टेलँथीरा फायकॉइडिया : (कुल-ॲमरँटेसी). ही लहान, सरळ ⇨ ओषधी मूळची उष्ण अमेरिकेतील (ब्राझील) असून बागेत शोभेकरिता वाफ्यांच्या कडेने लावलेली सर्वत्र आढळते. खोड बारीक आणि तळाशी सरपटणारे पण पुढे वर चढणारे, कोनयुक्त, रेषांकित, गुळगुळीत किंवा वरून व पानांच्या बगलेत सूक्ष्म लवदार. साधी पाने समोरासमोर, पसरट किंवा खाली वळलेली, आखूड देठाची, रुंद, भाल्यासारखी, बारीक व टोकदार आणि तरंगित कडांची असून जुलै–सप्टेंबरात किरमिजी होतात. फुलांचे झुबके लहान, ०·६–०·८ सेंमी. लांब, बिनदेठाचे, एकेकटे किंवा जोडीने येतात. छदे निमुळती होत गेलेली, टोकदार व बाहेरील संदलापेक्षा बरीच लांब, केसरदले दहा व सर्व सारखी (त्यावरून नाव पडले) व त्यांचा पेला बनलेला निम्मी वंध्य व निम्मी परागधारी [⟶ फूल ॲरमँटेसी]. नवीन लागवड कलमे लावून (किंवा तळाशी विभागून) करतात. हिवाळ्यात काळजी घ्यावी लागते. वेळोवेळी छाटणी करून चांगल्या स्थितीत राखता येतात. आल्टरनँथीरा ॲमाबिलीस या नावानेही ही वनस्पती ओळखतात.

जमदाडे, ज. वि.