जीवविज्ञान : सर्व जीवांसंबंधीच्या संपूर्ण माहितीचे संकलन आणि त्या माहितीचा व्यावाहारिक उपयोग करण्यासंबंधीचे मार्गदर्शन यांचा अंतर्भाव असणारी विज्ञानशाखा. मनुष्याला ज्या वेळी आपल्या आसमंतात असलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या अस्तित्वाची व आपण त्यांच्यावर अवलंबून असल्याची जाणीव झाली त्याच वेळी जीवविज्ञानाचा आरंभ झाला, असे म्हणता येईल. मनुष्याच्या जिज्ञासेमुळे त्याच्यापुढे स्वतःबद्दल व आपण ज्यांना आज जीव असे म्हणतो, त्या इतर सर्व प्राणी आणि वनस्पती यांच्याबद्दल अनेक प्रश्न उभे राहिले त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा जो प्रयत्न त्याने केला त्यात या जीवांचे वर्तन आणि स्वभाव व्यक्त केला गेला. जीवविज्ञानातील त्या पहिल्या कल्पना प्रारंभिक, अस्पष्ट, धर्मभोळ्या आणि अंधश्रद्धेवर आधारलेल्या होत्या. त्या वेळेपासून आजपर्यंत या विषयाची जी प्रचंड वैज्ञानिक प्रगती झाली तिचे श्रेय सर्व जीवांची अधिकाधिक माहिती मिळविणाऱ्या असंख्य संशोधकांना आहे. जीवांसंबंधीचे आजचे बरेचसे निश्चित ज्ञान सर्वसंमत अशा ⇨ वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून मिळविले असल्याने त्याला ‘जीवविज्ञान’ अशी संज्ञा प्राप्त झाली. इतकेच नव्हे तर सर्व जीवांतील सजीवत्व (चैतन्य) तत्त्वतः सारखेच असल्याचा महत्त्वाचा सप्रमाण शोध या विज्ञानाच्या साहाय्याने लागला आहे. जीवांचे बाह्यस्वरूप व त्यांची संरचना कितीही भिन्न असो, त्या सर्वांत एकच जीवतत्त्व आहे. तथापि एवढ्यावर वैज्ञानिक कार्य थांबत नसून ते पुढे चालावेच लागते. कोणताही सिद्धांत किंवा नियम न बदलणारा असतो असे धरून चालत नाही. विज्ञानाच्या प्रगतीमुळे त्याचे स्वरूप बदलत जाते. जीवविज्ञान अद्याप पूर्ण विकसित नाही असे मानतात अद्याप शेकडो जीवांचा तपशीलवार अभ्यास व्हावयाचा आहे. त्यांच्या विषयीचे संपूर्ण ज्ञान उपलब्ध नाही. मनुष्यासह सर्व जीवांविषयी संपूर्ण ज्ञान मिळविणे हे जीवविज्ञानाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे ही विज्ञानशाखा सर्व विज्ञानशाखांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

जीवविज्ञान व इतर विज्ञानशाखा : गणित, रसायनशास्त्र, भौतिकी आणि भूविज्ञान यांसारख्या इतर विज्ञानशाखांनी मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय जीवांविषयीच्या आपल्या समजुती पूर्णपणे स्पष्ट होणार नाहीत, हे उघड आहे. अवकाशासंबंधी उपलब्ध होत असलेल्या अत्याधुनिक ज्ञानामुळे आपल्या ग्रहगोलावरील जीवांवर इतर ग्रह व सूर्य यांचा पडणारा प्रभाव व पृथ्वीचा इतिहास यांबद्दल अधिक माहिती मिळविण्याची आवश्यकता पटली आहे. जैव घटनांचे वर्णन व स्पष्टीकरण इतर विज्ञानशाखांच्या साहाय्याने अजैवांशी (निर्जीवांशी) कितपत तुल्य आहे हे पाहणे जीवविज्ञानाच्या क्षेत्रात समाविष्ट आहे. प्रत्येक जीववैज्ञानिक प्रक्रियेत इतर विज्ञानशाखांतील काही तत्त्वे व नियम विचारात घ्यावे लागतात. आपले खाद्यपदार्थ कोठून आले याचा विचार केल्यास त्यांच्या निर्मितीत रासायनिक विक्रियांची कल्पना येते त्याकरिता उपयोगात आलेल्या व त्यात साठविलेल्या ऊर्जेचा उगम सूर्यप्रकाशात (सौर ऊर्जेत) आहे हे समजल्यावर सूर्य, पृथ्वी व इतर ग्रह यांचा याबाबतीत संबंध लक्षात येतो पृथ्वीशिवाय इतर ग्रहांवर जीवन आहे किंवा कसे ही जिज्ञासा उत्पन्न होते. साहजिकच खगोलविज्ञानाचा व जीवविज्ञानाचा संबंध येणे अटळ आहे, हे कळून येते. आपल्या व सर्व प्राण्यांच्या पचनक्रियेतील रासायनिक प्रक्रियांवरून रसायनशास्त्र व जीवविज्ञान यांचा निकट संबंध लक्षात येतो. जीवांतील रूपांतरित अन्नाचे शोषण व परिवहन यांमध्ये भौतिकीतील ⇨तर्षण  आणि ⇨विसरण  या प्रक्रियांचा संबंध आल्याने त्या विज्ञानातील नियमांचा जीवविज्ञानात वापर होतो, हे दिसून येते. तसेच ऑक्सिजन वायूचे शोषण व कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे उत्सर्जन या प्रक्रियाही भौतिकीतीलच आहेत. पृथ्वीच्या पोटात आढळणाऱ्या जीवांचे अवशेष (जीवाश्म) व विद्यमान जीवसृष्टीतील त्यांचे वंशज यांचा परस्परसंबंध समजून घेऊन जैव क्रमविकासाचा (उत्क्रांतीचा) सिद्धांत प्रस्थापित करण्यास भूविज्ञान शाखेची फार मोठी मदत झाली आहे. एखाद्याला (प्राण्याला) किती अन्न लागते हे तो किती खातो, त्यातील किती ऊर्जा त्याला आवश्यक असते व किती उत्सर्जन होते (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकली जातात) यांचे उत्तर काढण्यास गणिताची जरूरी आहे म्हणजेच रोजच्या जीवनप्रक्रियेतील आवश्यक ऊर्जामापनास गणिताची मदत लागते.

जीवन चालू राहण्यास शरीरातील सर्व प्रक्रियांचा समन्वय व्हावा लागतो व तो काही रासायनिक माध्यमामुळे घडून येतो. प्राण्यांच्या बाबतीत येथे त्यांच्या तंत्रिका तंत्राचाही (मज्जासंस्थेचाही) संबंध येतो. जीवनातील स्वाभाविक घटनांच्या ओघात जीवांमध्ये स्वतःच्या शरीरव्यापाराची गरज भागवून ऊर्जाधिक्य झाल्यास त्यांची वाढ होऊन त्यांना परिपक्वता येते पूर्ण वाढ झालेल्या जीवांपासून संततीची निर्मिती होऊन जाति-परिरक्षण होते. वनस्पतींच्या बाबतीत तंत्रिका तंत्राच्या अस्तित्वाबद्दल संरचनात्मक पुरावा उपलब्ध नाही त्याबद्दल अंदाज व्यक्त केलेले आहेत वनस्पती संवेदनशील आहेत याबद्दल दुमत नाही प्राण्यांशी तुलना करता याबाबतीत त्यांचा विकास फार कमी आहे. ⇨सर जगदीशचंद्र बोस  यांनी अत्यंत संवेदी साधनांनी (उपकरणांद्वारे) वनस्पतीत तंत्रिका तंत्र असावे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रजोत्पादनासारख्या जैव प्रक्रियेत संततीच्या पितरांशी आढळून येणाऱ्या साम्यामुळे ⇨आनुवंशिकतेसारख्या घटनांचा विचार जीवविज्ञानाला करावा लागतो. पितर व संतती यांतील साम्य कालपरत्वे कमी होत जाऊन भेदांची वाढ होते व नवीन जातींची निर्मिती होते. ह्या ⇨ क्रमविकासामुळे पृथ्वीवरील भिन्न भिन्न प्रदेशांत जातींचे असंख्य प्रकार अवतरले आहेत. या सर्वांच्या काळजीपूर्वक अभ्यासाने त्यांचे आप्तसंबंध निश्चित करावे लागतात व त्याचे अर्थपूर्ण व व्यवस्थित वर्गीकरण करावे लागते. जीवविज्ञानात या सतत चालू असणाऱ्या कार्यामुळे वर्गीकरण साचेबंद न राहता अधिकाधिक प्रगत व वस्तुनिष्ठ होत असल्याचे आढळते. सर्व जीवप्रकारांचा विचार केल्यास त्यांमध्ये परिस्थितिसापेक्ष अनुकूलन (ज्या प्रक्रियेने जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्यास योग्य होतो ती) आढळते. जीवांतील परस्परावलंबनात अनेक जटिल अन्न-शृंखला असून त्यांत सहजीवनाचा आविष्कार आढळतो त्यामुळे एकंदर सृष्टीला सापेक्ष स्थैर्य प्राप्त झाल्यासारखे वाटते. सृष्टीतील सजीव आणि निर्जीव यांच्या जाळ्यात मनुष्याचे नेमके स्थान समजून घेणे आवश्यक ठरते व त्याच्याकडून झालेल्या चुकांची कारणमीमांसा करून त्यांची पुनरावृत्ती न होऊ देण्याकरिता मार्गदर्शनपर ज्ञानप्रसार करणे हे जीवविज्ञानाच्या क्षेत्रात येते, कारण जगात मानवाला असंख्य समस्यांशी सामना द्यावयाचा असतो आणि त्यांतील काही समस्या त्यानेच निर्माण केलेल्या असतात. उदा., आपल्या अनेक गरजा (कागद, लाकूड, जळण वगैरे) भागविण्याकरिता मनुष्याने जंगलांचा नाश केला, पण त्यामुळे अवर्षणाची समस्या उत्पन्न झाली व साहजिकच वृक्षारोपणाची योजना हाती घेणे भाग पडले. हवा आणि पाणी यांची शुद्धता ⇨प्रदूषणामुळे धोक्यात आली व सुधारित मानवसमाजाला तिच्यावर तोडगा शोधून काढणे भाग पडले तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे आलेल्या अन्नटंचाईच्या समस्येला तोंड देण्याकरिता संततिनियमन आणि अधिक अन्ननिर्मिती, संचय, परिरक्षण, वितरण इ. उपाय अंमलात आणावे लागतात. त्यामुळे जीवविज्ञानाच्या अनेक शाखातज्ञांना आता मोठे संशोधन क्षेत्र निर्माण झाले आहे.


शाखा : सर्व जीवांना लागू पडणाऱ्या अशा काही सर्वसाधारण बाबींसंबंधीचे विवेचन वरील मजकुरात आढळेल. तथापि अधिक विशिष्ट, सखोल व चिकित्सापूर्ण अभ्यासाच्या सोयीच्या दृष्टीने जीवविज्ञानाचे अनेक उपविभाग किंवा शाखा केलेल्या असून त्या प्रत्येक शाखेत प्राणी वा वनस्पती यांचा भिन्न दृष्टिकोनांतून अभ्यास केला जातो व मिळालेल्या माहितीचा अंतर्भाव केला जातो. या भिन्न शाखांची रूपरेखा पुढे दिली आहे. वनस्पती व प्राणी यांच्या स्वतंत्रपणे केलेल्या अभ्यासाची माहिती अनुक्रमे ⇨वनस्पतिविज्ञान, ⇨प्रणिविज्ञान  या दोन मोठ्या शाखांत दिली जाते या प्रत्येक शाखेत पुढे दिलेल्या त्याच प्रमुख उपशाखा मानून त्याप्रमाणे अभ्यासाचे व संशोधनाचे एकूण क्षेत्र विभागले जाते. (१) आकारविज्ञान : जीवांचे आकार व आकारमान पूर्वी या उपशाखेस याशिवाय संरचना, विकास, ⇨आकारजनन  वगैरेंचा समावेश असे. (२) शारीर : जीवांची संरचना व आकारजनन. (३) कोशिकाविज्ञान : शरीरातील सर्वांत सूक्ष्म घटकांसंबंधीची (कोशिका पेशींसंबंधीची) सर्व माहिती. (४) क्रियाविज्ञान : शरीरातील सर्व क्रिया, विक्रिया व प्रक्रिया यांची माहिती लहानमोठ्या अवयवांची कार्ये. (५) सूक्ष्म रचना : शरीरावयवांची सूक्ष्म संरचना यात काही शास्त्रज्ञ कोशिकाविज्ञानाचा समावेश करतात. (६) वर्गीकरणविज्ञान: विद्यमान व निर्वंश जीवांचे नैसर्गिक (आप्तभाव दर्शविणारे) वर्गीकरण. (७) पुराजीवविज्ञान : प्राचीन खडकांच्या थरांत आढळणाऱ्या जीवाश्मांची (जीवांच्या शिळारूप अवशेषांची) माहिती. (८) परिस्थितीविज्ञान : जीवांच्या आसमंतातील सर्व घटकांची माहिती व जीवांचे व जीव समुदायांचे अनुयोजन (त्याशी समरस होऊन जगणे). (९) गर्भविज्ञान : जीवाच्या गर्भावस्थेतील विकासाची माहिती. (१०) आनुवंशिकी : जीवांच्या लक्षणांचे पिढ्यान्‌पिढ्या होणारे अनुहरण (एका पिढीतून दुसरीत जाणे). (११) जीवभूगोल : जीवांचे किंवा जैव समुदायांचे पृथ्वीवर भिन्न भौगोलिक प्रदेशातील नैसर्गिक वितरण. (१२) जीववैज्ञानिक तत्त्वज्ञान : जीवोत्पत्ती व विद्यमान जीवांची निर्मिती (क्रमविकास). (१३) जीवभौतिकी व जीवरसायनशास्त्र : जीवांसंबंधीच्या भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास. (१४) प्राण्यांचे वर्तन व मानसशास्त्र. (१५) सूक्ष्मजीवविज्ञान : फक्त सूक्ष्मजीवांसंबंधीचा (उदा., सूक्ष्मजंतू, आदिजीव, सूक्ष्म कवक व विषाणू किंवा व्हायरस) अभ्यास. (१६) रेणवीय जीवविज्ञान : जीवांची रेणवीय व आणवीय पातळीवरील संरचना व प्रक्रिया यांसंबंधीची माहिती. (१७) जीवसांख्यिकी : जीवविज्ञानातील काही आकडेवारी किंवा जीवांची संख्यात्मक लक्षणे यांचे सांख्यिकीय पद्धतीने विश्लेषण करून निष्कर्ष काढणे. (१८) बहिर्जीवविज्ञान : अवकाशात सतत किंवा कधीकधी वावरणारे जीव आणि इतर ग्रहांवरचे वा इतर ग्रहमालेतील ग्रहांवरचे जीव (असल्यास) ह्यांसंबंधीची माहिती.

ह्या भिन्न शाखांमध्ये काटेकोर मर्यादा नसतात. जीववैज्ञानिक संशोधनात संपूर्ण जीव व त्याचे अवयव यांचा अभ्यास हा एक प्रवेशमार्ग असून जीवप्रक्रियांचा अभ्यास हा दुसरा प्रवेशमार्ग आहे. निरीक्षण व प्रयोग यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या अभ्यासात ⇨सूक्ष्मछेदक, ⇨सूक्ष्मदर्शक  इ. अनेक अत्याधुनिक भौतिकी उपकरणांचा व किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (तोच अणुक्रमांक परंतु भिन्न अणुभार असलेल्या आणि भेदक कण किंवा किरण बाहेर टाकणाऱ्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचा) वापर करतात तसेच सूक्ष्म रासायनिक विक्रियांचा आणि जीवरासायनिक तंत्राचाही उपयोग करतात.

इतिहास : विज्ञानाच्या कोणत्याही शाखेच्या इतिहासावरून असे दिसून येते की, त्यातील प्रगतीला दोन गोष्टींची जोड लागते. त्यांपैकी एक म्हणजे संशोधनाला आवश्यक असे सर्जनशील मन त्याने जुन्या व स्वीकृत कल्पना टाकून नव्या उपपत्तींचा स्वीकार करण्यास तयार असणे आवश्यक असते दुसरी गोष्ट म्हणजे नव्या तांत्रिक साधनांद्वारे प्रयोग करून नवीन उपपत्तींची कसोटी पाहण्याची तयारी. योग्य अशा साधनसामग्रीच्या अभावी जिज्ञासू व सृष्टीतील गूढे उकलू पाहणाऱ्या मनाची गती थांबते तसेच उत्तम साधनसंपत्तीचा पुरवठा असून त्याचा योग्य उपयोग करून पाहण्याची मनाची ओढ नसेल, तर संशोधनाला आळा बसतो. उदा., जीवांचे शरीर हे कोशिकामय (सूक्ष्म जिवंत घटकांचे बनलेले) असते, ह्या कोशिका-सिद्धांताची [→ कोशिका] स्थापना सूक्ष्मदर्शक साधने उपलब्ध झाल्यावर झाली तत्पूर्वी शेकडो वर्षे जीवांच्या मूलभूत शरीरघटकासंबंधी फक्त अंदाजच चालू होते. तेच स्पष्टीकरण ⇨ग्रेगोर योहान मेंडेल  यांच्या शोधाच्या बाबतीत लागू पडते [→ आनुवंशिकी]. वाटाण्याच्या भिन्न प्रकारांतील लक्षणांचे अनुहरण (संततीत उतरणे) गुणसूत्रे (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) व त्यांची कोशिकाविभाजनातील भूमिका तांत्रिका साधनांनी कळेपर्यंत व्यवहारात अज्ञातच राहिले. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आणि अतिकेंद्रोत्सारक (केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या प्रेरणेचा उपयोग करून अतिसूक्ष्म कण वेगळे करणारे) यंत्र यांसारखी अतिशय सुविकसित साधे अलीकडे उपलब्ध झाल्यामुळे जीवविज्ञानाचे वर्णनात्मक स्वरूप कमी होऊन त्यातील नवीन संशोधन उपकोशिकेय (कोशिकेपेक्षाही लहान आणि साध्या जीवघटकांच्या) व रेणवीय बाजूकडे अधिकाधिक होत आहे व त्यावरून सजीवांच्या सर्व पातळ्यांवर संरचना आणि कार्ये यांचा समन्वय घालण्याचे उद्दिष्ट या विज्ञानशाखेकडून साध्य होऊ लागले आहे.

जीवविज्ञानाचा उगम व प्रारंभिक विकास : जीवविज्ञानाच्या उगमाची काळवेळ निश्चित सांगणे कठीण आहे. मानवी जीवनाच्या सुरुवातीस मानवाला हितकर वनस्पती व हानिकारक प्राणी आणि त्यांचे वर्तन यांचे ज्ञान अनुभवानेच झाले असणे शक्य आहे त्याशिवाय तो जगलाच नसता. मानवी संस्कृतीच्या आरंभीच मनुष्यांशी सलगीने वागणारे प्राणी त्यांनी माणसाळविले होते व मनुष्यास समुदायाला पुरेसे अन्न उपलब्ध करून देणारी पिकेही निश्चितपणे काढण्याइतके कृषिज्ञान त्यांना होते म्हणजेच लेखनकला अवगत होण्यापूर्वी बरीच वर्षे जीवविज्ञानाचा उगम झाला होता. ॲसिरियन आणि बॅबिलोनियन लोकांची पिकविलेली धान्ये व त्यांचे पशुवैद्यकीय ज्ञान हे दर्शविणाऱ्या त्यांनी कोरून काढलेल्या चित्रांवरून आज अतिप्राचीन जीववैज्ञानिक माहिती कळते तसेच काही शिक्क्यांवरील चित्रांवरून त्यांना खजुरीच्या झाडांतील लिंगभेद आणि नरवृक्षावरील पराग स्त्रीवृक्षावरच्या फुलांतील स्त्रीकेसरावर घालून फलोत्पादन होते इ. बाबींची माहिती झाली होती हे कळते. इ. स. पू. १८०० च्या सुमारास हामुराबी काळातील एका बॅबिलोनियन व्यापारी करारावरून खजुरीची नर-पुष्पे ही एक व्यापारी वस्तू होती याचा व खजुरीच्या मोसमाची माहिती यांसंबंधीचा काळ इ. स. पू. ३५०० च्या आसपास असल्याचा बोध होतो. इ. स. पू. ४००० च्या काळात बॅबिलोनियन लोक ताग पिकवीत असत त्याचे कापड ईजिप्शियन लोक वापरीत. याशिवाय ⇨पपायरस  नावाच्या कागदावरील मजकुरावरून शारीरविषयक काही वर्णन (इ. स. पू. १६००) व हृदयाचे महत्त्व (इ. स. पू. १५००) त्या वेळी माहीत असल्याचे दिसून येते. अश्मयुगातील मानवाने (इ. स. पू. १००००) स्पेनमधील अल्तामिरा गुहेत रानबैलाचे चित्र काढलेले आढळते [→ आदिम कला]. त्यावरून त्याच्या चित्रकलेची (एका सुप्त गुणाची) आणि त्याच्याशी सलगी असलेल्या प्राण्यांची कल्पना येते. ईजिप्शियन थडगी व पिरॅमिडे यांमधील पपायरस कागद व हस्तनिर्मित वस्तू यांवरून ईजिप्शियन लोकांना वैद्यकीय ज्ञान चांगले होते असे दिसते मृताचे परिरक्षण करण्यास लागणाऱ्या रासायनिक पदार्थांची आणि वनस्पतींची त्यांना माहिती होती हे उघड आहे. ईजिप्शियन ‘ममीं ’च्या पोटांतील अन्नात ज्वारी, सातू व कंद आढळले आहेत, त्यावरून त्या काळी (इ. स. पू. ५०००) ती धान्ये पिकवीत असत असे दिसते. अनेक ठिकाणी आढळलेल्या माळा आणि कोरीव चित्रे यांवरून त्यांना काही वनस्पतींचे औषधी महत्त्व कळले होते (इ. स. पू. २०००). चिनी बादशहा शेन नुंग यांच्या वेळच्या (इ. स. पू. २८००) एका ग्रंथावरून अनेक वनस्पतींच्या औषधी गुणांची आणि ⇨सोयाबीनसारख्या महत्त्वाच्या व इतर अन्नविषयक वनस्पतींची माहिती मिळते. प्राचीन चिनी लोक बाँबिक्स मोरी  या रेशीम बनविणाऱ्या किड्यांची पैदास व्यापारी प्रमाणावर रेशीम बनविण्यासाठी करीत तसेच वृक्ष पोखरणाऱ्या काही किड्यांचा नाश करणाऱ्या कीटकभक्षक मुंगीचीही त्यांना माहिती होती (हल्ली याला ‘जीववैज्ञानिक नियंत्रण’ म्हणतात). इ. स. पू. २५०० च्या सुमारास भारतातील हिंदूंची कृषिविषयक पद्धत प्रगत झाली होती. गहू व सातू (बार्ली, यव, जव) ही धान्ये मोहें-जो-दडोच्या उत्खननात आढळली आहेत ती त्यावेळी पिकविली जात होती. ज्वारी, बाजरी यांसारखी धान्ये खजूर, खरबुजे, इतर काही फळे व भाज्या कापूस इत्यादींशी या संस्कृतीचा परिचय होता. इ. स. पू. ६०० च्या काळातील एका हिंदू लिखितातून ९६० औषधी वनस्पतींची वर्णने, शिवाय शारीर, शरीरक्रियाविज्ञान, रोगविज्ञान आणि प्रसूतितंत्र यांसंबंधीही माहिती मिळते.


वैदिक वाङ्‌मयाचा (वेद, ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे व कल्पसूत्रे इ.) काळ साधारणपणे इ. स. पू. २५०० ते इ. स. ५०० हा धरून या सु. तीन हजार वर्षांच्या कालखंडातील भारतीय जीवविज्ञानाचा शोध घेतल्यास असे आढळते की, यज्ञकर्म हा एक त्या वेळच्या जनतेच्या जीवनातील प्रमुख भाग असल्याने त्याकरिता आवश्यक ती धान्ये पिकविणे, रानात उगवलेली इतर धान्ये, गवते, वनस्पतींची पाने, फुले, फांद्या वगैरे जमविणे व त्याचप्रमाणे रोगनिवारणार्थ वनस्पती जमविणे, आरोग्य व आयुर्वर्धक आहारास उपयुक्त कंदमुळे जमा करणे, उपयुक्त पशुपालन (शेती व दुधदुभते इत्यादींकरिता) करणे यांमध्ये बरीच प्रगती झाली होती सु. २५० वनस्पतींचा उल्लेख व उपयोग दिलेला आढळतो त्यांत यव (सातू), तांदूळ, कुळीथ, गहू, तीळ, मसूर, उडीद, मूग, मोहरी, ऊस, वाळा, एरंड, पळस, गुळवेल, दर्भ, दूर्वा, वड, कमळ, बेल, मधुक, कळक, वेत, शमी, शिसू इ. मुख्यत्वेकरून उल्लेखिली आहेत. थोडक्यात कृषी, वैद्यक व उपयुक्त आहार यांसंबंधीचे जीवविज्ञान वेदकाली प्रगत होते, म्हणजे तत्पूर्वी अनेक वर्षे त्याचा आरंभ व विकास भारतात चालू असावा. वैदिक वाङ्‌मयात वनस्पतींचे काही स्वरूप-प्रकार व त्यांच्या शरीराचे भाग, शेतीच्या काही प्रक्रिया, वृक्षांच्या भागांचे विविध उपयोग यांची काही माहिती मिळते. मंत्रतंत्र, प्राण्यांची शिकार, वाजीकरण, घरबांधणी, आसने, चटया, मद्ये (सुरा), सोम, सुगंध, राक्षसांचा नाश इत्यादींकरिता अनेक वनस्पतींचा वापर वर्णिलेला आढळतो. यांतील अनेक वनस्पतींचा व विविध कार्यांकरिता केलेल्या प्रक्रियांचा विकास वेदोत्तर काळात व नंतरही चालू राहिला व जीवविज्ञानाच्या वाढीला उपकारक ठरला हे निर्विवाद.

ग्रीक व रोमन यांचे जीवविज्ञान : वर वर्णन केलेल्या भिन्न देशांत वनस्पती व प्राणी यांच्या व्यावहारिक उपयोगाने जी माहिती मिळविली गेली त्यामुळे त्या त्या देशात जीवविज्ञानाचा आरंभ झाला व विकासाची काही क्षितिजे त्यांच्या दृष्टिपथात आली, तथापि असुर व भुतेखेते यांसारख्या अदृश्य व काल्पनिक गोष्टी आणि अंधश्रद्धा यांचाही पगडा त्यांच्या मनावर होता. विद्वानांच्या अभ्यासात नैसर्गिक सृष्टीपेक्षा अतिभौतिक सृष्टीसंबंधीच्या विचारांना प्राधान्य असे. त्यामुळे तर्कशुद्ध विचारसरणीच्या विकासाला व विज्ञानाच्या प्रगतीला अडथळा येत असे. ग्रीक संस्कृतीमुळे मात्र अशा गूढवादी प्रवृत्ती बदलू लागल्या त्याचा योग्य असा परिणाम दिसू लागला. इ. स. पू. ६०० च्या सुमारास काही ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी कार्यकारणभावाचा पुरस्कार केला त्यामुळे पुढील वैज्ञानिक शोधांत तर्कशुद्धता येऊ लागली. विश्वातील घटना नैसर्गिक नियमांनी घडून येतात आणि अभ्यासूंना आपली निरीक्षणशक्ती व निगमन (त्यावरून निष्कर्ष काढणे) यांच्या साहाय्याने त्यांचे आकलन होते ही गोष्ट पटल्याने ग्रीकांनी विज्ञानात तर्कशुद्ध विचारांना प्रवेश देऊन जीवविज्ञानाचा पाया घातला. इ. स. पू. सातव्या शतकातील मायलीटसच्या थेलीझ या ग्रीक तत्त्ववेत्त्यांच्या मते विश्वात ‘फायसीस’ नावाची सर्जनशील (निर्माण करण्याची क्षमता असलेली) शक्ती आहे जग आणि त्यातील सर्व जीव पाण्यापासून बनले आहेत. थेलीझ यांचे शिष्य ॲनॅक्सिमँडर यांच्या मते जीवांमध्ये पाण्याशिवाय मृदा ॲपेरॉन हा वायूसारखा पदार्थही अंतर्भूत आहे उष्ण व शीत असे त्याचे भाग असून त्यांच्या भिन्न प्रकारच्या मिश्रणांनी मृदा (पृथ्वी), हवा (वायू), अग्नी (तेज) व पाणी (आप) ही चार मूलतत्त्वे बनतात. त्यांच्या मते जीवांचा उगम चिखलापासून स्वयंजननाने (आपोआप) झाला असून काटेरी कातडीचे मासे सर्वप्रथम बनले असून त्यांचे वंशज प्रथम कोरड्या जमिनीवर आले व त्यांचे रूपांतर इतर प्राण्यांत झाले. आजच्या जीवांच्या ⇨क्रमविकासाच्या सिद्धांताचा हा पहिला टप्पा म्हणण्यास हरकत नाही. इ. स. पू. ५०० च्या सुमारास द. इटलीत क्रोटॉन येथे पायथॅगोरस यांनी एक निसर्गतत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचे मंडळ स्थापले होते. त्यांच्या अल्कमेऑन या शिष्यांनी प्राण्यांच्या संरचनेचा अभ्यास केला त्यांनी रोहिणी आणि नीला यांतील फरक दर्शविला मेंदू हे बुद्धीचे स्थान आहे असे दर्शवून दृक् तंत्रिकेचाही शोध लावला गर्भाच्या विकासाच्या माहितीमुळे त्यांना आद्य गर्भविज्ञ म्हणतात. इ. स. पू. ४०० च्या सुमारास कॉस या एजियन बेटावर ग्रीक वैद्य हिपॉक्राटीझ यांनी वैद्यकाच्या अभ्यासाकरिता एक संस्था सुरू केली पण ते अल्कमेऑन यांच्यासारखे संशोधक नव्हते. मनुष्याच्या शरीरातील अनेक अवयवांतील गुंतागुंतीचे परस्परसंबंध अनेक रोगी तपासून त्यांनी ओळखले होते तसेच मनुष्याच्या प्रवृत्तीवर परिस्थितीचा परिणाम कसा होतो, हे त्यांनी दाखविले तीव्र फरक असलेल्या हवामानातील रहिवासी सामर्थ्यवान असतो, परंतु समशीतोष्ण हवामान मनुष्यातील आळसटपणाला पोषक ठरते, असे त्यांचे मत होते. हिपॉक्राटीझ व त्यांच्या पूर्वीचे कार्यकर्ते यांनी विश्व व त्यातील जीव यांच्या उत्पत्तीबद्दल लक्ष केंद्रित केले होते. वर उल्लेख केलेली ‘फायसीस’ ही संकल्पना मान्य करूनही पाणी, मृदा, हवा व अग्नी यांच्या भूमिकेबद्दल मतभेद होते. ॲनॅक्सिमेनीस (ॲनॅक्सिमँडर यांचे शिष्य) हे ‘चिखलापासून जीवांची उत्पत्ती’ ह्या कल्पनेचेच पुरस्कर्ते होते शिवाय सूर्यापासून आलेल्या उष्णेतेतून सर्जनशक्तीची प्राप्ती हवेच्या द्वारे होते असे ते मानीत असत. हिपॉक्राटीझ यांच्या इतर अनुयायांची उपपत्ती भिन्न होती सर्व जीव रक्त, काळे पित्त, श्लेष्मा व पिवळे पित्त या चार शरीरद्रवांचे बनलेले असून त्यांचा उगम अनुक्रमे हृदय, प्लीहा, मेंदू आणि यकृत यांमध्ये आहे, या शरीरद्रवांतील समतोल बिघडल्यास भिन्न भिन्न व्याधी उद्‌भवतात ह्या शरीरद्रवांच्या कल्पनेच्या प्रभावामुळे आजमितीसही त्या संज्ञा त्याच अर्थी शब्दकोशात आढळतात. तसेच रोगांचा उगम शरीरद्रवांतील समतोल बिघडण्यात असतो, अशा समजुतीने शरीरद्रवाचे आधिक्य कमी करण्यास कृत्रिम पद्धतीने रक्तस्राव घडवून आणण्याची प्रथा सुरू झाली व अद्याप तिचा वापर कोठे कोठे दृष्टीस पडतो. सृष्टीच्या संघटनेसंबंधी ग्रीक तत्त्वज्ञानातील चार मूलतत्त्वांची कल्पना भारतीय (हिंदू) पंचमहाभूतांच्या कल्पनेहून फारशी भिन्न नाही तसेच सूर्यकिरणातून मिळाणाऱ्या ऊर्जेतूनच आज सर्व जीव आपापला ऊर्जेचा वाटा मिळवतात या आजच्या शास्त्रीय सत्याशी सुसंगत अशीच ग्रीकांची मूळची सर्जनशील शक्तीच्या उगमाची कल्पना आहे.


ॲरिस्टॉटल यांच्या संकल्पना : इ. स. पू. चौथ्या शतकाच्या मध्यास प्राचीन ग्रीक विज्ञानाची चरमसीमा या तत्त्वज्ञानाबरोबरच गाठली गेली, कारण ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४–३२३) हे त्या वेळचे महापंडित अनेक ज्ञानाशाखांत मनःपूर्वक लक्ष घालीत असत. त्यांनी प्राण्यांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला हे वर्गीकरण सदोष असले, तरी काही प्राण्यांविषयीची महत्त्वाची माहिती सूक्ष्म व काळजीपूर्वक निरीक्षणाने त्यांनी मिळविली होती हे दिसून येते उदा., काही प्राणी रक्तयुक्त व काही रक्तहीन असतात सर्व सस्तन प्राण्यांना फुप्फुसे असतात, ते हवेत श्वासोच्छ्‌वास करतात, त्यांचे रक्त गरम असते व ते पिलांना पाजतात इत्यादी. पद्धतशीर वर्गीकरणाची संपूर्ण कल्पना व त्यात उपयुक्त अशी भिन्न दर्जाची एकके ओळखून वापरणे याबाबत त्यांचा क्रमांक सर्वप्रथम मानतात. जीवांची पुनरुत्पत्ती, गुणदोषांचे अनुहरण व जीवांचे अवतरण यांसंबंधीचे त्यांचे विचार महत्त्वाचे होते परंतु उत्पत्तीची जुनी (अजीवजननाची) कल्पना त्यांनी मान्य केली होते लैंगिक प्रजोत्पत्ती (मैथुनाशिवाय व मैथुनाने), कळ्या येणे (अलैंगिक प्रजोत्पादन) व अजीवजनन असे प्रजोत्पादनाचे चार प्रकार त्यांनी मानले होते. रेतुके (पुं-कोशिका, शुक्राणु) आणि अंडी (स्त्री-कोशिका) यांचे वर्णन त्यांनी केले असून अपत्यांना जन्म देणाऱ्या प्राण्यांचा ऋतुस्राव हाच प्रजोत्पादक पदार्थ असावा असे त्यांचे मत होते जीवांच्या जाती परिवर्तनीय असतात (त्यांच्या लक्षणांत बदल होतात) ही महत्त्वाची बाब त्यांना मान्य होती. ⇨नैसर्गिक निवडीची कल्पना त्यांनी अमान्य केली होती व डार्विन यांच्या आधीच्या क्रमविकासाच्या कोणत्याही कल्पनेचा विकास त्यांनी केला नाही सृष्टीतील कोणत्याही घटना हेतुपूर्वक साकार होतात हे स्पष्टीकरण ते सर्व निरीक्षणांना लावीत असत विसाव्या शतकातच बनलेली आहेत अशी पुढील काही वैज्ञानिक तत्त्वे त्यांच्याशी निगडित आहेत : (१) सर्व सजीवांची संरचना व त्यांच्या सवयी परिस्थितीशी जमवून घेण्याकरिता असतात, हे त्यांनी पक्ष्यांच्या उदाहरणावरून दर्शविले. (२) निसर्गात कमालीची काटकसर आढळते अनावश्यक ऊर्जानिर्मिती टाळली जाते. (३) प्राण्यांच्या वर्गीकरणात बाह्यस्वरूपापेक्षा संरचनेच्या विविधतेतील मूलभूत साचा त्यांनी अधिक महत्त्वाचा मानला हे तत्त्व आजही शास्त्रशुद्ध आणि आवश्यक मानतात. (४) भिन्न प्राण्यांत आढळणारे मूलतः सारखे अवयव (संरचनात्मक साम्य) व सारखे कार्य असलेल्या भिन्न संरचना (कार्यात्मक सादृश्य) यांचे महत्त्व त्यांना निरीक्षणामुळे समजले होते. तुलनात्मक शरीररचना या जीववैज्ञानिक शाखेचा मूलभूत पाया याच तत्त्वावर आधारित आहे. (५) विशेषत्व हे सामान्यातून उगम पावते आणि त्याप्रमाणे ऊतकांच्या (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांच्या) प्रभेदनातून (श्रमविभागणीच्या विकासामुळे होणाऱ्या फेरबदलांतून) अवयवांची निर्मिती होते. ॲरिस्टॉटल यांच्या अनेक ग्रंथांपैकी उपलब्ध असलेले असे दोनच ग्रंथ वनस्पतिविज्ञानासंबंधी आहेत परंतु त्यावरून पुढे त्या विज्ञानाचा विकास झाला असावा, असे आढळत नाही. तथापि त्यांचे शिष्य थीओफ्रॅस्टस (इ. स. पू. ३७२–२८८) यांनी ग्रीककालीन वनस्पतिविज्ञानाची पुरेशी कल्पना येईल असे कार्य केले आहे. थीओफ्रॅस्टस हे सूक्ष्म निरीक्षक असले, तरी त्यांच्या गुरूइतकी स्वतंत्र विचाराची सखोलता त्यांच्याजवळ नव्हती De historia et causis plantarum (द कॅलेंडर ऑफ फ्लोरा, १७६१) या त्यांच्या ग्रंथात आकारविज्ञान, नैसर्गिक इतिहास व चिकित्सा आणि वनस्पतींचा वैज्ञानिक उपयोग यांचा अंतर्भाव केलेला आढळतो. शरीराबाहेरील भागास अवयव व आतील भागास ऊतक असा फरक करून व काही रूढ संज्ञांना विशेष अर्थ देऊन परिभाषा बनविण्याचा उपक्रम त्यांनी नव्याने सुरू केला. उदा., कार्पोस = फळ पेरिकार्पिऑन = बीजपात्र. त्यांच्या लिखाणात सु. पाचशे वनस्पतींचा उल्लेख आढळतो, तरीही सर्व वनस्पतींचे वर्गीकरण दर्शविणाऱ्या पद्धतीचा त्यांनी प्रस्ताव केलेला नाही तथापि त्यांनी अनेक वनस्पतींचे भिन्न भिन्न गट (आता वंश) बनविले होते. खजुरीच्या वृक्षावरच्या स्त्रीकेसरावर परागण (स्त्रीपुष्पावर नरवृक्षाचे परागकण शिंपणे) हाताने कसे करावे याचा पहिला तपशीलवार वृत्तांत त्यांनी लिहिला असून फुलझाडांतील लैंगिक प्रजोत्पादन, बीजाचे रुजणे (अंकुरण) आणि त्यातून आलेल्या नवीन अवयवांचा विकास यासंबंधीचे निरीक्षण इत्यादींचे वर्णन केलेले आढळते. ग्रीक काळातील संशोधन ॲरिस्टॉटल व थीओफ्रॅस्टस यांच्याबरोबरच समाप्त झाले.

ग्रीकांनंतरचे जीवविज्ञान : ग्रीकोत्तर काळातॲलेक्झांड्रियातील दोन नवीन अभ्यासकेंद्रे म्हणजे तेथील ग्रंथालय आणि संग्रहालय ही होत. इ. स. पू. ३०० वर्षे पूर्ण होईपर्यंतच्या काळात जीवविज्ञानाच्या प्रगतीचे श्रेय वैद्यांकडे जाचे. हीरॉफिलस हे त्यांत प्रमुख असून मनुष्याच्या प्रेताचे विच्छेदन व इतर काही मोठ्या प्राण्यांच्या शरीररचनेशी त्यांची तुलना त्यांनी केली होती. तंत्रिका तंत्राचे केंद्र व बुद्धीचे स्थान म्हणून मेंदूचे तपशीलवार वर्णनही केलेले आढळते शिवाय डोळ्यासंबंधी, प्रसूतीसंबंधी (दायांकरिता) व सामान्य शारीरविषयक असे तीन स्वतंत्र ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांचे समकालीन एरासिस्ट्रेस यांनी हृदयातील पडदे व रुधिराभिसरण यांचा अभ्यास केला रोहिणी व नीला यांचा परस्परसंबंध लहान लहान रक्तवाहिन्यांकरवी होत असावा, हे त्यांनी ओळखले होते. ग्रीक वैद्य ⇨गेलेन  या शेवटच्या प्राचीन जीववैज्ञानिकांचा जन्म आशिया मायनरमध्ये झाला होता व ते तोरो येथे इ. स. पू. दुसऱ्या शतकाच्या मध्यात वैद्यक व्यवसाय करीत होते. मनुष्याची व इतर काही प्राण्यांच्या शरीरांची रचना त्यांनी चांगली अभ्यासली होती, तथापि प्रेताच्या विच्छेदनाविरुद्ध लोकमत असल्याने त्यांचे ज्ञान सदोष राहिले तरीही त्यांच्या चांगल्या लेखनपद्धतीमुळे पुढे अनेक शतके त्यांचा प्रभाव वैद्यकावर पडून राहिला परंतु त्यानंतर जीवविज्ञानातील संशोधन जवळजवळ थांबले इ. स. पू. दुसऱ्या शतकाच्या शेवटी विज्ञानाची गती खुंटली कारण ग्रीकांच्या चिकित्सक प्रवृत्तीला उदयोन्मुख ख्रिस्त धर्मीयांनी उत्तेजन दिले नाही असे म्हणतात.

अरबी वर्चस्व : युरोपात ज्या १,००० वर्षाच्या काळात विज्ञानाला सुप्तावस्था प्राप्त झाली त्या वेळी अरबांचा प्रभाव स्पेनपर्यंत पसरून इतर ज्ञानाशाखांप्रमाणेच जीवविज्ञानासह सर्व विज्ञानावर त्यांचा मोठा प्रभाव पडला. त्याच वेळी चीनमधून नवीन तांत्रिक शोध पाश्चात्त्यांकडे येऊ लागले. त्यांतील प्रमुख म्हणजे कागदाचा शोध व मुद्रणकला (छपाई) त्यामुळे शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल घडून आले तसेच भारतातून तथाकथित अरबी आकड्यांची यूरोपात झालेली आयात. इसवी सनाच्या तिसऱ्या ते अकराव्या शतकापर्यंत जीवविज्ञानाची प्रगती अरबांतर्फेच चालू होती ते स्वतः फार मोठे संशोधक नव्हते त्यांनी ॲरिस्टॉटल व गेलेन यांच्या ग्रंथांचे अरबीत भाषांतर केले व त्यांवर टीकाप्रबंध लिहिले. लेखकांत अल्-जहीज (मृत्यू इ. स. ८६८) हे प्रमुख असून किताब-अल्-हयवान (प्राण्यांचा ग्रंथ) या त्यांच्या प्रमुख ग्रंथावर ग्रीकांचा प्रभाव आढळतो सृष्टीतील ऐक्य व जीवांच्या भिन्न गटांतील आप्तसंबंध यांवर भर दिलेला आढळतो. जीवांत लिंगभेद आढळल्याने अल्-जहीज हे स्वयंजननाबाबत ग्रीकांशी सहमत होते. ⇨इब्ज सीना (ॲव्हिसेन्ना) हे अकराव्याशतकाच्या आरंभीच्या काळातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ असून ते ॲरिस्टॉटल यांचे वारसदार होते. औषधे व औषधी रसायने यांसंबंधीचे त्यांचे लिखाण अधिकृत असून प्रबोधन काळापर्यंत ते तसे मानले जात होते त्यामुळे ॲरिस्टॉटल यांचे लिखाण परत यूरोपात आले व अरबीतून त्याचे लॅटिनमध्ये भाषांतर झाले.


बाराव्या शतकाच्या आसपास वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान यांत तुरळक प्रगती आढळते वनस्पतींच्या रोगनिवारक गुणधर्मांच्या अभ्यासातून वनस्पतिविज्ञानाचा थोडा विकास झाला. त्यात कित्येक वनस्पतींची सचित्रे वर्णने समाविष्ट झाली. शिकारीचा छंद आणि पशुवैद्यक यांतून प्राणिविज्ञानात काहीशी प्रगती झाली. या काळात बायझंटिन, चिनी व लॅटिन संस्कृतींच्या मानाने अरबी विज्ञान अधिक वाढले, तरी पुढे पुढे त्यास उतरती कळा लागली. लॅटिन ज्ञान-विज्ञान त्यामानाने प्रगत होत गेले. तेराव्या शतकाच्या मध्यास सेंट अल्बर्ट मॅग्नस या जर्मन विद्वानांनी वनस्पतींसंबंधी सात व प्राण्यासंबंधी सव्वीस ग्रंथ लिहिले त्यांना आधार ग्रीक ज्ञानाचा (विशेषतः ॲरिस्टॉटल यांच्या) होता तथापि स्वतःची अनेक नवीन निरीक्षणे त्यांनी त्यात समाविष्ट केली होती (उदा., पानांची संरचना व शिरांची मांडणी). बीजप्रसार, प्रजोत्पादन व सर्व जीवांतील लैंगिकता यांवर त्यांच्या लिखाणात भर असून प्राण्यांत प्रजोत्पादनाकरिता दोन भिन्न लिंगी व्यक्तींची जरूरी असते, त्यामुळे वनस्पतींपेक्षा प्राणी अधिक परिपूर्ण होते व जीवांची उत्पत्ती प्रथम स्वयंजननाने झाली होती इ. गोष्टी त्यांनी वर्णिल्या आहेत. औषधीय जीवविज्ञानाच्या बाबतीत त्यांच्या दृष्टिकोनामुळे पुढील यूरोपीय विज्ञानावर फार मोठा परिणाम झाला. कारण त्यांचा लोकभ्रमावर विश्वास नव्हता ॲरिस्टॉटल यांच्या जीवविज्ञानाचा त्यांची स्वीकार केला होता. त्यांचे शिष्य सेंट टॉमस ॲक्विना यांनी ख्रिस्ती धर्म व ॲरिस्टॉटल यांचे तत्त्वज्ञान यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ख्रिस्ती धर्माच्या विचारांशी सुसंगत असलेल्या बुद्धिगम्य ज्ञानाचे पुनरुज्जीवन झाले.

मध्ययुगीन काळात इटलीत विज्ञान केंद्रीभूत झाले होते पण कृषी व वैद्यक यांमध्ये अधिक लक्ष घातले गेले विशेष महत्त्वाचा विकास शारीरासंबंधीच्या शास्त्रात झाला, कारण वैद्यक शिक्षणसंस्थांत त्या वेळी शवविच्छेदनाची प्रथा सुरू झाली. चौदाव्या शतकाच्या आरंभी मोंदीनो दे लूत्त्सी ह्या सुप्रसिद्ध इटालियन शास्त्रज्ञांचे शारीरविषयक कार्य महत्त्वाचे होय. ते स्वतः शवविच्छेदनाचे काम करीत असत. त्यांच्या निरीक्षणाने त्यांनी ग्रीक व अरबांच्या पूर्वीच्या चुका दुरुस्त केल्या असत्या, परंतु वरिष्ठांशी मतभेद टाळण्याकरिता त्यांच्या दृष्टिकोनाशी जमवून घेण्यात काही चुका राहून जात प्रस्थापित प्राधिकरणापासून सुटून जाण्याची अडचण खऱ्या संशोधनाच्या आड कशी येते याचे मोंदीनो हे प्रतिनिधिक उदाहरण आहे.

भारतीय जीवविज्ञानाच्या आरंभी आणि त्यानंतरच्या विकासात तत्कालीन मानवी समाजाने केलेले प्रयत्न, वैदिक वाङ्‌मयावरून मिळालेल्या माहितीचा उपयोग केल्यास कसे समजून येतात याचा उल्लेख मागे आलाच आहे. त्यानंतर त्यामध्ये खरी प्रगती इ. स. पू. सहाव्या ते इ. स. दहाव्या शतकापर्यंतच्या दीर्घकालात होऊन विशेषतः वनस्पतीविज्ञानाचा पाया घातला गेला व त्याच्या अनुषंगाने बव्हंशी पाळीव प्राण्यांविषयीची माहिती संकलित झाली. ह्या काळातील प्रसिद्ध व्याकरणतज्ञ पाणिनी यांच्या अष्टाध्यायी  या ग्रंथांत अनेक प्रकारची वने व अनेक दृष्ट्या उपयुक्त वनस्पती यासंबंधी विपुल माहिती आलेली असून त्यांपैकी कित्येक वनस्पती आज लागवडीत आहेत. बौद्धकाळातील धर्मग्रंथांवरून व सम्राट अशोकाच्या शिलालेखांवरून तक्षशीला आणि नालंदा या प्रचीन विद्यापीठांतील वैद्यकशिक्षण व व्यवसाय, तत्कालीन पशुरोगांची चिकित्सा, वृक्षारोपण इत्यादींची माहिती मिळते. महाभारतात अनेक परिचित वनस्पतींचा (उदा., पारिजातक, अशोक, शेवगा, कांदा, लसूण, जास्वंद, गाजर, खजूर इ.) उल्लेख आला असून आकारमान व रीती यांवरून वनस्पतींची वर्गवारी केलेली आढळते. वृक्षारोपण, उद्याननिर्मिती, वनस्पतींतील काही शरीरक्रिया व चैतन्य यांची माहिती आलेली आहे. कौटिलीय अर्थशास्त्रात शेतीच्या काही प्रक्रिया आणि मद्योत्पादनात उपयुक्त वनस्पतींची यादी दिली आहे. वात्स्यायनाचे कामसूत्र (इ. स. चौथे शतक) व बृहत्संहिता (इ. स. सहावे शतक) यांमध्ये कृषी व वास्तुशास्त्राच्या आनुषंगाने अनेक वनस्पतींची व फळे, भाज्या, मद्ये, पेये, धान्ये इत्यादींची माहिती मिळते. यातील ‘वृक्षायुर्वेद’ प्रकरण वृक्षांसंबंधी विविध प्रकारची माहिती पुरविते. याशिवाय ⇨आयुर्वेदासारख्या अत्यंत व्यावहारिक आणि महत्त्वाच्या ज्ञानशाखेत या दीर्घकालखंडात व पुढील काळात (मध्ययुग इ. स. दहावे ते पंधरावे शतक) झालेल्या प्रगतीत भारतीय जीवविज्ञानाच्या वाढीस उपयुक्त असे विपुल विज्ञान संकलित झाले. या काळातील शार्ङ्‌गधर हे प्रसिद्ध वैद्य असून त्यांनी मानवी शारीर, गर्भविज्ञान, रोगगणना, औषधांचे गुणधर्म, परिणाम, पदार्थविज्ञान वगैरे वैद्यक विषयांशी संलग्न असे अनेक पोटविषय तपशीलवार दिले आहेत. शार्ङ्‌गधरानंतर फारशी प्रगती झाली नाही. मात्र आधुनिक वनस्पतिविज्ञानाची पंधराव्या शतकानंतर यूरोपात जी प्रगती झाली त्या धर्तीवर सर्व जीवविज्ञानाची भारतात आलेल्या अनेक यूरोपीय शास्त्रज्ञांच्या प्रयत्नाने होऊ लागली. यामध्ये ⇨ शास्त्रीय उद्याने, प्राणिसंग्रहालये, वनस्पतिसंग्रहालये, संशोधन संस्था, प्राणी व वनस्पती सर्वेक्षण संस्था इत्यादींचा अंतर्भाव होतो.

प्रबोधन : इटलीत चौदाव्या शतकात सुरू होऊन तेथील संस्कृतीत अंतर्भूत असलेल्या व शिक्षणाच्या पुनरुज्जीवनासोबतच्या एका सामान्य घटनेचे हे नाव आहे. आपल्या कलेच्या क्षेत्रात वास्तवाचे प्रत्यंतर आणण्यास कलाकारांना प्राणी व मनुष्य यांच्यासंबंधी वस्तुनिष्ठ ज्ञान मिळविणे आवश्यक वाटले त्यामुळे त्यांनी शवविच्छेदनाचा आग्रह धरला होता यांचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे सुप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा व्हींची त्यांनी १४००–१५०० या काळात मनुष्याच्या आकृतीचा उत्कृष्ट अभ्यास केला त्यातील काही तपशील पुढे १०० वर्षांपर्यंत इतरांना आकलन झाले नाहीत. घोडा आणि मनुष्य यांतील वरवरचे फरक स्पष्ट असूनही त्यांची हाडे व सांगाडे यांच्या मांडणीतील मूलभूत साम्य (रचनासादृश्य) दर्शविणारे तेच सर्वप्रथम होते. सर्वसाधारणपणे बाहेरून अनेक फरक दर्शविणाऱ्या प्राण्यांच्या गटांची निश्चित एकके बनविण्यास रचनासादृश्याची संकल्पना इतकी महत्त्वाची होती की, तिची पुढे क्रमविकासाच्या अभ्यासाला फार मदत झाली. सोळाव्या शतकातील जीवविज्ञानाच्या प्रगतीवर परिणामकारक प्रभाव पाडणारे इतर काही घटक होते त्यांमध्ये या शतकाच्या मध्यास आलेली मुद्रणाची सोय, कागदाची वाढती उपलब्धता व लाकडावरील कोरीव आकृती करण्याची कला हे विशेष होते. यामुळे निरीक्षणाचा व संशोधनाचा सचित्र ठसा कागदावर उमटविता आला. १४५३ च्या सुमारास कित्येक ग्रीक विद्वान पश्चिमेत आले आणि त्यामुळे तेथील विद्वानांना प्राचीन शास्त्रीय ग्रंथांचा अरबी भाषांतरापेक्षा प्रत्यक्ष संपर्क मिळणे सुलभ झाले. १५३० मध्ये ओटो ब्रुनफेल्स या जर्मन पुरोहित वनस्पतिशास्त्रज्ञांनी औषधी वनस्पतींसंबंधी एक ग्रंथ प्रसिद्ध केला (Herberum vivae eicones). यातील नवीन चित्रे स्पष्ट असल्याने जुन्या नकलांपेक्षा श्रेठ दर्जाची होती. हायरऑनिमस बॉक आणि लेओनहार्ट फुक्स यांनीही वर्णनात्मक व सचित्र अशी सामान्य रानटी फुलझाडांसंबंधी काही पुस्तके इ.स. १५०० च्या मध्यास प्रसिद्ध केली. या तिघांना वनस्पतिविज्ञानाचे जनक म्हणतात (ॲरिस्टॉटल यांनीही हीच उपाधी लावलेली आढळते). आधुनिक पादपजातीय ग्रंथांची (विशिष्ट क्षेत्रातील किंवा काळातील वनस्पतींच्या यादीची वा वर्णनात्मक ग्रंथांची) वरील पुस्तके अग्रदूत होती असे मानतात. याशिवाय (संपूर्ण सोळाव्या शतकात) नेदर्लंड्स, स्वित्झर्लंड, इटली व फ्रान्स या देशांत वनस्पती वैज्ञानिक अभ्यासाचे कार्य सुरू होते. जुन्या वनस्पतिविषयक काही ग्रंथांत (हर्बल्स) वनस्पतींचे क्षुप (झुडूप), वृक्ष अथवा वनस्पती (ओषधी) हे तीन स्वरूप-प्रकार मानून त्यांची वर्णने दिली होती नंतरच्या अनेक ग्रंथांतही अकारविल्हे याद्या वा कोणत्यातरी प्रकारे त्यांची मांडणी केलेली आढळते परंतु या काळात त्यांच्या वर्गीकरणात सुधारणा केली गेली तसेच दिवसेंदिवस अधिकाधिक वर्णनीय वनस्पती जमविल्या जाऊ लागल्याने त्या सर्वांची पद्धतशीर मांडणी करण्याकरिता त्यांना नावे देणे अटळ झाले. याकरिता सोळाव्या शतकाच्या शेवटी व सतराव्या आरंभीच्या काळातील गास्पार बोअँ या स्विस शास्त्रज्ञांनी आधुनिक द्विपद नामकरणासारखी पद्धत अंमलात आणली. सामान्य वंशवाचक नावांनी वनस्पतीतील आप्तभाव दर्शविले जात होते परंतु बोअँ यांनी वंशातील जातींमध्ये अभिप्रेत असलेला नातेसंबंधाचा अंदाज व्यक्त केला नाही. प्येअर बलाँ ह्या फ्रेंच शास्त्रज्ञांनी मध्य पूर्वेत भरपूर प्रवास करून तेथील वनस्पतींचा अभ्यास केला त्यासंबंधी त्यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांपैकी एकात फक्त वृक्ष आणि दुसऱ्यात उद्यानविज्ञान वर्णिले आहेत माशांसंबंधीच्या दोन पुस्तकांत तत्कालीन वर्गीकरणाची स्थिती दिली असून त्यात मासे आणि इतर जलचरांचीही नोंद आहे (उदा., काही स्तनी प्राणी, कवचधारी, मृदुकाय, कृमी इ.). त्यांच्या पक्ष्यांविषयीच्या ग्रंथातील वर्गीकरण मात्र जवळजवळ आजच्या सारखेच आहे त्यांचा तुलनादर्शक शारीरावरचा (विशेषतः कंकालांचा म्हणजे सांगाड्यांचा) व्यासंग चांगला होता त्यांनीची सर्वप्रथम पक्ष्याचा व माणसाचा सांगडा परस्परांशेजारी दाखवून त्यांतील रचनासादृश्य विशद केले. याखेरीज इतर अनेक यूरोपीय निसर्गशास्त्रज्ञांनी खूप प्रवास करून अनेक विदेशी वनस्पती व प्राणी यांची माहिती संकलित केली व प्रवासवर्णनेही लिहिली. विद्यापीठांतून ⇨शास्त्रीय उद्यानांची व्यवस्था आणि वनस्पतींचे सुके नमुने ठेवण्याची संग्रहालये बनविली [→ वनस्पतिसंग्रह]. सोळाव्या शतकातील वनस्पतिविज्ञानातील विकास प्राणिविज्ञानापेक्षा अधिक झाला. ती उणीव भरून काढण्यास जीववैज्ञानिकांचा एक मोठा गट पुढे आला व त्यामध्ये कोनराट गेस्नर (स्विस निसर्गशास्त्रज्ञ) हे प्रमुख होते त्यांनी विश्वकोश रचनेचे कार्य सुरू केले. गेस्नर यांनी उत्कृष्ट आकृत्यांसह प्राण्यांसंबंधी अनेक पुस्तके लिहिली परंतु ह्यांतील अनेक वर्णने सदोष असल्याने प्राण्यांच्या व प्राणिविज्ञानाच्या ज्ञानात फारशी नवीन भर पडली नाही.


सोळाव्या शतकानंतरची प्रगती : शारीरासंबंधी शास्त्रशुद्ध अभ्यासाची सुरुवात वनस्पतिविज्ञानाप्रमाणेच प्रबोधन काळातील कला व मुद्रणतंत्र यांपासूनच झाली. लिओनार्दो दा व्हींची यांनी मृत मानवी शरीरावरून शारीरविषयक ज्ञान मिळविले तरी त्यांच्या समकालिनांना त्याची दाद नव्हती. त्याऐवजी बेल्जियम शारीरविज्ञ अँड्रिअस व्हिसेलिअस यांना शारीरशास्त्राचे पितामह म्हणवून घेण्याचा मान मिळाला. ते लुव्हेन व पॅरिस येथील संस्थांत शिकून तेथेच यशस्वी शिक्षक झाले गेलेन यांच्या कार्याशी ते पूर्ण परिचित होते वरिष्ठांशी मतभेद झाल्यामुळे १५३७ च्या शेवटी ते पादुआ येथे गेले. तेथे त्यांनी अध्यापन पद्धतीत फार दूरगामी सुधारणा केल्या. स्वतः शवविच्छेदन करून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी विद्यार्थ्यांस तो विषय शिकविला तत्पूर्वी विच्छेदन साहाय्यकाकरवी होत असे. त्यांचा मानवी शरीराच्या अंतर्रचनेसंबंधीचा ग्रंथ (१५४३) हा पहिला आधुनिक आणि म्हणून जीवविज्ञानाला पायाभूत असा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ होता. चिकित्सक प्रचितीनंतरच कोणतेही वर्णन स्वीकारण्याचा बहुमोल सल्ला त्यांनी तरुण शास्त्रज्ञांना दिला ही त्यांची सर्वोत्तम देणगी समजतात. याच वेळी मायकेल सर्व्हीटस (स्पॅनिश पुरोहित व वैद्य) यांनी रुधिराभिसरणाच्या संदर्भात असे दाखविले की, रक्ताचा प्रवाह हृदयाच्या उजव्या कप्प्यातून फुप्फुसाकडे जातो (हृदयातील मध्यवर्ती पडद्यातून जात नाही). सतराव्या शतकातील जीववैज्ञानिक संशोधनाला चालना देणाऱ्या प्रमुख गोष्टींत शास्त्रीय मंडळांच्या स्थापनेची गणना करावी लागते [→ वनस्पतिवैज्ञानिक संस्था आणि संघटना प्राणिवैज्ञानिक संस्था व संघटना]. त्यांतील प्रमुख उद्देश सूक्ष्मदर्शकातून होणाऱ्या गौप्य स्फोटाची (पूर्वीपासून गूढ राहिलेली पण दिवसेंदिवस ज्ञात होणारी सृष्टीतील जीवांविषयीची) माहिती सर्वांस मिळावी. या उपक्रमामुळे अनेक तथाकथित अदृश्य गोष्टींचा शोध लागून त्यांची माहिती सर्वांस झाल्याने जीव विज्ञानाच्या प्रगतीवर दूरगामी परिणाम झाला. सतराव्या व अठराव्या अशा दोन्ही शतकांत अधिकाधिक कार्य शरीरवर्णन, वर्गीकरण आणि नामकरण या क्षेत्रांतच झाले. मनुष्यासह सर्व जीवांच्या तुलनादर्शक अभ्यासाचे महत्त्व कळून आले. अठराव्या शतकात निर्जीवापासून (जडापासून) सजीव (चेतन) अथवा अजीवजनन ही फार जुनी उपपत्ती खोटी ठरू लागली आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास लूई पाश्चर यांच्या संशोधनानंतर तिची जागा ‘जीवजनना’ने (विद्यमान जीवांपासून होणाऱ्या नवीन जीवांच्या निर्मितीने) घेतली. जीववैज्ञानिक सफरी व सहली मोठ्या प्रमाणावर सुरू होऊन अनेक नवीन वनस्पती व प्राणी जमा करणे व त्यांच्यासंबंधी विविध माहितीचा प्रसार करणे हे सुरू झाले व त्याची चरमावस्था म्हणजे क्रमविकासाच्या सिद्धांताची स्थापना. एकोणिसावे शतक जीवविज्ञानाचा प्रचंड प्रगती करणारे ठरले कोशिका-सिद्धांत, आधुनिक गर्भविज्ञानाचा पाया व अनुहरणाचे नियम त्याच शतकातले महत्त्वाचे संशोधन होय.

ॲरिस्टॉटल व गेलेन यांच्या संकल्पनेप्रमाणे हृदयाच्या प्रसरणात रक्तप्रवाह बाहेरून शोषला जातो व हृदयाच्या संकोचनात ते बाहेर खेचले जाते हृदयाच्या दोन कप्प्यांतील रक्त छिद्रांद्वारे एकातून दुसऱ्यात जाते हृदयातून जैव उष्णता निघते व फुप्फुसातील हवेने तिच्यात फरक पडतो. परंतु विल्यम हार्वे (व्हिसेलिअस यांच्या विद्यार्थ्याचे सहाध्यायी व इंग्रज शास्त्रज्ञ) यांच्या रुधिराभिसरणाच्या शोधामुळे वरील संकल्पनेत बराच फरक पडला. हार्वे यांनी सिद्ध केले की, हृदयाच्या क्रियाशीलतेने ते संकोचते परंतु परत भरण्यामुळे आपोआप फुगते, हृदयात नीलेद्वारे रक्त जमते याचा अर्थ कोठेतरी रोहिणी आणि नीला यांमध्ये रक्ताची देवघेव होत असावी ती केशवाहिन्यांतर्फे होते हे पुढे एक शतकानंतर सिद्ध झाले. सर्व प्राण्यांच्या विकासात ते एकदा सूक्ष्म अंड्याच्या स्वरूपात (अवस्थेच) असतात, त्या वेळी ती अवस्था अप्रभेदित जिवंत पुंज (जीवद्रव्य) असते, असा निष्कर्षही हार्वे यांनी गर्भविज्ञानाच्या अभ्यासातून काढला होता.

सतराव्या शतकातील शोधांमुळे आधुनिक कृषी व पशुसुधारणा यांत बरीच भर पडली या शोधांत स्टीव्हेन हेल्स यांचे ⇨प्रकाशसंश्लेषण  आणि जेथ्रो टूल यांचे पिकाची निपज करण्याकरिता जमीन सुधारणा यांचा अंतर्भाव होतो. एकोणिसाव्या शतकातील इव्हान मिच्युरिन या रशियातील शास्त्रज्ञांच्या कार्याचा उल्लेख येथे करणे आवश्यक आहे. त्यांनी क्रियाविज्ञानाच्या आणि उद्यानविद्येच्या क्षेत्रातील काही नवीन माहिती प्रत्यक्ष वापरात आणली त्यामुळे नवीन हवामानाशी समरस होणारी अशी नवी पिके काढता येऊ लागली व त्यामुळे जगभर अन्ननिर्मितीचा मोठा विस्तार होण्याचा प्रारंभ झाला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत वर्गीकरणाच्या बाबतीत गोंधळच होता. परंतु कार्ल लिनीअस यांनी कृत्रिम पद्धतीचे वर्गीकरण व द्विनामपद्धती सुरू केली व पुढे अनेकांनी सुधारित व नैसर्गिक वर्गीकरणाच्या पद्धती अंमलात आणून आज उपलब्ध असलेली वर्गीकरणविज्ञानाची शाखा प्रस्थापित केली [→ वनस्पतिनामपद्धति वनस्पतींचे वर्गीकरण प्राणिनामपद्धति प्राण्यांचे वर्गीकरण वर्गीकरणविज्ञान]. याचप्रमाणे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास टॉमस हक्स्ली यांनी जीवविज्ञानाच्या अध्यपनात सुधारणा घडवून आणली प्राणी व वनस्पती यांच्या प्रत्येक गटातील प्रतिनिधिक अशा जीवाच्या आधारे तो गट शिकविण्याचे नवीन धोरण त्यांनी पुरस्कृत केले त्यातही अनेक सुधारणा होत जाऊन आजच्या अधिक कार्यक्षम पद्धती विकास पावल्या आहेत.

क्रमविकास  आणि ⇨आनुवंशिकी  यासंबंधीच्या उपलब्ध झालेल्या नवीन ज्ञानामुळे जीवविज्ञानाने मनुष्याच्या तत्त्वज्ञानविकासात फार मोठी भर टाकली आहे. त्यामध्ये अठराव्या व एकोणिसाव्या शतकांतील ⇨लामार्क (१७४४–१८२९) व ⇨चार्ल्‌स डार्विन (१८०९–८२) यांचा प्रमुख वाटा आहे. सृष्टीत बदल होत जातो ही कल्पना डार्विन यांच्या काळात अपिरिचित आणि अनपेक्षित होती परंतु ती एकदा स्वीकारल्यानंतर खऱ्या लोकशाहीचे स्वागत करण्यास तिचा फार उपयोग झाला, कारण सामाजिक गतिशीलतेवर लोकशाही बव्हंशी अवलंबून असते. यानंतरच्या प्रगतीचा टप्पा म्हणजे विसाव्या शतकाच्या आरंभी ⇨ग्रेगोर मेंडेल (१८२२–८४) यांच्या आनुवंशिकतेच्या नियमांचा पुन्हा (१९००) लागलेला शोध आणि ⇨टॉमस हंट मॉर्गन  यांचा ‘गुणसूत्र सिद्धांत’ हा होय. या दोन्हीमुळे क्रमविकास कसा घडून येतो (यंत्रणा व पद्घती) यांसंबंधी पुढील निश्चित माहिती उपलब्ध झाली : व्यक्तीतील भिन्नता लक्षणांना जबाबदार असलेले घटक निश्चित प्रकारची रासायनिक एकके असून त्याचे वास्तव्य कोशिकांच्या प्रकलातील (कोशिकेच्या कार्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजातील) गुणसूत्रांवर निश्चित स्थानांवर असते व ती एकके [→ जीन] प्रजोत्पादक कोशिकांद्वारे संततीत बहुधा न बदलता स्वतंत्रपणे उतरतात ती व्यक्तीच्या विकासात भिन्न लक्षणांच्या रूपाने व्यक्त होतात ह्या प्रक्रियेत कधीकधी जुनकांचे (जीनाचे) पुनःसंयोजन किंवा लोप व गुणसूत्रांत होणारे काही बदल [→ कोशिका आनुवंशिकी] यांमुळे नवीन संततीत लहान मोठे भेद [→ उत्परिवर्तन] निर्माण झालेले दिसतात व ते पिढ्यान्‌पिढ्या चालू राहतात तसेच काही लक्षणे संततीत ज्या विशिष्ट नियमान्वये उतरतात त्यांना आधारभूत अशीच यंत्रणा गुणसूत्रात असते.

जीवांच्या संततीत दिसून येणारी उत्परिवर्तने (अचानक घडून येणारे बदल) आंतरिक जैव कारणांनीच उगम पावतात असे नसून क्ष-किरण किंवा इतर भौतिक व कृत्रिम उपायांनी घडवून आणता येतात असे एच्. जी. म्यूलर यांनी दाखवून दिले, ही त्यापुढची पायरी होय. अशा मानवी प्रयत्नांनी आनुवंशिकतेवर नियंत्रण घालता येते. या शोधामुळे गुणसूत्रांच्या अधिक संशोधनाला चालना मिळाली. विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धात लाइनस पॉलिंग (१९४९) यांनी मांडलेली प्रथिन-रेणूंची संरचना व वॉटसन आणि क्रिक यांनी (१९५३) प्रतिपादन केलेली गुणसूत्रांतील ⇨न्यूक्लिइक अम्लांची (प्रकली अम्लांची) संरचना ह्या महत्त्वाच्या शोधांमुळे आनुवंशिकतेची यंत्रणा अधिकच स्पष्ट झाली आहे [→ कोशिका आनुवंशिकी]. मनुष्याच्या रक्तातील प्रतिजनांवर (असे कोणतेही विष, सूक्ष्मजंतू वा इतर वनस्पतिजन्य किंवा प्राणिजन्य पदार्थ की जे शरीरात शिरले असता प्रतिपिंडे निर्माण होतात त्यांवर) परिणाम करणाऱ्या विकल्पांच्या महत्त्वाच्या श्रेणीसंबंधी आर्. सँगर व इतर शास्त्रज्ञांनी (१९६२) संशोधन केले आहे. एफ्. सँगर यांनी (१९५४) इन्शुलिनाच्या (मधुमेहावरील महत्त्वाच्या हॉर्मोनाच्या) रेणूची संरचना विशद केली प्रथिनाची विशद केलेली संपूर्ण संरचना अशी ही पहिलीच होय या संशोधनानंतर इतर प्रथिनांच्या संरचनेच्या संशोधनास चालना मिळाली. आनुवंशिकतेच्या बाबतीत एका कोशिकेतून दुसऱ्या कोशिकेत जाणाऱ्या जननिक माहितीसंबंधीची (सांकेतिक संहितेसंबंधीची) बरीच माहिती एम्. डब्ल्यू. निरेनबर्ग व जे. एच्. मथाई यांनी (१९६१) उपलब्ध केली आहे. ए. कोर्नबर्ग आणि एस्. ओचोआ यांनी तर आनुवंशिकतेच्या दृष्टीने महत्त्वाची अशी डीएनए व आरएनए ही न्यूक्लिइक अम्ले प्रयोगशाळेत (१९५५–५७) यशस्वी रीतीने निर्माण केली आहेत. भारतीय शास्त्रज्ञ ⇨हरगोविंद खोराना  यांनी या न्यूक्लिइक अम्लांचे संश्लेषण, जुनकांची निर्मिती व रेणवीय जीवविज्ञान या क्षेत्रांत महत्त्वाचे संशोधन केले आहे. पहिले मानवनिर्मित जनुक त्यांनी बनविले आहे. अशा रीतीने जीवविज्ञानातील आनुवंशिकतेच्या क्षेत्रातील अलीकडच्या संशोधनामुळे जीवांच्या विविध लक्षणांत इच्छेप्रमाणे बदल घडवून आणण्याचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे दिसत आहेत. जीवद्रव्याबद्दल संपूर्ण ज्ञान मिळविण्याचे जीवविज्ञानाचे साध्यही फार दूर नाही असे वाटते.

पहा : अवकाशविज्ञान आकारविज्ञान आनुवंशिकी कोशिका जीवद्रव्य जीवभौतिकी जीवरसायनशास्त्र जीवसांख्यिकी जीवोत्पत्ति परिस्थितिविज्ञान पुराजीवविज्ञान प्राणिविज्ञान रेणवीय जीवविज्ञान वनस्पतिविज्ञान शरीरक्रियाविज्ञान शारीर शारीर, तुलनात्मक सूक्ष्मजीवविज्ञान.

संदर्भ : 1. Core, E. L. Strausbaugh, P. O. Weimer, B. R. General Biology, New York, 1961.

        2. Hickman, C. P. Integral Principles of Zoology, Tokyo, 1966.

        3. Whaley, W. G. and Others Principles of Biology, New York, 1964.

        ४. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.

परांडेकर, शं. आ.