ऑस्प्रे : हा शिकारी पक्षी पँडिऑनिडी कुलातला असून ससाणा, शिकरा, घार आणि गिधाड यांचा नातेवाईक आहे. हा एक सर्वदेशीय पक्षी असून त्याचे जातिवाचक नाव पँडिऑन हॅलिईटस आहे.
हा साधारणपणे घारीएवढा असतो. शरीराची वरची बाजू गर्द तपकिरी आणि खालची पांढरी असते. डोके पांढुरके असून त्याच्या दोन्ही बाजूंवर काळा पट्टा असतो. छातीवर कंठ्याप्रमाणे एक रुंद तपकिरी पट्टा असतो. पंख लांब आणि टोकदार असतात. पायांच्या बोटांवर लांब व अतिशय वाकडे नखर असतात. बाहेरचे बोट पलटविता येते आणि तळव्यावर दाट कंटिका (लहान काट्यांसारख्या वाढी) असतात. नखर आणि कंटिका यांचा उपयोग भक्ष्य पकडण्याच्या कामी होतो. हा पक्षी समुद्रकिनाऱ्यावर किंवा नद्या, तलाव, सरोवरे यांच्या तीरांवर आढळतो. तो पूर्णपणे मत्स्याहारी आहे. संथपणे पाण्यावरून उडत असताना सु. १०–१५ मी. उंचीवरून पाण्यात सूर मारून तो पायांनी मासा पकडतो व लगेच पाण्याबाहेर पडून उडतो.
यूरोपात याची वीण एप्रिलपासून जूनपर्यंत होते. हिमालयात व भारतात काही जागी याची वीण होते असे म्हणतात. ऑस्प्रे उंच ठिकाणी किंवा झाडावर घरटे बांधतो. पुष्कळ पक्षी एकाच किंवा जवळजवळ असणाऱ्या झाडांवर घरटी बांधतात. घरटे काटक्याकुटक्यांचेच केलेले असते. हा पक्षी एकच घरटे वर्षानुवर्षे वापरीत असतो व दरवर्षी त्यात काटक्यांची भर घालतो. मादी दर खेपेस २–४ अंडी घालते.
कर्वे, ज. नी.