हसन गंगू : (?–११ फेब्रुवारी १३५८). मध्ययुगात दक्षिणभारतात स्थापन झालेल्या बहमनी सत्तेचा संस्थापक व कर्तबगार प्रशासक. तो अमीर जफरखान या नावानेही ओळखला जातो. त्याच्याविषयी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही तथापि बुर्हान-इ-मआसिर व तबकात–इ-अकबरी या ग्रंथांनुसार इस्फंदयारचा मुलगा बहमन असून त्याचामुलगा हसन गंगू होय. हसन गंगूविषयी अनेक आख्यायिका आहेत. फिरिश्ताच्या (१५५०–१६२३?) मतानुसार तो इराणच्या बहमन राजाच्या वंशातील होता. काहींच्या मते, हसन हा दिल्ली येथील गंगूनामकब्राह्मणाच्या पदरी गुलाम होता. या गंगू ब्राह्मणाचा त्याच्यावर बराच प्रभाव होता. त्या कारणाने ब्राह्मण या शब्दाचा अपभ्रंश करून त्याने बहमन हे नाव आपल्या वंशाला धारण केले असावे व आपले नाव हसन गंगू केले असावे.

 

हसन गंगूला (कार. १३४७–५८) अमीरांनी आपला पुढारी म्हणून घोषित करून दौलताबाद येथे त्याचा राज्याभिषेक केला. त्याने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण केले आणि ३ ऑगस्ट १३४७ रोजी बहमनी राज्याची स्थापना केली. त्याने आपली राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्यास नेली. राज्यात सर्वत्र स्थिरस्थावरता करून त्याने स्थानिक बंडे शमविली. बहुतेक सर्व मोहिमांचे नेतृत्व त्याने स्वतः केले. एक-दोन पराभव सोडले, तर इतर सर्व स्वाऱ्यांमध्ये हसनला विजय मिळाला. त्याने प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याची चार सुभ्यांत विभागणी केली आणि प्रत्येकावर एक स्वतंत्र सुभेदार नेमला. तो सुभेदार लष्कर व नागरी व्यवस्था पाहण्याबरोबरच साराही गोळा करीत असे.

 

अलाउद्दीन हसन हे नाव धारण करून त्याने स्वतःच्या नावाची नाणी पाडली. बहमनी सुलतानांनी तात्त्विक दृष्ट्या अब्बासी खलीफांचे वर्चस्व मानले होते. त्यामुळे त्यांच्या तख्तावर काळी छत्री आणि नाण्यांवर खलीफांचा उजवा हात असे. हसनने दक्षिणेतील हिंदू राजांना आपल्या पक्षाकडे वळविले. देशमुख-देशपांड्यांना वतने-इनामे दिली. अनेक नवीन वतनदार निर्माण करून राज्याचा विस्तार केला. त्याच्या अल्पकाळाच्या कारकीर्दीत बहमनी सत्तेचा लक्षणीय विस्तार झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा ज्येष्ठ मुलगा पहिला मुहंमदशाह (कार. १३५८–७५) गादीवर आला.

सोसे, आतिश सुरेश