हायगेन्झ (ह्यूजेन्स), क्रिस्तीआन : (१४ एप्रिल १६२९–८ जुलै १६९५). डच गणिती, ज्योतिर्विद व भौतिकीविद.त्यांनी प्रकाशाच्या तरंग सिद्धांताचा पाया घातला, तसेच शनीच्याकड्यांचा खरा आकार शोधून काढला आणि गतिकी (वस्तू अथवा पिंडांवरील प्रेरणांच्या क्रियेचा अभ्यास) या विज्ञानशाखेत मूलभूत स्वरूपाची कामगिरी केली.

 

हायगेन्झ यांचा जन्म द हेग (नेदर्लंड्स) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील कॉन्स्टंटीन हायगेन्झ हे मुत्सद्दी कवी व लॅटिनभाषेचे अभ्यासक होते. शिवाय त्या काळातील ? रने देकार्त या तत्त्वज्ञ व वैज्ञानिक यांसारख्या असामान्य बुद्धिवंत मंडळींशी कॉस्टंटीन यांची मैत्री होती. क्रिस्तीआन यांना बालपणापासूनच यांत्रिक बाबींविषयी आवडहोती आणि आरेखन व गणित यांमध्ये बौद्धिक रस होता. त्यांचे भूमिती-तील कार्य पाहून देकार्त प्रभावित झाले होते.

 

हायगेन्झ यांनी १६४५ मध्ये लायडन विद्यापीठात प्रवेश घेतला तेथे त्यांनी गणित व कायदा या विषयांचा अभ्यास केला. नंतर देान वर्षांनी त्यांनी कॉलेज ऑफ ब्रेडा येथे प्रवेश घेतला. देकार्त यांच्या तत्त्वज्ञानाविषयी तेव्हा वाद चालू होता. नंतरच्या काळात हायगेन्झ यांनी देकार्त यांची विशिष्ट मते नाकारली. विज्ञानात यांत्रिक स्पष्टीकरणे गरजेची असतात, असे मत हायगेन्झ यांनी खंबीरपणे मांडले. या वास्तवाचा त्यांच्या प्रकाश व गुरुत्वाकर्षण या दोन्ही विषयांतील गणितीय अर्थ लावण्याच्या कार्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला.

 

हायगेन्झ १६६० मध्ये पॅरिसला गेले असता, त्यांची भेट ब्लेझपास्काल यांच्याशी झाली. त्याआधीच गणितातील समस्यांवरीलत्यांच्यामधील पत्रव्यवहार सुरू झालेला होता. हायगेन्झ यांनी भिंगे घासण्याच्या व पॉलिश करण्याच्या नवीन पद्धतींसह दूरदर्शकाच्या रचनेत सुधारणा केली. त्यांनी आपला सुधारित दूरदर्शक वापरून शनीचा एक नवीन उपग्रह (टायटन) पाहिला (१६५५), तसेच ओरायन (मृगशीर्ष )? अभ्रिकेतील घटक तारे वेगळे ओळखून काढले (१६५६). त्यांनी शनीच्या कड्यांच्या खऱ्या आकाराविषयीचा शोध लावला (१६५९). ज्योतिर्विद म्हणून त्यांना अचूक कालमापनात रस असल्याने त्यांनी घड्याळातील नियंत्रक म्हणून लंबकाचा शोध लावला व त्याचे वर्णनत्यांनी आपल्या होरोलोजियम (१६५८) या पुस्तकात केले आहे.त्यांनी बनविलेल्या लंबकाच्या घड्याळाचा उपयोग ज्योतिषशास्त्रात व जहाजावर स्थळाचे रेखांश काढण्यासाठी होत असे. त्यांनी बनविलेलीदीर्घ केंद्रांतरांची भिंगे, दोन भिंगांची जोडनेत्रिका इ. गोष्टी रॉयल सोसायटीत जतन केल्या आहेत. ग्रहांचा व्यास मोजण्यासाठी त्यांनी दूरदर्शकात सूक्ष्ममापकाचा उपयोग केला होता.

 

हायगेन्झ हे १६६६–८१ या दरम्यान पॅरिसला असताना त्यांनीफ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस स्थापण्यात पुढाकार घेतला होता. तेथे त्यांची प्रसिद्ध गणिती व तत्त्वज्ञ गोटफ्रीट व्हिल्हेल्म लायप्निट्स यांच्याशी मैत्री झाली. तेथील वास्तव्यात हायगेन्झ यांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना म्हणजे, त्यांचे १६७३ मध्ये प्रसिद्ध झालेली होरोलोजियम ऑसिलेटोरियम हे पुस्तक होय. या पुस्तकात वक्रतेच्या गणितावरील सिद्धांत व साध्या लंबकाच्या आंदोलन कालाचे सूत्र साधित करणे यांसारख्या गतिकीमधील समस्यांचे पूर्ण निर्वाह, स्थिर अक्षाभोवतीच्या वस्तूचे आंदोलन आणि एकविध वर्तुळाकार गतीसाठीच्या केंद्रोत्सारी प्रेरणेचे नियम आहेत. या पुस्तकाच्या परिशिष्टात काही फले (निष्कर्ष) सिद्धतेविना दिली असून त्यांची पूर्ण फले त्यांच्या मृत्यूनंतरच प्रसिद्ध झाली.

 

हायगेन्झ १६८९ मध्ये लंडनला गेले. तेथे ते ? सर आयझॅक न्यूटनयांना भेटले. त्यांनी रॉयल सोसायटीत स्वतःच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतावर व्याख्यानही दिले. अर्थात, गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या बाबतीत त्यांचा न्यूटन यांच्याशी थेट वाद झाला नाही. मात्र, न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतात कोणतेही यांत्रिक स्पष्टीकरण नसल्याने हायगेन्झ यांना तोमुळात स्वीकारार्ह वाटत नव्हता. तथापि, त्यांच्या केंद्रोत्सारी प्रेरणेविषयीच्या कार्याचा उपयोग न्यूटन यांना गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडताना झाला. हायगेन्झ यांचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत १६६९ पासून परिचित होता. मात्र, तो १६९० मध्ये ‘डिस्कोर्स ऑन द कॉज ऑफ ग्रॅव्हिटी’ या इंग्रजी शीर्षकार्थाच्या पुस्तकात प्रसिद्ध झाला. त्यातील गुरुत्वाचे यांत्रिक स्पष्टीकरण देकार्त यांच्या भोवऱ्याविषयीच्या (चक्रगतीविषयीच्या) मतावर आधारलेले होते.

 

हायगेन्झ यांचे १६७८ मध्ये जवळजवळ पूर्ण झालेले ट्रिटाइज ऑन लाइट हे मूळ पुस्तकही १६९० मध्ये प्रसिद्ध झाले. प्रकाशाच्या स्वरूपाविषयाच्या यातील चर्चेतही अखेरीस यांत्रिक स्पष्टीकरणांची त्यांची गरज यात दिसून येते. मात्र, यातील प्रकाशाचे परावर्तन व प्रणमन( वक्रीभवन) यांविषयीचे न्यूटन यांच्यापेक्षा अधिक चांगले स्पष्टीकरण हे पूर्णपणे यांत्रिक स्पष्टीकरणावर अवलंबून नसून ते पूर्णपणे द्वितीयक तरंगमुखाच्या तथाकथित हायगेन्झ तत्त्वावर आधारलेले होते. संपूर्ण अठराव्या शतकात गतिकी व प्रकाश यांविषयीच्या हायगेन्झ यांच्या कार्यावर न्यूटन यांच्या कार्याचे सावट पडले होते. हायगेन्झ यांच्या गुरुत्वाविषयीचा सिद्धांत कधीच गंभीरपणे विचारात घेतला गेला नाही. तथापि, त्यांचे परिभ्रमी वस्तूंशी निगडित संशोधन व प्रकाशाच्या सिद्धांतातील त्यांची कामगिरी यांचे महत्त्व दीर्घकाळ टिकणारे आहे.

 

हायगेन्झ १६६३ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो झाले. शेवटी त्यांनी आपली हस्तलिखिते, टिपणे व पत्रव्यवहार लायडन विद्यापीठाकडे सुपूर्द केली. त्यांचे हे लेखन नंतर १८८८–१९०५ या कालावधीत द हेग येथेदहा खंडांमध्ये प्रसिद्ध झाले.

 

हायगेन्झ यांचे द हेग येथे निधन झाले.

ठाकूर, अ. ना.