लमाण : भारतातील एक भटकी आदिम जमात. तिची वस्ती महाराष्र्ट, कर्नाटक, तमिळनाडू,राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यांत प्रामुख्याने आढळते. लंवाडा लंबाडी, वंजारा, सुगाळी ह्या नावांनी ते प्रदेशपरत्वे परिचित आहेत. महाराष्ट्रात त्यांना काही जिल्ह्यांत वंजारी व इतरत्र बनजारा किंवा लमाण म्हणतात.

पूर्वी या जमातीचा धंदा व्यापार होता. विशेषतः धान्य व मीठ एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ते बैलावर वाहून नेत असत. ‘लवण’ म्हणजे मीठ वाहणारे, यापासून लमाण हे नाव त्यांना प्राप्त झाले असावे. आज काही भागात लमाण प्रामुख्याने शेती करतात. याव्यतिरिक्त मजुरी व शेतमजुरी हे त्यांचे व्यवसाय आहेत. ते गावाबाहेर आपली स्वतंत्र वस्ती करून राहतात. त्या वस्तीस ‘तांडा’ या नावाने संबोधितात. ‘गोरमुखी’ ही त्यांची बोलीभाषा होय. या बोलीभाषेत द्राविडी भाषासमूहातील शब्द आढळून येतात, असे सर जॉर्ज ग्रीअर्सन यांचे मत आहे.

पुरुष धोतर, शर्ट व पागोटे वापरतात तर स्रिया लाल अथवा हिरवा लहंगा व चोळी परिधान करतात. लहंगा व चोळीवर लहान आरसे लावून नक्षीकाम करतात. डोक्यावर लाल रंगीत ओढणी असते. त्यांच्या हातात हस्तिदंताच्या अथवा हाडांच्या भरपूर बांगड्या असतात.

मुळात हे लोक राजस्थानातील असून मुसलमानांच्या फोजांना रसद पोहचविण्याच्या निमित्ताने ते दक्षिणेत आले व तेथेच स्थायिक झाले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णाच्या लोकांचा भरणा त्यांच्यात आहे. ब्राह्मणांना मथुरिया, वैश्यांना लमाण, राजपूतांना गोर बंजारे आणि भाटांना चारण व धाडी अशी नावे आहेत.

या जमातीत हिंदु, शीख, जैन व मुसलमान धर्माचे लोक आहेत. तिरुपतीच्या बालाजीचे ते भक्त आहेत. महाराष्र्टात काही कुटुंबे नांदेड येथील गुरूद्वारात जाऊन गुरू नानकाची उपासना करतात. भवानी अंबाबाई, मरीअम्मा, बंजारीदेवी, शिवमाया, मारताल, हिंगलज, मिथुभूकिया या त्यांच्या प्रमुख देवता होत.

मूल जन्मल्यानंतर ते नगारा वाजवतात आणि मित्र, भाट व पुजारी यांना साखर वाटतात. पाचव्या दिवशी सत्तीची पूजा करतात. आतेमामे भांवंडांत विवाह होत नाहीत, तसेच मावस भावंडांत विवाह निषिध्द मानतात. लग्नात देज देण्याची पध्दत आहे. बहुपत्नीत्वाची प्रथा रूढ आहे. चरण उप-जमात सोडून इतर उपजमातीत घस्टफोट रूढ आहे. विवाह मध्य रात्री पावसाळ्यात संपन्न होतात.

गोकुळ अष्टमी व होळी हे त्यांचे प्रमुख सण आहेत. विवाहित मृत पुरुष अथवा स्रीस जाळतात व अविवाहित स्री व पुरुषास काही विधी न करता पुरतात. भाद्रपद महिन्यात मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ जेवण देतात.

‘घाडी ’, बंजारांचे वादक व भाट होत. पूर्वजांच्या कथा गाऊन सांगणे, हा त्यांचा प्रमुख धंदा. ते मुसलमान आहेत परंतु विवाहप्रसंगी सरस्वतीची पूजा करतात. मृताला पुरल्यानंतर फकीर प्रार्थना करतात.

जादूटोण्यावर त्यांचा विश्वास आहे. ते मांसाहारी व मद्यपी आहेत. प्रत्येक तांड्याचा एक तांडा प्रमुख असून त्यास ‘नायक’ म्हणतात. त्यांची जात पंचायत असते. नायकाचा निर्णय अंतिम मानला जातो. हे पद वंशपरंपरागत असते.

पूर्वी लमाण हे गुन्हेगार म्हणून ओळखले जात परंतु शिक्षणाच्या प्रसाराबरोबर त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी झाली आहे. महाराष्ट्र राज्यात जातीस ‘विमुक्त जमात’मानले जाते, तर आंध्रप्रदेश राज्यात त्यांची गणना वर्गीकृत जमातीत केलेली आढळून येते.

पहा : वंजारा सुगाळी लंबाडी.

संदर्भ : 1. Enthoven. R. E. Tribes and Castes of Bombay Province. Bombay,1922.

           2. Russel, R. V. Hiralal, Tribes and castes of the Central provinces of India. Vol. III,

                Delhi, 1975.

          3. Thurston, Edgar, Castes and Tribes of Southern India, Vol. IV, Madras, 1965. 

          ४. राठोड, मोतीराज, बंजारा संस्कृती, औरंगाबाद १९७६. 

सिरसाळकर, पु. र.