इंद्रायण, कडू : (कडू वृंदावन, इंद्रफळ; हिं. माकल, घोरंबा; गु. इंद्रक; क. तुमटीकाई; सं. चित्रफला, महेंद्रवारुणी; इं. बिटर ॲपल, कोलोसिंथ; लॅ. सिट्रुलस कोलोसिंथस; कुल-कुकर्बिटेसी). जमिनीवर पसरणारी किंवा वर चढणारी ही वेल विशेषेकरून जंगलात आढळते.
भारत (कोकण, दख्खन, गुजरात; विशेषतः समुद्र किनारी) व उष्णकटिबंधातील इतर देशांत ही आढळते. हिची अनेक शारीरिक लक्षणे ⇨ कुकर्बिटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे पाने मोठी व खंडित फुले मध्यम, बाहेरून हिरवी व आतून पिवळी मृदुफळ ५·८ सेंमी. व्यासाचे, गोलसर, हिरवट, गुळगुळीत मगज (गर) रसाळ, तांबूस अथवा पिवळसर, चव अत्यंत कडू बीजे फिकट पिंगट, लांबट व लहान वाळलेला मगज हेच ‘कोलोसिंथ’ औषध होय तो कडू व रेचक असून अधिक घेतल्यास वेदना होऊन शौचास रक्त पडते. मूळ उगाळून वा फळाचा मगज कुचल्याबरोबर गळवे व फोडांवर लावतात. गूळ, मिरी व मुळाचा समभाग घालून बनविलेल्या गोळ्या संधिवातावर देतात. मगज पित्तशामक, ज्वरशामक व कृमिनाशक बियांपासून मिळणारे तेल दिव्याकरिता वापरतात.
क्षीरसागर, ब. ग.