बिंझवार : भारतातील एक आदिवासी जमात. यांची वस्ती मुख्यत्वे मध्य प्रदेशातील रायपूर व बिलासपूर जिल्ह्यांत व ओरिसा राज्यातील संबळपूर व सुंदरगड जिल्ह्यांत आढळते. त्यांना बिंझिया किंवा बिंझहाळ असेही म्हणतात. महाराष्ट्रात त्यांची बस्ती १३९ (१९७१) असून ती विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यांत विखुरलेली आहे. त्यांची भारतात एकूण लोकसंख्या ६३,८८८ (१९७१) होती, ही जमात बैगा जमातीतून निघाली असून प्रगत बैगा बिंझवार म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि त्यांना पुढे स्वतंत्र जमातीचे स्थान प्राप्त झाले. विंध्यपर्वत रांगांवरून त्यांचे नाव बनले आहे आणि अद्यापि विंध्यवासिनी देवी ही या जमातीची कुलस्वामिनी आहे. ते बिंझिया कोप या विंध्य पर्वातातील प्रदेशातून येथे येऊन स्थायिक झाले. रूढ दंतकथेनुसार त्यांचे पूर्वज म्हणजे बारभाई बेठकर. ते विंध्यवासिनीचे बारा पुत्र मानले जातात. त्यांच्यात बिंझवार, सोंझहार, बिरजीहार आणि बिंझिया अशा चार पोटशाखा आहेत. त्यांच्यात माष, मझी, करजी, पाघन, वजक, मिर्धा, वरासगंझू वगैरे कुळे असून पूर्वी त्यांची वाघ, पोड (महिष), कमालिया (कमळ) इ. देवके होती. काही बिंझवारांनी रामेश्वर, गजेंद्र, नागेश्वर इ. संस्कृत भाषेतील गोत्रनावे घेतली आहेत.

बिंझवारांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून काही बिंझवार शेतमजुरी व ग्रामपुरोहिताचे (झांकार) काम करतात. स्त्रीपुरुष सामान्यतः एकच वस्त्र अंगाभोवती गुंडाळतात आणि केस विंचरत नाहीत. बिंझवार स्त्रीने लग्नानंतर लगेचच अथवा लग्नापूर्वी गोंदवून घेणे आवश्यक असते. दागिन्यांची हौस स्त्रियांना आहे. हे लोक माकड, गाय, बैल, म्हैस यांचे मांस खात नाहीत तथापि डुक्कर, साप, उंदीर इत्यादींचे मांस त्यांना चालते.

यांच्यात सगोत्र विवाह होत नाही. मुलेमुली वयात आल्यानंतर लग्न करतात. त्यांना आपला जोडीदार निवडण्याची पूर्ण मुभा असते. मुलीला पळवून नेऊनही लग्न लावण्याची प्रथा प्रचलित आहे. आते-मामे भावंडांच्या विवाहास अग्रक्रम दिला जातो. वधूमूल्याची पद्धत असून ते धान्य रूपात देण्यात येते. लग्नविधी वराच्या घरी साजरा करतात आणि लग्नसमारंभास रविवारी प्रारंभ होऊन बुधवारी प्रत्यक्ष विवाह होतो. लग्नसमारंभाच्या वेळी लोहार व कुंभार कुळांतील व्यक्ती उपस्थित राहणे, ही बाब आवश्यक मानली जाते. त्यांच्यात बहूपत्नीत्वाची चाल आहे तथापि घटस्फोट रूढ असूनही तो क्वचित दिला जातो.

बिंझवार हे जडप्राणवादी असून ग्रामदेवतांना भजतात. गोंडांच्या बडादेवावरही त्यांची श्रद्धा आहे. दसऱ्याच्या दिवशी ते सर्व शस्त्रांची पूजा करतात. बाण हे या जमातीचे गणचिन्ह आहे. एखाद्या मुलीचे लग्न होत नसेल, तर तिचे बाणाशी लग्न लावतात. दर तीन वर्षांनी विंध्यवासिनी देवीची दसऱ्याला मोठी मिरवणूक काढतात. त्यांच्यात सुगीचा समारंभ (कर्मसमारंभ) भाद्रपद महिन्यात साजरा करतात. भूतपिशाच्यांवर त्यांचा विश्वास असून बैरागी लहान मुलांना कर्णमंत्र देतो आणि गळ्यात तुळशीमाला बांधतो. 

मृतांना ते पुरतात. तिसऱ्या दिवशी दफनस्थळी विशिष्ट विधी करतात या विधीस खारपाणी म्हणतात. लहान मुले आणि अविवाहित यांच्या निधनानंतर मात्र हा विधी करती नाहीत. वयोवृद्ध व थोर व्यक्तींच्या बाबतीत दुसरा एक बडापाणी नामक विधी करतात. अशौच १७ दिवस पाळतात.

 संदर्भ :

1. Maharashtra Census Office, Comp. Scheduled Tribes in Maharashtra, Ethnographic Notes, Bombay, 1972. 

2. Russel, R. V. Hira Lal, Tribes and Castes of the Central Provinces of India, Delhi, 1975.

 देशपांडे, सु. र.