हांगजो : चीनच्या पूर्व भागातील मोठे शहर व जजिआंग प्रांताच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या ६२,४१,९७१ (२०१२). हे शांघायच्या नैर्ऋत्येस १६० किमी. हांगजो उपसागरावर क्विमांगटांग नदीमुखखाडी-जवळ वसले आहे. हांगजो क्विमांगटांग नदीमुखावरील बंदर असल्याने यांगत्सी नदीवरील महत्त्वाचे वाहतुकीचे केंद्र बनले आहे. हे पीकिंग या राजधानीशी व परदेशातील मोठ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडलेले आहे. सुमारे पाच हजार वर्षांपासून हांगजोमध्ये लोकवस्ती आहे. इ. स. ५०० मध्ये हे व्यापारी केंद्र बनले आणि याचा झपाट्याने विकासझाला. अकराव्या शतकापर्यंत सुंग सम्राटांनी त्यांच्या राज्याची हांगजो हीराजधानी केली होती. बाराव्या शतकामध्ये हे जगातील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक शहर होते. मार्को पोलोच्या चीन भेटीच्या वृत्तांतात हांगजोचा उल्लेख आहे.

 

ताइपिंग बंडखोरांनी १८५०–६४ या कालावधीत हांगजोचे फार नुकसान केले परंतु लवकरच त्याची उभारणी करण्यात आली. १९३८–४५ पर्यंत (दुसरे महायुद्ध संपेपर्यंत) हांगजो जपानच्या ताब्यात होते. १९४९ मध्ये कम्युनिस्ट चीनची संपूर्ण देशावर सत्ता आल्यानंतर हांगजोमधील जड उद्योगधंद्यांचा विकास झाला. येथील रेशीम व सुती कापड प्रसिद्ध आहे. यांशिवाय येथे रसायने, विद्युत् उपकरणे, औषधे इ. निर्मितिउद्योग चालतात.

 

हांगजो हे पर्यटन केंद्र असून जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळालेल्या ‘ वेस्ट लेक ‘ नावाचे सुंदर सरोवर येथे आहे. या सरोवरात चार बेटे आहेत. त्यांच्या किनाऱ्यावर अनेक उद्याने, भव्य स्मारके ( पुतळे) व मंदिरे आहेत. यासाठी अनेक पर्यटक या सरोवरास भेट देतात. हांगजो हे सृष्टिसौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. चीनमधील अनेक ख्यातनामकवी व चित्रकारांशी हे संबंधित आहे. बॉच्युई ह्या येथील प्रसिद्ध कवीस या शहराचा गव्हर्नर म्हणून नेमले होते. शीआक्वे हा चीनमधील प्रसिद्ध चित्रकार हांगजोचा रहिवासी होता. त्याने काढलेल्या निसर्गचित्रांमुळे हांगजो व त्याचा परिसर अजरामर झाला आहे. गतवैभवाची साक्ष देणाऱ्या कित्येक वास्तू आणि वैशिष्ट्यपूर्ण पॅगोडा येथे अद्याप पहावयास मिळतात.

कुंभारगावकर, य. रा.