हरितालिका व्रत : एक काम्यव्रत. सौभाग्यप्राप्तीसाठी सुवासिनींनी करावयाचे हे व्रत असून ते भाद्रपद शुद्ध तृतीयेला करतात.या व्रताच्या शास्त्रशुद्ध विधीचे वर्णन कमलाकर भट्ट यांच्या (सु. १६१०–४०) निर्णयसिंधू, तसेच व्रतार्क या निबंधग्रंथांत आढळते. राजमार्तंड या ग्रंथामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीला करावयाच्या ‘हरिता चतुर्थी’ या व्रताचा उल्लेख असून हे व्रत पार्वतीला प्रिय असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील सुवासिनींमध्ये हरितालिकेचे व्रत विशेष प्रचलित आहे.
व्रतविधी साधारणपणे पुढीलप्रमाणे : स्त्रियांनी तेल आणि आवळकाठीचे चूर्ण लावून स्नान करावे. रेशमी वस्त्रे परिधान करावीत. पूजास्थानी वाळूची किंवा मातीची पार्वतीची मूर्ती व शिवलिंग यांची स्थापना करावी. मंगलवाद्यांच्या घोषात पूजेला सुरुवात करावी आणि सौभाग्यप्राप्तीसाठी हरितालिकेचे व्रत करीन, असा संकल्प करावा. गणेशपूजन झाल्यानंतर शिवपार्वतीच्या प्रतिमांची मनोभावे षोडशोपचार पूजा करावी. बांबूच्या पात्रात वायन (वाण), सौभाग्यालंकार व हळदकुंकू इत्यादींचे दान द्यावे. त्या दिवशी अग्नीला लागलेली कोणतीही वस्तू खाऊ-पिऊ नये. फलाहार करावा. रात्री धूपारती करावी. व्रतकथा श्रवण करावी. दुसऱ्या दिवशी पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवावा. अक्षता वाहून देवीचे विसर्जन करावे.
सांप्रतकाळी स्त्रिया पार्वती, शिवलिंग आणि पार्वतीची एक सखी ह्यांच्या मातीच्या रंगीत मूर्तीची पूजा करतात. पार्वतीला तिच्या सख्यांनी (आलिकांनी) घरातून हरण करून नेले होते म्हणून ह्या व्रतास ‘हरितालिका’ असे म्हटले जाते, असा उल्लेख व्रतराज ह्या ग्रंथात आढळतो. तसेच ‘हरितालिका व्रत’ केल्यामुळे पार्वतीला शंकर हा पती मिळाला आणि तिला शंकराच्या अर्धांगाची स्थिती प्राप्त झाली. त्यातूनच अर्धनारीश्वराची संकल्पना प्रसृत झाली व मूर्तीही तयार करण्यात आल्या. वेरूळच्या लेण्यांतील (लेणे क्र.१५) अर्धनारीनटेश्वराची मूर्ती भव्य असून सुबक आहे. या संदर्भातील स्वतः शंकराने पार्वतीला सांगितलेली कथाही व्रतराज या ग्रंथात दिली आहे. पार्वतीच्या विवाहाची विस्तृत कथा वराहपुराणा तही आढळते.
हे व्रत केल्याने मुलींना इच्छित वर मिळतो आणि सुवासिनींना अखंडसौभाग्य, आरोग्य, सुखसमृद्धी व संतती यांची प्राप्ती होते, अशी दृढसमजूत आहे.
पोळ, मनीषा