आल्ड्रोव्हांडी, ऊलीसे : (११ सप्टेंबर १५२२–४ मे १६०५). इटालियन प्रकृतिवैज्ञानिक. प्रकृतिविज्ञान व प्राणिजीवन यांसंबंधीच्या लेखनाकरिता विशेष प्रसिद्ध. बोलोन्या येथे त्यांचा जन्म झाला. १५५३ मध्ये त्यांनी वैद्यकाची डॉक्टरेट संपादन केली आणि नंतर वनस्पतिविज्ञानाचा अभ्यास केला. १५६० मध्ये बोलोन्या येथे ते वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक झाले. त्या काळात इटलीत प्रकृतिविज्ञानाची उपेक्षा होत होती आल्ड्रोव्हांडी यांनी प्रकृतिविज्ञानातील सर्व विषयांवर विपुल लेखन करून लोकांत या विज्ञानाविषयी जिज्ञासा उत्पन्न केली. बोलोन्याला वनस्पति-उद्यानाची स्थापना करून ते त्याचे पहिले संचालक झाले. औषधे आणि औषधनिर्मितीचे निरीक्षक म्हणूनही त्यांची नेमणूक झाली होती. सुप्रसिद्ध ‘बोलोन्या म्युझियम’ त्यांनीच स्थापन केले. हल्लीची वनस्पतिसंग्रहाची शास्त्रीय पद्धती त्यांनीच प्रथम सुरू केली. खूप प्रवास करून त्यांनी प्राण्यांचे व वनस्पतींचे नमुने जमविले आणि जगातील प्राणिजीवनावर ग्रंथ लिहिण्याचे महत्कार्य हाती घेतले. त्यांच्या हयातीत या प्रचंड ग्रंथाचे चार खंड– तीन पक्षिविज्ञानावर व एक मॉलस्कावर (मृदुकाय प्राण्यांवर)– प्रसिद्ध झाले. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या शिष्यांनी व मित्रांनी त्यांच्या हस्तलिखितांवरून उरलेले दहा खंड प्रसिद्ध केले. ते बोलोन्या येथे मरण पावले.

जमदाडे, ज. वि.