हिरासिंग ‘दर्द’ : (३० सप्टेंबर १८८९–२२ जून १९६५). पंजाबी पत्रकार व साहित्यिक. पाकिस्तानातील रावळपिंडी जिल्ह्यातील घाघरोट येथे जन्म. लहान वयातच त्यांनी ‘दर्द’ या नावाने देशभक्तिपर आणि धार्मिक विषयांवरील कवितालेखनास सुरुवात केली. पुढे दर्द या नावानेच ते ओळखले जाऊ लागले. हिरासिंग यांचे वडील हरिसिंग हे मूळचे पुंछ (जम्मू-काश्मीर) येथील होते. पुढे त्यांनी रावळपिंडी येथे स्थायिक होऊन शीख धर्माचा प्रचार केला. हिरासिंग यांनीही शीख धर्माचा स्वीकार केला होता.
हिरासिंग यांचे शालेय शिक्षण ख्रिश्चन मिशन स्कूल, रावळपिंडीयेथे झाले. त्यांची जकात कारकून म्हणून एका स्थानिक नगरपालिकेत नियुक्ती झाली (१९०७). जकात कारकुनाच्या शासकीय नोकरीचाराजीनामा देऊन ते ल्यालपूर जिल्ह्यात सिंग सभा विद्यालय (चक्क) येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. ही नोकरी करत असतानाच ‘विद्वान’ आणि ‘ग्यानी’ या परीक्षा पंजाब विद्यापीठ, लाहोर येथून ते उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांनी नामांकित ऐतिहासिक शीख व्यक्तींवर आणि घटनाप्रसंगांवर लिहिलेले अनुक्रमे उप्कद्रद्दन दी वन्नगी (१९१२, सॅम्पल्स ऑफ द डीड्स ऑफ चॅरिटी) आणि शीख बच्छिओजदगो (१९१३, वेकअप सिखयुथ) हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. ब्रिटिशांनी जमीनदोस्त केलेल्या गुरुद्वारा रिकबगंजच्या भिंतीची पुनःस्थापना करण्याच्या चळवळीत त्यांनी हस्तपत्रक काढून शीख समाजाला जागृत केले. त्यांनी १९१५ मध्ये गुरुग्रंथसाहिबचे पठण आपल्या शाळेत आयोजित केले आणि कोमागाटा मारू प्रवाशांच्या[हुगळी, कोलकाता (कलकत्ता) येथे इंग्रजांच्या गोळीबारात मरण पावलेल्या] मृतात्म्यांसाठी प्रार्थना केली. तेव्हा त्यांना अटककरण्यात आली.
मास्टर सुंदरसिंग ल्यालपुरी यांनी लाहोर येथून सुरू केलेल्या अकाली या पंजाबी दैनिकाचे हिरासिंग यांनी साहाय्यक संपादक म्हणून काम केले (१९२०) . हे दैनिक ब्रिटिश शासनविरोधी असल्याने हिरासिंग यांना कठोर कारावासाची शिक्षा झाली. १९२४ मध्ये कारागृहातून सुटका झाल्यावर त्यांनी फुलवदन नावाचे वाङ्मयीन मासिक काढले. अमृतसर येथून प्रकाशित होणारे हे दर्जेदार मासिक पंजाबी साहित्यात महत्त्वाचे ठरले. १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनात हिरासिंग यांना अटक झाल्यामुळे फुलवदन हे मासिक बंद पडले. शीख लीगचे सचिव म्हणून तसेच अमृतसर येथील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे सभासद म्हणून ते या आंदोलनात सहभागी होते. पंजाब प्रांतिक काँग्रेस कमिटी आणिऑल इंडिया काँग्रेस कमिटीचेही ते सभासद होते. सर साहेबुद्दीन आणिएस. पी. सिंग यांच्याबरोबरीनेच हिरासिंग हे पंजाबी सभेच्या स्थापनेतील एक संस्थापक होते. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर ते जलंदर येथे स्थायिक झाले. तेथेच त्यांनी फुलवदन मासिक पुन्हा सुरू केले.
हिरासिंग हे डाव्या विचारसरणीचे होते. त्यांनी पंजाबी भाषेत सु. बारा पुस्तके लिहिली. त्यांपैकी छोनावे दर्द सुनेहे (काव्यसंग्रह, तीन भाग, १९१८–२४), श्री बाल गंगाधर टिळक (१९२१), होर अगेरे(काव्यसंग्रह, १९४९), पंथ धर्म ते राजनीती (१९५०), नवीन भारत दे राजसी अगू (१९५२), आज दी तन्द ते होर कहानिया (कथासंग्रह, १९५३) इ. प्रसिद्ध ग्रंथ होत. त्यांनी लिहिलेले मेरिआँ कुछ इतिहासिक यादाँ (१९५५) हे आत्मचरित्रही लक्षवेधक आहे. तसेच पंजाबी साहित्याचा इतिहासही त्यांनी लिहिला. त्यात त्यांची मार्क्सवादी दृष्टी दिसून येते.
जलंदर येथे ते निधन पावले.
संदर्भ : Singh, Mohan, History of Punjabi Literature (1100–1932), Amritsar, 1956.
गुडेकर, विजया म.
“