ऑर्किडेलीझ : (आमर-गण). फुलझाडांपैकी एकदलिकित वर्गातील ह्या गणामध्ये ऑर्किडेसी, बर्मानिएसी व ॲपोस्टॅसिएसी या तीन कुलांचा अंतर्भाव केला आहे. अत्यंत लहान बीजे हे या गणाचे अधिक महत्त्वाचे लक्षण असल्याने ‘मायक्रोस्पर्मी’ (सूक्ष्मबीजी) या नावानेही हा गण ओळखतात. यातील सर्व वनस्पती अपिवनस्पती, शवोपजीवी (मृत शरीरावर जगणाऱ्या) किंवा नेहमीप्रमाणे जमिनीवर वाढणाऱ्या ओषधी अथवा लहान क्षुपे (झुडपे) असतात. यांच्या फुलांच्या संरचनेत पुष्पदलांची मंडले एकावर एक द्विलिंगी असतात. तथापि केसरदलातील संख्येत बरीच घट झालेली आढळते. परागकोश व किंजल्क हे परस्परांस अंशत: किंवा पूर्णतः चिकटून असतात. किंजपुट अधःस्थ व त्यात एक किंवा तीन कप्पे असून बोंडामध्ये बारीक बिया असतात [→ फूल]. गर्भाचे सर्व भाग प्रथम पूर्णपणे बनलेले नसतात. सर्व एकदलिकित वनस्पतींत हा गण अत्यंत प्रगत व उत्क्रांतीच्या सर्वश्रेष्ठ पायरीवर आहे, हे जरूर त्या शारीरिक लक्षणांवरून दिसून येते. हचिंसन यांच्या मते मात्र तसे नसून त्यांनी तो उच्च दर्जा गवतांना दिला आहे व वर सांगितलेल्या तिन्हींपैकी दोन कुलांचा वेगवेगळ्या गणांत (बर्मानिएलीझ व ऑर्किडेलीझ) व एकाचा (ॲपोस्टॅसिएसीचा) हीमॅडोरेलीझ या गणात समावेश केलेला आहे. लिलिएलीझ या गणाशी ऑर्किडेलीझचे साम्य व निकटवर्ती संबंध ओळखून बहुधा लिलिएसी या कुलापासून ऑर्किडेसी हे कुल उत्क्रांत झाले असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. ऑर्किडेसीचा उगम म्यूझेसीतील [ → सिटॅमिनी] पूर्वजांमधून झाला असावा, असेही एक मत प्रचलित आहे.
परांडेकर, शं. आ.