दुआब : (दोआब). [दु–दो = दोन, आब–आप = पाणी, प्रवाह]. जवळजवळ एकाच दिशेने वाहणाऱ्या दोन नद्यांच्या संगमाच्या वरच्या बाजूच्या लांबट, त्रिकोणी भूभागास सामान्यतः दुआब म्हणतात. विशेषतः उत्तर प्रदेशातील गंगा–यमुनेच्या दरम्यानचा गाळाने बनलेला, अत्यंत सपाट, सलग, सुपीक, संपन्न व दाट लोकवस्तीचा प्रदेश दुआब म्हणून ओळखला जातो. याशिवाय पंजाब (पंच–आप) मधील सतलज–रावीमधील बडी दोआब, रावी–चिनाबमधील रेचना  दोआब, चिनाब–झेलममधील जेच दोआब व झेलम–सिंधूमधील सिंध सागर दोआब प्रसिद्ध आहेत. दक्षिण भरतात कृष्णा–तुंगभद्रा दोआब आहे. टायग्रिस व युफ्रेटीस यांदरम्यानचा मेसोपोटेमिया (ग्रीक भाषेतील दोआब या अर्थाचा शब्द) हा जगप्रसिद्ध दुआब आहे. जगातील अशा प्रकारच्या कोणत्याही भूप्रदेशास आता दुआब ही संज्ञा वापरतात.

पाठक, सु. पुं.

Close Menu
Skip to content