हवास, झाही : (२८ मे १९४७). ईजिप्शियन पुरातत्त्वज्ञव ईजिप्तविद्येचा गाढा अभ्यासक. त्याचा जन्म दॅमिएट्टाजवळ अल्–उबयदियाह या गावी एका मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात झाला. सुरुवातीचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण घेऊन त्याने अलेक्झांड्रिया विद्यापीठातून ग्रीक व रोमन पुरातत्त्व विषयात बी.एस्सी. पदवी संपादन केली. त्यानंतर कैरो विद्यापीठातून त्याने ईजिप्तविद्या विषयात पदविका प्राप्त केली आणि नंतर पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून (अ. सं. सं.) पीएच्.डी. ही पदवी संपादनकेली (१९८७). तत्पूर्वी त्याने अनेक पुरातत्त्वीय मोहिमा काढून काही ठिकाणच्या उत्खननांतही भाग घेतला. त्यात अलेक्झांड्रियाचा पश्चिम त्रिभुज प्रदेश (१९७०), एम्बाबा, गिझा (१९७२–७४), अबू सिंबेल (१९७३-७४), लक्सॉर (१९७४) वगैरेंचा अंतर्भाव होता. त्याची निरीक्षक म्हणून पहिली नियुक्ती एम्बाबा व बहरिया या ओएसिस प्रदेशांत झाली (१९७४–७९) व नंतर पदोन्नती मिळून प्रमुख निरीक्षकपदी १९८० मध्ये निवड झाली. पीएच्.डी.च्या संशोधन-लेखनासाठी त्याला प्रतिष्ठित फुलब्राइट छात्रवृत्ती मिळाली होती. पीएच्.डी. मिळविल्यानंतर त्याने १९८८ पासून प्रथम अमेरिकन विद्यापीठ (कैरो) व नंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (लॉस अँजेल्स) येथे इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वविद्या या तीन विषयांचे अल्पकाळ अध्यापन केले. दरम्यान त्याची नियुक्ती ईजिप्त शासनाने गिझा पिरॅमिड पठारावर निरीक्षक म्हणून केली होती पण त्याने राजीनामा दिल्यामुळे (१९९३) त्याच्याविषयी काही गैरसमज पसरविण्यात आले. ते शमल्यानंतर त्याची १९९४ मध्ये तेथे पुनर्नियुक्ती झाली. पुढे १९९८ मध्ये त्याला पदोन्नती मिळून त्याची संचालक पदावर नियुक्ती झाली. या पठारावरील त्याचे संशो-धनात्मक काम व संवर्धनविषयक सूचना आणि सावधगिरी यांचा विचार करून शासनाने त्याला ईजिप्शियन सुप्रीम काउन्सिल ऑफ ॲन्टिक्विटीज या खात्याचे प्रधान सचिवपद दिले (२००२). या पदावर असताना त्याने गिझा पिरॅमिडच्या वास्तुविशारदांचा शोध घेतला. तसेच बहरियामधील सुवर्ण ममींचे खोरे पिंजून काढून २००५ मध्ये ईजिप्शियन ममींच्या संदर्भात एक प्रकल्प उभा केला. तसेच तूतांखामेन राजाच्या ममीचे सीटी स्कॅन केले. राजा व सामान्य लोक दोघांचे सीटी स्कॅन केले. यांशिवाय तत्कालीन सम्राज्ञी हॅटशेपसूट व नेफेर्तिती यांच्या मृत्यूमागील गूढ उकलण्याचा प्रयत्न केला. हवासने अनेक प्राचीन वास्तू , मूर्ती, पुतळे, थडगी, ममी इत्यादींचा जीर्णोद्धार केला आणि ईजिप्तविद्येचे संवर्धन व संरक्षण केले. आधुनिक तंत्राचा वापर करून त्याने संशोधनाचे नवीन तंत्र विकसित केले. उत्खनित वस्तू-वास्तूंचे कालमान निश्चित केले. त्याने बराक ओबामा या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या २००९ च्या ईजिप्तदौऱ्यात त्यांना तेथील महत्त्वाची पुरातत्त्वीय स्थळे दाखविली. त्यानंतर ईजिप्तच्या होस्नी मुबारक या राष्ट्राध्यक्षांनी हवासची सांस्कृतिक उपमंत्री म्हणून नियुक्ती केली. पुढे तो पूर्णवेळ सांस्कृतिक मंत्री झाला (२०११) तथापि ईजिप्तमध्ये राजकीय अनागोंदीला प्रारंभ झाल्यावर ईजिप्शियन संग्रहालयातील काही प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या, काही फोडण्यात आल्या. तूतांखामेनच्या दोन मूर्ती विद्रूप करण्यात आल्या. त्यामुळे त्याच्या संशोधनावर मर्यादा पडल्या.
हवासने दूरदर्शन, आकाशवाणी या माध्यमांद्वारे आपले संशोधन जगासमोर मांडले. पाश्चात्त्य देशांना सदिच्छा भेटी देऊन ईजिप्तविद्येचे महत्त्व पटविले. ईजिप्त टुडे या मासिकाचा हवास हा स्थायी स्तंभलेखक असून ‘हेरिटेज की’ या ऐतिहासिक समूहाचा तो सदस्य आहे. त्याने तूतांखामेनवर अनेक चित्रफिती काढून त्यांचे प्रसारण दूरदर्शनद्वारे केलेआहे. त्याने आपले संशोधन, उत्खनन व तत्संबंधीची अनुमाने शोध-निबंधांद्वारे तसेच ग्रंथलेखनातून मांडली आहेत. त्याच्या संशोधन–लेखनामुळेच ईजिप्तच्या समृद्ध प्राचीन संस्कृतीचे ज्ञानभांडार आधुनिक विद्वानांना अभ्यासणे सोयीचे झाले.
हवासने अनेक स्फुट शोधनिबंध लिहिले असून त्याचे ग्रंथलेखनही विपुल आहे. त्यांपैकी सायलंट इमेजीस : विमेन इन फेअरोनिक ईजिप्त (२०००), व्हॅली ऑफ द गोल्डन ममीज (२००२), सीक्रेट्स फ्रॉम दसँड (२००३), हिडन ट्रेझर ऑफ एन्शन्ट ईजिप्त (२००४), द फेअरोज (२००५), तूतांखामेन अँड द गोल्डन एज ऑफ ईजिप्त : इन द रिम ऑफफेअरोज (२००६), माउंटन्स ऑफ द फेअरोज (२००६), द रॉयल टूम्ब्ज ऑफ ईजिप्त (२००६), ट्रेझर्स ऑफ एन्शन्ट ईजिप्त (२००७), रॉयल ममीज : इम्मॉर्टॅलिटी इन एन्शन्ट ईजिप्त (२००८), वंडर्स ऑफद होरस टेम्पल : द साउंड अँड लाइट ऑफ एडफू (२०११) इ. ग्रंथ महत्त्वाचे व मान्यवर होत.
हवासला अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी गोल्डन प्लेट अवॉर्ड (२०००), सिल्व्हर मेडल, रशियन अकॅडेमी (२००१), टाइम नियत-कालिकाच्या निवडक विद्वान व्यक्तींत समावेश (२००५), एमी अवॉर्ड, नॅशनल अकॅडेमी (२००६), वर्ल्ड टुअरिझम अवॉर्ड (२००८),पर्सनॅलिटी ऑफ द यिअर अवॉर्ड (२०१०) आदी महत्त्वाचे वप्रतिष्ठित होत. यांशिवाय अनेक विद्यापीठांनी त्याला सन्मान्य डॉक्टरेट देऊन गौरविले आहे.
ईजिप्तमधील राजकीय अस्थिरतेत व अशांत वातावरणातही हवासचा संशोधन, लेखन व वाचन हा व्यासंग चालू आहे.
देशपांडे, सु. र.
“