हॉम्स : मध्य सिरियातील याच नावाच्या जिल्ह्यातील एक इतिहास- प्रसिद्ध शहर. हे सिरियाची राजधानी दमास्कसपासून उत्तरेस १६२ किमी.वर ओराँटीस नदीकिनारी वसलेले आहे. लोकसंख्या १०,२०,७६० (२००९). भूमध्य समुद्रातून देशाच्या अंतर्भागात जाण्याचे हे प्रमुख प्रवेश-द्वार मानले जाते. रोमनांच्या काळात एमेसा या नावाने हे येथील सूर्यदेवतेच्या भव्य मंदिरामुळे प्रसिद्ध होते. रोमन सम्राट सेप्टिमीअस ऑडिनेथसने या शहराचा विकास केला. त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी व पॅल्मायराची सम्राज्ञी झिनोबिआ हिची शहरावर सत्ता होती. यानंतर इ. स. २७२ मध्ये रोमन सम्राट ऑरिल्यनने येथे तिचा पराभव करून शहरावर वर्चस्व मिळविले. ६३६ मध्ये हे मुस्लिमांच्या अधिपत्याखाली आले व त्यांनी याचे हिम्स (हॉम्स) असे नामकरण केले. ७५० मध्ये अब्बासी खिलाफतीने सिरियावर अंमल बसविला. त्यात या शहराचाही समावेश होता. बाराव्या शतकात ख्रिस्ती धर्मीयांच्या सर्व परंपरा आणि वास्तूंचा विध्वंस करण्यात आला आणि हे इस्लाम धर्मीयांचे प्रमुख शहर बनले. १५१६ मध्ये हे ऑटोमन तुर्कांच्या अमलाखाली आले. १८३० मधील ईजिप्शियनांचा अंमल वगळता पहिल्या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत हे शहर तुर्कांच्या अमलाखाली होते. पहिल्या महायुद्धानंतर १९२० पासून सिरियाच्या स्वातंत्र्यापर्यंत (१७ एप्रिल १९४६) येथे फ्रेंचांची सत्ता होती. सिरियात २०११-१२ मध्ये उद्भवलेल्या लष्कर व नागरी संघटना यांमधील संघर्षात हॉम्स येथे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली होती.
हॉम्स शहर सुपीक कृषिप्रदेशात वसलेले असून येथे गहू , मका, कापूस, फळे आणि भाजीपाला यांची शेती केली जाते. परिसरातील महत्त्वाचीकृषी बाजारपेठ म्हणून या शहराची ख्याती आहे. त्यानुसार येथे कृषी आधारित उद्योगांची आणि कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यातआली आहे. येथे साखर, पिठाच्या गिरण्या, तेलगिरण्या, खते इ. उद्योगव खनिज तेल शुद्धीकरण व तदानुषंगिक उद्योग तसेच रेशीम, लोकर,सुती कापड इ. निर्मितिउद्योग विकसित झाले आहेत. येथे उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असून अल् बाथ विद्यापीठ (१९७९), जर्मन विद्यापीठ (२००४), अल् अन्डालूस वैद्यकीय विज्ञान विद्यापीठ (२००५) या विद्यापीठांची येथे स्थापना करण्यात आली आहे. येथील उम-अल्-झेन्नार व सेंट एलिअन ही चर्च, खलिद इब्न-अल्-वालिद व अल्-नूरीया मशिदी, अझे हरावे राष्ट्रीय लोकसाहित्य संग्रहालय, क्लॉलत सलह एल्-दिन किल्ला आणि क्रॅकदेस चव्हॅलिअर्स ही जागतिक वारसास्थळे पर्यटकांची आकर्षण स्थळे आहेत.
अमृते, विद्याधर
“