कॅमरेअरियस (कॅमरर), रूडोल्फ याकोप: (१२ फेब्रुवारी १६६५—११ सप्टेंबर १७२१). जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ट्यूबिंगेन येथे झाला. तत्त्वज्ञान व वैद्यक या विषयांचा अभ्यास केल्यावर त्यांनी यूरोपभर प्रवास केला. ते १६८८ मध्ये ट्यूबिंगेन येथेच शास्त्रीय उद्यानाचे संचालक व साहाय्यक प्राध्यापक झाले व १६९५ मध्ये आपल्या वडिलांच्या नंतर तेथेच वैद्यकाचे प्राध्यापक झाले. वनस्पतींमध्ये फुलांस बीजधारणा होण्यास परागांची आवश्यकता असते व त्यावरून वनस्पतींत लिंगभेद आहेत, ही महत्त्वाची गोष्ट त्यांनी १६९४ मध्ये निर्णयात्मक प्रयोगाने सिद्ध केली आणि याबद्दल त्यांची विशेष प्रसिद्धी आहे. De Sexu Plantarum Epistola (१६९४) हा त्यांचा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. ट्यूबिंगेन येथे ते ख्रिस्तवासी झाले.

पहा : आनुवंशिकी प्रजोत्पादन.

जमदाडे, ज. वि.