श्व्हान, टेओडर : ( ७ डिसेंबर १८१० – १ जानेवारी १८८२). जर्मन शरीरक्रियावैज्ञानिक. प्राण्याचे शरीर कोशिकांपासून (पेशींपासून) बनलेले असते या त्यांच्या संशोधनामुळे आधुनिक ऊतकविज्ञानाचा पाया घातला गेला. हे संशोधन कोशिका सिद्धांत म्हणून ओळखले जाते.

 

श्व्हान यांचा जन्म नॉइस येथे झाला. बर्लिन येथे वैदयकीय शिक्षण घेतल्यावर त्यांनी ⇨ योहानेस पेटर म्यूलर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले (१८३४-३८). ‘पक्ष्यांच्या भ्रूण अवस्थेतील श्वसन’या विषयावरील त्यांच्या प्रबंधास पीएच्.डी मिळाली. बेल्जियम येथील लूव्हाँ व ल्येझ विदयापीठांत शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणूनही त्याने काम केले (१८३९-७९).

 

पचन तंत्राबाबत संशोधन करताना त्यांना जठरात पचनास कारणीभूत असणारा पेप्सीन हा द्रव वेगळा करण्यास यश मिळाले. ⇨ मातीयास याकोप श्लायडेन यांनी वनस्पतींबाबत प्रस्थापित केलेला ‘कोशिका सिद्धांत’ श्व्हान यांनी प्राण्यांच्या बाबतीत लागू होत असल्याचे दाखविले. या सिद्धांतात पुढे त्यांनी सजीवाचे शरीर कोशिका व कोशिकाजन्य पदार्थांपासून तयार झालेले असते अशी सुधारणा केली. सजीवाच्या उत्पत्तीबाबतच्या ‘अजीवोत्पत्तिवाद’ या सिद्धांताचे ते समर्थक होते. कोशिकामध्ये होणाऱ्या रासायनिक बदलासाठी ‘चयापचय’ (मेटॅबॉलिझम) ही संज्ञा त्यांनी प्रथम वापरली. कुजण्याच्या क्रियेतील सूक्ष्मजीवांच्या कार्याचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. अंडे ही एक कोशिका असून त्यापासून पूर्ण सजीव तयार होतो हे त्यांचे निरीक्षण भ्रूणविज्ञानातील मूलभूत तत्त्व समजले जाते. तंत्रिका तंतूभोवती असणारे वसावरण खंडित असते. या आवरणाभोवती असणाऱ्या पातळ आवरणाचा त्यांनी शोध लावला. हे आवरण ज्या कोशिकांचे बनलेले असते, त्यास श्व्हान कोशिका असे नाव देण्यात आले.

 

कॉप्ली पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. रॉयल सोसायटी व फ्रेंच ॲकॅडमी ऑफ सायन्सेस यांचे ते सदस्य होते. त्यांचे कोशिका सिद्धांताबाबतचे संशोधन मायक्रोस्कोपिकल रिसर्चेस ऑन दि सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर अँड ग्रोथ ऑफ ॲनिमल्स अँड प्लँट्‌स १८४७ मध्ये प्रसिद्ध झाले. ते कोलोन येथे मृत्यू पावले.

 

पाटील, चंद्रकांत प.