हरिहर-१ : (सु. तेरावे शतक). भक्तिमार्ग चळवळीतील प्रख्यात कन्नड कवी. त्याच्या पूर्वजीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाहीतथापि पद्मराज पुराण, चेन्नबसव पुराण, भैरवेश्वर काव्यदकथा सूत्र रत्नाकर या समकालीन ग्रंथांतून त्याच्या चरित्राची व साहित्याची ओळख होते. त्याच्या आईचे नाव शर्वणी व वडिलांचे नाव महादेव. रुद्राणी ही त्याची बहीण हंपीच्या महादेव भट्ट यांना दिली होती. विख्यात वीरशैव कन्नड कवी ⇨ राघवांक हा तिचा मुलगा होय. हरिहर होयसळ घराण्यातील राजा नरसिंह बल्लाळ (कार. १२२०–३४) याच्याकडे नोकरीस होता. पुढे ही नोकरी सोडून हंपीला विरूपाक्षाच्या साधनेसाठी तो स्थायिक झाला.
त्या काळात मुख्यतः चंपूशैलीमध्ये काव्यनिर्मिती होत असे. ‘रगळे’ या वृत्तछंदात त्याने प्रथम काव्ये रचली आणि त्याला गौरवपूर्ण स्थान प्राप्त करून दिले. सर्वसामान्यांनाही आपली काव्यभाषा अवगत व्हावी, या दृष्टीने त्याने काव्यात नवीन देशभाषा वापरली. तो क्रांतिकारक कवी होता कारण त्याने काव्याच्या अभिव्यक्तीची रीतीच बदलली. वचन- साहित्यापासून प्रेरित होऊन त्याने काही रचना केल्या. त्याच्या रचना मुख्यतः भक्तिभावपूर्ण आहेत. गिरिजाकल्याण ही त्याची चंपूकाव्य शैलीतील उत्कृष्ट पारंपरिक रचना असून तीत शिवपुराणवर्णन व शिवपार्वतीच्या विवाहाचे वर्णन भावोत्कटतेने चित्रित केले आहे. यातील कथेची नायिका गिरिजा असल्याने ग्रंथाचे शीर्षक त्याने गिरिजाकल्याण असे ठेवले असावे. कन्नडमध्ये कल्याण म्हणजे विवाह. मार्गसंप्रदायीशैली व वचनसाहित्यदृष्टी यांमध्ये स्वतःची एक सहजस्फूर्त शैलीनिर्माण करण्याचा प्रयत्न त्याने या रचनेत केला आहे तथापि तो फारसा यशस्वी झाला नाही. तरीही त्यातून त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व व उच्च प्रतिभेचा आविष्कार प्रत्ययास येतो. त्याची शैली गतिमान, प्रवाही आणि तेजस्वी आहे.
हरिहरच्या मते, भाषा ही लोकांसाठी असते. लोक भाषेसाठी नसतात. परंपरेने चालत आलेली विशिष्ट व्याकरणपद्धती आणि आलंकारिकता यांना त्याने छेद दिला आहे. त्याच्या या सुधारणावादी शैलीचे त्याच्या काळातील कवींनी कौतुक केलेच पण त्याबरोबरच राघवांक, केरेय, पद्मरस यांनी त्याचे अनुकरणही केले. हरि-गिरी, रवि-गिरी, सूरापतिगिरापती असे बोली भाषेतील सर्वपरिचित शब्द त्याने आपल्या काव्या-मध्ये मुक्तपणे वापरले. विलक्षण काव्यशैली त्याला लाभली होती. त्याच्या काळापासून कन्नड काव्यशैलीने आधुनिकतेचे वळण घेतले. कन्नड साहित्यात नवे आकृतिबंध, नवी काव्यशैली निर्माण करून तिला संपन्न करण्यात त्याचा वाटा मोठा आहे. हरिहर हा कवींचा कवी होता. त्याबरोबरच तो सर्वसामान्यांचाही कवी होता.
पोळ, मनीषा