हलम : विविध बोली भाषा बोलणारा आदिम जमातींचा एक समुदाय. भारताच्या पूर्व किंवा ईशान्य भागातून स्थलांतरित होऊन हा समुदाय त्रिपुरा राज्यात स्थिरस्थावर झाला आहे. त्यांच्यापैकी काहीजण त्यांची उत्पत्ती आणि अस्तित्व महाभारत काळापासून मानतात. अनुसूचित जमात म्हणून प्रामुख्याने ते त्रिपुरात आढळतात. शिवाय मेघालय, अरुणाचल प्रदेश व आसामच्या करीमगंज जिल्ह्यातही त्यांची वस्ती आहे. तेथे त्यांचा कुकी जमातीत अंतर्भाव करतात. त्यांची एकूण लोकसंख्या ४७,२६१ होती (२००१). हलम याचा अर्थ माणसाला मारणारा असा होतो. पूर्वी ही जमात हिंस्र स्वभावाची आणि परक्या, अनोळखी लोकांस ठार मारणारी होती. त्यामुळे आजूबाजूच्या समाजांत त्यांची ओळख हलम म्हणून झाली.
हलमांची वस्ती त्रिपुरा राज्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागांत अधिक आहे. त्यांच्यावर हिंदू आणि ख्रिश्चन धर्मांचा पगडा आहे. हलम काईपेंग, हलम कलोई, हलम मोलसोम आणि हलम रूपिनी अशा त्यांच्या मुख्य उपशाखा आहेत. पारंपरिक दृष्ट्या पूर्वी त्यांच्या १२ उपशाखा मानल्या जात. काईपेंग आणि मोलसोम हे हलम भाषा बोलतात, तर कलोई आणि रूपिनी हे काकबारक भाषा बोलतात. काईपेंग, मोलसोम आणि कलोई हे समाज स्थलांतरित शेती करतात. रूपिनी लोक हे भटके व गोपालक आहेत. सर्व हलमांमध्ये रूपिनी हे त्रिपुरातील आद्य रहिवासी आहेत. सांप्रत ते पशुसंवर्धन व शेतीकडे वळले आहेत.
काईपेंग आणि कलोई यांचे रोटीबेटी व्यवहार बंगाली आणि त्रिपुरींबरोबर झाले आहेत. काहीजणांनी हलम हे आपले आडनाव म्हणून लावण्यास सुरुवात केली आहे, तर काहीजण आपल्या उपशाखेचे नाव आडनाव म्हणून लावतात.
पारंपरिक वेशभूषेतील हलम युवक-युवती
आसामात हलम हा अल्पसंख्याक वांशिक समुदाय असून येथे त्यांची स्वतंत्र गावे आढळतात. तसेच येथे त्यांचे अधिक उपप्रकार आहेत. हलम भाषेच्या विविध बोली हे लोक बोलतात. बंगाली आणि मोडकी-तोडकी हिंदी भाषाही ते बोलतात. लिहिण्यासाठी ते बंगाली भाषेची लिपी वापरतात. ते मांसाहारी आहेत. घरी केलेली तांदळाची बिअर ते नियमित घेतात.
हलमांच्या प्रत्येक उपशाखेची असंख्य गोत्रे किंवा कुळी आहेत. आजूबाजूच्या सर्वच समुदायांना ते बरोबरीने वागवतात. मुलींचे विवाहाचे वय १८–२० वर्षे, तर मुलांचे वय २५ वर्षांच्या आसपास आहे. मैत्रीतूनही काही विवाह जमतात. वधूमूल्य हे सेवा किंवा पैशाच्या स्वरूपात घेतात. अलीकडच्या काळात हलम स्त्रिया विवाहानंतर कुंकू किंवा शंखाच्या बांगड्या सौभाग्य लेणे म्हणून वापरतात. घटस्फोट, पुनर्विवाह यांस जमातीत मान्यता आहे.
हलम स्त्रीला सामाजिक दर्जा आहे परंतु धार्मिक, राजकीय जीवनात तिला स्थान नाही. बाळाच्या जन्मानंतर पाचव्या-सहाव्या किंवा सातव्या दिवशी जलदेवता आणि सूर्य यांची पूजा करून बाळाचे नाव ठेवले जाते. बाळाला तिसऱ्या किंवा सहाव्या महिन्यात भाताची पेज दिली जाते. मुलाचे लग्न ठरल्यावर त्याचे नातेवाईक आणि मित्र मुलाच्या सासूसासऱ्यांकडून पाहुणचार घेतात. हिंदू हलमांत मृतांना जाळण्याची, तर ख्रिश्चन हलमांत पुरण्याची प्रथा आहे. हलमांच्या प्रत्येक उपप्रकारात परंपरा आणि कर्मकांड यांत थोडा फरक आहे.
संदर्भ : 1. Bhattacharya, S. The Kaipeng, Agartala, 1980.
2. Chaudhary, J. G. The Halams : A Study of a Tribal Community of Tripura, 1982.
3. Dev Varman, S. B. K. The Tribes of Tripura, Agartala, 1981.
4. Singh, K. S. The Scheduled Tribes, Delhi, 1994.
कुलकर्णी, शौनक
“