हामामात्सू : जपानच्या होन्शू बेटावरील शिझूओका प्रांतातीलएक महत्त्वाचे शहर. हे टोकिओच्या नैर्ऋत्येस टोकिओ व क्योटो या शहरांच्या मध्यावर पॅसिफिक महासागराच्या किनारी वसलेले आहे. लोकसंख्या ७,९७,४६२ (२०१२). तेन्प्यू नदीकाठावरील हे शहर उद्योग, व्यापार व दळणवळणाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. हे जपान राष्ट्रीय रेल्वेच्या नव-टोकैडो लोहमार्गावरील स्थानक, थांब्याचे ठिकाण असून या लोहमार्गाने व शिनॅनो-टोकैडो या महामार्गाने इतर मोठ्या शहरांशी ते जोडलेले आहे. दाइम्यो (स्थानिक सरंजामदार) राजवटीत हे शहर किल्ल्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या बाँबहल्ल्यात याची हानी झाली होती (मे-जून १९४५).

 

शहराजवळच्या अकिबा व सकूमा जलविद्युत् निर्मितिकेंद्रांतून होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे व दळणवळणाच्या सोयींमुळे येथे उद्योगधंद्यांचा विकास झाला असून हे टोकाई उद्योगक्षेत्रातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे संगीतवाद्ये आणि मोटारसायकल निर्मितिउद्योग, विणकाम, कापड रंगविणे इ. उद्योग भरभराटीस आलेले आहेत. येथे पियानो, ऑर्गन, व्हायोलिन इ. संगीतवाद्यांची निर्मिती होते.

 

येथे हामामात्सू विद्यापीठ, हामामात्सू गाकैन विद्यापीठ, हामामात्सू युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन इ. उच्च शिक्षणसंस्था आहेत. शहरात दरवर्षी पियानो आंतरराष्ट्रीय स्पर्धा होते. येथील वेधशाळा, कोपिन स्मारक, हामामात्सू किल्ला व त्यातील पुराणवस्तूंचे संग्रहालय, दरवर्षी भरविण्यात येणारा पतंगोत्सव इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

पुजारी, ए. ए.