आमास्या : तुर्कस्तानच्या उत्तरेकडील याच नावाच्या प्रांताचे मुख्य शहर. लोकसंख्या ३४,१६८ (१९६५). हे येथील इर्माक (आयरिस) नदीकाठी, सामसूनच्या नैर्ऋत्येस ८० किमी. व सिवासच्या वायव्येस १४४ किमी. असून, या दोन शहरांना जोडणाऱ्या सडकेवरील व लोहमार्गावरील व्यापारी पेठ समजले जाते. सेल्जुक तुर्कांचे हे महत्त्वाचे ठाणे होते. त्या वेळेपासून येथे बनविली जाणारी कौले प्रसिद्ध आहेत. याशिवाय सभोवती मोठमोठ्या फळबागा असून सफरचंद, द्राक्षे, तंबाखू, गहू, कांदे, अफू यांचा व्यापार चालतो. ग्रीक भूगोलज्ञ स्ट्रेबो याचे हे जन्मस्थळ होय.
कुमठेकर, ज. ब.