हस्तमैथुन : (मुष्टिमैथुन ). स्वतःच हाताने आपल्या जननेंद्रियाचे उद्दीपन व मर्दन करून लैंगिक समाधान व समागमाचे सुख (रतिसुख) मिळविण्याच्या क्रियेला हस्तमैथुन म्हणतात. पौगंडावस्थेतील व्यक्ती व अविवाहित (एकटी) प्रौढ व्यक्ती यांच्यात हस्तमैथुन ही सर्वांत सामान्यपणे आढळणारी लैंगिक क्रिया आहे. ॲल्फ्रेड किन्सी व इतरांनी विसाव्या शतकाच्या मध्यात केलेल्या अभ्यासांवरून अमेरिकेतील लोकांविषयीची पुढील आकडेवारी समोर आली आहे. व्यक्ती वीसवर्षांची होईपर्यंत ९० टक्क्यांहून अधिक पुरुषांनी आणि ३० टक्क्यांहून अधिक स्त्रियांनी हस्तमैथुन केलेले असते. चाळीसाव्या वर्षांपर्यंत ९५ टक्क्यांहून अधिक पुरुषांनी व ८० टक्क्यांहून अधिक स्त्रियांनी आयुष्यात कधीतरी हस्तमैथुन केलेले असते. यूरोपमध्ये झालेल्या अशा प्रकारच्या अध्ययनांतूनही यासारखी आकडेवारी समोर आली आहे.

 

व्यक्तीचे वय व वैवाहिक स्थिती यांनुसार हस्तमैथुन करण्याची वारंवारता वेगवेगळी असते. पौगंडावस्थेतील बहुतेक व्यक्ती आठवड्यात सरासरी दोन किंवा तीन वेळा हस्तमैथुन करतात. विवाहित व्यक्तींमध्ये सर्व-साधारणपणे महिन्यातून एकदा हस्तमैथुन करण्याची प्रवृत्ती आढळते. चाळीस ते पन्नास वर्षांचे एकेकटे पुरुष अथवा स्त्रिया आठवड्यातून सरासरी एकदा व याहून अधिक तरुण असलेल्या एकेकट्या व्यक्ती आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हस्तमैथुन करतात.

 

हस्तमैथुन करण्याची वेगवेगळी तंत्रे आहेत. बहुतेक पुरुष शिश्‍नाचा अग्रभाग व त्यापुढील पूर्ण भाग यांचे स्वतःच्या हाताने लयबद्ध रीतीने मर्दन करतात. इतर काही पुरुष आपले शिश्‍न उशीवर घासतात. क्वचित शिश्‍नाचे मर्दन लैंगिक जोडीदाराकडून करवून घेतले जाते. यात समागमाचा हेतू नसतो. बहुतेक स्त्रिया योनिलिंगाचे (क्लिटॉरिसचे म्हणजे भगाच्या– विटपाच्या – वरच्या अग्र भागातील लहान अवयवाचे) हाताने उद्दीपन करून व लैंगिक भावना चेतवून हस्तमैथुन करतात. काही स्त्रिया योनीत बोट वा मेणबत्तीसारखे साधन घालून असे उद्दीपन करतात, तर काही स्त्रिया यासाठी स्वतःच्या दोन मांड्या एकमेकींवर लयबद्ध रीतीने घासतात. लैंगिक उद्दीपनासाठी पुरुष व स्त्रिया कंपनकासारख्या यांत्रिक प्रयुक्त्या, रबरी शिश्‍न किंवा रबरी स्त्री योनी यांसारख्या गोष्टी वापरतात.

 

व्यक्ती हस्तमैथुनाकडे कशी पाहते, यावर त्याचा मानसशास्त्रीय अर्थ अवलंबून असतो. काहींमध्ये यामुळे अपराधीपणाची भावना निर्माण होते. काहींना हा ताणमुक्तीचा सोपा उपाय वाटतो व यात भावनेला थारानसतो. काहींच्या मते ही एक केवळ मजा असून ती आनंदासाठी करायची कृती आहे. अशा प्रकारे हस्तमैथुनाचा संबंध बहुधा उत्सुकता, मनातील कल्पनाजाल किंवा आनंदासाठी करायची गोष्ट यांच्याशी येतो.

 

हस्तमैथुनामुळे कोणत्या तरी प्रकारचा शारीरिक वा मानसिक आजार होतो, या पूर्वग्रहाला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हस्तमैथुनामुळे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, म्हणजे ते हानीकारक वाअपायकारक नाही. शिश्‍न ताठ होणे, ते चोळले जाणे व शेवटी वीर्यपतन होणे या घटना संभोग व हस्तमैथुन या दोन्ही क्रियांत एकसारख्याच असतात, म्हणून संभोगाप्रमाणेच हस्तमैथुन अपायकारक नाही. हस्त-मैथुनामुळे वीर्यनाश होतो आणि वीर्यनाश म्हणजे शक्तिनाश हा बालीशसमज आहे. कारण वीर्य लाळेप्रमाणे शरीरातील तीन ग्रंथींमधून होणाऱ्या स्रावांचे मिश्रण असलेले सामान्य द्रव्य आहे. त्यातील शुक्राणू प्रजननासाठी गरजेचे असून त्याचा शरीराला काही उपयोग होत नाही तथापि, डोकेदुखी, थकवा, हृदयविकार, अपस्मार किंवा बुद्धिभ्रंश (वेड) अशा विविध आजारांचे कारण हस्तमैथुन मानून वैद्यकीय मंडळी पूर्वी त्याची निर्भत्सना करीत असत. मात्र, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, असे प्रयोगांतून उघड झाले आहे. प्रौढावस्थेतील एकट्या व्यक्तींचे हस्तमैथुन ही अगदी सामान्य बाब आहे. मात्र, जोडीदार असतानाही समागमाला पर्याय म्हणून हस्तमैथुन करणे किंवा हस्तमैथुनाचा अतिरेक हे मानसिक समस्येचे लक्षण असू शकते.

 

मुलांमध्येही हस्तमैथुन आढळते. ते त्याला शिकवावे लागत नाही. वयाच्या १३–१८ वर्षांच्या दरम्यान मुलगा स्वतःहून ते शोधून काढतो.मात्र, लोकांना तापदायक ठरून राग आणणारे मुलांकडून उघडपणे होणारे हस्तमैथुन ही मानसिक समस्या मानतात म्हणून स्वतःच्या जननेंद्रियाला स्पर्श करणे ही खाजगी गोष्ट असून ती जाहीरपणे करणे चुकीचे आहे, हे मुलांना समजावून सांगणे गरजेचे असते. मात्र, यासाठी शिक्षा करणेकिंवा भीती दाखविणे यांमुळे मुलांमध्ये मानसिक समस्या उद्भवूशकतात आणि पुढील आयुष्यात त्या लैंगिक गैरकृत्य या स्वरूपात समोरयेऊ शकतात.

 

बहुतेक धर्मांत हस्तमैथुन निषिद्ध मानले आहे. ख्रिश्चन व ज्यू धर्मांत हस्तमैथुनाला मनाई आहे. जुन्या करारातील सृष्टीच्या उत्पत्तीविषयीचे वर्णन असलेल्या ‘जेनेसिस’ या पहिल्या पुस्तकातील पुढील कथनावर ही मनाई आधारलेली आहे. या माहितीनुसार ओनान नावाच्या जुडाहच्या पुत्राने समागम पूर्ण करण्याऐवजी आपले वीर्य पृथ्वीवर सांडले, यामुळे त्याची निर्भत्सना करण्यात आली [→ बायबल]. तसेच रोमन कॅथलिक चर्च हस्तमैथुन हे नैतिक पाप मानते व त्याची निर्भत्सना करते.

 

अशा धार्मिक वृत्तीच्या लोकांमध्ये ज्यांचे संगोपन झालेले असते, अशा लोकांचा त्यांच्या शारीरिक (लैंगिक) गरजांशी मानसिक संघर्ष निर्माण होतो आणि त्यांच्या मनात हस्तमैथुनाबाबत लज्जा व अपराधीपणाची भावना निर्माण होते तथापि, लैंगिक शिक्षणात होणारी वाढ व एकूणच लैंगिकतेविषयी वाढत असलेला मोकळेपणा यांच्यापुढे हस्त-मैथुनाविषयीची अपराधीपणाची सल व शरम कमी होत आहे. शिवाय त्याचे अभ्यासक हस्तमैथुन या लैंगिक वर्तनाच्या आरोग्यदायी, समाधान देणारे, ताण हलका करणारे, शामक इ. गुणांची स्तुती करू लागले आहेत.

 

अमेरिकेत हस्तमैथुनप्रतिबंधक कायदा नाही. मात्र, सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करणे, हे असभ्य व निंद्य कृत्य मानले जाते.

 

पहा : लैंगिक वर्तन लैंगिक शिक्षण.

भोसले, राजन ठाकूर, अ. ना.