अकोला शहर : अकोला जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,६८,४५४ (१९७१). मोर्णेच्या पश्चिम तीरावर जुना गाव व पूर्व तीरावर ताजनापेठ ही नवीन वस्ती मिळून अकोल्याचे क्षेत्रफळ १६·४ चौ. किमी. आहे.

अकोलसिंग नावाच्या रजपूत सरदाराने अकोला बसविल्याची दंतकथा आहे. आईन-इ-अकबरीत नरनाळा सरकारचे अकोला हे परगणा असलेले शहर असा उल्लेख असून औरंगजेबकालीन असदखान याचे शिलालेख तेथे आढळतात. १८५३ मध्ये निजामाकडून इंग्रजांनी हे शहर घेतले. १८६८ पासून येथे नगरपालिका असून शहररचना चांगली आहे. येथील हवामान विषम व कोरडे आहे.

मुंबई-कलकत्ता व खांडवा-हिंगोली रेल्वेमार्ग आणि मुंबई-कलकत्ता महामार्ग यांवरील हे स्थानक असून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांशी सडकांनी जोडलेले आहे. पृष्ठभागी समृद्ध विदर्भ व मुंबईकडून विदर्भात येणाऱ्या मालाची पहिली उतारपेठ म्हणून अकोला व्यापाराकरिता सुप्रसिद्ध बनले. येथे दररोज करोडो रुपयांची उलाढाल होते. कापसाची ही मोठी पेठ. याशिवाय येथे दोन कापडाचे व एक वनस्पती तुपाचा असे तीन मोठे उद्योगधंदे असून सरकी काढून गठ्ठे बांधणे, सिमेंटच्या फरशा व रंगीत कौले, लोखंडी वस्तू, लाकडी खेळणी, तूऱडाळ, विडी, साबण, प्लॅस्टिक वस्तू इत्यादींचे कारखाने, तेलगिरण्या व तेलघाणे आहेत. निर्मिती उद्योगधंद्यात १८ टक्के कामगार आहेत.

राष्ट्रीय शिक्षणाकरिता १९२० पासून प्रसिद्ध असलेले टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर, अनेक माध्यमिक शाळा, एक व्यावसायिक व औद्योगिक शिक्षणसंस्था आणि मानव्य, विज्ञान, वाणिज्य, कायदा, कृषी, शिक्षणशास्त्र, आयुर्वेद, होमिओपथी यांची महाविद्यालये येथे असून १९६९ मध्ये पंजाबराव कृषि-विद्यापीठ स्थापन झाले आहे. येथील साक्षरता ४८ टक्के असून दोन दैनिके व चार साप्ताहिके येथून प्रसिद्ध होतात. तीन मोठी ग्रंथालये येथे आहेत.

कुलकर्णी, गो. श्री.