बलवंत गार्गी : (४ डिसेंबर १९१६-). आधुनिक पंजाबी नाटककार. जन्म भतिंडा जिल्ह्यातील सेहना या गावी. लाहोर येथील ख्रिश्र्चन महाविद्यालयात शिक्षण. पंजाब विद्यापीठातून राज्यशास्त्र व इंग्रजी ह्या विषयांत एम्. ए. ही पदवी मिळविली. नाटक आणि रंगभूमी यांचा अभ्यास करण्यासाठी ते पोलंड, फ्रान्स, इंग्लंड, रशिया व अमेरिका ह्या देशांतही जाऊन आले. १९६४ मध्ये वॉशिंग्टन विद्यापीठात ‘भारतीय रंगभूमी’ या विषयांचे त्यांनी अध्यापन केले. ते पंजाब विद्यापीठात ‘भारतीय रंगभूमी’ विभागाचे प्रमुख होते.

कुआरी टीसी (१९४४), दस्वंध (१९४९), लोहा कुट्ट (१९४९), सैल पत्थर (१९४९), घुग्गी (१९५०), नवाँ मुढ (१९५१), केसरो (१९५२), सोही-महींवाल, कणक दी वल्ली इ. त्यांची उल्लेखनीय नाटके होत. त्यांपैकी केसरो आणि सोहनी-महींवाल ह्या नाटकांचे परदेशांतही प्रयोग झाले आहेत. गार्गी यांच्या नाटकांचे वैशिष्टय म्हणजे नाटकांतून केलेला बोलीभाषेचा परिणामकारक उपयोग व चुरचुरीत, स्फोटक संवाद हे होय. रंगमंचाचे तांत्रिक ज्ञान असल्याने त्यांची नाटके समकालीन पंजाबी ना-टकांपेक्षा अधिक यशस्वी ठरली. शांतता मोहीम, ग्रामीण पुनर्रचना, बां-धीलकी, कलावंतात असलेली स्वत्वाची जाणीव ह्यांसारख्या विषयांनी प्रेरित होऊन त्यांनी वुग्गी, केसरो, सैल पत्थर इ. नाटके लिहिली. धुनी दी अग्ग ह्या नाटकामध्ये प्रेम आणि द्वेष ह्या दोन विरोधी भासणाऱ्या भावनांतील अंतर हिंसेच्या आश्रयाने कमी करण्याच्या मानवाच्या सनातन प्रवृत्तीचे उत्कृष्ट चित्रण आहे.

नाटकांव्यतिरिक्त एकांकिक, लघुकथा, कादंबरी इ. साहित्यप्रकारही गार्गी यांनी समर्थपणे हाताळले आहेत. सात चोणवें एकांगी (१९४९), दो पासे ते होर एकांगी (१९४९), वेबे ते होर एकांगी (१९५१), पत्तन ही बेंन्डी (१९५१) इ. एकांकिकासंग्रह दुल्हे बेर (१९५५) हा कथासंग्रह कक्का रेता (१९४४) ही कादंबरी नीम दे पत्ते हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह इ. त्यांनी लिहिलेली इतर पुस्तके आहेत. यांशिवाय थिएटर ऑफ इंडिया आणि कोक थिएटर ऑफ इंडिया ही दोन इंग्रजी पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या रंगमंच (भारतीय रंगभूमीचा इतिहास  प्रगतीची वाटचाल) ह्या पुस्तकास १९६२ चा साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला.

के. जगजित सिंह (इं.)

ब्रह्मे, माधुरी (म.)

Close Menu
Skip to content