळे संशोधनाची मोठीच हानी झाली आहे. फार्सी पत्रव्यवहाराच्या बांधणीच्या या पद्धतीकडे इतिहाससंशोधकांचे विशेष लक्ष न गेल्याने अनेक ठिकाणी फार्सी पत्रव्यवहार आवरणे व वेष्टणपट्ट्यांसह मिळतो.

फार्सी साधनांत पत्रगुच्छ हा एक कागदपत्रांचा प्रकार आहे. काही मुसलमान विद्वान किंवा शौकीन नबाब आपल्या आश्रयदात्याने किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीने लिहिलेली पत्रे एकत्र संकलित करीत. असे सु. पन्नास पत्रगुच्छ माहीत झाले आहेत. त्यांपैकी बऱ्याच पत्रगुच्छांचे तपशील भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोग व भारतीय इतिहास परिषद यांच्या वार्षिक इतिवृत्तांत आलेले आहेत. त्याशिवाय काही थोडे पत्रगुच्छ मूळ रूपात किंवा अनुवादरूपाने प्रकाशित झाले आहेत. उदा., रियाजुल-इन्शा, रुकआते आलमगिरी तसेच सेतुमाधवराव पगडी यांनी खुतूते शिवाजी, हफ्त अंजुमनलुत्फुल्ला ची पत्रे यांचे मराठी अनुवाद मोगल मराठा संघर्ष या व इतर नावांनी प्रकाशित केले आहेत. मराठी पत्रांचे असे गुच्छ तयार केलेले फारसे आढळत नाहीत. तथापि नाना फडणीस यांच्या शब्दांत पानिपतचा रणसंग्राम हे पुस्तक अपवाद होय. या पुस्तकात पानिपत विषयी नाना फडणीसांची व इतरांची पत्रे सांगली संस्थानचे मूळ पुरुष चिंतामणराव पटवर्धन यांनी एकत्र करून ठेवली होती, ती छापली आहेत. अं. रा. हर्डीकर यांचे लेखरत्‍नमाला  हे पुस्तक अशाच तर्‍हेचे आहे. या पत्रगुच्छांचे मूळ रूपांत किंवा अनुवादरूपाने प्रकाशन करताना त्यांतील शिक्के, शेरे व कालनिर्देश गाळले जातात किंवा नकळत त्यांत बदल केला जातो. त्यामुळे या साधनांना ऐतिहासिक महत्त्वाच्या दृष्टीने दुसर्‍या वर्गात घालावे लागते.

नाणी किंवा मुद्रा हे इतिहासकाळाच्या सर्व विभागांत उपयोगी पडणारे महत्वाचे साधन आहे. नाण्यांच्या योगाने कोणत्या प्रदेशात कोणता धातू उपलब्ध होता व विशेष प्रचलित होता, यासंबंधी माहिती मिळते. उदा., दक्षिणेत सोने, तांबे व शिसे हे धातू व त्यांची मिश्रणे मोठ्या प्रमाणात प्रचलित होती, असे दक्षिणेतील नाण्यांवरून लक्षात येते. याशिवाय नाण्यांवर लिहिलेल्या मजकुरावरून कित्येक राजकुले, त्या राजकुलांत होऊन गेलेले प्रसिद्ध स्त्रीपुरुष, त्यांच्या कारकीर्दी, त्यांचे धर्म व पंथ, त्यांची उपास्य दैवते, त्यांची बिरुदे, त्यांनी केलेले पराक्रम, धर्मकृत्ये इ. अनेक गोष्टींचा बोध होऊ शकतो. विशेषतः नाणी जो जो प्राचीन, तो तो त्यांचा अधिक उपयोग होतो. उदा., इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापूर्वीचे ताम्रपट नाहीतच. शिलालेखही अगदी थोडे आहेत. पण त्या काळातील नाणी मोठ्या प्रमाणात सापडल्याने इ. स. पू. व इ. स. पहिल्या दोन शतकांतील कितीतरी राजे, त्यांचे राज्यकाळ, धर्मपंथ इत्यादींची माहिती उपलब्ध झाली आहे. क्षत्रप व सातवाहन घराण्यांची सर्वाधिक माहिती त्यांच्या नाण्यांमुळेच समजली. नाण्यांसंबंधी आजवर शेकडो ग्रंथ प्रकाशित झाले असले, तरी त्यांची बृहत्सूची अद्याप प्रकाशित झालेली नाही.

परदेशी प्रवाशांनी लिहिलेली प्रवासवर्णने ही देखील इतिहासकालातील सर्व विभागांना उपयोगी पडतात. ॲरियन, प्लिनी, स्ट्रेबो, मीगॅस्थीनीझ इ. ग्रंथकार पूर्णतया प्रवासी नसले, तरी त्यांचे ग्रंथ व फाहियान, यूआन च्वांग, इत्सिंग इत्यादींची प्रवासवृत्ते प्राचीन विभागास उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे अल-बीरूनी, इब्‍न खुर्दादबा, इब्‍न हौकल, इब्‍न बतूता इ. इस्लामी प्रवाशांची प्रवासवृत्ते प्राचीन व मध्ययुगीन इतिहासविभागास उपयुक्त आहेत. मध्ययुगीन इतिहासविभागाला इस्लामी प्रवाशांच्या प्रवासवृत्तांबरोबरच जेझुइट मिशनरी, निकितिन्, पायीश, डोमिगो, प्येअत्रो देल्ला व्हाल्ले, बार्बोसा, पीटर दी मंडी, ताव्हेर्न्ये, बर्निअर, फ्रेइरे, सर टॉमस रो इ. यूरोपियांची प्रवासवृत्तेही उपयुक्त आहेत. अर्वाचीन इतिहासाला उपयुक्त अशी इस्लामी प्रवाशांची प्रवासवृत्ते नसली, तरी फॉर्ब्झ, बिशप हीबर, बुकनन, मुर इ. यूरोपियांची प्रवासवृत्ते उपयुक्त साधने ठरतात. हॅक्‍लुइत सोसायटीने अद्यापपर्यंत जवळजवळ दीडशे प्रवासवृत्ते प्रसिद्ध केली आहेत. नाणी व प्रवासवृत्तांबरोबरच चित्रे, शिल्पे, वास्तू इत्यादीही इतिहासकाळातील सर्व विभागांना उपयुक्त ठरणारी साधने आहेत.

पहा : इतिहासलेखनपद्धति.

संदर्भ : १. बेंद्रे, वा. सी. महाराष्ट्रेतिहासाची साधने, भाग २, , मुंबई, १९६६-६७.

२. बेंद्रे, वा. सी. साधन चिकित्सा, पुणे, १९२८.

खरे, ग. ह.