म्येच्‌न्यिकॉव्ह, इल्या इल्यीच : (१५ मे १८४५–१६ जुलै १९१६). रशियन जीववैज्ञानिक. रोगप्रतिकारक्षमते विषयीच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना ⇨ पॉल अर्लिक यांच्या समवेत १९०८ सालच्या शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयाच्या नोबल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

म्येच्‌न्यिकॉव्ह यांचा जन्म खारकॉव्हजवळील इव्हानफ्‌क येथे झाला. खारकॉव्ह विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर काही काळ त्यांनी जर्मनीतील गटिंगेन, गीसेन व म्यूनिक येथील प्रयोगशाळात अध्ययन केले. १८६७ मध्ये रशियाला परतल्यावर त्यांनी सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी सेंट पीटर्झबर्ग व ओडेसा येथे प्राणिविज्ञानाचे अध्यापन केले आणि पुढे १८७३–८२ या काळात ते ओडेसा येथे प्राणिविज्ञान व तुलनात्मक शरीररचनाविज्ञान या विषयांचे प्राध्यपक होते.

इ. स. १८८२ मध्ये ते इटलीतील मेसीना येथे संशोधन करण्यासाठी गेले. तेथे तारामिनाच्या डिंभासंबंधी (भ्रूणानंतरच्या स्वंतत्रपणे जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यातः क्रियाशील असलेल्या पूर्व अवस्थेसंबंधी) संशोधन करीत असताना त्यांना असे आढळून आले की पचनक्रियेशी संबंधित नसलेल्या काही कोशिका (पेशी) शरीरात बाहेरून आलेल्या कणांना वेढून त्यांचे भक्षण करतात. या कोशिकांना त्यांनी फॅगोसाइट्‌स (भक्षिकोशिका) असे नाव दिले. या कोशिका मानवी शरीरातही आढळतात व त्या रक्तातील पांढऱ्या कोशिकाच आहेत असे त्यांनी दाखविले. या कोशिका रक्तातील सूक्ष्मजंतू व इतर बाह्य पदार्थ भक्षण करून शरीराचे रोगापासून रक्षण करण्याच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी करतात असे त्याना आढळून आले. हे कार्य त्यांनी इंट्रा–सेल्यूलर डायजेशन (१८८२), द कंपॅरेटिव्ह पॅथॉलॉजी ऑफ इन्फ्लेमेशन (१८९२) आणि इम्युनिटी इन इनफेक्शन डिसिझेस (१९०५) या ग्रंथांद्वारे प्रसिद्ध केले.

ओडेसा येथे नव्याने स्थापन झालेल्या सूक्ष्मजंतुवैज्ञानिक संस्थेच्या संचालकपदावर म्येच्‌निकॉव्ह यांची १८८६ मध्ये नेमणूक झाली परंतु १८८८ मध्ये ते पॅरिस येथे लूई पाश्चर यांच्या समवेत संशोधन करण्यासाठी गेले आणि त्यानंतर मृत्यूपावेतो त्यांनी पाश्चर इन्स्टिट्यूमध्येच काम केले. १९०३ मध्ये प्येर रू यांच्याबरोबर काम करून माकडांमध्ये ⇨ उपदंश हा रोग संक्रमित करण्यात त्यांनी यश मिळवले. जठरांत्र मार्गातील (जठर व आतडी यांनी बनलेल्या पचन मार्गातील) संसर्गी सूक्ष्मजंतुंसंबंधीही त्यांनी संशोधन केले. आयुष्याच्या उत्तर काळात त्यांनी मानवातील वयोवस्थेचे (कालानुसार शरीराच्या अवस्थेत होणाऱ्या बदलांचे) कारक व दिर्घायुषी होण्याचे मार्ग यांसंबंधीचे प्रामुख्याने संशोधन केले आणि यासंबंधीचे आपले विचार द नेचर ऑफ मॅन (१९०४) व द प्रोलाँगेशन ऑफ ह्यूमन लाइफ (१९१०) या ग्रंथांद्वारे माडले. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

मिठारी, भू. चिं.