आवाज – जोपासना आणि वर्गीकरण : ‘आवाज’ हा शब्द ह्या लेखात केवळ ‘संगीतोपयोगी आवाज’ एवढ्याच मर्यादित अर्थाने वापरण्यात आलेला आहे. दीर्घ परंपरा असलेल्या संगीतपद्धतींमध्ये मानवी आवाजाचा संगीतदृष्ट्या कमीअधिक विचार झालेला आढळतो. भारतीय संगीतपरंपरा ह्यास अपवाद नसली, तरी आवाजाच्या जोपासनेसंबंधीचा औपपत्तिका स्वरूपाचा विचार मात्र संगीतातील कोणत्याही घराण्यात झालेला दिसत नाही. त्या मानाने पाहता पश्चिमी संगीतकारांनी ह्या विषयाकडे अधिक शास्त्रीय दृष्टिकोनातून लक्ष पुरविल्याचे दिसून येते. पश्चिमी देशांत रूढ असलेली धर्मसंगीताच्या सांघिक गायनाची परंपरा हे ह्याचे एक प्रमुख कारण असावे. उदा., संघगायनात एकाच वेळी अनेक जातींचे आवाज गाते राहत असल्यामुळे आवाजाच्या विविध जाती, त्यांचे पल्ले, त्यांच्या मर्यादा, त्यांचे स्वररंग इ. बाबींच्या आधारे त्यांचे वर्गीकरण करणे अटळ झाले आणि त्यातून आवाजविज्ञानातील (व्हॉइस सायन्स) आवाजजोपासनाशास्त्र (व्हॉइस-कल्चर) हा एक महत्त्वाचा भाग विकसित झाला. आवाजविज्ञानाच्या विकासामागे संगीतविषयक जाणीव ही एक महत्त्वाची प्रेरणा असली, तरी आवाजजोपासना-शास्त्राच्या मर्यादा संगीताच्या प्रांतापलीकडेही पसरलेल्या आहेत. आवाजनिर्मिती करणाऱ्या शरीरांगांचे निर्दोष उपयोजन आणि तत्संबंधीचे नियम हा या शास्त्राचा प्रधान विषय असल्यामुळे जेथे आवाजाच्या जोपासनेची आवश्यकता आहे, अशा कोणत्याही जीवनांगात हे शास्त्र उपकारक ठरू शकेल. ह्या शास्त्राच्या महत्त्वाच्या नियमांचे सर्वसाधारण स्वरूप संगीताच्या संदर्भात स्पष्ट करण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
केवळ आवाजोत्पादन हे नैसर्गिकपणेच स्वरयंत्राद्वारे होत असते. त्या आवाजाचा घुमारा, दीर्घता इ. बाबी इतर शरीरांगांवर अवलंबून असतात. निसर्गत:च लाभलेल्या आवाजाची एका विवक्षित दिशेने आणि हेतून जोपासना करण्यासाठी आवाज-जोपासनाशास्त्राचा उपयोग होत असतो. स्वरयंत्रादी शरीरांगे मुळातच सदोष असलेल्या व्यक्तीला ह्या शास्त्राचा उपयोग होण्याची शक्यता नाही. तथापि ह्या बाबतीत निर्दोष असलेल्या व्यक्तीच्या नैसर्गिक आवाजाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्याला योग्य वळण लावण्याच्या दृष्टीने आवाजसंबद्ध शरीरांगांचे उपयोजन कसे करावे, हे ठरविता येते.
कोणत्याही शारीरिक क्रियेला कारक आणि विरोधी असे स्नायू वा स्नायुगट शरीरात असतात. तसेच कोणतीही क्रिया घडविण्यासाठी तिला कारक असलेले स्नायू तणावपूर्ण अवस्थेत व विरोधी असलेले स्नायू तणावमुक्त अवस्थेत असावे लागतात. कारक आणि विरोधी स्नायू एकाच वेळी तणावपूर्ण अवस्थेत असल्यास आवश्यक ती क्रिया घडूच शकत नाही, हे शारीरक्रियाविज्ञानातील मूलतत्त्व आवाजालाही लागू आहे. अर्थातच विवक्षित आवाजोत्पादनासाठी कारक आणि विरोधी असणाऱ्या स्नायूंच्या तणावांचे यथायोग्य सहसंयोजन साधणे आवश्यक ठरते. हे सहसंयोजन शक्य व्हावे, यासाठी आवाजाची जोपासना करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला स्वत:च्या स्नायूंवर नियंत्रण कसे ठेवावे आणि हवे ते स्नायू हवे तेव्हा तणावपूर्ण किंवा तणावमुक्त कसे करावेत, ह्याचे मार्गदर्शन आवाजजोपासनाशास्त्र करते.
आवाजजोपासनेच्या संदर्भात श्वसनाचे महत्त्व शास्त्राने मोठे मानले आहे. आवाजाची गोलाई आणि गाज मुख्यत: श्वसनावर अवलंबून असल्यामुळे श्वसनात कोणत्या स्नायूंचा अडथळा येऊ शकतो आणि तो टाळून आवाज संस्कारण्याच्या दृष्टीने श्वसनाची कोणती पद्धत यथायोग्य ठरू शकेल, ह्याचाही विचार आवाजजोपासनाशास्त्राला अभिप्रेत आहे.
कर्कशता टाळून आवाज उंच नेणे आणि तो खाली आणल्यानंतरही घोगरा होऊ न देणे, हे स्वरयंत्रातील विशिष्ट स्नायुगटांच्या योग्य उपयोगावर अवलंबून असते. वरचे आणि खालचे अशी मानवी आवाजाची दोन रजिस्टर्स असल्याचे आता बहुमान्य झाले आहे. आवाजाच्या उच्चतेच्या प्रमाणानुसार ह्यांपैकी एक स्नायुगट व नीचतेच्या प्रमाणानुसार दुसरा स्नायुगट अधिक कार्यप्रवृत्त असतो.
बसण्याउठण्याच्या क्रियांचाही आवाजावर इष्टानिष्ट परिणाम होत असल्यामुळे ह्या क्रिया कोणत्या प्रकारे उपकारक ठरतील, ह्याचेही विवेचन ह्या शास्त्रात आढळते.
आवाज-वर्गीकरण : संघगायनाची, त्याचप्रमाणे एकाच वेळी अनेक आवाज गाते असण्याची पद्धती पाश्चात्य संगीतात रूढ असल्यामुळे विविध आवाजांचे पल्ले, त्यांच्या मर्यादा व त्यांचे स्वररंग लक्षात घेऊन आवाजाचे वर्गीकरण त्यानुसार करण्यात आले आहे. पाश्चात्य संगीतात आरंभस्वर कोणताही असू शकतो पण त्यांचा संप्तकारंभी स्वर ‘सी’ असून त्याचे नादमूल्य निश्चित व कायम असल्याने या स्वराच्या संदर्भात सर्व आवाजांचे पल्ले ठरविण्यात येतात. त्यामुळे आवाजांचे वर्गीकरण स्वाभाविक रीत्या प्रचारात आले आहे. भारतीय संगीताच्या संदर्भात आवाजाच्या जाती (बसका, रुंद, पातळ) काहीही असल्या, तरी पेटीवरील पांढरी एक पासून पांढरी सहा-सात इ. पट्ट्यांपर्यंत पट्ट्यांच्या भाषेत त्या त्या आवाजाचा आरंभस्वर ठरविण्यात येत असल्याने, आवाजाचे वर्गीकरण पाश्चात्यांच्या अर्थाने होत नाही. पाश्चात्यांचे आवाज-वर्गीकरण पुढीलप्रमाणे:
बेस : मध्य ‘सी’च्या खालील पहिल्या ‘डी’ या स्वरापासून प्रारंभ केल्यास एक सप्तक खाली व एक सप्तक वर असा या आवाजाचा पल्ला असतो.
बरिटोन : मध्य ‘सी’च्या खालील पहिल्या ‘एफ्’ या स्वरापासून प्रारंभ केल्यास एक सप्तक खाली व एक सप्तक वर.
टेनर : मध्य ‘सी’च्या खालील पहिल्या ‘ए’ या स्वरापासून आरंभ केल्यास एक सप्तक खाली व एक सप्तक वर.
कॉन्ट्राल्टो : मध्य ‘सी’च्या वरील पहिल्या ‘ई’ स्वरापासून प्रारंभ केल्यास एक सप्तक वर व खाली.
मेझोसोप्रानो: मध्य ‘सी’च्या वरील पहिल्या ‘जी’ स्वरापासून प्रारंभ केल्यास एक सप्तक वर व खाली.
सोप्रानो : मध्य ‘सी’च्या वरील पहिल्या ‘बी’ स्वरापासून प्रारंभ केल्यास एक सप्तक वर व खाली.
पियानो या वाद्यानुसार हे आवाजाचे पल्ले वर निश्चित केले आहेत. पियानोवर ताडून पाहिल्यास ‘सी’च्या वर म्हणजे उजव्या हातास व खाली म्हणजे डाव्या हातास हे स्पष्ट होईल. ही वर्गीकरणे अगदी काटेकोर नाहीत, ही गोष्ट अर्थातच गृहीत धरली पाहिजे.
संदर्भ: 1. Behnke, Emil, The Mechanism of the Human Voice, 1880.
2. Klein, J.J. Schjeide, O.A. Singing Technique, How to Avoid Vocal Trouble, New Jersey, 1967.
3. Stanley, D. The Science of Voice, New York, 1948.
रानडे, अशोक