आळू : (आतू; हिं. मोइना; क. गुंदकरे, मुल्लकरे; सं. पिंडू; लॅ. वँगुरिया स्पायनोजा; कुल-रूबिएसी). हा लहान काटेरी पानझडी वृक्ष पेगू (ब्रह्मदेश), जावा, भारत (उ. बंगाल, प. द्वीपकल्प, दख्खन,कारवार वगैरे) इ. भागांत आढळतो. काटे सरळ, तीक्ष्ण, संमुख (समोरासमोर), क्वचित त्रिखंडी व लांब; साल गर्द व गुळगुळीत; पाने ५–१२ सेंमी. लांब, पातळ, आयत, गुळगुळीत व लांबट टोकाची; फुले लहान, पांढरट हिरवी व वल्लरीवर जानेवारी-एप्रिलमध्ये येतात. सामान्य संरचना व लक्षणे ⇨ रूबिएसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे. सवंर्त पेल्यासारखा, पुष्पमुगुट-नलिका पसरट व आत कंठाशी केसाळ [→फूल]; अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ २·५ सेंमी. व्यासाचे, गोलसर, गुळगुळीत, पिकल्यावर पिवळट गर्द तपकिरी व खाद्य असून त्यात ४-५ कठीण अष्ठी (आठळ्या) असतात. फळ फारसे चविष्ट नसले तरी गरीब लोक खातात. पाला गुरांना चारा म्हणून घालतात. पानांचे चूर्ण घटसर्पावर देतात; फूल पित्तवर्धक, प्रशीतकर (थंडावा देणारे) असते आणि कफ व पित्त बाहेर पडण्यास साहाय्य करते.

हर्डीकर, कमला श्री.