आयर्लंड, प्रजासत्ताक: (आयर). आयर्लंड बेटाच्या ईशान्येचा अल्स्टर प्रांताच्या सहा परगण्यांचा मिळून झालेला व युनायटेड किंग्डममध्ये समाविष्ट असलेला उत्तर आयर्लंड हा भाग वगळता बाकीचा भाग म्हणजे आयर्लंड प्रजासत्ताक होय. हे १८ एप्रिल १९४९ ला अस्तित्वात आले.

इंग्लंडच्या पश्चिमेस अटलांटिक महासागरात ५१३०’ उ. ते ५५३०’ उ. व ६ प. ते १०३०’ प. यांच्या दरम्यान हा देश आहे. याचे क्षेत्रफळ ७०,२८३ चौ. किमी. व लोकसंख्या २९,७१,२३० (१९७१) आहे. याच्या ईशान्येस उत्तर आयर्लंड, पूर्वेस व आग्नेयीस सेंट जॉर्जेस चॅनल व आयरिश समुद्र आणि उत्तरेस, दक्षिणेस व पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे. आयरिश प्रजासत्ताकाची राजधानी डब्लिन आहे.

भूवर्णन : पहा : आयर्लंड.
इतिहास : पहा : आयर्लंड

राजकीय स्थिती : १८ एप्रिल १९४९ रोजी पूर्वीच्या आयरिश फ्री स्टेटचा कायापालट होऊन स्वतंत्र सार्वभौम आयरिश प्रजासत्ताक राज्य जन्मास आले. त्यापूर्वी काही महिने आयर्लंड ब्रिटिश राष्ट्रकुलातून बाहेर पडला होता. हल्ली आयर्लंडचे प्रशासन १९३७ च्या संविधानानुसार चालते. या संविधानानुसार देशाचे नाव आयर ठेवण्यात आले. त्यात २६ परगण्यांचा अंतर्भाव आहे. आयर म्हणजे सर्व आयरिश भूमी असा अर्थ असला तरी उत्तर दक्षिणेचे एकीकरण होईपर्यंत आयरच्या विधिमंडळाने केलेले कायदे पूर्वीच्या आयरिश फ्री स्टेटमधील मुलुखाला लागू होतील असे स्पष्टीकरण संविधानात आहे.

आयरचे प्रशासन लोकनियुक्त राष्ट्रपतीच्या नावाने चालते. राष्ट्रपतीची निवडणूक दर सात वर्षांनी होते व कोणालाही लागोपठ दोहोपेक्षा जास्त वेळ राष्ट्रपतिपदावर राहता येत नाही. आयरची संसद द्विगृही असून लोकसभेला डेल आयरीन (प्रतिनिधी सभा) व वरिष्ठ गृहाला सीनेड आयरीन (सीनेट) म्हणतात. लोकसभेचे व वरिष्ठ गृहाला सीनेड आयरीन (सीनेट) म्हणतात. लोकसभेचे १४७ व सीनेटचे ६० सभासद असतात. सीनेटच्या सभासदांपैकी ११ सभासदांची नेमणूक महामंत्री करतोविद्यापीठांचे ६ प्रतिनिधी असतात व बाकीच्यांची निवड निरनिराळ्या व्यावसायिक गटांचे प्रतिनिधी करतात. शासनप्रमुख म्हणून राष्ट्रपती महामंत्र्याची नेमणूक करतो व महामंत्री ७ ते १५ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ नेमतो.

फियाना फेल (रिपब्लिकन पार्टी), फाइनगेल, लेबर हे आयर्लंडमधील प्रमुख राजकीय पक्ष असून इतर लहान लहान गटही देशात आहेत. लहान पक्षांचे सभासद विधिमंडळात व पुष्कळदा मंत्रिमंडळातही असतात.

आयरमधील २६ परगण्यांचे शासन कांऊटी कौन्सिल, बरो कौन्सिल व अर्बन कौन्सिल यांमार्फत चालते. यांच्यावर मध्यवर्ती शासनाचे नियंत्रण असते. रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य, गृहनिर्माण, शिशुसंगोपन इ. विषय स्थानिक प्रशासनाच्या कक्षेत येतात. त्यासाठी त्यांना मध्यवर्ती शासनाचे अनुदान मिळते व स्थानिक करही बसविता येतात.

आयर्लंडच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश व चार सहकारी न्यायाधीश असतात. खालच्या न्यायालयांच्या निर्णयाविरुद्ध अपीले हे कोर्ट ऐकते. उच्च न्यायालय हे त्याखालचे न्यायालय असून त्यात मुख्य न्यायाधीश व सहा इतर न्यायाधीश असतात. विधिमंडळाने केलेले कायदे वैध-अवैध ठरविण्याचा अधिकार हायकोर्टाला आहे. हायकोर्टाच्या कक्षेत ३६ जिल्हा न्यायालये, ९ प्रांतिक न्यायालये व फौजदारी खटल्यातील अपीले ऐकणारे उच्च न्यायालय अशी न्यायालये असतात.

आयर्लंडच्या सैनिक दलात एकूण १३,००० सैनिक आहेत. किनाऱ्याच्या रक्षणापुरते आरमार व लहानसे ५५० लोकांचे (१९६९) हवाईदल आयरजवळ आहे. राखीव स्वयंसेवक दल १९६९ मध्ये २४,२०० स्वयंसेवकांचे होते. वर्षाचे काही आठवडे त्यांना लष्करी शिक्षण घ्यावे लागते. आयरमध्ये लष्करी सेवा व भरती सक्तीची नाही. संयुक्त राष्ट्रांच्या सायप्रसमधील दलात आयरिश पथक आहे. तसेच लेबानन, न्यू गिनी, भारत, पाकिस्तान, मध्यपूर्व येथेही संयुक्त राष्ट्रांतर्फे आयरिश अधिकारी काम करीत असत.

आर्थिक स्थिती : आयर्लंड कृषिप्रधान देश असून सुपीक शेतजमीन व गवताळ कुरणे ही देशाची नैसर्गिक संपत्ती होय. तांबे, जस्त, शिसे, जिप्सम यांच्या खाणी आयर्लंडमध्ये असून इमारती दगड, संगमरवर, स्लेट इ. खनिजेही सापडतात. पीटची गणना आयर्लंडच्या महत्त्वाच्या नैसर्गिक खनिजसंपत्तीत करावयास पाहिजे. याचा इंधनासाठी सर्वत्र उपयोग होतो. आयर्लंडमधील काही औष्णिक वीजकेंद्रेही पीटवर चालतात. प्राचीन काळी येथे विपुल जंगले होती. शेती लागवडीसाठी व इंधनासाठीही पुष्कळ जंगलतोड झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरकारने खास जंगल आयोग नेमून जंगल विकासाचा कार्यक्रम अंमलात आणला आहे. राय, बार्ली, ओट, गहू ही धान्ये व गवत, भाजीपाला, बटाटे, सलगम, बीट ही आयर्लंडची प्रमुख पिके होत. पशुसंवर्धन हा आयर्लंडचा महत्त्वाचा व्यवसाय असून तज्जन्य दुग्ध-मांसव्यवसाय भरभराटीत आहेत. देशात जून १९६९ मध्ये ५६·९ लक्ष गुरे, ४०,०६,२०० मेंढ्या, ११,१५,५०० डुकरे, १·२५ लक्ष घोडे व तट्टे आणि १,०३,३४,६०० कोंबड्याबदके होती. मच्छीमारीत कॉड, ईल, हेरिंग, हॅडॉक, लॉबूस्टर, प्लेस सॅमन, कोलंबी इत्यादींचे उत्पादन होते.

आयर्लंडमध्ये उद्योगधंद्यांची वाढ विशेष झालेली नाही. विविध खाद्यपदार्थ, तंबाखूचे पदार्थ, स्टाऊट (बीअर), कापड, विजेची उपकरणे, रसायने व रासायनिक खते यांचे कारखाने आयर्लंडात असून, अलीकडे जलविद्युत व औष्णिक वीज केंद्रातून उद्योगधंद्यांना विजेचा पुरवठा केला जातो.

आयर्लंडचा आयातनिर्यात व्यापार मुख्यत: ग्रेट ब्रिटन, उत्तर आयर्लंड, अमेरिका, पश्चिम जर्मनी, कॅनडा, बेल्जियम, लक्सेंबर्ग इ. देशांशी चालतो. कोळसा, धान्य, यंत्रे, लोखंड, धातूचे विविध पदार्थ, मोटारी, तेल, पोलाद, डांबर, कापड इत्यादींची आयात आणि लोणी व अंडी, मद्ये, घोडे व अन्य जनावरे कोंबड्या यांची निर्यात प्रमुखत्वाने होते. १९६७ मध्ये ३९·०५ कोटी पौंडांचा माल आयात व २८·४४ कोटी पौंडांचा निर्यात झाला. ब्रिटनकडून ५०%, अमेरिकेकडून ८% व पश्चिम जर्मनीकडून ६% आयात झाली. ब्रिटनकडे ७२% , अमेरिकेकडे ९% निर्यात झाली. त्यात मांस २१%, गुरे १८%, कापड ८%, दुधाचे पदार्थ ७% होते. १९६५ मध्ये ग्रेट ब्रिटन व आयर्लंडमध्ये उभयतांतील मुक्त व्यापारासंबंधी करार झाला. तदनुसार जुलै १९६६ पासून ग्रेट ब्रिटनमध्ये आयात होणाऱ्या आयरिश मालावर जकात माफ व्हावयाची व आयर्लंडने ब्रिटिश मालाच्या आयात करात १४% कपात करावयाची ठरले. काही अपवाद वगळता १९७५ पर्यंत सर्व जकाती रद्द व्हावयाच्या आहेत. आयरिश पौंड हे चलन असून ते स्टर्लिंगच्या व २·४० डॉलरच्या बरोबरचे आहे.

आयर्लंडमध्ये १९६८ मध्ये सर्व प्रकारचे मिळून सु. ८६,४२७ किमी. लांबीचे रस्ते व २,१४७ किमी. लोहमार्ग होते. डब्लिनच्या कालिंग्जटाऊन व लिमरिकच्या शॅनन विमानतळावरून देशोदेशांशी विमानवाहतूक चालते. डब्लिन, कॉर्क, वॉटरफर्ड, लिमरिक इ. बंदरांतून बोटींनी वाहतूक होते. शॅनन नदी व ग्रँड आणि रॉयल कालवे हे प्रमुख अंतर्गत जलमार्ग आहेत. १९६७ मध्ये २,२१८ डाकघरे, १,४२० तारायंत्रे व १९६८ अखेर २,७४,१३४ दूरध्वनीयंत्रे, ८,६०,००० बिनतारी यंत्रे व ४,४१,००० दूरचित्रवाणीयंत्रे होती. पर्यटन विभागाला १९६७ मध्ये सु. ७ कोटी पौंड उत्पन्न झाले.


लोक व समाजजीवन : बहुसंख्य आयरिश लोक केल्टिक व केल्टिक-नॉर्मन अशा मिश्र वंशाचे आहेत. ९५% लोक रोमन कॅथलिक पंथी ख्रिश्चन आहेत. मात्र घटनेने धर्मस्वातंत्र्याची ग्वाही दिलेली असल्याने अन्य पंथीय लोक देशात समाधानाने राहतात. गेलिक (आयरिश) व इंग्लिश अशा दोन्ही भाषा आयर्लंडमध्ये प्रचलित आहेत. रस्त्यावरील पाट्या, शासकीय व अन्य दस्तैवज सामान्यत: दोन्ही भाषांत असतात व शाळांतून दोन्ही भाषा शिकविल्या जातात. आयरिश प्रजासत्ताकात सु. पन्नास टक्के लोक शहरी भागांत व बाकीचे ग्रामीण भागांत राहतात.

आयरिश कुटुंबात सामान्यत: ६-७ व्यक्ती असतात. अपुरी शेतजमीन, व्यवसायाचा अभाव इत्यादींमुळे आयरिश स्त्रीपुरुष बऱ्याच उशीरा म्हणजे वयाच्या तीस वर्षाच्या पुढे विवाहबद्ध होतात. अपुऱ्या उत्पन्नामुळे देशांतर करणार्‍यांचे प्रमाणही आतापर्यंत पुष्कळच होते. ग्रामीण भागातील घरे गवताच्या किंवा पानांच्या छपरांची दोनतीन खोल्यांची असतात. नवीन घरे मात्र कौलारू व दगडी बांधणीची दिसतात. शहरातील घरे तीनचार मजली, दगडविटांची असतात.

बटाटे, कांदे, मांसांच्या तुकड्यांचा रस्सा, ओटच्या पिठांचा पातळ सांजा, कोबी यांचा समावेश आयरिश लोकांच्या आहारात मुख्यत: होतो. आयरिश व्हिस्की व स्टाऊट नावाची बीअर ही पेये येथे लोकप्रिय आहेत.

आयरिश लोकांना खेळांची व अश्वारोहणाची खूप आवड आहे. आयरिश घोडे विख्यात असून किल्डेअर शहराची आयरिश डर्बी व डब्लिनची ग्रँड नॅशनल ह्या घोड्यांच्या शर्यतीकडे जगातील कित्येक लोकांचे लक्ष असते. सॉकर, मुष्टियुद्ध, हर्ली (हॉकीसारखा खेळ), गेलिक फुटबॉल इ. खेळही लोकप्रिय आहेत.

रोमन कॅथलिकांचे सर्व सण व उत्सव आयर्लंडमध्ये साजरे होतात. आन टोस्टाल नावाचा उत्सव ईस्टरपासून तीन आठवडे चालतो. त्यात नाटक, तमाशा, मिरवणूकी, गायन वगैरे कार्यक्रम होतात. नाटकाचीही आयरिश लोकांना फार आवड आहे.

आयर्लंडमध्ये सहा ते चौदा वर्षांच्या मुलामुलींना शिक्षण सक्तीचे असून प्राथमिक शिक्षण सामान्यत: नि:शुल्क आहे. प्राथमिक शाळा शासकीय व माध्यमिक शाळा खाजगी असून त्यांपैकी बहुसंख्य रोमन कॅथलिक चर्चमार्फत किंवा चर्च ऑफ आयर्लंडमार्फत चालविल्या जातात. या शिक्षणसंस्थांना सरकारी अनुदान मिळते. बहुतेक शहरांत व मोठ्या गावांत धंदेशिक्षणाच्या शाळा असून त्यांत कृषी, व्यापार व तांत्रिक शिक्षण देण्यात येते. डब्लिन विद्यापीठ (स्थापना १५९१) व नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आयर्लंड (१९०८) ही आयर्लंडमधील विद्यापीठ असून, मेनूथ येथील धर्मशास्त्राच्या विद्यापीठाची गणनाही प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांत होते. १९६९-७० मध्ये ४०७३ शासकीय, प्राथमिक शाळांत ४,५३,५२५ विद्यार्थी व १९६८-६९ मध्ये १,४०० शिक्षक, १९७०-७१ मध्ये ५९९ माध्यमिक शाळांत १,५०,६९० विद्यार्थी व ६,७९७ शिक्षक, धंदेशिक्षण-शाळांत १,०५,७४२ विद्यार्थी व ४,६२६ शिक्षक, शिक्षकप्रशिक्षण संस्थात १,७३६ विद्यार्थी, १९६९-७० मध्ये उच्च शिक्षण घेणारे १८,८८० विद्यार्थी व त्यांच्यासाठी १,१९४ शिक्षक होते.

आयर्लंडचा वृत्तपत्र व्यवसाय मुख्यत: डब्लिनला केंद्रित असून देशात आठ दैनिक व साठ साप्ताहिके आहेत. दूरवाणी व डाकतार खाती, तसेच नभोवाणीकेंद्रे शासनातर्फे चालविली जातात.

कला : पाचव्या शतकापासून ख्रिस्ती मठवासीयांच्या परिश्रमांमुळे आयर्लंडमध्ये साहित्यकलादींना मोठा बहर आला व विद्याकलांचा अन्य देशांतही मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. अनेक मठवासीयांनी आपली हस्तलिखिते विविध प्रकारांनी सजविली. त्यांपैकी एक बुक ऑफ डरो बुक ऑफ केत्स ही नव्या कराराची हस्तलिखिते प्रख्यात आहेत. शिल्पज्ञांनी दगडावर कोरलेले व विविधप्रकारे सजविलेले क्रॉस, पूजेची भांडीकुंडी, विविध अलंकार इ. प्राचीन आयरिश कलाकृती आजही चित्तवेधक वाटतात.

एकोणिसाव्या शतकातील आयरिश स्वातंत्र्यचळवळीचा भाग म्हणून आयरिश साहित्य-कलादींच्या उत्कर्षासाठी पुष्कळ प्रयत्न झाले. आयरिश हायबर्निया अकादमी या संस्थेने चित्रकारांना उत्तेजन दिल्याने जॉन कीटिंग, मॉरिस, माक्‌गोनिगल, एस्टेल सॉलोमन इ.  चित्रकारांना आजच्या यूरोपीय चित्रकारांत महत्त्वाचे स्थान मिळविता आले. थेली कॉनली, जिरारी डिलन, डॅन्येल ओनील व जॅक येटस् हे अलीकडील आयरिश चित्रकारही ख्यातनाम आहेत. आयरिश लोकसंगीत व नृत्यालाही फार प्राचीन परंपरा असून अलीकडे जॉन माकॉर्मकच्या प्रयत्नाने आयरिश लोकसंगीताचा पुष्कळच प्रचार झाला आहे. विणकाम, भरतकाम वगैरे कलांतही आयरिश स्त्रीपुरुष प्राचीन काळापासून निष्णात आहेत.

भाषा व साहित्य : प्राचीन काळी आयर्लंडमध्ये ओगॅम नावाची खुणांची लिपी प्रचलित होती. पण साहित्य लिपिबद्ध करण्याइतकी ती विकसित नव्हती. साहजिकच तत्कालीन साहित्य म्हणजे संतकथा. गद्यपद्यात ह्या कथा सांगणाऱ्या भटक्या भाटांनी पिढ्यानपिढ्या ह्या साहित्यांचे जतन केले. पाचव्या शतकात ख्रिस्ती धर्माच्या सेंट पॅट्रिक व इतर धर्मप्रसारकांनी आयर्लंडमध्ये रोमन लिपी प्रचलित केली. त्यानंतरच्या दोनचार शतकांतील संतकथा, भावगीते, लोककथा इ. गेलिक भाषेतील साहित्य उपलब्ध असून त्यातील जीवनानुभव, निसर्गप्रेम, भावनांची सखोलता इ. गुणांवरून गेलिक साहित्याचे सुवर्णयुग असे या काळाचे वर्णन केले जाते. मध्ययुगात ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी व मठवासियांनी संतचरित्रे व विविध प्रकारचे धर्मविषयक ग्रंथ लिहिले. आठव्या शतकातील व्हायकिंगांच्या स्वार्‍यांचा वेळी आयर्लंडमधील अनेक हस्तलिखित ग्रंथ नष्ट झाले. नंतरच्या इंग्रजी अंमलात आयरिश भाषा व साहित्य यांची पद्धतशीरपणे गळचेपी झाल्याने आयरिश साहित्याचा निर्मिती जवळजवळ थांबली.

अठराव्या-एकोणिसाव्या शतकांतील राष्ट्रीय चळवळीच्या काळात गेलिक लीग सारख्या संस्थांनी आयरिश भाषेच्या अभिवृद्धीसाठी पुष्कळ प्रयत्न केले. याच काळात विल्यम येट्स, जॉर्ज रसेल (लूइस) यांसारख्या लेखकांनी इंग्लिश भाषेत आयरिश जीवनाला व संस्कृतीला प्राधान्य असलेले साहित्य लिहिले. याचीच परिणती आयर्लंडातील साहित्यिक प्रबोधनात झाली. या प्रबोधनकाळात आयरिश नाट्यकलेला विशेष बहर येऊन लेडी ग्रेगरी, शॉन ओकेसी, जॉन मिलिंग्टन सिंग इत्यादींच्या नाट्यकृतींनी लोकांना आकृष्ट केले.

अनेक आयरिश साहित्यिकांनी इंग्लिश लेखकांत मानाचे स्थान मिळविले आहे. जॉनाथन स्विफ्ट, ऑलिव्हर गोल्डस्मिथ, टॉमस मुर, जेम्स जॉइस, पॉद्रिक कॉलम, जेम्स स्टीफन्स, ऑस्कर वाईल्ड, बर्नार्ड शॉ हे त्यांत अग्रगण्य होत. (चित्रपत्र २१).

ओक, द. ह.


आयर्लंड

लेक नदीकाठावरील कॉर्क शहर डब्लिन: एक दृश्य  ग्रामीण भागात अनेकदा वापरली जाणारी गाढवाची गाडी