ऑरॉनी, यानोश: (२ मार्च १८१७–२२ ऑक्टोबर १८८२). श्रेष्ठ हंगेरियन महाकवी. पश्चिम रूमानियातील नॉडिसॉलोंटा (सॉलोंटा) येथे जन्म. डेब्रेत्सेन येथे चालू असलेले शिक्षण अर्ध्यावरच सोडले. घरच्या परिस्थितीमुळे तो गावीच स्थायिक झाला. त्याने लिहिलेल्या Toldi ह्या महाकाव्याला अफाट किर्ती मिळाली. ती एक राष्ट्रीय कलाकृती ठरली. ह्या महाकाव्याचे तीन खंड प्रसिद्ध झाले. पहिला व अखेरचा खंड अनुक्रमे १८४७ व १८५४ मध्ये प्रसिद्ध झाले व मधला खंड १८७९ मध्ये प्रसिद्ध झाला. याशिवाय Bolond Istok (१८५०, इं.शी. स्टीव्हेन द फूल) व Buda halala (१८६४, इं. भां. द डेथ ऑफ किंग बूडा, १९३६) ही महाकाव्ये त्याने लिहिली. शेक्सपिअरच्या आणि ॲरिस्टोफेनीसच्या काही नाटकांची त्याने भाषांतरे केली. त्याने लिहिलेली वीरगीते हंगेरियन साहित्यात अजोड आहेत.
ऑरॉनीने हंगेरीच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला (१८४८). शेतकऱ्यांसाठी निघणाऱ्या शासकीय वृत्तपत्राचा तो काही काळ संपादक होता. काही काळ त्याने शिक्षकाचा पेशा स्वीकारला. १८५८ मध्ये हंगेरीच्या अकादमीचा तो सभासद झाला. १८६० मध्ये तो ‘Kisfaludy society’ या एका हंगेरियन साहित्यसंस्थेत संचालकपदी नेमला गेला. १८६५ ते १८७९ पर्यंत तो हंगेरीच्या अकादमीचा सरचिटणीस होता. ह्या साऱ्या बहुमानांचा त्याने अलिप्तपणे स्वीकार केला. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे १८७९ मध्ये त्यांने हंगेरियन अकादमीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. बूडापेस्ट येथे तो मरण पावला.
जगताप, दिलीप