दोरा–२ : दोन वा अधिक सुते (धागे) एकत्र करून त्यांस पीळ देऊन दोरा तयार करतात. सामान्यतः तीन सुते एकत्र करून पिळून नेहमीचा दोरा तयार करतात. याला तीनपदरी दोरा असे म्हणतात. असे दोन वा अधिक दोरे एकत्रित करून पिळून सहापदरी, नऊपदरी दोरे तयार करण्यात येतात. घरगुती व औद्योगिक शिवणकाम आणि विणकाम-भरतकाम यांसाठी दोऱ्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. तसेच दोऱ्याचा उपयोग आवेष्टन इत्यादींसाठीही करण्यात येतो. जास्त पीळ दिलेला दोरा विणकामासाठी व कमी पीळ दिलेला दोरा भरतकामासाठी वापरतात. कापूस, रेशीम, लिनन (फ्लॅक्स) इ. नैसर्गिक सुतांपासून आणि रेयॉन, डेक्रॉन इ. कृत्रिम (मानवनिर्मित) सुतांपासून दोरा तयार करतात.

इतिहास : पुरातत्त्ववेत्त्यांच्या मतानुसार सु. २५ हजार वर्षांपूर्वी गुहांमध्ये राहणाऱ्या आदिमानवाने प्राण्याच्या कातड्यापासून पहिला दोरा तयार केला. अशा दोऱ्याचा उपयोग त्याने हाडाच्या सुईच्या साहाय्याने दोन कातडी शिवण्यासाठी केला. याच सुमारास उष्ण कटिबंधात राहणाऱ्या आदिमानवाने सालीतील तंतूंचा उपयोग दोरा तयार करण्यासाठी केला. हे दोरे पीळ न दिलेले होते. पीळ दिलेले तंतू टिकण्यास उत्तम असतात, असे आढळून आल्यामुळे आदिमानवाने वरील प्रकारच्या तंतूंना पीळ देऊन दोरा तयार केला. सु. २५ शतकांपूर्वी आदिमानवाने दोन वा अधिक तंतू एकत्र करून त्यांना पीळ देऊन दोरा तयार केला, याच मूलभूत क्रिया वापरून हल्लीही दोरा तयार करण्यात येतो. यानंतर दोरा तयार करण्यासाठी लिननचा आणि त्यानंतर कापसाचा व रेशमाचा वापर करण्यात आला. कृत्रिम तंतूंच्या शोधानंतर त्यांचाही उपयोग दोरा तयार करण्यासाठी करण्यात येऊ लागला. तथापि कापसाचा दोराच जास्त प्रमाणात वापरला जातो. लिननचा दोरा जरी बळकट असला, तरी त्याचा वापर कमी झाला आहे. तलम कापडांच्या शिवणकामासाठी रेशमी दोरा वापरण्यात येतो. लोकरीचा उपयोग दोऱ्यासाठी हल्ली करीत नाहीत.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत दोरे हातांनीच तयार करीत असत. १८१२ मध्ये यांत्रिक पद्धतीने दोरा तयार करण्याचा पहिला कारखाना पेस्ली (स्कॉटलंड) येथे सुरू झाला. या कारखान्यात पीळ दिलेला तीनपदरी दोरा तयार करण्यात आला. १८५० मध्ये आयझाक सिंगर यांनी शिवणयंत्राचा शोध लावला. यामुळे जलद गतीने चालणाऱ्या यंत्रावर शिवताना टिकेल अशा दोऱ्याचा शोध लागला. त्याचबरोबर दोऱ्याच्या इतर गुणधर्मांकडे लक्ष वेधले जाऊन त्यांनुसार दोरे तयार करण्यात येऊ लागले. ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, जर्मनी हे देश दोरानिर्मितीत अग्रेसर आहेत.

निर्मिती : ज्याप्रमाणे कापसापासून सूत तयार करतात, त्याच क्रियांनुसार दोरा तयार करतात. कापूस स्वच्छ करून त्याचे तंतू मऊ होईपर्यंत विंचरतात. नंतर त्याचा यंत्राच्या साहाय्याने वातीसारखा सलग पेळू तयार करतात व त्यापासून सूत तयार करतात. अशा सुताचे तीन वा अधिक पदर एकत्र करून त्यांना पीळ देऊन दोरा तयार करतात. काही वेळा पेळूपासून योग्य जाडीचा दोरा तयार करतात. तयार झालेला दोरा प्रथम विरंजित (रंगहीन) करतात. मग त्यावर योग्य त्या क्रिया करून नंतर तो जरूर त्या रंगाने रंगवितात. ठराविक लांबीचा दोरा लाकडी वा कागदी रिळांच्या, लडीच्या अथवा गुंडीच्या स्वरूपात गुंडाळून विक्रीस पाठवितात.

रेशीम, नायलॉन, टेरिलीन, ऑरलॉन इत्यादींपासून कमी जाडीचा दोरा तयार करतात. यासाठी विंचरणे इ. क्रिया कराव्या लागत नाहीत. दोरा तयार झाल्यावर तो विरंजित करतात व नंतर रंगवितात.

दोऱ्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी तो तयार केल्यावर त्यावर बऱ्याच क्रिया करतात. ह्या क्रिया करताना त्यास संरक्षक आवरण देणे, शिलाईतील उठावदारपणा, बळकटपणा व चिवटपणा, शिवणयंत्रातील त्याचे सुलभ वहन, घर्षणरोध इ. गुणधर्म विचारात घ्यावे लागतात. सुतांना पीळ देऊन तयार झालेल्या दोऱ्याच्या पृष्ठभागावरील डोकावणारे तंतू जाळतात. त्यातील नको असलेला मेणचटपणा उच्च दाब व उच्च तापमानाच्या साहाय्याने घालवितात. दोरा पांढराशुभ्र करण्यासाठी त्याचे विरंजन करतात, तसेच टिनोपॉलसारख्या शुभ्रकारी पदार्थांचा वापर करतात. दोऱ्याची चकाकी वाढविण्यासाठी सु. १८% दाहक (कॉस्टिक) सोड्याच्या विद्रावाने कमी तापमानाला त्यावर विक्रिया करतात. यांमुळे दोऱ्याचा भरीवपणा व बळकटपणा वाढतो. काही वेळा दोरा विशिष्ट प्रकारच्या खळीतून नेतात, त्यामुळे दोऱ्याचे पदर सुटे होत नाहीत. याला ‘ग्लॅसे फिनिश दोरा’ असे म्हणतात. मऊ व कमी चिवट दोऱ्याला ‘सॉफ्ट फिनिश दोरा’ म्हणतात व तो शिलाईसाठी वापरला जातो.

जे. अँड पी. कोट्स या कंपनीने १९७० साली दोऱ्यावर द्रव अमोनियाची प्रक्रिया (प्रोग्रेड प्रक्रिया) करण्याची पद्धत शोधून काढली. या पद्धतीत द्रव अमोनियामध्ये ३–४ सेकंद दोरा धुतात. नंतर तो उकळत्या पाण्यात धुतला जातो आणि नंतर रिळावर ताणून गुंडाळतात व सुकवितात. या पद्धतीमुळे अतिशय बळकट, चकचकीत व भरीव असा दोरा बनतो. असा दोरा आकसत नाही व कापसाच्या इतर दोऱ्यांपेक्षा स्वस्त असतो.


गुणधर्म : हाताने करावयाच्या भरतकामासाठी कमी पिळाचे, कमी पदरांचे किंवा दोरीसारखे सलग असे रेशमाचे वा रेयॉनाचे दोरे वापरतात. तसेच हाताने करावयाच्या विणकामासाठी वापरावयाचा दोरा दोरीसारखा व कापसापासून तयार करतात.

शिलाईसाठी वापरावयाचा दोरा घट्ट पीळ दिलेला व दोन वा अधिक पदरी असतो. अशा दोऱ्याचा पीळ सर्वत्र सारखा असतो यामुळे दोऱ्याला गोल आकार येतो. ताण दिल्यास हालचाल सुलभ होईल व सुईच्या भोकातून सहज जाणारा, मुलायम असणारा, शिलाईच्या वेळी कमी घर्षण असणारा, शिवण तुटणार नाही अशा तऱ्हेने ताणला जाणारा तसेच धुताना व वापरताना शिलाई न सुटणारा असा शिवणकामाचा दोरा असणे आवश्यक असते.

विशिष्ट प्रसंगी वापरावयाच्या दोऱ्यांसाठी विशिष्ट क्रिया कराव्या लागतात. उदा., जलरोधी कापड शिवण्यासाठी जलरोधी दोराच वापरतात. असे दोरे तयार करण्यासाठी सूत काढल्यावर त्यावरच योग्य त्या क्रिया करतात आणि मगच त्या सुताचे दोरे तयार करतात. दोऱ्याचा आकार रिळावर वा गुंडीवर क्रमांकाने निर्देशित केलेला असतो. हा क्रमांक दोऱ्याच्या तलमपणावर अवलंबून असतो. हे क्रमांक ठरविण्याच्या पद्धतीत विविध देशांत फरक आढळून येतो.

रेशमी दोऱ्याचा व्यास फारच कमी असतो. तो बळकट असून जास्त ताण सहन करू शकतो. शिलाई करताना तो कायम स्वरूपात ताणता येतो. रेशमी व लोकरी कापड शिवण्यास तो वापरतात. हातांनी करावयाच्या काजांसाठी वापरावयाचा रेशमी दोरा बळकट, चमकदार व नेहमीच्या तिप्पट व्यासाचा असतो. काजांव्यतिरिक्त त्याचा उपयोग गुंड्या शिवण्यासाठी, भरतकामासाठी व नक्षीकामात करतात.

कापूस, लिनन, रेयॉन इत्यादींपासून तयार केलेल्या कापडांच्या शिलाईसाठी कापसाचा दोराच वापरतात कारण अशा कापडांप्रमाणेच दोराही आटतो (आकसतो) पण कृत्रिम तंतूंच्या कापडांसाठी त्याचा उपयोग होऊ शकत नाही कारण असे कापड आकसत नाही. कृत्रिम तंतूंच्या कापडांसाठी व न आटणाऱ्या वनस्पतिजन्य कापडांसाठी न आकसणाऱ्या दोऱ्याचा उपयोग करतात. अशा दोऱ्यांचा उपयोग यंत्राने विणलेल्या कापडाच्या शिलाईसाठीही करतात. तयार (रेडिमेड) कपड्यांच्या शिलाईमध्ये लिनन व रेयॉन यांचा जास्त प्रमाणात वापर होतो. भरतकामाचा दोरा मर्सरायझेशन केलेला [⟶ कापडावरील अंतिम संस्करण] असतो व त्यासाठी उंची कापूस वापरतात.

नायलॉन दोरा बळकट असून तो ताणून व मग सैल सोडल्यास मूळच्या स्थितीत येतो. हा दोरा शिलाईसाठी कठीण असतो व तो आकसत नाही. अशा दोऱ्याचा उपयोग ताणून विणण्यासाठी करतात. पॉलिएस्टर दोऱ्यांचे गुणधर्म व उपयोग नायलॉन दोऱ्याप्रमाणेच आहेत. ज्या ठिकाणी शिवण बाह्य वातावरणाला कायम उघड्यावर असते, अशा तंबूसारख्या कापडाच्या शिलाईसाठी पॉलिएस्टर अथवा ॲक्रिलिक दोरा वापरतात.

भारतीय उद्योग : दोरा तयार करण्याचा भारतातील पहिला कारखाना जे. अँड पी. कोट्स हा होय. १९७४ मध्ये भारतामध्ये एकूण ६८८ कारखान्यांत विविध प्रकारचा दोरा तयार करण्यात येत होता.

पहा : सूतकताई सूत.

संदर्भ : 1. Editors of American Fabrics Magazine,  Encyclopaedia of Textiles, Englewood Cliffs, N.J., 1960.

            2. Kaswell, E. R. Textile Fibers, Yarns and Fabrics, New York, 1963.

            3. Press, J. J., Ed.  Man-Made Textile Encyclopaedia, New York, 1959.

दाते, अ. गं.