मॅझरू : लेसोथो प्रजासत्ताकाच्या राजधानीचे शहर. लोकसंख्या ७५,००० (१९८० अंदाज). हे सस.पासून १,५०० मी. उंचीवर कॅलडन नदीच्या डाव्या तीरावर वसलेले आहे.

‘मॅझरू’ शब्दाचा अर्थ ‘लाल वालुकाश्माचे स्थान’ असा असून प्रारंभी हे लहानसे व्यापारी ठाणे होते. ब्रिटिशांनी १८६९ मध्ये पहिला मॉशेश या स्थानिक प्रमुखाच्या विनंतीनुसार रक्षित राज्याचे (स्था. १८६८) प्रशासकीय मुख्यालय मॅझरू येथे स्थापन केले. द. आफ्रिका प्रजासत्ताकाच्या ब्लूम फाँटेन-नाताळ या प्रमुख लोहमार्गाशी मॅझरू-मार्से या लहान लोहमार्गाद्वारा हे जोडण्यात आले असल्याने शेतमाल व्यापार व श्रमपुरवठा करणे शक्य झाले आहे. याशिवाय मॅझरू हे देशातील अन्य भागांना रस्ते व हवाई मार्ग यांद्वारे जोडण्यात आले असून याच्याजवळच आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे.

शहरात राष्ट्रीय संसदभवन, उच्च न्यायालयभवन असून आफ्रिकी माध्यमिक विद्यालय, तांत्रिक विद्यालय तसेच ‘लेसोथो कृषि महाविद्यालय’(स्था. १९५५) आहे. याशिवाय शहरात रोमन कॅथलिक व अँग्लिकन कॅथीड्रल, तसेच आधुनिक इस्पितळ आहे. मॅझरू ही देशाची प्रमुख बाजारपेठ असल्याने येथे बँकिंग सुविधा आहेतच शिवाय यांत्रिक अभियांत्रिकीच्या सुविधा असून हस्तकारागिरीचेही उद्योगधंदे आहेत.

गद्रे, वि. रा.