नाक : शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी नाक हे एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. डोक्याच्या अग्रभागी असणाऱ्या ह्या इंद्रियाचे आद्य कार्य जरी गंधज्ञान हे असले, तरी वायुश्वासी व विशेषतः चतुष्पाद प्राण्यांत त्याचा उपयोग फायदेशीर रीतीने श्वसनासाठीही सर्रास केला जातो. अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांत नाक नसते. निम्न जलचर पृष्ठवंशीयांत नाकाचा उपयोग गंधज्ञानासाठीच केला जातो. श्वसनासाठी पाणी मुखावाटेच घेतले जाते. ह्यांत घ्राणेंद्रिय व श्वसनेंद्रिये एकमेकांपासून वेगळी असतात. मानवेतर पृष्ठवंशी प्राण्यांत नाकाची रचना व कार्य ह्यांत क्रमशः पुढीलप्रमाणे बदल होत गेलेले दिसून येतात.

आ.१. लँप्रीच्या डोक्याचे पृष्ठीय दृश्य : (१) मध्य नासाद्वार, (२) डोळा, (३) अंध नासा-मूलजनक कोश.

सायक्लोस्टोमा: या वर्गातील लँप्रीत डोक्यावर मध्यभागी एकच नासाद्वार असते (आ. १). ते खालच्या बाजूस गंधकोशाशी आणि अंध नासा-मूलजनक कोशाशी (गंधकोशाच्या बुडापासून सुरू होऊन, कवटीच्या तळाखालून पृष्ठरज्जूच्या अग्रभागापर्यंत जाणाऱ्या एका लांबट, खालच्या टोकाशी बंद असलेल्या कोशाशी नासाद्वारातून आत आलेले पाणी ह्यात येते त्यामुळे गंधग्राही कोशिकांचे उद्दीपन होऊन गंधज्ञान होते) जोडलेले असते (आ. २) पण नासाद्वार ग्रसनीशी (घशाशी) जोडलेले नसल्याने त्याचा उपयोग श्वसनास न होता केवळ गंधज्ञानापुरताच मर्यादित होतो. ह्याच वर्गातील हॅगफिशमध्ये नासाद्वार तुंडाच्या (मुस्कटाच्या, डोक्याच्या पुढे आलेल्या निमुळत्या भागाच्या) टोकाशी असते. रचना सर्वसाधारण लँप्रीप्रमाणेच असली, तरी ते ग्रसनीशीही जोडलेले असते (आ. ३). यामुळे गंधज्ञानाखेरीज पाण्याचा प्रवाह घसा व क्लोमकोष्ठांपर्यंत (कल्ल्यांच्या कोष्ठांपर्यंत) जाऊन श्वसनासही मदत होते.

आ. २. लँप्रीच्या अग्रभागाचा उभा छेद : (१) नासाद्वार, (२) गंधकोश, (३) नासा-मूलजनक कोश, (४) मुखविवर, (५) ग्रसनी.

मत्स्यवर्ग: बहुतेक माशांत [→ मत्स्यवर्ग] फक्त बाह्यनासाद्वारांची जोडी असते. निरनिराळ्या माशांत त्यांचे स्थान भिन्न असते. उदा., शार्कमध्ये नासाद्वारे मुस्कटाच्या बऱ्याच खालच्या बाजूस असतात, तर इतर माशांत ती तोंडाच्या पुढील अगर वरच्या बाजूस असतात. अंतःनासाद्वारे नसल्याने बाह्यनासाद्वारे मुखविवराशी (घशाशी) जोडलेली नसतात. त्यामुळे नाकाचा उपयोग श्वसनासाठी होत नाही. पृष्ठवंशीयांत सर्वप्रथम कोॲनिक्थीस ह्या मत्स्यवर्गाच्या उपवर्गात नाक अंतःनासाद्वाराच्या जोडीने मुखविवराशी जोडलेले असते, किंबहुना कोॲनिक्थीस शब्दाचा अर्थच नाक मुखाशी जोडलेले असणे असा होतो. त्यामुळे नाकाच्या बाहेरच्या बाजूस उघडणाऱ्या छिद्रांच्या जोडीस बाह्यनासाद्वारे आणि मुखविवरात उघडणाऱ्या जोडीस अंतःनासाद्वारे व दोहोंच्यामधील मार्गास नासामार्ग म्हटले जाते. अर्थात आजच्या ज्या काही माशांमध्ये अंतःनासाद्वारे आहेत त्यांपैकी कोणातही त्यांचा उपयोग श्वसनास हवा आत घेण्यासाठी होत नाही. मात्र नासामार्गात गंधवाही उपकला (पातळ अस्तर) असल्याने गंधज्ञान होऊ शकते.

आ.३. हॅगफिशच्या अग्रभागाचा छेद : (१) नासाद्वाराचे स्थान, (२) नासा-मूलजनक नाली, (३) गंधकोश, (४) मुखविवर, (५) नासाग्रसनी नाली.

उभयचर वर्ग: या वर्गातील (म्हणजे पाण्यात व जमिनीवर राहणाऱ्या) प्राण्यांत बाह्य व अंतःनासाद्वारांची प्रत्येकी एक जोडी असते. नासामार्ग आखूड असल्याने अंतःनासाद्वारे घरच्या जबड्याच्या टोकाशीच मुखविवरात उघडतात [→ बेडूक]. नासामार्गांचा उपयोग गंधज्ञान व श्वसनासाठी हवा आत घेणे, बाहेर टाकणे यांकरिता केला जातो. अशा रीतीने नाकाचा श्वासोच्छ्‌वासासाठी जो उपयोग स्थलचर (भूचर) पृष्ठवंशीयांत सर्रास केला जातो त्याची सुरुवात उभयचरांत झालेली आढळते. बेडूक वगैरे विपुच्छ-गण उभयचरांत (शेपूट नसलेले उभयचरांत) मुख व फुफ्फुस-श्वसनाच्या क्रियेत विशिष्ट उपायांनी नासाद्वारे तात्पुरती बंद करण्याची योजना असते [→ बेडूक श्वसन तंत्र].

आ. ४. सरड्याच्या नाकाच्या भागातून व मध्यरेषेच्या किंचित उजवीकडून जाणारा उभा छेद : (१) बाह्यनासाद्वार, (२) प्रघाण कोटर, (३) गंधवाही उपकला असणारा वरचा भाग, (४) हवेचा (श्वसनाचा) मार्ग, (५) अत:नासाद्वार, (६) व्होमेरोनेझल किंवा याकॉपसन इंद्रीय.

सरीसृप: या वर्गातील (म्हणजे सरपटणाऱ्या) प्राण्यांच्या नाकाची मूळ मांडणी व कार्य उभयचरांप्रमाणेच असते. फरक एवढाच की, नासामार्ग काहीसे लांब असतात. त्यांची रचनाही थोडी गुंतागुंतीची असते. सामान्यतः नासामार्गाचे दोन भाग पडतात : सुरुवातीचा प्रकोष्ठ (प्रघाण कोटर) आणि नंतरचा गंधकोश (आ. ४). गंधकोशाच्या आतील बाजूंची काहीशी चक्र वाढ झालेली असून फक्त त्याच भागावर गंध-उपकला असते. कासव व मुख्यत्वे मगर वगैरे सरीसृपांत दुय्यम तालूमुळे (काही अस्थींपासून बनलेल्या आडव्या विभागणाऱ्या पडद्यासारख्या भागामुळे) नासामार्ग लांब, नालीसारखा बनून घशात खूपच मागच्या बाजूस उघडणाऱ्या अंतःनासाद्वारास जोडलेले असतात. शिवाय एका विशेष झडपेने अंतःनासाद्वारे तात्पुरती झाकता येतात. त्यामुळे अन्न किंवा पाणी श्वसन तंत्रात (श्वसन संस्थेत) जाऊ शकत नाही आणि हवा व अन्न स्वतंत्र मार्गांनी जाऊ शकतात. पाण्यात राहणाऱ्या ह्या प्राण्यांना अशा संरचनेचा दुहेरी फायदा होतो. एक म्हणजे भक्ष्य जबड्यात घट्ट पकडून ठेवताना अगर सुटण्याची धडपड करणाऱ्या भक्ष्यासह पाण्यात बुडून राहतानाही श्वासोच्छ्‌वासास अडथळा निर्माण होत नाही. दुसरा म्हणजे मुस्कटाच्या टोकावरील बाह्यनासाद्वारे पाण्याच्या पातळीबाहेर ठेवून व बाकीचा भाग पाण्याखाली झाकून, जबडे उघडे ठेवून भक्ष्याच्या शोधात फिरतानाही श्वासोच्छ्‌वासास अडथळा येत नाही. सरडे व विशेषतः सापात नाकाच्या जवळच अंधवर्धांच्या (एका टोकाशी बंद असलेल्या पिशवीसारख्या भागांच्या) जोडीने तयार झालेले एक इंद्रिय असते. त्याला व्होमेरोनेझल किंवा याकॉपसन (एल्. एल्. याकॉपसन या डॅनिश शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारे) इंद्रिय [ आ. ४ (६)] म्हणतात (उभयचर व त्यानंतरच्या वर्गांतील इतरही बऱ्याच पृष्ठवंशीयांत काही प्रमाणात त्याची वाढ झालेली असते. मानवात फक्त भ्रूणावस्थेत अवशेषी स्वरूपात ते असते, नंतर नसते). ह्या इंद्रियाचा उपयोग मुखविवरात आलेल्या अन्नाचे गंधज्ञान करण्यासाठी होतो. म्हणजेच ते घ्राणेंद्रियास पूरक मानले जाते. विशेषतः सापात तर लांब, द्विभिन्न (साधारणतः मध्यरेषेवर दुभागलेली) जीभ वेळोवेळी बाहेर काढून हवेतील रासायनिक कण टिपले जातात. जीभ परत तोंडात घेतल्यावर द्विभिन्न टोकाचा भाग ह्या इंद्रियात सारून ते कण इंद्रियाच्या ओलसर गंधवाही उपकलेवर सोडले जातात व गंधज्ञान होते.


पक्षी: पक्ष्यांमध्ये बाह्यनासाद्वारे चोचीच्या बुडाशी असून काहींत (उदा., कबूतर) त्यांच्याभोवती मऊ त्वचेचे फुगीर आवरण असते. किवी मात्र बाह्यनासाद्वारे चोचीच्या टोकाशी असतात. नासामार्ग काहीसा आखूडच असतो व त्यामध्ये नासीय ग्रंथींच्या वाहिन्या उघडतात. नासीय ग्रंथींची वाढ स्थलचर पक्ष्यांपेक्षा सागरी पक्ष्यांत बरीच झालेली असते. ह्या ग्रंथींमधून लवणाचे स्त्रवण होऊन वृक्कांना (मूत्रपिंडांना) उत्सर्जनास पूरक म्हणून उपयोगी पडतात. पक्ष्यांमध्ये दृष्टी तीक्ष्ण असल्याने सामान्यतः गंधज्ञानास फारसे महत्त्व नसते. बाहेरील हवा नासामार्गात गरम व ओलसर (दमट) होऊन फुफ्फुसांत जाते.

सस्तन प्राणी: नाक ही संज्ञा खऱ्या अर्थाने सस्तन प्राण्यांत (विशेषतः नरवानर गणात–प्रायमेट्समध्ये) वापरली जाते. सस्तन प्राण्यांत नाकाची अंतर्रचना इतर प्राण्यांहून अधिक गुंतागुंतीची झालेली असते. नासामार्गाची लांबीही वाढलेली असते. नासामार्ग प्रथम कठीण तालू व नंतर मृदू तालूमुळे अन्नमार्गापासून अलग झालेला असून घशात मागील बाजूस उघडतो. नासामार्गाचे सामान्यतः प्रकोष्ठ, श्वसनास उपयोगी पडणारा व गंधवाही असे तीन भाग पडतात. प्रकोष्ठ लहान असून नाकाचा बहुतेक भाग उरलेल्या दोन भागांचा झालेला असून नासा-शुक्तिकेमुळे (हाडांनी बनलेल्या शंखाकार भागामुळे) रचना गुंतागुंतीची होते. ह्या भागांची सूक्ष्म शारीरिक रचना वैशिष्ट्यपूर्ण असते व त्यांची कार्येही तशी वेगवेगळी असतात. उदा., प्रकोष्ठाच्या सुरुवातीस बाह्य त्वचेचे अस्तर असते. तेथे स्वाभाविकच केस असतात, तसेच त्वचेतील ग्रंथींचे स्रावही तेथे सोडले जातात. त्यामुळे श्वास घेताना हवेतील धुलिकण, तंतू इ. पदार्थ सुरुवातीसच रोखले जाऊन हवा स्वच्छ करून किंवा गाळून पुढे जाते. श्वसनास उपयोगी पडणाऱ्या भागास वाहिनीवंत (द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहिन्यांनी युक्त असलेल्या) श्लेष्मकलेचे (पातळ बुळबुळीत पटलाचे) अस्तर असते. गाळून आलेली हवा येथे गरम व ओलसर होऊन श्वसनास योग्य करून फुफ्फुसांत पाठविली जाते. नासामार्गाच्या मागील व वरील भाग (तिसरा भाग) गंधवाही असतो, कारण त्यावर गंध-उपकलेचे अस्तर असते. कवटीच्या काही हाडांतील कोटरे (पोकळ्या) नासामार्गाशी जोडलेली असतात. त्यांचा उपयोग कवटीचा भार हलका करण्यासाठी आणि आवाजाच्या ⇨ अनुस्पंदनास साहाय्य करण्यासाठी होतो.

काही प्राण्यांतील वैशिष्ट्ये: काही प्राण्यांच्या नाकात वैशिष्ट्यपूर्ण बदल झालेले आढळतात. पुष्कळसे बदल अनुकूली (विशिष्ट परिसराशी जुळवून घेण्यासाठी झालेल्या) स्वरूपाचे असतात. उदा., उभयचरातील ॲपोडा वर्गात नासाद्वारापासून बहिःक्षेप्य (बाहेर काढता येण्याजोग्या) गंधवाही संस्पर्शकांची (बारीक, लवचिक व संवेदनाग्राहक इंद्रियांची) वाढ झालेली असते. भारतीय घडियालामध्ये मुस्कटाच्या टोकावर जाडसर, मांसल गोल घड्यांसारखा (गोल भांड्यासारखा) भाग असतो व त्यावर बाह्यनासाद्वारे असतात. वाळूचे कण आत जाऊ नयेत म्हणून वाळवंटी प्राण्यांच्या नाकात अनुकूली बदल झालेले आढळतात. काही सापांत नासाद्वारांचे झडपांनी संरक्षण केले जाते, तर काहींत नासाद्वारे सूचिछिद्रासारखी असतात. वाळू उकरणाऱ्या प्राण्यांत नासाद्वारे टोकाशी पुढे उघडणारी नसून ऊर्ध्वमुखी (वर उघडणारी) असतात. उंटाची नासाद्वारे (नाकपुड्या) पापण्यांप्रमाणे मिटू शकतात. मोल, श्‍रु, टॅपिर, हत्ती ह्या स्तनी प्राण्यांत नाक लांबट होऊन त्याची सोंड तयार होते. हत्तीची सोंड तर फारच लांब झालेले नाक व वरचा ओठ ह्यांपासून बनलेली असते. व्हेल, पॉरपॉईज वगैरे जलचर स्तनी प्राण्यांत एक किंवा दोन बाह्यनासाद्वारे असून काहींत ती डोक्यावर थोडी मागे असतात. मानवात नाकाच्या आकारातील फेरफार विशिष्ट वंशाची लक्षणे म्हणून मानले जातात. नाक लांब, सडपातळ, टोकदार, पुढे आलेले आहे की आखूड, बसकट, पसरट आहे नासासेतू (नाकाचा वरचा बाह्य भाग) सखल आहे की नाही वगैरे लक्षणे विशिष्ट वंशांत आढळतात. उदा., कॉकेसॉइड वंशात नाक सामान्यतः सरळ, अरुंद व टोकदार, पुढे आलेले असते तर नीग्रॉइड जातीत ते रुंद, बसकट, पसरट असते. माँगोलॉइड वंशात नासासेतू सखल व नाकपुड्या मध्यम स्वरूपाच्या पसरट असतात. ऑस्ट्रेलियन वंशात नाक रुंद असले तरी बसकट, पसरट नसते.

सर्वसाधारणपणे प्रगत अस्थिमीन (ज्यांचा सांगाडा अस्थींचा बनलेला आहे असे मासे), पक्षी, सागरी स्तनी प्राणी, मानवासहित प्रगत नरवानर गणात डोळ्यांचा विकास चांगला होऊन दृष्टी तीक्ष्ण असल्याने, गंधज्ञानाचा विकास तेवढा चांगला झालेला नसतो. याउलट अन्न मिळविण्यासाठी, शत्रू-मित्रभेद समजण्यासाठी, सहचर ओळखण्यासाठी, स्मृतींवर आधारलेल्या प्रतिसादाकरिता सायक्लोस्टोम, शार्क मासे, आदिम अस्थिमीन, उभयचर व सरीसृप वर्गातील प्राण्यांत व बहुतेक सर्व स्तनी प्राण्यांत (वर उल्लेखिलेले वगळून) बाह्य जगाशी संपर्क साधण्याचा महत्त्वाचा मार्ग चांगले गंधज्ञान हाच असतो. मानवात ०·०२४ मिग्रॅ./लिटर पेपरमिंटाच्या तेलाचे तसेच ०·००४ मिग्रॅ./लिटर कृत्रिम कस्तुरीचे अभिज्ञान करण्याची (अस्तित्व ओळखण्याची) क्षमता असते [→ गंध].

परांजपे, स. य.

मानवी नाक: चेहऱ्यावर मध्यभागी असणाऱ्या प्रमुख शरीर अवयवाला नाक म्हणतात. वर्णनाकरिता तसेच शरीररचना दृष्ट्या त्याचे दोन भाग पाडता येतात : (१) बाह्य नाक व (२) अंतर्गत नाक किंवा नासागुहा. हे दोन्ही भाग एकमेकांशी सलग असतात. नाकाचे वरचा आणि खालचा असेही दोन भाग पाडतात. वरचा लहान भाग गंधज्ञानासंबंधी आणि खालचा मोठा श्वसनासंबंधी. सबंध नाक बाह्य वातावरणाला दोन्ही नाकपुड्यांद्वारे उघडे असते, तसेच ते मागील बाजूस पश्चनासाद्वारामुळे नासाग्रसनीत उघडलेले असते. नाक नासापटल नावाच्या पडद्याने उभे विभागलेले असून त्याचे उजवी व डावी नाकपुडी असे भाग पडतात. दोन्ही नाकपुड्यांतील अवयव सारखेच असले, तरी त्यांत आकारभिन्नता असण्याचा संभव असतो.

बाह्य नाक हाडे आणि उपास्थी (कूर्चा) मिळून बनलेले असते. हाडाचा भाग प्रामुख्याने प्रत्येक बाजूस नासास्थी व उत्तरहन्वस्थीचा (वरच्या जबड्याच्या हाडाचा) ललाटीय प्रवर्ध (चेहेऱ्याच्या बाजूला पुढे आलेला भाग) मिळून बनतो. उपास्थींचा भाग पुष्कळ छोट्या मोठ्या उपास्थी मिळून बनतो (आ. ५).

आ.५. बाह्य नाकाची रचना : नासास्थी, (२) ललाटास्थी, (३) उत्तर-हन्वस्थी, (४) उपास्थींचा भाग.

उपास्थी रचनेमुळे नाकाचा आकार तयार होतो. या उपास्थींना काही स्नायू जोडलेले असतात व त्यांच्यामुळे नाकपुड्या विस्फारता येतात.

नासापटलाचा काही भाग हाडापासून व काही भाग उपास्थींपासून बनलेला असतो. त्याचा अग्रभाग चौकोनी आकाराचा साधारण मोठ्या उपास्थींचा असतो. याच्यामागे तितवास्थीची उभी पट्टिका व तिच्या मागे जतुकास्थीचा (कवटीच्या तळाशी असलेल्या हाडाचा) चंचू भाग असतो. चौकोनी उपास्थीची खालची बाजू उत्तर-हन्वस्थी शिखा व तालु-अस्थी शिखा यांच्याशी संबंधित असते. पुढच्या बाजूस हलास्थीनासा उपास्थी असते (आ. ६). अगदी मागच्या बाजूचा मोठा भाग हलास्थीपासून बनलेला असतो. नासापटलाच्या उपास्थी भागाच्या पृष्ठभागावर पर्युपास्थीचे (उपास्थीवरील तंतुमय पातळ पटलाचे) व अस्थी भागावर पर्यास्थिकलेचे (अस्थीवरील तंतुमय पातळ पटलाचे) आच्छादन असते. या दोन्हींवर श्लेष्मकलास्तर असते. या अस्तराचा वरचा आणि पश्चभाग जो तितवास्थीच्या जालपटाजवळ (सच्छिद्र पटाजवळ) असतो, तो गंधवाही क्षेत्रात मोडतो.


आ.६. नासापटलाची रचना : (१) ललाटास्थी, (२) तितवास्थीची उभी पट्टिका, (३) नासास्थी, (४) उपास्थीचा चौकोनी तुकडा, (५) हलास्थी, (६) उत्तर-हन्वस्थीची नासाशिखा, (७) तालुअस्थीची नासाशिखा, (८) हलास्थि-नासा उपास्थी.

नासागुहेच्या पार्श्वभित्तीवर प्रत्येक बाजूस (उजव्या व डाव्या) एकाखाली एक असे तीन उंचवटे असतात व त्यांना नासा-शुक्तिका म्हणतात (आ. ७). प्रत्येक शुक्तिकेच्या खाली जी पोकळी असते तिला नासाद्वार म्हणतात. वरून खाली या शुक्तिकांना अनुक्रमे ऊर्ध्व, मध्य व निम्न शुक्तिका अशी नावे आहेत. निम्न शुक्तिका ही हाडाचा एक तुकडाच असून तो पार्श्वभित्तीस चिकटलेला असतो.

आ.७. नाकाची पार्श्वभित्ती (आतील बाजू) : (१) ललाटास्थीमधील नासाकोटर, (२) ललाटास्थी, (३) नासास्थी, (४) उपास्थी, (५) ऊर्ध्व, मध्य व निम्न नासा-शुक्तिका, (६) ग्रसनी, (७) जतुकास्थीमधील नासाकोटर.

उरलेल्या दोन्ही शुक्तिका म्हणजे मधली व वरची तितवास्थीचेच भाग असतात. या सर्व शुक्तिकांवर स्तंभाकार सकेसल (सूक्ष्म केस असलेल्या) कोशिकांपासून (पेशींपासून) बनलेली श्लेष्मकला आच्छादिलेली असते.

निम्न नासाद्वारामध्ये (निम्न शुक्तिकेच्या खाली) पुढच्या बाजूस नासाश्रुवाहिनीचे (अश्रुकोशापासून नाकात अश्रू आणून सोडणाऱ्या नलिकेचे) छिद्र असते. ऊर्ध्व आणि मध्य नासाद्वारात अग्रगटातील नासाकोटरांतील स्राव वाहून नेणारी छिद्रे उघडतात. ऊर्ध्व नासाद्वार पुढच्या बाजूस बंद व मागे उघडे असते, तर बाकीची दोन्ही पुढे व मागेही उघडीच असतात. पश्चगटातील नासाकोटरे वर आणि मागे उघडतात आणि म्हणून त्यांच्या छिद्रातून येणारा स्राव (पू वगैरे) फक्त नाकाच्या गुहेच्या पश्च भागाच्या तपासणीतच दिसतो. मध्य नासाद्वारात काही महत्त्वाचे भाग आहेत. त्याच्या अग्रभागी तितवास्थीचा मोठा फुगवटा दिसतो, त्याला तितवास्थी कंद म्हणतात व त्याच्या पुढे त्याच हाडाचा अंकुश प्रवर्ध हा भाग असतो. दोन्हींच्या मध्ये अर्धचंद्राकृती खळगा असतो आणि त्याला अर्धचंद्राकृती द्वार म्हणतात. उत्तर-हन्वस्थीतील नासाकोटर छिद्र या द्वारात उघडते. याच द्वाराच्या अग्रभागी अथवा जरा पुढे ललाटास्थीमधील नासाकोटराचे छिद्र उघडते. याशिवाय मध्य नासाद्वारात तितवास्थीतील नासाकोटरांची छिद्रेही उघडतात. ऊर्ध्व नासाद्वार लहान असून त्यात जतुकास्थीतील नासाकोटराचे छिद्र असते.

आ.८. शुक्तिका कापून टाकल्यावर दिसणारी नाकाची पार्श्वभित्ती : (१) तितवास्थी कंद, (२) अंकुश प्रवर्ध, (३) अर्धचंद्राकृती द्वार, (४) नासाश्रुवाहिनीचे छिद्र, (५) जतुकतालू छिद्र काळे ठिपके तितवास्थीतील छोट्या पोकळ्यांची छिद्रे आहेत.

नाकाला शुद्ध रक्तपुरवठा भरपूर प्रमाणात होत असून बाह्य व आंतरग्रीवा (मानेतील) रोहिण्यांच्या शाखांपासून निघणाऱ्या रक्तवाहिन्यांचे तेथे मोठ्या प्रमाणात वाहिनीमीलन झालेले असते. नासापटलाच्या पुढील व खालच्या भागामध्ये जे रक्तवाहिन्यांचे जाळे असते ते आधारहीन व जवळजवळ सुटे असल्यासारखे असते. या ठिकाणाहून नेहमी रक्तस्राव होतो व त्या विशिष्ट भागाला ‘लिट्ल यांचे क्षेत्र’ (जे. एल्. लिट्ल या अमेरिकन शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावावरून) म्हणतात.

नाकाच्या आजूबाजूच्या अस्थींमध्ये ज्या पोकळ्या असतात त्यांना परानासाकोटरे म्हणतात. मध्यरेषेच्या उजव्या व डाव्या बाजूस प्रत्येकी चार कोटरे असून मूळ हाडावरून त्यांना पुढील नावे दिलेली आहेत : (१) ललाटास्थीय नासाकोटर, (२) उत्तर-हन्वस्थीय नासाकोटर, (३) तितवास्थीय नासाकोटर आणि (४) जतुकास्थीय नासाकोटर. यांपैकी (१), (२) आणि (४) ही आकारमानाने मोठी असून त्यांच्या जोड्या असतात तर प्रत्येक बाजूचे तितवास्थीय नासाकोटर पुष्कळ छोट्या छोट्या पोकळ्या मिळून बनलेले असते. या प्रत्येक नासाकोटराचे छिद्र नासागुहेत उघडते. म्हणून परानासाकोटरे नासागुहेची अंधवर्धेच (विपुटीच) आहेत, असे म्हणता येते. दोन्ही बाजूंच्या त्याच नासाकोटरांचा आकार नेहमी एकसारखा असत नाही. या परानासाकोटरांतून हवा असते व त्यांच्या भित्तींवर सकेसल कोशिकांचे आच्छादन असते. कोटरातील स्रावाचा निचरा ज्या छिद्राद्वारे नासागुहेत होतो त्यापैकी फक्त ललाटास्थीय नासाकोटराचे छिद्र गुरुत्वाकर्षणाने सुलभपणे निचरा करू शकते. इतर कोटरांतील निचरा डोक्याच्या विशिष्ट स्थितीतच सहज होऊ शकतो. मात्र सकेसल कोशिकांचे केस जी हालचाल करतात, ती सर्व निचरा छिद्राकडेच वाहून नेण्यास योग्य अशीच असते.

आ.९. परानासाकोटरे : (१) ललाटास्थीय नासाकोटर, (२) उत्तर-हन्वस्थीय नासाकोटर, (३) तितवास्थीय नासाकोटर, (४) जतुकास्थीय नासाकोटर.

तितवास्थीय नासाकोटरे गर्भावस्थेतच बरीच वाढलेली असतात. ललाटास्थीय आणि जतुकास्थीय नासाकोटरे जन्माच्या वेळी अल्पविकसित असतात. उत्तर-हन्वस्थीतील नासाकोटर तयार असते, परंतु आकारमानाने लहान असते. ही तिन्ही नासाकोटरे (ललाटास्थीय, जतुकास्थीय व उत्तर-हन्वस्थीय) वयाच्या पहिल्या सात-आठ वर्षांत जवळजवळ पूर्ण वाढतात परंतु त्यांपैकी उत्तर-हन्वस्थीतील नासाकोटराची वाढ कायमचे दात येऊन गेल्यानंतरच पूर्ण होते, तसेच ललाटास्थीय कोटरे यौवनावस्थेपर्यंत पूर्ण वाढतात. शैशवास्थेतील चेहरा आणि यौवनावस्थेतील चेहरा यांच्यातील बदलास कोटरांच्या आकारमानातील बदल पुष्कळ अंशी कारणीभूत असतात.


कार्य: नाकाच्या प्रमुख कार्यात (१) गंधज्ञान, (२) गालन आणि (३) फुफ्फुसांत जाणाऱ्या हवेचे आर्द्रीकरण करणे व तिचे तापमान योग्य बनविणे यांची गणना होते. यांशिवाय आवाजाच्या अनुस्पंदनात मदत करणे, स्वमर्यादित (नाकापुरती) स्वच्छता ठेवणे आणि श्लेष्मकला आच्छादन नेहमी ओलसर ठेवणे यांचाही समावेश नाकाच्या कार्यांत होतो.

(१) गंधज्ञान: गंधक्षेत्रापर्यंत हवा पोहोचली, तरच गंधज्ञान होते. शोथामुळे (दाहयुक्त सुजेमुळे) हवा पोहोचण्यात अडथळा येतो किंवा मस्तिष्काघातामुळे (मेंदूवर झालेल्या आघातामुळे) तंत्रिका (मज्जा) तुटल्यास वास येत नाही [→ गंध].

(२) गालन : हवेतील कचरा, सूक्ष्मजंतू आणि इतर बाह्य पदार्थ नाकात शिरल्यानंतर ओलसर श्लेष्मकलेवर चिकटतात. हे चिकटलेले पदार्थ कोशिकांच्या केसांच्या हालचालीमुळे ग्रसनीकडे सरकवले जातात आणि तेथील स्त्रावाबरोबर गिळले जातात. यामुळे हे पदार्थ श्वसनमार्गे हवेबरोबर फुफ्फुसांत शिरत नाहीत.

(३) हवेचे आर्द्रीकरण व ती गरम करणे हे नाकाचे एक प्रमुख कार्य आहे. हवा फुफ्फुसांत पोहोचते त्या वेळी तिचे तापमान ३०° से. आणि सापेक्ष आर्द्रता ७५–९५% असते, थंडीच्या दिवसांत खोलीतील हवा उष्ण केल्याने तिची आर्द्रता आवश्यक अशा ४०% पेक्षा एकदम कमी होण्याची शक्यता असते. योग्य अशी आर्द्रता निर्माण करण्याचे कार्य नाकात होते म्हणून नाकातील श्लेष्मकला आच्छादनाची क्रियाशीलता नेहमी उत्तम असावी लागते.

आ. १०. नाकातील हवेचे प्रवाह : (अ) अंतःश्वसन (आ) उच्छ्‌वसन नाकात अंतःश्वसनाच्या वेळी शिरणाऱ्या हवेचा प्रवाह वर आणि मागे म

नाकात अंतःश्वसनाच्या वेळी शिरणाऱ्या हवेचा प्रवाह वर आणि मागे मध्यशुक्तिकेवरून जाऊन पश्चनासाद्वारातून वळतो. उच्छ्‌वसनात बाहेर येणारी हवा नासागुहेत अधिक पसरते एवढेच नव्हे, तर ती  मध्यशुक्तिकेभोवती भोवऱ्यासारखी फिरून मग बाहेर पडते.

काही विकार: बाह्य पदार्थ नासागुहेत अडकणे : खडे, चिंचोके, पेन्सिलीचे तुकडे, कागद इ. वस्तू पुष्कळ वेळा लहान मुलांच्या नाकात अडकतात. या वस्तू बहुधा नाकाच्या खालच्या भागात अडकून राहतात. या वस्तू अधिक वेळ राहिल्यास नाक दुखणे आणि एकाच नाकपुडीतून पूयुक्त स्राव बाहेर पडणे ही प्रमुख लक्षणे आढळतात. अशा वस्तू दीर्घकाल आत राहिल्यास त्यांवर पुटे चढून त्यापासून एकप्रकारचा खडाच बनतो व त्याला नासाश्मरी म्हणतात. विशिष्ट प्रकारची शस्त्रे वापरून या वस्तू बाहेर काढाव्या लागतात. पुष्कळ वेळा शुद्धिहारक औषधे अगोदर वापरावी लागतात. अशा वस्तू काही वेळा मागे ग्रसनीत ढकलल्या जाण्याचा आणि तेथून श्वसनमार्गात जाऊन अडकण्याचा धोका असतो.

नासारक्तस्त्रावण: (घोणा अथवा घोळणा फुटणे). नाकातून रक्तस्राव होणे हे एक लक्षण असून स्थानीय किंवा सार्वदेहिक रोगात ते उद्‌भवते. तरुण व मध्यम वयातील व्यक्तीमध्ये रक्तस्राव क्षेत्र खाली पुढच्या बाजूस असून असा रक्तस्राव सार्वदेहिक रोगाशी बहुधा संबंधित नसतो. अधिक वयस्कर व्यक्तीत रक्तस्राव क्षेत्र वर व मागे असण्याचा व रक्तस्राव सार्वदेहिक रोगाशी निगडीत असण्याचा अधिक संभव असतो. सार्वदेहिक कारणांमध्ये अती रक्तदाब, रोहिणीकाठिण्य, मूत्रपिंड विकृती व रक्तविषयक रोग यांचा समावेश होतो. स्थानीय कारणांमध्ये आघात, व्रण, अर्बुद (कोशिकांच्या अत्यधिक नवोत्पतीमुळे निर्माण झालेली गाठ) इत्यादींचा समावेश असून रक्तस्राव बहुधा लिट्ल क्षेत्रातून होतो. कधीकधी अतिसौम्य धक्का (उदा., नाक शिंकरण्याची क्रिया) रक्तस्राव सुरू करतो. प्रत्यक्ष रक्तस्राव सुरू असताना तो थांबविणे महत्त्वाचे असते. त्याकरिता प्रथमोपचारात नाक बोटांनी दहा मिनिटे दाबून धरतात. त्यानंतर कोकेन व ॲड्रेनॅलीन या औषधांच्या द्रवात भिजवलेली वात नाकपुडीत ठेवतात. कारण शोधून त्यावर जरूर पडल्यास दाहकर्म (तप्त लोखंडाने वा विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने ऊतकाचा–कोशिकासमूहाचा–नाश करणे), रोहिणीबंध वगैरे इलाज करावे लागतात.

सर्दी अगर पडसे: नाकातील श्लेष्मकलेच्या संक्रामणजन्य (रोगकारक सूक्ष्मजीवांच्या आक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या) तीव्र शोथाला सर्वसाधारण भाषेत सर्दी किंवा पडसे म्हणतात. सर्व श्लेष्मकलेत रक्ताधिक्य होते आणि ग्रंथी वाढून स्राव मोठ्या प्रमाणावर तयार होतो.

सर्दीची सुरुवातीची सर्व लक्षणे नाक व नासाग्रसनीच्या अनेक व्हायरसांच्या संक्रामणापासून उद्‌भवतात. या व्हायरसांपैकी ऱ्हायनोव्हायरस इतरांपेक्षा सर्दीला अधिक कारणीभूत असतात. त्यानंतर सूक्ष्मजंतूंचे संक्रामण होते व त्यांत स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी, हीमोफायलस इन्फ्‌ल्यूएंझी किंवा स्टॅफिलोकोकाय हे भाग घेतात.

नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांसारखी सार्वजनिक स्थळे व खेळती हवा नसलेली घरे संक्रामणास मदत करतात. कोणत्याही कारणामुळे आलेला अशक्तपणा, तसेच परिसरीय हवामानातील एकाएकी उद्‌भवणारे तापमान आणि आर्द्रताविषयक बदल प्रतिरोध शक्ती कमी करून संक्रामणास मदत करतात रोगामुळे फार थोडा वेळ टिकणारी प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) तयार होते व तीही त्या त्या विशिष्ट व्हायरसापुरतीच मर्यादित असते व म्हणून सर्दी वारंवार होते.


सर्दीची सुरुवात बहुधा एकाएकीच होते. अगदी सुरुवातीस नाकात गुदगुदल्यासारखे वाटून शिंका येतात. नाक कोरडे पडल्यासारखे वाटते व घशास कोरड पडून दाह जाणवतो. डोके जड होऊन डोळे जळजळतात. नंतर नाकातून पाण्यासारखा स्राव मोठ्या प्रमाणात वाहू लागतो. एक-दोन दिवसांनंतर सूक्ष्मजंतू संक्रामणामुळे स्राव घट्ट व पूयुक्त बनतो आणि श्वासोच्छ्‌वासात अडथळा उत्पन्न होतो. सुरुवातीस कधीकधी अल्पसा ज्वरही असतो. रोगाची तीव्रता संपल्यानंतर चोंदलेले नाक हळूहळू मोकळे होते, श्वासोच्छ्‌वास पूर्ववत होतो व स्राव कमी होतो.

तीव्र अवस्थेत नाकातील सर्व ग्रंथी अतिक्रियाशील बनतात. त्यामुळे स्त्रावोत्पादक प्रतिक्रियेचा जोर वाढतो. केशवाहिन्यांच्या (सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या) भित्तींमधून कोशिका ऊतकात पसरतात, तसेच श्लेष्मकलेच्या वरच्या स्तरातील कोशिका झडून पडतात (विशल्कन). सुरुवातीस सकेसल कोशिकांचे केस जमणारा स्रावमिश्रित कचरा ढकलण्याचा प्रयत्न करतात परंतु कोशिकांचा नाश वाढल्याने स्राव घट्ट बनतो व तो ढकलण्यास केसांची हालचाल अपुरी पडते. या अवस्थेला सर्दीची अवरोधी अवस्था म्हणतात. स्राव (शेंबूड) पिवळसर असण्याचे कारण त्यात पुष्कळ झडून पडलेल्या कोशिका मिसळलेल्या असतात. रोगाचा जोर कमी होताच श्लेष्मकला पूर्ववत होऊ लागते व सकेसल कोशिकांच्या केसांची हालचाल सुरू होते.

सर्दीमुळे  उद्‌भवणारे उपद्रव मूळ रोगाचाच भाग असतात की निराळ्याच व्हायरसाच्या जोरदार संक्रामणाचा परिणाम असतात, हे निश्चित सांगता येत नाही. उपद्रवात पुढील विकृतींचा समावेश होतो. (१) नासाकोटरशोथ, (२) ग्रसनी-कर्णनलिका श्लेष्मल विकार, (३) मध्यकर्णशोथ [→ कान], (४) श्वसनमार्ग सूक्ष्मजंतू संक्रामणजन्य विकार : (अ) श्वासनालशोथ, (आ) श्वासनलिकादाह, (इ) श्वसनिकादाह, (ई) फुफ्फुसशोथ (न्युमोनिया) [→श्वसन तंत्र].

सर्दीवरील प्रतिबंधात्मक इलाज शोधण्याकरिता आटोकाट प्रयत्न सतत चालू आहेत. निरनिराळे उपाय वेळोवेळी सुचविण्यात येतात आणि त्यांपैकी जीवनसत्त्व चिकित्सा, लस चिकित्सा, कॅल्शियम चिकित्सा, जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरण चिकित्सा यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येतो. तथापि या चिकित्सांविषयी अजून एकमत झालेले नाही. जीवनसत्त्वांचा योग्य प्रमाणात पुरवठा असला म्हणजे श्वसनमार्गाची प्रतिरक्षात्मक शक्ती वाढण्यास मदत होत असावी. शारीरिक आरोग्य, मोकळी व स्वच्छ हवा व व्यायाम सर्दीला प्रतिबंध करण्यास मदत करतात. ज्यांना कमी सूर्यप्रकाशात काम करावे लागते (उदा., खाण कामगार) त्यांना जंबुपार किरण चिकित्सा उपयुक्त ठरते. लस चिकित्सेचे स्थान अद्याप अनिश्चित आहे.

सर्दी हमखास बरी करणारा कोणताही इलाज अजून सापडलेला नाही. ती संसर्गजन्य विकृती असल्यामुळे सुरुवातीच्या तीव्र अवस्थेत रोगी इतरांपासून अलग राहिल्यास रोग पसरण्यास आळा बसतो. अंथरुणावर पडून विश्रांती घेणे, औषधयुक्त वाफारा (मेंथॉल किंना बेंझोइन) वारंवार हुंगणे इत्यादींमुळे आराम पडून रोग लवकर बरा होण्यास मदत होते. ज्वर असल्यास ॲस्पिरीन, फेनॅसिटिन आणि डोकेदुखीवर कोडीन ही औषधे उपयुक्त असतात. श्वसनमार्ग किंवा नाकाच्या उपद्रवावर योग्य ती प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे देतात.

वारंवार सर्दी होणाऱ्यांनी नाक, कान व घसा या शरीरभागांच्या तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि नासागिलायुवृद्धी [→ ॲडिनॉइडे], विचलित नासापटल (नाकाचा पडदा एका बाजूस झुकणे) यांसारख्या विकृती आढळल्यास योग्य इलाज करून घ्यावेत.

अधिहर्षताजन्य (ॲलर्जीजन्य) सर्दी : सर्दीच्या या प्रकारात नाकाच्या श्लेष्मकलेतील प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रिया (कोणतेही विष, सूक्ष्मजंतू वा इतर प्राणिजन्य किंवा वनस्पतिजन्य पदार्थ–प्रतिजन व ते शरीरात शिरल्यावर त्यांना प्रतिकार करणारे शरीरात निर्माण होणारे विशिष्ट पदार्थ–प्रतिपिंड–यांतील प्रतिक्रिया) कारणीभूत असते. ही विकृती कुमारावस्थेत आणि लहान वयात अधिक आढळते. प्रतिजन बाह्य पदार्थ असून बहुधा प्रथिन असतो परंतु त्याचे पुढील प्रकार असतात. (अ) अंतर्वाही : श्वसनमार्गात ओढले जाणारे, उदा., घरगुती व प्राणिजन्य धूळ, बुरशी व पराग. गवताच्या परागांपासून ब्रिटनमध्ये मे, जून व जुलै महिन्यांत या विकृतीचा जोर असतो. या मोसमी विकृतीला ⇨ पराग ज्वर म्हणतात. (आ) अन्नपदार्थ व औषधे : मासे, अंडी, दूध, गहू व गव्हाचे पदार्थ नासा अधिहर्षतेचे विशेषेकरून लहान मुलांत, प्रमुख कारण असतात. ॲस्पिरीन, आयोडीन आणि प्रतिजैव औषधे यांचा औषधात समावेश होतो. (इ) संपर्क परिणामकारी : यामध्ये काही प्रतिजैव औषधे आणि वनस्पतींचा समावेश होतो. (ई) सूक्ष्मजंतू : स्टॅफिलोकोकाय, न्यूमोकोकायस्ट्रेप्टोकोकाय.

अधिहर्षताजन्य सर्दीचा स्राव सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास त्यात अरुणकर्षी (इओसीन या गुलाबी रंजकाने सुलभतेने रंगविल्या जाणाऱ्या) कोशिकांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळते.

लक्षणांमध्ये नाक व डोळ्यांची खाज, शिंका, नाक चोंदणे, डोळ्यातील नेत्रश्लेष्म-केशवाहिन्यांत रक्ताधिक्य होणे, डोळ्यातून पाणी गळणे इत्यादींचा समावेश होतो. नाकातील स्राव सहसा पूयुक्त बनत नाही. रोग राहून राहून पुन्हा उद्‌भवतो. मोसमी व बारमाही या दोन्ही प्रकारांत लक्षणे सारखीच आढळतात.

प्रतिबंधात्मक इलाजांत सर्व अधिहर्षताजनक पदार्थ टाळणे महत्त्वाचे असते. पराग अधिहर्षता असणाऱ्याने ठराविक मोसमात शेतीच्या प्रदेशात जाऊ नये. हिस्टामीनरोधक (सर्व प्राण्यांच्या ऊतकात आढळणाऱ्या आणि केशवाहिन्यांचे विस्फारण करणाऱ्या हिस्टामीन या संयुगाला रोध करणाऱ्या) औषधांचे दररोज ठराविक प्रमाणात सेवन केल्यास मोसमी पराग ज्वर टाळता येतो. उपचारांमध्ये नाकातील काही विकृती (उदा., विचलित नासापटल) असल्यास त्यावर इलाज करून घेणे हितावह असते. स्थानिक उपचारात वाहिनी-आकुंचक औषधांचे थेंब (एफेड्रीन /%) नाकात घालतात. विशिष्ट विसंवेदीकरण (विशिष्ट पदार्थांची अधिहर्षता घालविणे वा कमी करणे) हा उपाय उपयुक्त असतो. मात्र कोणते पदार्थ अधिहर्षताजनक आहेत हे समजणे आवश्यक असते. पदार्थ निश्चित झाल्यानंतर या पदार्थापासून बनविलेली अंतःक्षेपणे (इंजेक्शने) दर आठवड्यास वाढत्या प्रमाणात देतात. दमा व नासा-अधिहर्षता एकत्र असल्यास नाकात बेक्लॅमेथासोनसारखी स्टेरॉइड औषधे वातविलेपी (सूक्ष्म कणांच्या फवाऱ्यात रूपांतर करून अंतःश्वसनाने आत घेता येतील अशा) स्वरूपात उपयुक्त असतात.

चिरकारी नासाशोथ : (जुनाट सर्दी). या विकृतीचे निरनिराळे प्रकार आढळतात. त्यांपैकी (अ) अतिवृद्धियुक्त आणि (आ) अपपुष्टियुक्त या दोन प्रकारांची माहिती येथे दिली आहे.


(अ) तीव्र नासाशोथ पूर्ण बरा न होणे हे या रोगाचे प्रमुख कारण असते. नाकात अवरोध असणे, आघात व अधिहर्षता यांची तीव्र नासाशोथाच्या अपूर्ण शमनास मदत होते. कधीकधी नासाकोटरशोथ किंवा नाकात घालण्याच्या थेंबांचा दुरुपयोग (जरूरीपेक्षा जास्त वेळा वापरणे) यास कारणीभूत असतात. परिसरीय कारणांमध्ये धुळीचे वाफारे व अयोग्य हवामान यांचा समावेश होतो. नाकातील श्लेष्मकला सुजलेली व लाल दिसते. श्वसनमार्ग मोकळा नसतो व कालांतराने सकेसल कोशिकांच्या ऐवजी घनाकार किंवा स्तरित कोशिका पृष्ठभाग व्यापतात. पुढे श्लेष्मकलेची अतिवृद्धी होते.

लक्षणांमध्ये अवरोध हे प्रमुख लक्षण असते. सुरुवातीस अधून मधून जाणवणारा अवरोध नंतर कायम जाणवतो. स्राव चिकट असून सकाळी दीर्घकाळपर्यंत शिंकरून आणि घसा खाकरून खाकरून तो काढावा लागतो. कर्ण-नासाग्रसनी नलिका (तोंड, नाक, घसा आणि कानाचा पडदा यांमध्ये संबंध प्रस्थापित करणारी नलिका) शोथामुळे बंद झाल्याने कमी ऐकू येते. डोकेदुखी, तोंड उघडे ठेवून झोपणे वगैरे लक्षणे उद्‌भवतात. कधीकधी या रोगाचा परिणाम म्हणून नासाकोटरशोथ उद्‌भवतो.

सुरुवातीस मोकळ्या हवेत व्यायाम करणे, तपकीर न ओढणे, तसेच परिसरीय कारणे काढून टाकणे या उपायांनी आराम पडतो. सोबतच हिस्टामीनरोधक औषधे उपयुक्त असतात. एफेड्रीन द्रवाशिवाय कोणतेही थेंब नाकात घालू नयेत. या उपायांनी बरे न वाटल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा. स्थानिक इंजेक्शने, अग्निकर्म आणि कधीकधी शस्त्रक्रिया उपयुक्त ठरतात.

(आ) या विकृतीला ‘पीनस’ असेही म्हणतात. तरुणवयात तसेच वृद्धावस्थेत आढळणाऱ्या या विकृतीत नाकातील श्लेष्मकलेची अपपुष्टी होते. तीमध्ये बदल होऊन तंतुमय ऊतकाची अधिक वाढ होते, ग्रंथींची अपपुष्टी होऊन रक्तवाहिन्या अरुंद होतात. नासाकोटरातील श्लेष्मकलेवरही असेच परिणाम होतात. नाकाला कोरड पडणे, डोकेदुखी तसेच नाकात खपल्या धरल्यामुळे श्वासोच्छ्‌वासास अवरोध होतो. मध्यम वयस्कर व्यक्तीत उष्ण, कोरड्या व धूळमिश्रित हवेत काम करणाऱ्या, तसेच काही औद्योगिक व्यावसायिकांत आढळणाऱ्या या रोगाला ‘शुष्क नासाशोथ’ म्हणतात. याच रोगाच्या एका प्रकाराचे स्त्रियांतील प्रमाण अधिक आढळते व त्यात स्राव अतिदुर्गंधीयुक्त असतो. अशा व्यक्तीचा सहवासही अगदी असह्य असतो. रोग्याला स्वतःला ही दुर्गंधी जाणवतही नाही कारण त्याला गंधज्ञान नसते. या प्रकाराला ‘अपीनस’ (ऊझीना) म्हणतात.

नाकाची श्लेष्मकला कोरडी पाडणाऱ्या कोणत्याही कारणामुळे पीनस हा रोग उद्‌भवू शकतो. त्याचे निश्चित कारण अजून अज्ञात आहे. अनेकांच्या मताप्रमाणे नाक व नासाकोटरे यांचे दीर्घकालीन पूयीभवन त्यास कारणीभूत असावे.

उपचारामध्ये नाक नेहमी स्वच्छ ठेवणे हा महत्त्वाचा भाग असून विशिष्ट पिचकारीने दिवसातून चार वेळा नाक धुवून काढावे. नाक धुतेवेळी तोंडाने श्वास घ्यावयास सांगावा. त्यामुळे धुण्याचा विद्राव (सोडियम बायकार्बोनेट २५% आणि सोडियम क्लोराइड ५०% भुकटीच्या मिश्रणाचा, / चहाचा चमचा भुकटी एक कपभर कोमट पाण्यात या प्रमाणात मिसळलेला विद्राव) श्वसनमार्गात शिरणार नाही. खपल्या बसू नयेत म्हणून २·५% ग्लुकोजाचा ग्लिसरीनमिश्रित विद्राव नाकात फवारावा. अपीनस या रोगात नाक धुतल्यानंतर इस्ट्रॅडिओल असलेल्या विद्रावाचा फवारा उपयुक्त ठरतो. उपदंश, क्षयरोग यांसारखे सार्वदेहिक रोग नसल्याची खात्री करून घ्यावी. औषधी उपचारांनी गुण न आल्यास विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करतात.

नासा–मांसवृद्धी: (नाकातील मोड). एका किंवा बहुधा दोन्ही बाजूंस नाकात लोंबकळणाऱ्या (देठ असल्यामुळे) मांसल गोळ्यांना मोड म्हणतात. बहुतेक सर्व मोड मध्यशुक्तिका आणि तितवास्थीवरील श्लेष्मकलेपासून बनतात. ७५% मोड अधिहर्षताजन्य असावेत. कधीकधी ते नाकपुडीबाहेर आलेले दिसतात. वारंवार होणारी सर्दी, नासाकोटरशोथ वा विचलित नासापटल रोगोत्पादनास मदत करतात. या मांसल गोळ्यांच्या पोटात द्रव असतो आणि त्यामधील बहुसंख्य कोशिका अरुणकर्षी प्रकारच्या असतात. श्वासोच्छ्‌वासात अडथळा, डोकेदुखी वगैरे लक्षणे प्रामुख्याने आढळतात.

उपचारामध्ये प्रामुख्याने शस्त्रक्रियांचा समावेश असल्यामुळे तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

विचलित नासापटल : या विकृतीत नासापटल नेहमीप्रमाणे मध्यरेषेत न राहता डाव्या किंवा उजव्या बाजूस झुकलेले असते.

आ.११. उजव्या बाजूस झुकलेले नासापटल

ही विकृती परिवर्धनजन्य किंवा आघातजन्य असते. तिचे दोन प्रकार आढळतात : (अ) उपास्थिमय व (आ) अस्थिमय. दोन्ही प्रकारांत अवरोध हे प्रमुख लक्षण असते. कधीकधी सर्दी लवकर बरी न होण्याचे कारण शोधताना ही विकृती प्रथमच दिसते. अनेक वेळा या विकृतीत कोणतेही लक्षण आढळत नाही व त्रासही होत नाही. म्हणून सहज तपासणीत ती आढळल्यास रोग्याचे लक्ष तिकडे मुद्दाम वळवू नये. इतर विकृतीचे विचलित नासापटल हे कारण असल्यास व जरूर असल्यास शस्त्रक्रिया करतात.

नासाकोटरशोथ : नासाकोटरांच्या श्लेष्मकलास्तराच्या दाहयुक्त सुजेला नासाकोटरशोथ म्हणतात. अनेक वेळा नाकातील संक्रामणाच्या फैलावापासून तो उत्पन्न होतो. कोणत्याही नासाकोटरातील स्रावाच्या निचऱ्यात अडथळा आल्यास, तसेच त्यामध्ये हवा खेळण्यास व्यत्यय आला म्हणजे तेथे शोथ उत्पन्न होतो. एकदा सूक्ष्मजंतू संक्रामणाने घर केले म्हणजे रोग सहसा आपोआप बरा होत नाही. कोणत्याही कारणामुळे नाकाचा मार्ग, विशेषेकरून मध्यनासाद्वार अरुंद बनल्यास निचरा होण्यात अडथळा येऊन नासाकोटरशोथ होण्यास मदत होते. विचलित नासापटल, बाह्य पदार्थ काही काळ अडकून पडणे आणि अर्बुदे अशी अरुंदता आणण्यास कारणीभूत होतात. हवेतील अती आर्द्रता किंवा अती शुष्कता रोगोत्पादनास मदत करतात. उत्तर-हन्वस्थीय नासाकोटरांचा शोथ पुष्कळ वेळा वरच्या जबड्यातील दंतमूलाशी असलेल्या संक्रामणापासून उद्‌भवतो. नाकाचा तीव्र शोथ चालू असताना एकसारखे नाक शिंकरण्याने (साफ करण्याच्या उद्देशाने) संक्रामण नासाकोटरात फैलावते. कोणत्याही तीव्र अवस्थेत तेवढ्याच कारणाकरिता नासा-अभिसिंचन (नेझल डूश) करू नये. पाण्यात उंचावरून सूर मारतेवेळी किंवा पाण्याखाली पोहताना संक्रामणयुक्त पदार्थ नासाकोटरात जोराने ढकलले जाण्याची शक्यता असते.

नासाकोटरातील श्लेष्मकलेचा शोथ अधिक स्रावोत्पादन करतो व त्या स्रावाचे पूयीभवन होते. कधीकधी कोटराची सबंध पोकळीच सुजलेल्या श्लेष्मकलेने व्यापली जाते. श्लेष्मकलास्तराखालील ऊतक, त्याखालील पर्यास्थिकला व हाडापर्यंत संक्रामणाचे दुष्परिणाम पसरतात. कधीकधी एकाच बाजूच्या सर्व कोटरांतून रोग पसरतो किंवा दोन्ही बाजूंची नासाकोटरे रोगग्रस्त होतात, या दुसऱ्या प्रकाराला ‘पूर्णनासाकोटरशोथ’ म्हणतात.

कोणत्याही नासाकोटराच्या शोथात पुढील लक्षणे सर्वसाधारणपणे आढळतात. डोकेदुखी किंवा वेदना, सार्वदेहिक अस्वस्थता, शारीरिक तापमानात वाढ व नाडीची गतिवाढ. नाकातून स्राव येईलच असे नाही. जे कोटर रोगग्रस्त असेल त्यावरील विशिष्ट जागी स्पर्शासह्यता वाढलेली असते. (१) ललाटास्थीय नासाकोटर : भुवईवर बोटाने हलका ठोका मारल्यास स्पर्शासह्यता जाणवते. (२) तितवास्थीय नासाकोटर : डोकेदुखी खोलवर डोळ्यांच्या मागे असून स्पर्शासह्यता आतल्या नेत्रकोणाजवळ असते. (३) उत्तर-हन्वस्थीय नासाकोटर : चेहऱ्यावरील उत्तर-हन्वस्थीय खाचेत बोटाने दाबल्यास स्पर्शासह्यता जाणवते. (४) जतुकास्थीय नासाकोटर : डोकेदुखी अतिशय खोल मस्तकाच्या मध्यबिंदूजवळ असते.

नाकाच्या तपासणीत नासाकोटरशोथात काही विशिष्ट लक्षणे आढळतात. रोगट नासाकोटराजवळची नाकातील श्लेष्मकला लाल व शोफयुक्त (द्रवयुक्त सूज असलेली) दिसते. अग्रगटातील नासाकोटरांच्या शोथात मध्यशुक्तिका लाल, सुजलेली आणि तुकतुकीत दिसते. पश्चगटातील नासाकोटरशोथात नाकाच्या वरच्या व पश्चभागातील श्लेष्मकलेवर परिणाम होतात. कधीकधी पूयुक्त स्राव छिद्रातून बाहेर पडताना स्पष्ट दिसतो. त्याकरिता अग्र आणि पश्च अशा दोन्ही नासादर्शन तपासण्या करणे जरूर असते. पश्च नासादर्शन विशिष्ट आरशाच्या मदतीने करावे लागते व ही तपासणी कष्टसाध्य असते.

आ.१२. पश्च नासादर्शन : (१) आरसा, (२) नासागिलायू (तुटक रेषेने परावर्तित किरण दाखविलेला आहे).

नासाकोटरशोथाचे दोन प्रकार आहेत : (१) तीव्र आणि (२) चिरकारी. उपचार प्रकारावर अवलंबून असतात. नासाकोटरे निरोगी राहण्याकरिता सकेसल कोशिकांच्या केसांची हालचाल आणि कोटरांची छिद्रे कधीही बंद न पडणे आवश्यक असतात. सर्व इलाजांचा प्रमुख हेतू ही अवस्था कायम ठेवण्याचाच असतो.

(१) तीव्र नासाकोटरशोथामध्ये औषधी उपचार बहुधा गुणकारी ठरतात. खेळती हवा असलेल्या खोलीत अंथरुणावर पडून राहून रोग्याने विश्रांती घेणे जरूर असते. कोटरातील स्रावाचा निचरा होण्यास मदत करण्याकरिता रक्ताधिक्य कमी करणारी औषधे असलेले  थेंब किंवा फवारे वापरावेत. औषधामध्ये एफेड्रीन किंवा टुआमीन असलेले नाकात घालण्याचे थेंब सर्वांत जास्त गुणकारी आहेत.

आ.१३. नाकात थेंब घालतेवेळी रोग्याने डोके टेकविण्याची पद्धत (ज्या नाकपुडीत थेंब घालावयाचे ती कलती असावी).

मेंथॉल वा फ्रायर्सबालसम (बेंझोइन टिंक्चर मिश्रण) यांचा वाफारा घ्यावा. रोगाचा जोर असल्यास सल्फॉनामाइडे किंवा प्रतिजैव औषधे देतात. ही औषधे देण्यापूर्वी स्रावाची तपासणी करून कोणते सूक्ष्मजंतू रोगकारक आहेत, हे ठरविणे हितावह असते. औषधांनी आराम न पडल्यास शस्त्रक्रिया करून निचरा योग्य होईल, अशी योजना करावी लागते. प्रत्येक नासाकोटराकरिता विशिष्ट शस्त्रक्रिया आहेत.

(२) चिरकारी शोथात नाक अभिसिंचनाद्वारे स्वच्छ ठेवणे, नाकात औषधियुक्त थेंब घालणे वगैरे उपाय करून बघतात. क्ष-किरण तपासणी आवश्यक असते व या तपासणीत रोग गंभीर आढळल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.

आयुर्वेदीय चिकित्सा: पहा शल्यतंत्र व शल्यशालाक्य-नासारोग.

गोसावी, द. कृ. भालेराव, यं. त्र्यं. परांडेकर, आ. शं. रानडे, म. आ.

संदर्भ : 1. Cleveland, P. H. Integrated Principles of Zoology, Tokyo, 1966.

            2. Ellis, M., Ed. Modern Trends in Diseases of the Ear, Nose and Throat, Washington, D.         C., 1954.

            3. Hall, I. S. Colman, B. H. Diseases of the Nose, Throat and Ear, Edinburgh, 1975.

            4. Hollinshead, W. H. Textbook of Anatomy, New York, 1962.

            5. Parker, T. J. Haswell, W. A. A textbook of Zoology, 2 Vols., London, 1963.

            6. Romer, A. S. The Vertebrate Body, Bombay, 1965.