हॉर्नब्लेंड : ⇨ अँफिबोल गटातील या खनिजाचे स्फटिक एक-नताक्ष समूहाचे व प्रचिनाकार असतात. ते स्तंभाकार व तंतुमय रूपांत किंवा समांतर सुयांसारख्या स्फटिकसमूहांत आणि भरड व सूक्ष्म-कणांच्या रूपांतही आढळते [→ स्फटिकविज्ञान]. ⇨ पाटन (110) परिपूर्ण कठिनता ५-६ वि.गु. ३.२ चमक काचेसारखी व तंतुमय प्रकाराची पुष्कळदा रेशमासारखी रंग गडद हिरव्या ते काळ्या छटा कस पांढरा वा रंगहीन दुधी काचेप्रमाणे पारभासी भंजन उपशंखाभ. [→ खनिजविज्ञान].
हॉर्नब्लेंड याची सामान्य रा. सं. (Ca, Na)2 (Mg, Fe, Al)5 (Al, Si)8 O22 (OH, F)2. ॲल्युमिनियम हे मूलद्रव्य ⇨ ट्रेमोलाइटामध्ये नसते, तर हॉर्नब्लेंडमध्ये असते. हा यांत असलेला मुख्य रासायनिक फरक आहे. बंद नळीत हॉर्नब्लेंड तापविल्यास पाणी मिळते. स्फटिकाकार, पाटन व गडद रंग ही हे खनिज वेगळे ओळखण्याची वैशिष्ट्ये आहेत.
हॉर्नब्लेंड हे व्यापकपणे आढळणारे व खडक निर्माण करणारे महत्त्वाचे खनिज असून ते जगभरातील अग्निज व रूपांतरित या दोन्ही खडकांत आढळते. शिलारसाच्या स्फटिकीकरणातील शेवटच्या टप्प्यांत व रूपांतरणात पायरोक्सिनात बदल होऊन ते तयार होते. रूपांतरणानेतयार झालेल्या हॉर्नब्लेंडाला पुष्कळदा युरलिटिक हॉर्नब्लेंड किंवा युरलाइट म्हणतात. हॉर्नब्लेंड हे ⇨अँफिबोलाइट खडकाचा मुख्य घटक आहे. आब्राहाम गॉटलोप व्हेर्नर यांनी १७८९ मध्ये एका जर्मन शब्दा- वरून हॉर्नब्लेंड हे नाव ठेवले. हा जर्मन शब्द कोणत्याही गडद रंगी प्रचिनाकार धातुकांत (कच्च्या रूपातील धातूंमध्ये) आढळणाऱ्या खनिजासाठी वापरीत असत मात्र त्यातील धातू मिळविता येईल एवढ्या प्रमाणात नसते.
पहा : अँफिबोल गट.
बरीदे, आरती ठाकूर, अ. ना.
“